ग्रामीण राजकारणातील महत्वकांक्षी वलय कै.दत्तरामजी माने यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने…
जन्माला तर अनेक माणसे येतात ;पण कार्यकर्तुत्व मात्र त्याच माणसाचं कायम राहते जी माणसं अतिसामान्यातून असामान्याची लोकोपयोगी वहिवाट निर्माण करतात.त्यापैकीच एक कोणशीला म्हणजे कै. दत्तरामजी रानबाजी माने (वजीरगावे) होते. हदगाव तालुक्यातील डोंगरपायथ्याशी वसलेल्या शिवपुरी या गावातून ग्रामीण राजकारणाच्या दिशा पेरणारं हे महत्वकांक्षी नेतृत्व ज्या गावांनी गमावले त्या दु:खमय घटकेला आज वर्ष लोटत आहे.सर्वसमावेशक राजकारण, धर्म,समाजकार्य, आणि कटू प्रसंगी डोळ्यासमोर उभा राहणारा आशावाद ज्या गावातून लोप झाला तो संपूर्ण गावच गहिवरून गेला होता. इतके जनमानसात रुजलेल्या या माणसाने ग्रामपंचायतीच्या राजकारणाची परिभाषाच बदलून टाकली. खरे तर दिल्लीचे राजकारण अवघड पण गल्लीचे राजकारण मात्र सर्वाधिक अवघड असते
ही बाब सर्वश्रुत असली तरी तब्बल तीन दशकापेक्षा अधिक काळ ग्रामपंचायत राजकारणात ठाण मांडणाऱ्या कै. दत्तारामजी माने यांच्या बाबतीत ही बाब अपवाद ठरते. याचे कारण म्हणजे त्यांनी केवळ राजकारणच केले नाही तर राजकारणापलीकडे निर्माण केलेला भावस्पर्शी ऋणानुबंध होता.खरे तर ज्या गावातील लोकांत ऋणानुबंध असतो ते गाव गाव न राहता घराची प्रचलित देते.गेली तीन दशके ज्या माणसाला लोकांच्या मनात घर करता आले , त्या माणसाला राजकारण करण्याची गरज भासली नाही तर राजकारणच त्या माणसाभोवती फिरल्याचा इतिहास शिवपुरी आणि समस्त पंचक्रोशीच्या ग्रामीण राजकारणात कै. दत्तरामजी माने यांनी कोरला आहे.
प्रचंड जनसंपर्क, बोलण्यात स्पष्टता ,अंगभूत चपळाई यासारख्या उपजत गुणांनी भरलेल्या या माणसांने गावच्या माणसांच्या कठीण प्रसंगात नेहमीच धाव घेतली. या विशेष बाबी आजही तितक्याच बळ देणार्या वाटतात. गेली तीस वर्षापासून शिवपुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रदीर्घपणे केलेली जनसेवा गावच्या विकासात भर घालणारी आहे. राजकारणात विविध खेळी खेळल्या जातात.परिणामी बहुतांश गावचे राजकारण इतक्या खोलात जाते की, लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. वाद -विवाह,कलह भांडण-तंटे,सुडाच्या राजकारणातून पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या या पातळीवर गावचे राजकारण पोहोचते ;मात्र गेली ते तीस वर्षापासून कोणत्याही वाद-विवादाशिवाय केलेले यशस्वी राजकारण हे आजच्या तरुणांना प्रेरणा देणारे आहे.कै. दत्तरामजी माने यांनी स्वतःला काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ ठेवत त्यांनी आपली एक वेगळीच ओळख तालुका स्थरावर निर्माण केली होती. त्यांच्या राजकारणाबरोबरच एकूणच व्यक्तिमत्त्वाबद्दल विविध मतमतांतरे नेहमीच वर्तवली गेली. कोणी म्हणत ‘ ग्रामपंचायतीच्या राजकारणातील ते शरद पवारांसारखं राजकारण करून गेले. तर कोणी म्हणत ‘त्यांना गावच्या आणि गावातील प्रत्येक घराघरातील माणसांची नाडी ओळखता आली’. इतका प्रभाव दत्तरामजी माने यांनी आपल्या संपूर्ण जीवन कारकिर्दीत उमटवला होता. या एकंदरीत बाबतीत दत्तरामजी माने यांच्या बद्दल असेच म्हणता येईल की, ” गावच्या राजकारणात कोणत्याही परिस्थितीत सिंहासन राखून ठेवणारा खिलाडी म्हणजे कै. दत्तरामजी माने हे व्यक्तीमत्व शिवपुरीच्या नेतृत्वात दीर्घकाळ अधिराज्य गाजवत राहिले होते. शिक्षणाप्रती त्यांची असणारी आस्था ही गावच्या शैक्षणिक वातावरणाला पोषक ठरली. तर धर्माप्रति असणारी श्रद्धा आणि निष्ठा ही कधी परधर्मियांना अन्यायकारक अथवा द्वेषात्मकतेचा प्रसंग आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी कधीच उद्भवू दिला नाही. त्यामुळे त्यांच्या स्वच्छ राजकारणाचे प्रतिबिंब स्पष्ट होते. त्यांनी आपल्या जीवनात नेहमीच राजकारणात सक्रियता आणि अग्रक्रमता यात कुठलाही खंड पडू न देता ग्रामपंचायत,जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा तसेच इतर निवडणुकात काँग्रेस पक्षाला जनाधार बळकट करून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळेच तालुक्यातील राजकीय वर्तुळात त्यांनी आपली छाप पाडली होती. जेवढ्या सक्रियतेने ते ग्रामपंचायतीच्या राजकारणात वावरत होते. तेवढीच सक्रियता त्यांनी कृषी विकासात साधली.आधुनिक बी-बियाणे तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषीसंपन्नता जोपासणाऱ्या या व्यक्तींमत्वाने प्रदीप काळापर्यंत अनेक सदस्य असलेलं एकत्र कुटुंब पद्धतीने आपल्या कुटुंबाचा कारभार रेटला. या कुटुंबातील प्रत्येक लेकरांवर शिक्षण, आरोग्य, संस्कार या बाबी नेटाने बिंबविल्या त्यामुळेच या कुटुंबातील मुले -मुली आज विविध क्षेत्रात स्थिर झाली आहेत. कुटुंबाप्रमाणेच गावावर प्रेम करणाऱ्या या व्यक्तिमत्वाने राजकारण तर केलेच ;पण आपल्या सहवासातील अनेकांना राजकारणही शिकवले. आशा या व्यक्तिमत्वाला २१ मे २०२१ रोजी संपूर्ण गाव मुकला आणि शिवपुरीच्या ग्रामपंचायतीवर कायम अधिराज्य गाजवणाऱ्या भिंती उनाड पडल्या .आपल्या आयुष्याचे अखेरचे निवडणूक पॅनल उभारताना त्यांना बरेच कष्ट करावे लागले होते. पण सत्तेचा ताज हाती पडली आला नाही.शेवटी ग्रामपंचायत सदस्यत्व मिळवलेल्या या ग्रामीण राजकारणाच्या लोकनेत्याची राजकिय कारकीर्द ही गावच्या नकाशावर कोरून ठेवावी अशी आहे. अशा या लोकाभिमुख राजकारण्यास आजच्या त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन..!
-मनोहर सोनकांबळे
८४५९२३३७९१
( एम.फिल.संशोधक विद्यार्थी
माध्यमशास्त्र संकुल,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड)