Uncategorizedराज्य

जाणून घ्या ही आहेत तलाठयांची कर्तव्ये

तलाठयांची कर्तव्ये

  1. 1 ऑगस्ट रोजी नवीन महसुनी वर्षाव प्रारंभ होण्याच्या सुमारास तलाठयाने ज्या ठेवावयाच्या असतात अशा सर्व नोंद त्याने उघडून , पृष्ठांकित कराव्यात व त्या सर्व वहया किमान एक पंधरवडा आधी तहसिलदाराकडे पाठवून 1 ऑगस्ट पूर्वी तहसिलदाराकडून स्वाक्षरित करवून घ्याव्यात .
  2. वार्षिक प्रशासनिक अहवालाच्या संकलनासाठी आवश्यक असलेली माहिती जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख, यांच्याकडे तलाठयाने 1 ऑगस्ट नंतर लगेच पाठवावी . त्या माहितीबरोबरच , ज्यांची मोजमापे घ्यावयाची आहे अशा नवीन हिश्श्यांचे विवरणपत्रही, त्यांची मोजमापे घेण्याची व्यवस्था करण्यासाठी तहसिलदाराकडे सादर करावे.
  3. तलाठ्याने, त्याचवेळी किंवा त्यानंतर ताबडतोब, हंगामाच्या स्वरूपावर लक्ष ठेवावे आणि साप्ताहिक पर्जन्य आणि पिकाची स्थिती यांचे अहवाल तहसिलदारांना सादर करून, त्यांच्या प्रती मंडळ निरीक्षकाकडे पाठवाव्या आणि अशा प्रकारे आपत्ती येण्याचा संभव असल्यास तिच्यासंबंधी अहवाल देण्यास तयार रहावे.
  4. तलाठ्याने त्याचवेळी खरीप पीक आणि कुळवहिवाट व सीमा आणि भूमापन चिन्हे यांच्या निरीक्षणास प्रारंभ करावा आणि 15 ऑक्टोबरपर्यंत ते पूर्ण करावे.
  5. त्यानंतर तलाठ्याने रब्बी पीक आणि कुळवहिवाट आणि सीमा आणि भूमापन चिन्हे यांच्या निरीक्षणास प्रारंभ करून 31 डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करावे.
  6. तलाठ्याने मंडळ निरीक्षकास पिकाची आणेवारी तयार करण्यास व आवश्यक तितके पीक कापणी प्रयोग करण्यास मदत करावी.
  7. तलाठ्याने 15 डिसेंबरपर्यत किंवा पिकांच्या परिस्थितीनूसार त्याच्या आधी, चालू वर्षीच्या जमीन महसूलाच्या तसेच मागील वर्षाच्या तहकूब जमीन महसूलाच्या वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्याचे आदेश मिळवावे. जमीन महसूलाची तहकुबी आणि त्याची वसुली व सूट यासंबंधीच्या जिल्हाधिऱ्याच्या आदेशांना सर्वत्र प्रसिध्दी द्यावी.
  8. दरवर्षी डिसेंबरच्या अखेरीस तलाठ्याने गाव नमुना 8अ अद्यावत करावा आणि गाव नमुना 8ब चा मागणी संबंधीचा भाग जमीन महसूल वसुलीस प्रारंभ करण्यासाठी तयार ठेवावा.
  9. जिल्हाधिऱ्याने नियमान्वये विहीत केलेल्या दिनांकाना तलाठ्याने जमीन महसूल वसुल करावा.
  10. त्या वर्षामध्ये वसुलीसाठी नियत असलेला सर्व जमीन महसूल त्या वर्षाच्या 31 जुलैपूर्वी वसुल केला पाहिजे. आणि कोणतीही अनधिकृत थकबाकी वसुल केल्याशिवाय राहू देता कामा नये, यागोष्टी तलाठ्याने लक्षात ठेवाव्या.
  11. शासनाच्या वतीने त्याला मिळालेल्या सर्व पैशाबद्दल तलाठ्यांने पावती दिली पाहिजे. पावती देण्यात तलाठ्याने कसूर केल्यास, मिळालेल्या रक्कमेच्या दुप्पटीपेक्षा अधिक नसेल इतक्या दंडास तो पात्र राहील. पहा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 77. त्याच्याकडे असलेल्या पावती पुस्तकांचा हिशेब दर्शविणारी नोंद वही त्याने ठेवावी.
  12. तलाठ्याने एक रोकड वही ठेवावी आणि तिच्यामध्ये त्याला मिळालेले सर्व पैसे आणि 15 दिवसाच्या आंत कोषागारात जमा केलेले पैसे हे दर्शवावे. कोणत्याही वेळी रू. 1000 पेक्षा अधिक रक्कम त्याने आपल्या हातात शिल्लक ठेवू नये.
  13. तलाठ्याने वसूल केलेला जमीन महसूल ज्या चलनाखाली शसकीय कोषागारता जमा केला असेल त्या चाृलनामध्येच त्याने जमीन महसुलाच्या वसुलीच्या प्रगतीचा अहवाल तहसिलदाराला द्यावा.
  14. तलाठ्याने वर्षातील सर्व येणे रकमांची वसुली झाल्याबरोबर त्याचे सर्व महसुली लेखे लेखा परीक्षेसाठी (जमाबंदीसाठी) तहसिलदाराला सादर करावे. यामध्ये 31 मे पर्यंत सादर करावयाच्या गाव नमुना अकराच्या गोषवाऱ्याचा देखील समावेश होतो.

