स्प्रुट लेखन

काळाच्या पडद्याआड हरवलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ (माई) यांचा संघर्षमय जीवनप्रवास

संघर्षातून विश्व निर्माण करणा-या अनाथांचा सूर्य मावळला

काळाच्या पडद्याआड हरवलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ (माई) यांचा संघर्षमय जीवनप्रवास

विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील अतिदुर्गम जंगल भागातील पवित्रभूमी नवरगाव या अतिशय मागासलेल्या गावी 14 नोव्हेंबर 1947 रोजी साठे कुटूंबात चिंधी (सिंधू) नावाच्या कन्यारत्नेचा जन्म झाला. गावच खूप मागासलेलं त्यामुळे परिस्थितीचा विचारच न केलेले बरा! जंगलभाग असल्यामुळे या गावाला शहरी सुविधांचा स्पर्शच नव्हता. त्यामुळे साहजिकच शिक्षणाचा कुणाला गंधच नाही, अशीच सगळी परिस्थिती होती. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुरे वळायचं काम करत होते. चिंधी (माई) ही सर्वात मोठी मुलगी होती. त्यांच्या पाठीमागे एक भाऊ व एक बहीण. मुलीनं शिकावं अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्या पाच वर्षाच्या असताना त्यांचे वडील त्यांना घेऊन पिंपरी या गावी वास्तव्यास आले. परंतु त्यांच्या आईचा मात्र शिक्षणाला सक्त विरोध होता. माई मुळच्याच बुद्धिमान त्यामुळे शिक्षणाची त्यांनाही आवड होती. परंतु आईच्यापुढे त्याही हतबल झाल्या. त्यांची आई त्यांना गुरे राखायला रोज सकाळी बाहेर पाठवायच्या. गुरे राखण्याच्या बहाण्याने का होईना माई शाळेत जाऊन बसायच्या. असं करत त्यांना जेमतेम चौथ्या वर्गापर्यंत शिकता आलं. त्यानंतर अल्पवयातच वयाच्या 11व्या वर्षी त्यांच्यापेक्षा वयाने 30 वर्षाने मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी विवाह झाला आणि चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली.
माहेरची परिस्थिती जशी हलाकिची होती अगदी तशीच सासरची पण होती. त्यामुळे त्यांना प्रचंड सासरवास सहन करावा लागत असे. घरात सगळे पुस्तकद्वेष्टे असल्यामुळे गुरांसारखी मेहनत करावी लागत होती. वाचनाची त्यांना आवड असल्यामुळे जंगलातील लाकूडफाटा, शेण गोळा करताना मिळालेले पेपरचे किंवा पुस्तकाचे तुकडे माई घरी आणायच्या व उंदराच्या बीळात लपवून ठेवायच्या. घरी एकट्या असताना कामातून क्वचित सवड मिळताच त्या अक्षरांवरून अधाशासारख्या नजर फिरवायच्या. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपण झाली होती. परंतु त्या चौथ्या वेळी गर्भवती असतांना त्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिला संघर्षमय लढा लढावा लागला. “तेव्हा गुरं वळणं हाच व्यवसाय असायचा.” गुरेही शेकड्यांनी असायची. त्याचं शेण काढता काढता कंबरडं मोडायचं. त्यामुळे शेण काढून स्त्रिया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल त्यांना कोणतीही मजूरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम टाकणा-यांना मजूरी पण शेण काढणा-यांना नाही. या शेणाचा लिलाव वनखात्यावाले करायचे. या विरोधात त्यांनी बंड पुकारला होता. त्यांचा लढा सुरू होताच लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्या हप्त्यावर अंकुश लागला.
माईंनी हा लढा जिंकला होता. पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. माईंच्या या धाडसी कार्याने गावातील जमीनदार दमडाजी असतकार दु:खावला गेला. वनविभागाकडून मिळणारी मिळकत बंद झाली होती आणि अडाणी गावक-यांना नवीन नेतृत्व मिळालं होतं. त्यामुळे गावकरी दमडाजीला डोईजड होण्याची शक्यता होती. माईंचा सुड घेण्याच्या बेताने दमडाजीने माईंच्या पोटातील बाळ आपलंच असल्याचा प्रचार सुरू केला. ही गोष्ट माईंच्या पतीच्या कानापर्यंत पोहोचताच त्यांच्या मनात माईंच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. मग त्यांनी पूर्ण दिवस भरलेल्या माईंना बेदम मारहान करून घराबाहेर काढलं. एवढंच नाही तर अर्धमेल्या अवस्थेतील माईंना गुरांच्या गोठ्यात मरणाच्या दारात टाकलं. त्याच अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली.
पतीने हाकलल्यानंतर गावक-यांनीही त्यांना हाकलून लावलं. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या, पण इथेही सख्या आईने पाठ फिरवली. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागायची वेळ माईंवर आली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वेस्टेशनवर त्या भीक मागत फिरू लागल्या. चतकोर भाकर, उष्टावलेलं एखादं फळ हाती लागेल या विचाराने रात्रभर रेल्वेरुळांच्या काठाने फिरत असायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पण “सोबत असलेल्या आपल्या लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल” या अंतर्मनातील हाकेने माघारी फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणं असा दिनक्रम सुरू झाला.
माई दिवसभर गात भीक मागायच्या आणि रात्रीला स्टेशनवच झोपायच्या. पण तिथेही त्यांनी कधी एकटं खाल्लं नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिका-यांना बोलावून मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग त्यांच्या समवेत एकत्र बसून जेवायच्या. स्टेशनवरील भिका-यांनीच मग माईंना संरक्षण दिले. माईंभोवती रिंगण घालून ते झोपायचे. पण एके दिवसी 21 वर्षांच्या माईंचे हे संरक्षणही संपले. दोन दिवस काहीच भीक न मिळाल्याने त्यांच्याबरोबर जेवणारे भिकारी त्यांच्यापासून दूर झाल्याचं त्यांना जाणवलं आणि त्यांच्या लक्षात आलं की इथे आता आपल्याला कायम राहता येणार नाही. त्यामुळे त्यांनी वाट फुटेल तिथे चालत राहिल्या. पण आश्रय कुठेच मिळाला नाही. उघड्यावर तर रात्री झोपणं शक्य नव्हतं, म्हणून माईंना सुरक्षित वाटलेलं स्मशान गाठलं. त्या स्मशानातच राहू लागल्या. वास्तव्याचं ठिकाण मिळालं, पण पोटातल्या भुकेचं काय? तेवढ्यातच अंत्यसंस्कारासाठी तिथे एक मृतदेह आला. अंत्यसंस्कार झालं, मडकं फुटलं पण मडक्यात थोडं पाणी तसंच राहिलं होतं. अंत्यविधी करून लोक परतायला लागले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे मागे चालू लागल्या. एकाला त्यांची दया आली व त्यांनी माईंना थोडं पीठ नि सव्वा रुपया दिला. भिन्न काळोख दाटला होता आणि चिता अजूनही धगधगत होती. माईंच्या पोटात भूक इतकी पेटली होती की, “एखादा दगडही खाल्ला असता, तरी ते भाकरीसमान वाटलं असतं.” मग माईंनी मडक्यातल्या त्या पाण्यात पीठ भिजवले आणि चितेवरच्या निखा-यावर भाजले व कडक भाकरी तशीच खाल्ली.
माई काही दिवसांनी तिथूनही बाहेर पडल्या. भीक मागत, काम शोधत चिखलद-याला पोहोचल्या. तिथे रस्ताबांधणीला सुरुवात झाली होती. स्थानिक आदिवासी आणि मध्य प्रदेशातील मजूर तिथे काम करत होते. माईंनी तिथे काम मागितले. परंतु कंत्राटदाराने माईंना कामावर ठेवण्यास नकार दिला होता. परंतु सकाळ-संध्याकाळ कुटकी, डाळ आणि आठवड्यातून एकदा ताक या बोलीवर तेथील मजुरांची मुलं सांभाळण्यास सुरुवात केली. चिखलद-याचं काम संपल्यावर हे मजूर पुण्याला निघाले. त्यामुळे माई पण त्यांच्यासोबत निघाल्या. पुण्याला आल्यानंतर एकदा असंच कुठेसं माईंना एक मुलगा रस्त्यावर रडत दिसला. आपलं नाव दिपक गायकवाड एवढंच त्या मुलाला सांगता येत होतं. आसपासच्या लोकांनाही त्याच्याविषयी काहीच माहिती नव्हती. मग त्या मुलाला घेऊन माई पोलीस स्टेशनला गेल्या. तर पोलीसांनी माईंना हाकलून लावलं. माईंनी संपूर्ण आठवडा पोलीस स्टेशनबाहेर बसून काढला. पण पोलीसांनी साधी तक्रारही नोंदवून घेतली नाही. माईंनीच मग त्या मुलाचा सांभाळ करायचं ठरवलं.
पुढे महिनाभरात अशीच 2-3 मुलं त्यांना रस्त्यावर भीक मागतांना भेटली आणि माईंनी त्यांनाही आपल्या पदराखाली सामावून घेतलं. निराश्रिताचं जगणं किती भयंकर असतं ते त्यांनी अनुभवलं होतं. त्यामुळे ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये, ही त्यांची इच्छा होती. या मुलांमुळे आपल्याही जगण्याला काही अर्थ मिळेल असं त्यांना वाटलं होतं. पण या मुलांचा सांभाळ करायला पैसा कुठून आणायचा? स्वत:चंच पोट तिथे भरलं जात नव्हतं आणि आता सोबत 4 मुलं होती. पण त्या मुलांनी भीक मागणं माईंना मंजूर नव्हतं. नेमक्या त्याचवेळी भारत-रशियाच्या ऐतिहासिक मैत्री करारावर पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात कडेकोट बंदोबस्तात मोठा समारंभ आयोजित केला होता. माईंच्या लक्षात आलं की, आपण इथे व्यासपीठावर जाऊन दोन शब्द जर बोलू शकलो तर निश्चितच इथे जमलेल्या हजारो प्रेक्षकांच्या मनात आपण जागा करू शकू आणि मग आपल्या संकटातून मार्ग निघू शकेल. त्यांनी संधी मिळताच हळूच सभागृहात प्रवेश केला. पण कामवाली असेल म्हणून कुणीच त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यावेळी व्यासपीठावर एक काश्मिरी माणूस आपल्या व्यथा सांगत होता. तो आपले भाषण संपवून खाली उरताच माईंनी थेट व्यासपीठावरच उडी घेतली. दुसरा वक्ता उठायच्या आत माईंनी माईक धरला आणि आपलं भाषण सुरू केलं. त्यांचा खणखणीत आवाज आणि कविता ऐकून सगळेच स्तब्ध झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि माईंना जे हवं होतं ते मिळालं. आता त्यांना मदत नक्कीच मिळणार होती. कार्यक्रम संपताच श्री. सुनील दत्त समोर येऊन माईंशी हस्तांदोलनच केले. त्यावेळी माई तर थक्कच झाल्या. अशाप्रकारे सर्वजण माईंचं कोतुक करत होते, पण त्यांच तिकडे लक्ष नव्हतं. कारण त्यांना खूप भूक लागली होती. शेवटी त्यांनी हळूच विचारलं,”खाना है क्या?” कार्यक्रमानंतर आमंत्रितांसाठी बडा खाना मांडलेलाच होता. मग माईंनी पूर्ण ताट भरून अन्न घेतलं आणि तिथेच जमिनीवर बसून जेेवू लागल्या. एवढं ताटभर अन्न त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं होतं.
माई जेवण करत असतानाच दगडूशेठ हलवाई मंदिर समितीचे तात्यासाहेब गोडसे तिथे आले नि त्यांची विचारपूस केली. तात्यासाहेबांनी माईंची मुलगी ममताला सांभाळण्याची तयारी दर्शवली आणि ममता पुण्याच्या सेवासदनमध्ये दाखल झाली. त्याच कार्यक्रमात आकाशवाणीचे यशवंत खरातही होते. माईंचा खडा आवाज त्यांनी ऐकलाच होता. त्यांनी माईंना आकाशवाणीवर कार्यक्रम करायला आमंत्रित केलं. मग माई मुलांना सोबत घेऊन मुंबईला निघाल्या. पण स्वत:च्या मुलीला माईंनी दुस-यांना सांभाळायला का दिलं? यावर माईंनी अतिशय मार्मिक उत्तर दिलं,”रस्त्यावर बेवारस सोडलेली मुलं माझ्याकडे सांभाळायला होती. मी जे काही सोसलं होतं, त्यानंतर माझा हा मार्ग मी निश्चित केला होता. माझ्या मुलीला मी त्यांच्याबरोबर सहज सांभाळू शकले असते. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर मी काय केलं असतं? ज्या मुलांना मी सांभाळणार होते, ती मुलं तशीच पाणी पिऊन झोपली असती. पण माझी मुलगी त्यांच्याबरोबर असती तर माझी माया जागृत झाली असती. तिला मी अंधारात नेऊन गुपचुप दोन घास खाऊ घातले नसते का? मला हा अन्याय करायचा नव्हता. म्हणूनच मी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातले आणि पुढे निघाले. माझ्यातली आई चुकली असती तर मग माझ्याकडून इतर मुलांचा साभाळ झाला नसता.”
आकाशवाणीवर गाऊन माईंना 350 रु. महिना मिळू लागले. दूरदर्शनवरही त्यांच्या गाण्याचे दोन कार्यक्रम झाले. जमा झालेले सर्व पैसे घेऊन माई चिखलद-याला परतल्या व तिथे एक झोपडी बांधून त्यांनी आपला आश्रम थाटला. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. रस्त्यावर सापडलेली, कचराकुंडीत फेकलेली, अनाथ झालेली मुलं माईंनी आपली मानून चिखलद-याला आणली. त्याचवेळी महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरील मेळघाटच्या जंगलात व्याघ्र प्रकल्पासाठी स्थान निश्चिती होती. या प्रकल्पासाठी जंगलातील 84 गावातील आदिवासी निर्वासित होणार होते. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवासींची बाजू शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. पण कुणीच लक्ष देत नाही हे पाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर 2-3 मोर्चेही नेले. तेव्हाचे वनमंत्री छेडीलाल गुप्ता यांच्या कानावर हा प्रकार गेला. त्यांनी आदिवासींचे पुनर्वसन झाल्याशिवाय व्याघ्र प्रकल्प सुरू होणार नाही, असं आश्वासन माईंना दिलं. अजून एक लढाई माई जिंकल्या, पण अशा कित्येक लढाया रोजच त्यांना लढाव्या लागत होत्या.
चिखलद-याचा परिसर ख्रिश्चन मिशन-यांनी व्यापला आहे. माईंचं अनाथाश्रम त्यांना या परिसरात नको होतं. म्हणून त्यांनी माईंवर अनेकदा दबाव आणला होता. “तुझी मुलं आम्हाला दे, आम्ही तुला पैसे देताे.” असा निरोप अनेकदा त्यांच्याकडून आला. मेळघाटच्या जंगलात मजा करायला येणा-या राजकारण्यांसाठी बंगल्यावर मुली पाठवण्यास दडपण आणल्या गेलं. शिवाय ही मुलं हिसकावून घ्यायचा प्रयत्नही झाला. तेव्हा मात्र माई अक्षरश: चवताळून उठल्या. अमरावतापासून ते थेट दिल्लीपर्यंत तक्रारी केल्या, पण उपयोग शुन्य. कारण आपल्याला तर माहितच आहे की, या राजकारण्यांच्या हुकूमशाही व राजेशाहीपुढे समाजसेवकांच्या लोकशाहीचं काहीच चालत नाही. एवढं होवूनही माई चिखलद-यातून पळ काढत नाही, हे पाहून मिशन-यांच्या गुंडांनी माईंवर हल्ला केला. एकाच महिन्यात दोनदा हल्ले झाले. तरीही माई खंबीर होत्या. परंतु जेव्हा माई मुंबईला निघाल्या, तेव्हा त्यांच्यावर तिसरा हल्ला झाला. त्यात त्या जबर जखमी झाल्या. त्यानंतर मात्र माईंनी त्या परिसरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
माईंचा पहिला मुलगा दिपक त्यांना पुण्याला सापडला होता. माईंच्या एका मुलाखतीत दिपकचा उल्लेख वाचून सासवडहून कुणीतरी त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत चिखलद-यात आले होते. दिपकच्या आजोबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी थोडी जमीन आपल्या बेपत्ता, अनाथ नातवासाठी ठेवली होती. दिपकने आता आपल्या गावी परत जावं. अशी त्या नातेवाईकांची व माईंची इच्छा होती. पण दिपकने या गोष्टीला नकार दिला. माईंनीच त्याला वाढवलं होतं आणि त्यांना सोडून कुठेही जाण्याची त्याची तयारी नव्हती. मात्र मिशन-यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दिपक, माई आणि अनाथाश्रमातील मुलांसकट बाहेर पडला. सासवडजवळील कुंभारवळण हे आपलं गाव गाठलं आणि आजोबांनी नावे करून दिलेल्या जमिनीवर “ममता बाल सदन” उभं केलं.
आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत. 1042 मुलं तिथे राहतात. काही वर्षापूर्वी माई परत चिखलद-यास परतल्या आणि तिथे मुलींचं वसतीगृह सुरू केलं. आज 100 मुली तिथे राहून शिक्षण घेतात. माईंना आज रोजी 1500 मुलं आहेत. दोन दिवसाच्या मुलापासून 72 वर्षाच्या वृद्धापर्यंत सगळीच त्यांची मुलं आणि विधवा, परित्यक्ता व मनोरुग्ण या त्यांच्या लेकी आहेत. माईंच्या मुलींचं आडनाव साठे, तर मुलांचं आडनाव सपकाळ असतं. माईंना 400 सुना आणि 200 जावई आहेत. बरीचशी मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी आहेत. “माझी मुलं डाॅक्टर, वकील, शिक्षक आहेत.” हे सांगतांना त्यांचा चेहरा फुलून येत होता. माईंच्या मुलांची, नातवंडांची लग्न, बारसं तर नेहमीचीच असत. शिकून नोकरीला लागलेली मुलं दूर गेली, तरी माईंच्या ओढीनं ती परत येत असत. माईंशिवाय आयुष्य जगणं त्यांच्यासाठी संभवच नव्हतं.
याशिवाय वर्धा जिल्ह्यात एक वृद्धाश्रम, गोरक्षण केंद्र आणि परित्यक्तांसाठी चिखलद-याला वसतीगृह माईंनी सुरू केलं आहे. माई सांगायच्या,” सर्वांनी, जन्मदात्या आईनंही पाठ फिरवली तेव्हा गोठ्यातल्या गाईनं मला संरक्षण दिलं. म्हणून मी गायीलाच माझी माय मानलं. तुझ्या ऋणातून उतराई होईन, असं मी तिला वचन दिलंय.” वर्ध्याच्या गोरक्षण केंद्राच्या रूपानं माईंनी आपलं वचन पाळलं. आज रस्त्यावर सोडलेल्या भाकड गायींचा व कावळ्यांनी डोळे फोडून जखमी केलेल्या गायींचा सांभाळ या केंद्रात केला जातो. 30 वर्ष राज्यभर फिरून, भीक मागून, भाषणं करून आणि कविता म्हणून माईंनी त्यांचा संसार उभा केला होता. गाण्यानं, कवितेनं माईंना जगवलं आणि कालही कविताच त्यांचा आधार होता. बहिणाबाई, सुरेश भटांच्या कविताचं ऋण त्या मान्य करत. “या साहित्यिकांनीच मला दु:खातून बाहेर काढलं आणि सांगितलं, व्रण जपत रहा, गात रहा, पुढे जात रहा. साहित्य माणसाच्या पायात बळ देतं, जखमा पुसतं, बेभान करतं, उन्मत्त करतं. कवितांमुळेच माझ्या वेदना मी विसरू शकले.” असं माई नेहमी सांगत असत. त्या उत्तम कवयित्री होत्या. त्यांच्या कवितेतही ही वेदना जाणवत असत. “वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते. वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते”, असं माई सांगत असत. माईंनी आता सत्तरी ओलांडली होती. दिपक आणि ममता ही त्यांची मुलं त्यांच बरचसं काम आता सांभाळत आहेत. ममताने एमएसडब्ल्यू केलं आहे. ‘सख्खी आई जिवंत असताना अनाथाश्रमात टाकलं आणि इतरांच्या मुलांना सांभाळलं.’ म्हणून आपली मुलगी आपल्याला बोल लावेल, याची माईंना सतत भीती वाटत असे. पण ममताला आपल्या आईने केलेल्या त्यागाचं मोल माहित होतं. माईंनी उभ्या केलेल्या पसा-याचा तिला प्रचंड अभिमान आहे.
ममता प्रमाणेच आपल्या इतर मुलींनी शिकावं म्हणून माई सतत झटत होत्या. ‘स्त्री कधीही हरणार नाही. कारण तिला वेदना म्हणजे काय? ते ठाऊक असत.’ विदर्भात कित्येक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. पण एकातरी शेतक-याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे का? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही. कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवते. स्त्रीचं आयुष्य कसं असतं? मंदिरात ठेवाल तर नंदादीप, मुठीत धराल तर आग. पण तरीही स्त्रीच कायम वेठीस धरली जाते. रमाबाई, पुतळाबाईंपासून ते रुपकंवरपर्यंत असंख्य स्त्रिया सती गेल्या. परंतु समाजात आजपर्यंत एक तरी सत्या झाल्या आहे का? विलक्षण नाट्यमय आयुष्य जगलेल्या माई ‘वेदनांची कीव करून त्यांचा पराजय कसा करायचा’, हे असं सहजपणे सांगून जायच्या. ‘चिखल आणि पाण्याचं जे नातं, ते दु:खाचं माझ्याशी आहे. या चिखलातच म्हणजे ओल्या मातीतच बीज अंकुरतं. पण असा ओलावा मला कधीच मिळाला नाही. मी खडकावरच रुजले. म्हणून माझी मूळं पक्की, चिवट आहेत. त्यामुळे मी कधीच पडणार नाही.’
माईंनी केलेल्या संघर्षाची पावती म्हणून त्यांना आजपर्यंत 172 पुरस्कार मिळाले आहेत. पण ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी बेघर व्हावं लागलं. त्या पिंपरीमधील गावक-यांनी माईंचं कौतुक केलं आणि त्यांना आश्चर्यच वाटलं. माईंनी छेडलेल्या आंदोलनामुळेच आज गावक-यांना शेणासाठी महिना हजार रुपये मिळतात. आपल्या गावातील एक स्त्रीने देशात नाव काढलंय, याचा त्या गावक-यांना अभिमान आहे. ‘जो गाव त्यांच्यावर थुंकला, तोच गाव त्यांच्या नावाने आज जयजयकार करतो. त्यांचं नाव झाल्यावर त्यांचे पतीही त्यांच्याकडे आले. त्यांना सांभाळणारं कुणीच नव्हतं. माईंनी त्यांना सांगितलं की त्या त्यांची आई होऊ शकेन, पण पत्नी मात्र कधीही नाही. पटत असतील तर रहा. त्यांच्या आश्रमातील मुलं त्यांचा नीट सांभाळ करतात.’ ‘हे निखारे मी स्वत:हून पदरात बांधून घेतले आहेत. जिवंत असेपर्यंत मी त्यांची राख होऊ देणार नाही,’ असं म्हणत न थकता माई काम करत असत. कसल्यातरी विवंचनेत सतत असत. जिंतूरचे एक डाॅक्टर माईंकडे एका 10 वर्षाच्या मुलाला घेऊन आले व सांगितले की या मुलाच्या ह्रदयात दोष आहे. डॉक्टरांना तो रस्त्यावर भीक मागताना सापडला. त्यांनी त्याला माईंकडे आणून सोडलं. निलेश असं त्याचं नाव आहे. अतिशय तल्लख बुध्दी, अफाट स्मरणशक्तीचा जेवढा धनी तेवढाच समजूतदार आहे. योग्य उपचार झाले नाहीत, तर तो फार जगेल असं डॉक्टरांना वाटत नाही. उपचारांसाठी लाख-दोन लाख कुठून आणायचे, याच चिंतेत आता माई होत्या. ‘मला 172 पुरस्कार मिळाले. पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही.’ म्हणून माई कालही लोकांसमोर पदर पसरत होत्या. चारपैकी एकाच अनाथाश्रमाला सरकारी अनुदान मिळतं. सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना माईंची दमछाक होत होती.
‘गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही,’ असं म्हणत. आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर फिरत होत्या. माईंनी अनाथ मुलं वाढवली. त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं आणि जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. ‘निराश्रित’, ‘बेवारस’ असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं, ते इतरांनाही मिळावं. म्हणून त्यांची धडपड सुरू असते. ‘देवा आम्हाला हसायला शिकव. परंतु आम्ही कधी रडलो होतो, याचा विसर पडू देऊ नकोस’, हे माईंनी त्यांना शिकवलं आहे.
सावली दिली वृक्षापरी
होऊन माय अनाथांची
सोसले दु:ख जीवनात
कहानी एका दिव्यमूर्तीची
या ईश्वररूपी महान व्यक्तीमत्त्वाबद्दस कितीही सींगितलं तरी त्यासाठी शब्दही अपूरे पडतात. ह्रदयाला स्पर्श करणा-या प्रत्येक शब्दाने नयन ओथंबून वाहायला लागतात. या महान व्यक्तीमत्त्वाच्या कार्याला नतमस्तक प्रणाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली!
पुन्हा अनाथ झाली गं
माई तुझी ती लेकरे
कुठे शोधायची छाया
स्थान दिसेना दुसरे

 

शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणध्वनी-7057185479

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button