कविता नागवंशाच्या : मनु व्यवस्थेला सुरुंग लावणारी कविता
कविता नागवंशाच्या : मनु व्यवस्थेला सुरुंग लावणारी कविता
कवितेचे जग विस्तारत असतांना मानवी संवेदनाचे नवनवीन कंगोरे कवितेच्या मर्मबंधात पाहायला मिळतात. मराठी कविता ही विचार कविता आहे असे म्हटले तरी मराठी कवितेत फार मोठी क्रांती केली नव्हती. जेव्हा मुका समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मभानाने बोलू लागला तेव्हा मराठी कवितेला नवीन फुलोरा फुटला. तो वास्तविकगर्भाचा ….या वास्तवगर्भातून क्रांतीची नवी कविता प्रसव झाली.
आज ही कविता आंबेडकरवादी कवितेच्या नावाने जगमान्य झाली आहे. आंबेडकरवादी कविता फक्त सहजीवनाचा विचार करत नाही तर या पृथ्वीवरील समदुःखी माणसाच्या जीवनाचे भावबंध अधोरेखित करते. बदलत्या जागतिकीकरणाचा वेध घेते. कर्मठ राजसत्तेला प्रश्न विचारते .जर ती राज्यव्यवस्था माणसाला विद्रूप करीत असेल तर एल्गार पुकारते. ही कविता बुद्धाच्या शांततेची शिकवण देते. पण जर शांतीने ते ऐकले नाही तर ती महायुद्धाची तयारी ठेवते. ही कविता महायुद्ध लढण्याची आहे. ते कोणत्याही संहारक शस्त्राने नाही तर ते शब्दाच्या शस्त्राने .मानवी मनाला परिवर्तन करूनच. कारण आंबेडकरवादी कविता लोकशाही मूल्यांचा मूल्यकोश आहे .अशा लोकशाही मूल्यांच्या भवितव्यासाठी प्रफुल धामणगावकर आपला दुसरा कवितासंग्रह कविता नागवंशाच्या घेऊन मराठी कवितेच्या रणांगणावर उतरला आहे. ते एक योद्धाच आहेत. त्यांच्या कवितेतून मानवाला करूप करणाऱ्या असत्य वाटांना जमीनदोस्त करण्याची प्रचंड जिद्द त्यांच्यात दिसून येते .
कविता नागवंशांच्या या कवितासंग्रहातील प्रस्तावनेत डॉ. संजय मून यांनी लिहिले आहे की, “ही कविता जाणीवांच्या अवकाश विस्तारणारी आहे”. त्यांनी यामध्ये विविध पातळीवर चर्चा केली आहे. साठोत्तरी पूर्वकाळ व साठोत्तरी नंतरचा काळ या मधील विद्रोही एक संकल्पना आहे .तरी ती बदलत नाही काळ कोणताही असू द्या .जोपर्यंत या जगात शोषणाचे अड्डे जोपर्यंत शिल्लक आहेत तोपर्यंत विद्रोह अग्नीज्वालेने पेटत राहील. त्यामुळे विद्रोह या संकल्पनेला काळाचे बंधन नाही. डॉ.संजय मून यांनी जी खंत व्यक्त केली आहे ती त्यांना योग्य वाटत असली तरी बदलत्या काळातील प्रश्न विराट रूप धारण करून माणसाच्या जगण्यावर थयथय नाचत आहेत . अशा काळात विद्रोह हा त्या कवितेचा धागा आहे हे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. डॉ. मिलिंद विनायक बागूल यांनी आपले मत नोंदवताना म्हटले आहे की,” प्रफुल धामणगावकर यांच्या कविता नव्या पिढीला सामाजिक भान आणणारी दिशादर्शक अशीच आहे. त्यांच्या मनात, शब्दात, कवितेत धगधगणारा ज्वालामुखी हा मनामनात आणि पिढीजात अन्याय,अत्याचार शोषणाच्या विरोधात शब्दाशब्दातून उद्रेक करीत आहे”. ही निरीक्षणे अत्यंत वास्तविक आहेत.तर डॉ.यशवंत मनोहर हे आपल्या बर्ल्बमध्ये लिहितात की ,”कविता नागवंशाच्या या कवितासंग्रहातील कविता निर्णायक संघर्षालाच सौंदर्य मानते आणि
मानवत्त्वाच्या अप्रतिष्ठेला विद्रृपता मानते.माणसामधील दुस्वाला ती अमाणूषता मानते आणि माणसांमधील सलोख्याला ती समाणुषता मानते.” ही या कविची ताकत आहे.