15.तलाठ्याने ठेवलेल वर्षचे लेखे बरोबर आणि आवश्यक तेथे तालुका लेख्यांशी जुळणारे आहेत हे तहसिलदाराचे समाधान होईल अशा प्रकारे सिध्द करावे.

  1. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि त्याखालील नियम किंवा त्यावेळी अंमलात असलेला इुसरा कोणताही कायदा यांच्या अन्वये विहित केल्याप्रमाणे किंवा राज्य शासनाच्य आदेशानुसार किंवा राज्य शासन आणि आयुक्त यांच्या सर्वसाधारण आदेशांच्या आधीन राहून जिल्हाधिऱ्याने निश्चित केल्याप्रमाणे सर्व महसुली लेखे आणि रोकड वह्या, कार्यभार अहवाल आणि इतर अभिलेख तलाठ्याने ठेवावे.
  2. जमीन महसुलाच्या थकबाकीची आणि जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसुलीयोग्य असलेल्या सर्व रकमांची वसुली आणि अधिकार अभिलेख ठेवणे यासाठी तलाठी जबाबदार राहील आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि त्याखालील नियम किंवा त्यावेळी अंमलात असलेला कोणताही कायदा किंवा राज्या शसनाचे आदेश यांमध्ये तरतूद केलेली अशी सर्व कर्तव्ये आणि कार्ये तो पार पाडील.

18.तालुक्याच्या वरिष्ठ महसूल किंवा पोलीस अधिकाऱ्याने तसे करण्यास सांगितल्यावर, नोटिसा, आणि फौजदारी बाबीमधील तपासाचे अहवाल,जबान्या आणि तपासण्या यासारखे केंद्र किंवा राज्याशासन किंवा जनता यांच्या उपयोगासाठी आवश्यक असलेले गावाच्या संबंधातील सर्व लेखे तलाठ्याने तयार करावे.

  1. तलाठ्याने,जमिनीच्या वापरामधील बदलाचा दिनांक अधिनियमाच्या कलम 44 च्या पोट-कलम (4) अन्वये त्याला माहिती मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत अकृषिक परवानगीदेणाऱ्या किंवा ज्याने दिली आहे असे मानण्यात येणाऱ्या अधिकाऱ्याला कळवावा.
  2. (अ) गावाची सीमा चिन्हे किंवा भूमापन चिन्हे नष्ट करण्यास किंवा त्यामध्ये अनधिकृत फेरफार करण्यास प्रतिबंध करण्याचा तलाठ्याने प्रयत्न करावा.

(ब) तथापि, गावाची सीमा चिन्हे किंवा भूमापन चिन्हे नष्ट केल्याचे किंवा त्यांमध्ये अनधिकृत फेरफार केल्याचे तलाठ्याच्या निदर्शनास आल्यावर, यासंबंधातील नियमानुसार एक पंधरवड्याच्या आत ती पूर्ववत करण्याबद्दल किंवा दुरूस्त करण्याबद्दल त्याने जमीनधारकांना ताबडतोब नोटीस पाठवावी.

(क) वरील नोटीसीनूसार जमीनधारकाने ती चिन्हे पूर्ववत करण्याबद्दल त्याने जमीनधारकांना ताबडतोब नोटीस पाठवावी.

(ड) त्यानंतर, मंडल निरीक्षकाने ती चिन्हे त्यापुढील एका आठवड्याच्या कालावधीच्या आत पूर्ववत किंवा दुरूस्त करून न घेतल्यास, तहसिलदाराने ती शासनाच्या खर्चाने पूर्ववत किंवा दुरूस्त करून घेण्याची व्यवस्था करावी आणि असा खर्च जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करून घ्यावा; त्याखेरीज जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 145 अन्वये द्यावयाच्या एखाद्या शास्तीसही पात्र राहील.

(इ) पूर्ववत किंवा दुरस्त करताना सीमा चिन्हांच्या एका संचाच्या जागी दुसरा किंवा दुसरे संच घातल्यास, सीमाचिन्हे दर्शविणाऱ्या नवीन व योग्य निशाण्या गाव नकाशांमध्ये दाखवण्यात याव्यात आणि ती गोष्ट जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख याला कळवण्यात यावी. सीमा चिन्हांचे पुढील परिरक्षण व त्याप्रमाणे दुरूस्ती करण्याची कार्यवाही करावी.

  1. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 149 खाली अधिकार संपादनाबद्दलचे मौखिक किंवा लेखी प्रतिवेदन मिळाल्याबद्दल तलाठ्याने संबंधित व्यक्तीला ताबडतोब लेखी पोच द्यावी.
  2. तलाठ्याने अशाप्रकारे त्याला मिळालेल्या प्रत्येक प्रतिवेदनाची फेरफार नोंदवहीमध्ये ताबडतोब नोंद करावी.

23.अधिनियमाच्या कलम 154 खालील नोंद करणाऱ्या अधिकाऱ्याने किंवा कोणत्याही जिल्हाधिऱ्याने कळवलेले संपादन किंवा हस्तांतरण याची तलाठ्याने फेरफार नोंदवहीमध्ये तशाच प्रकारे नोंद करावी.

  1. तलाठी फेरफार नोंदवहीमध्ये ज्या ज्या वेळी नोंद करील त्या त्यावेळी तत्काळ त्याने नोंदीची संपूर्ण प्रत चावडीमध्ये ठळक ठिकाणी लावावी आणि अधिकार अभिलेख किंवा फेरफार नोंदवही यावरून त्या फेरफारांमध्ये ज्यांचे हितसंबंध असण्याचा संभव आहे असे आढळेल अशा सर्व व्यक्तींना, त्याचप्रमाणे त्या फेरफारांमध्ये ज्याचा हितसंबंध असेल असे मानण्यास त्याला कारण दिसेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीला त्याने लेखी कळवावे. त्या पेन्सिलीने लिहावा, आणि फेरफार नोंद रीतसर प्रमाणित करण्यास आलेली नाही असा शेरा त्याने लिहावा.
  2. फेरफार नोंदवहीमध्ये केलेल्या कोणत्याही नोंदीवर तलाठ्याकडे मौखिक किंवा लेखी आक्षेप घेण्यात आल्यास, त्याने विवादग्रस्त प्रकरणांच्या विहित नोंदवहीमध्ये त्या आक्षेपाच्या तपशीलाची नोंद करावी. तलाठ्याने आक्षेप घेणाऱ्या व्यक्तील आक्षेप मिळाल्याबद्दलची विहित नमुन्यातील लेखी पोच ताबडतोब द्यावी.

26.(अ) नोंद प्रमाणित करण्यास समक्ष असलेल्या, अव्वल कारकून किंव मंडल निरीक्षक याच्यापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या महसूल किंवा भूमापन अधिकाऱ्याने फेरफार नोंदवहीमधील नोंद प्रमाणित केल्यावर तलाठ्याने ती अधिकार अभिलेखामध्ये शाईने अभिलिखित करावी.

(ब) सक्षम प्राधिकाऱ्याने फेरफार नोंदवहीमधील नोंद रद्द केलेली असल्यास तलाठ्याने अधिकार अभिलेखात पेन्सिलीने केलेली नोंद खोडून टाकावी.

  1. तलाठ्याने, फेरफार नोंदवहीमधील प्रमाणित नोंदीनुसार संबंधित गाव नमुने आणि त्यांचे गोषवारे हे देखील दुरूस्त करून घ्यावेत. त्याचप्रकारे त्याने आवश्यक तेथे गाव नकाशामध्ये पेन्सिलीने दुरूस्ती करावी. मंडल निरीक्षकाने आवश्यक असल्यास, तपासणीनंतर ती शाईने करावी.
  2. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 151 च्या पोट-कलम 1 अन्वये केलेल्या मागणीप्रमाणे पुरविलेल्या माहितीची किंवा सादर केलेल्या कागदपत्रांची लेखी पोच तलाठ्याने माहिती पुरविणाऱ्या किंवा कागदपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब द्यावी आणि असे कागदपत्र सादर केल्याचे त्यावर लिहून ते सादर केल्याचा दिनांक नमूद करणारी नोंद आपल्या सहीनिशी पृष्ठांकित करावी आणि आवश्यक असल्यास त्या कागदपत्राची एक प्रत ठेवून घेऊन ते ताबडतोब परत करावे.
  3. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे, देणे आणि ठेवणे) नियम, 1971 अनुसार तलाठ्याने अधिकार अभिलेख तयार करावे व ठेवावे.
  4. (अ) शेतजमीन धारकाकडून किंवा जमिनीचा महसूल देण्यास आद्यात: पात्र असलेल्या कुळाकडून लेखी अर्ज मिळाल्यावर तलाठ्याने अशा जमिनीसंबंधीच्या अधिकार अभिलेखाची प्रत असलेली एक पुस्तिका (खाते पुस्तिका) त्याला द्यावी.

(ब) जमिनीच्या महसूलाच्या आणि धारकाकडून किंवा यथास्थिती कुळाकडून येणे असलेल्या इतर शासकीय रकमांच्या प्रदानासंबंधीची माहिती आणि तसेच त्याच्या जमिनीची मशागत आणि गाव लेख्यात दर्शविल्याप्रमाणे पेरणी केलेल्या पिकांची क्षेत्रे यासंबंधीची माहिती आणि विहित करण्यात आलेली किंवा यानंतर विहित करण्यात येईल अशी इतर माहिती तलाठ्याने ही पुस्तिकेमध्ये दर्शवावी.

(क) महाराष्ट्र जमीन महसूल खाते पुस्तिका (तयार करणे, देणे आणि ठेवणे) नियम, 1971 या नावाच्या नियमानुसार तलाठ्याने ही पुस्तिका तयार करावी, द्यावी आणि ठेवावी.

  1. तलाठ्याने, त्याच्याकडे चावडीमध्ये प्रसिध्द करण्यासाठी म्हणून पाठवलेल्या सर्व नोटिसा किंवा आदेश विहित केलेल्या पध्दतीने प्रसिध्द करावे.
  2. तलाठ्याकडे दवंडी पिटवून जाहीर करण्याचे आदेश देऊन पाठवण्यात आलेल्या सर्व नोटिसा किंवा आदेश त्याने दवंडी पिटवून देखील जाहीर करावे.
  3. तलाठ्याने पीक आणि कुळवहिवाट आणि सीमा व भूमापन चिन्हे यांचे निरीक्षण प्रत्येक शेताची त्याच जागी, तेथे त्यावेळी उपस्थित असतील असे गावकरी, ग्रामपंचायतीचे सभासद आणि सरपंच असल्यास, यांच्या उपस्थितीत, प्रत्यक्ष पडताळणी करून करावे. निरीक्षणाच्या वेळी तलाठ्याने पुढील गोष्टींची पडताळणी करावी :-

(1) भोगवटदार, कुळे, इतर अधिकारधारक आणि इतर अधिकार यांची नावे प्रत्यक्ष कब्जाशी जुळणारी आहेत.

(2) उपविभागांचा हिशेब योग्यप्रकारे दाखवण्यात आला आहे व या प्रयोजनार्थ नवीन हिश्श्यांची नोंदवही विहित नमुन्यात ठेवण्यात आली आहे.

(3) “एकाच ओळीत घरे बांधण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम” (प्रिव्हेन्शन ऑफ रिबन डेव्हलपमेंट रूल्स) यांचे योग्य प्रकारे पालन करण्यात आलेले आहे.

(4) भू-प्रदान आणि पट्टे आणि अकृषिक परवानगी यांच्याशी संलग्न असलेल्या शर्तींचे योग्य प्रकारे पालन करण्यात येते.

(5) अतिक्रमणे आणि अनधिकृतपणे अकृषिक उपयोग यांचा तपास लावून अहवाल सादर केला आहे आणि या प्रयोजनार्थ विहित नमुन्यातील अतिक्रमण नोंदवही ठेवण्यात आली आहे;

(6) नकाशे, गाव नकाशा पुस्तक आणि अधिकार अभिलेख यांमधील विसंगतीची प्रकरणे दर्शविणारी नोंदवही अचूक आणि अद्यावत ठेवलेली असून ती शेतातील वास्तविक परिस्थितीशी जुळणारी आहे;

(7) विशेषत: सुधारित बियाणे, दुबार पिके, जलसिंचन पिके, पीक मिश्रणे आणि पडीक जमिनी यांच्या संदर्भात, स्थायी आदेशांनूसार पीक विवरणपत्र काळजीपूर्वक संकलित केले आहे.

(8) सीमा आणि भूमापन चिन्हे चांगल्या दुरूस्त स्थितीत आहेत आणि ती नादुरूस्त स्थितीत असल्यास अधिकार अभिलेखातील शेऱ्याच्या स्तंभात त्यांची नोंंद केली आहे;

(9) पाणीपुरवठ्‌याची साधने पीक विवरणपत्रामध्ये गाव नकाशांमध्ये, आणि गाव नमुना अकरामध्ये योग्यप्रकारेदाखवण्यात आली आहेत;

(10)मळईच्या जमिनींचा आणि पाण्याने वाहून गेलेल्या जमिनींंचा तपास लावून त्यासंबंधीचा अहवाल यथोचितरित्या सादर केला आहे;

(11) शासनाला संकीर्ण जमीन महसूल मिळवून देणाऱ्या लिलावयोग्य बाबींंचा तपास लावून त्यांचा अहवाल सादर केला आहे.

भूमापन क्रमांकांचा किंवा भूमापन क्रमांकांच्या उपविभागाचा प्रत्यक्ष कब्जा धारण करणारी व्यक्ती ही अधिकार अभिलेखातील नोंंदीनुसार जमिनीची मशागत करण्याचा हक्क असलेल्या व्यक्तीहून वेगळी असल्याचे तलाठ्‌याला आढळून आल्यास, त्याने, अधिकार अभिलेखानुसार कब्जा असल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्तीहून वेगळ्‌या असलेल्या कब्जा धारण करणाऱ्या व्यक्तींंच्या नोंंदवहीमध्ये त्याच्या नावाची नोंंद घ्यावी, आणि तिच्यातील संबंधित उतारेआवश्यक त्या कार्यवाहीसाठी तहसिलदाराकडे अग्रेषित करावे. या नोंंदवहीचा नमुना महाराष्ट्रजमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‌या (तयार करणे आणि ठेवणे) नियम, 1971, मध्ये विहित केला आहेे.

जर उपस्थित असलेले गावकरी किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य तलाठ्‌याबरोबर आले नाहीत तर तलाठी आपले वरील कर्तव्य त्यांच्यशिवाय पार पाडील.

  1. कलम 149 अन्वये आवश्यक असलेली सूचना विहित कालावधीमध्ये पाठवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा अधिनियमाच्या कलम 151 अन्वये आवश्यक असलेली माहिती पुरवण्यात किंवा कागदपत्र सादर करण्यात कसूर करणाऱ्या सर्व व्यक्तींच्या नावाची तलाठ्‌याने विलंब शुल्क नोंदवहीमध्ये नोंद घ्यावी आणि नोंदवही प्रमाणन अधिकाऱ्याच्या आदेशार्थ प्रस्तुत करावी.
  2. संबंधित कुळवहिवाट कायदा, आणि मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 याच्या तरतूदींचे उल्लंघन करून झालेल्या व्यवहारासंबंधीचे प्रतिवेदन तलाठ्‌याने तहसिलदाराकडे पाठवावे.

36.तलाठ्‌याने जमिनीच्या सर्व तुकड्‌यांची फेरफार नोंदवहीमध्ये नोंद करावी आणि अधिकार अभिलेख ठेवण्यासंबंधीच्या नियमांनुसार द्यावयाच्या व प्रसिध्द करावयाच्या नोटिसांशिवाय एकत्रीकरण अधिनियमान्वये विहित नमुन्यातील नोटिसा संबंधित व्यक्तींना पाठवाव्या.

  1. तलाठ्‌याने वारसा प्रकरणांची नोंदवही विहित नमुन्यात ठेवावी व वारसासंबंधीच्या नोंदी करतांना हिंदु उत्तराधिकार अधिनियमातील उपबंध आणि वारसांचे चार प्रकार व हिंदू विधवांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासंबंधीचा अधिनियम, आणि मुसलमान जमात आणि इतर जमाती यासंबंधीचे कायदे लक्षात ठेवावे.
  2. तलाठ्‌याने गहाळ दुव्यांची प्रकरणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 151 मधील उपबंधांचा अवलंब करून आणि भूमापन अधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त करून निकालात काढावी.
  3. तलाठ्‌याने त्याच्या सझ्यातील गावांमध्ये घडणाऱ्या पूर, आग, धुके, गारपीट, टोळधाड, माणसांचे किंवा गुरांचे साथीचे रोग, पिकेबुडणे इत्यादींसारख्या नैसर्गिक आणि इतर आपत्तींचा अहवाल मंडल निरीक्षकाकडेआणि तहसिलदाराकडे पाठवावा.
  4. तलाठ्‌याने मुंबई कृषि उपद्रवी कीड आणि रोग अधिनियम, 1947 अन्वये, कोणत्याही गावात कोणतेही कीटक, उपद्रवी कीट, इत्यादींंच्या प्रादुर्भावासंबंधीचा अहवाल जिल्हाधिऱ्याकडे पाठवावा.
  5. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा तलाठ्‌याने एकाधिकार प्रापणाच्या प्रयोजनार्थ शासनाने विहित केलेल्या नमुन्यात शेतकरी सूची पत्रकेतयार करावी व ठेवावी.
  6. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, तलाठ्‌याने गावातील शिधा पत्रिकांची सूची तयार करावी.
  7. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, तलाठ्याने शेतकऱ्याकडून साठृयांसंबंधी प्रतिज्ञापत्र्‌े मिळवावी.
  8. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, जमिनधारक आपल्या धान्याची विक्री शसकीय आदेशानुसार एकाधिकार खरेदी योजनेखाली करतील अशी व्यवस्था तलाठ्याने करावी.
  9. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, तलाठ्याने गावकऱ्यांना शिधापत्रिका द्याव्या.
  10. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, तलाठद्ययाने लेव्ही नोंदवही ठेवावी व खातेदांना मागणी नोटिसा पाठवाव्या.
  11. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, तलाठ्याने दुर्गम प्रदेशातील नागरी पुरवठ्याच्या पावसाळी केंद्राचा गोदामपाल म्हणून काम करावे.
  12. तलाठ्याने सर्व विभगांच्या शसकीय कर्मचाऱ्यांच्या जामीनदारांच्या पतदारीसंबंधी अहवाल सादर करावा.
  13. सार्वत्रिक निवडणूक आणि जिल्हा परिषद अणि ग्राम पंचायती यांच्या निवडणुका यांच्यासाठी तलाठ्याने मतदारांच्या याद्या तयार कराव्या.
  14. तलाठ्याने निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्या निवडणूकविषयक कर्तव्यांमध्ये मदत करावी.

51.गावांमध्ये अल्प बचत कार्यक्रम आयोजित करण्यात अल्प बचत अधिकाऱ्यांना तलाठ्याने मदत करावी.

  1. गावांमधील अल्प बचत योजनेत पैसे गुंतवणारांच्या नावांच्या नोंदवह्या ठेवाव्या.
  2. ग्रामीण ऋणपत्रांची कर्जरोखे विक्री तलाठ्याने करावी.
  3. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दारूबंदी सप्ताह, हरिजन सप्ताह, वनमहोत्सव, इत्यादी साजरे करण्यास मदत करावी.

55.राजपत्रित अधिकाऱ्यांकडून सूचना मिळाल्यावर किंवा अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या बाबतीत तहसीलदाराकडून सूचना मिळाल्यावर, तलाठ्याने निरनिराळ्या शासकीय विभागांच्या निरनिराळ्या शासकीय अधिकाऱ्यंासमवेत उपस्थित राहावे व त्यांना हवी असलेली कोणतीही माहिती पुरवावी.

  1. सर्व भूमापन कामे चालू असताना भूमापन अधिकाऱ्यांना तलाठ्याने आवश्यक ते सहाय्य द्यावे.
  2. तलाठ्याने आपल्या सझ्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी किंवा जिल्हाधिकारी ठरवून देईल अशा इतर कोणत्याही ठिकाणी राहावे; इतरत्र कोठेही राहू नये.
  3. तलाठ्याने एक दैनंदिनी ठेवावी आणि, तपासणी आणि शेरे व/वा अनुदेश देण्यासाठी, वरिष्ठ महसूल आणि भूमापन अधिकारी यांनी मागणी केल्यावर ती त्यांना सादर करावी.
  4. तलाठ्याने एक भेटनोंद पुस्तक ठेवावे आणि ते भेट देणाऱ्या प्रत्येक महसूल आणि भूमापन अधिकाऱ्यासमोर पृष्ठांकन आणि असल्यास शेरा, यासाठी सादर करावे.

60.तलाठ्याने त्याच्या ताब्यातील ग्राम अभिलेखांच्या प्रती किंवा त्यांचे उतारे, त्यांकरिता अर्ज करणाऱ्या हितसंबधित व्यक्तींना, अर्ज मिळाल्यापासून 24 तासांच्या आत, नक्कलशुल्क घेऊन द्यावे आणि अशा रीतीने वसूल केलेल्या शुल्काचा हिशेब ठेवावा.

  1. तलाठ्याने तगार्ठ आणि इतर सर्व शासकीय येणी यांचे लेखे त्याकरिता विहित केलेल्या नमुन्यात ठेवावे.

62.ज्या प्रयोजनार्थ तगाई कर्जे देण्यात आली असतील त्यांकरिताच ती वापरण्यात येतात किंवा कसे ते तलाठ्याने तपासावे, आणि कोणताही गैरवापर त्याच्या निदर्शनास आल्यास त्यासंबंधी तहसीलदाराकडे अहवाल पाठवावा.

63.तलाठ्याने आपल्या ताब्यातील सर्व शासकीय मालमत्तांची नोंदवही ठेवावी, आणि तपासणी व सहीसाठी ती निरीक्षण अधिकाऱ्याला सादर करावी.

  1. तलाठ्याने पोष्टाच्या सरकारी तिकिटांची नोंदवही विहित केलेल्या नमुन्यात ठेवावी.
  2. त्या त्या वेळी अंमलात असलेला कोणताही कायदा किंवा नियम, किंवा शासनाने वेळोवेळी काढलेले सर्वसाधारण किंवा विशेष आदेश, किंवा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले कोणतेही निदेश याअन्वये विहित केलेली सर्व कर्तव्ये तलाठ्याने पार पाडली पाहिजेत.

वि. वा. येलवे
वकील उच्च न्यायालय मुंबई
🎯८८९८३४३२८९

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button