कविता नागवंशाच्या या
कवितासंग्रहामध्ये अरुण काळे यांचे एक वाक्य आहे. “कुणीही अक्षर सुधारण्यासाठी कविता लिहीत नसते” हे वाक्य आंबेडकरवादी कवितेचा प्रगल्भ आविष्कार याची जाणीव करून देते
या कवितासंग्रहात एकूण १०३ कविता आहेत. वर्तमानकाळातील देशाच्या वातावरणात जाती व धर्माच्या दंगलमय झाला आहे. विद्यापीठ असो की ,मोर्चा आंदोलन असो की ,निषेध यामध्ये दंगलीचे मास्टरमाइंड तयार झालेले आहेत. दंगली रोखण्याचे काम ज्या व्यवस्थेकडे असते तीच व्यवस्था दंगली घडवण्याचे षड्यंत्र आखते. आमचा भारतीय बांधव या दंगलीत स्वतःच्या आयुष्य बरबाद करते. दंगलीत मारणारे आपलेच मित्र असतात. पण दंगल मास्टरमाइंडचा कोणीही माणूस मरत नाही. आपण आपल्याच बांधवावर हल्ला करतो. घर,च्या शेजारी असलेले हिंदू-मुस्लीम जाती-जातीतील ,बंधुभावाचे नाते गळून पडते .दंगलीची भयावहकता जीवनाची राखरांगोळी करते .सत्तेचा नेता मात्र मोठ्या मौजेत दंगलीचे डिबेट्स ऐकत असतो .त्याला देशाची लोकशाहीची फिकर नसते कारण तो फकीर असतो.जो कधीच कोणाचा होऊ शकत नाही. अशा दंगलमय वातावरणामुळे कवी अस्वस्थ होत होतो. दंगल, दंगल खोर ,दंगल अजून बाकी आहे ,अध्यादेश ,झाड माणुसकीचे ,धर्मांध, गनीम ,नगारे वाजताहेत या कविता कवीच्या अंतर्मनाचा वेध प्रस्तुत करतात कवी फक्त वरवर पाहत नाहीतर दंगल घडणाऱ्या मास्टर यांचा वेध घेतो. दंगल अजून बाकी आहे ..या कवितेत लिहितात की,
मानवता एवढी उत्तू गेली
की ,
जनावरं सोडली
नि
माणसं मारली
वस्त्या पेटवल्या
मोहल्ले चीत्कारले
बळजबरी वाढल्या
रक्तापेक्षा पाणी महागले
अश्रूंचे तर मोलच नासले
गावठी कट्टे, बॉबची रिहर्सल चालू आहे
थांबा…..!
दंगल अजून बाकी आहे….
पृ क्र १०४
तर “दंगल” या नावाची कविता एका उच्च पातळीवर रेखांकित केलेली आहे. ते दंगल मध्ये लिहितात की,
माणसे कोपली
माणसं कापली
बंद घरा ज्वाला भिडल्या
कणसावत माणस भाजली
आयांची पोटे फाडली
टोकदार भाल्यावर अर्भकं नाचवली बाया-पो-यांवर नराधम सुटले
अख्खे मोहल्ले धुराडून गेले..
चड्डीवाल्यांचा दलाल वदला ‘गाडीखाली कुत्र्याचे पिल्लू आल तर मी काय करू …?.
पृ क्र ६५
दंगलीचे मानसशास्त्र उलगडून दाखवणारी ही कविता दंगल घडवणार्या डोळ्यांमधील कारणांचा परामर्श घेत आहे. भारत हा नागवंशीय लोकांचा देश. मूलनिवासी यांना पराभूत करून त्यांनी त्यांना मानववंचित केले. लढण्याच्या साऱ्या वाटा बंद केल्या. इथल्या नागवंशीयांना पोळून काढले. पण आजही भारताच्या भूमीत बुद्धाच्या स्मृती दिसून येतात. अतिक्रमण केले ते स्वतःला सत्यवादी समजतात.बुद्धाला पराभूत करणे त्यांना तेव्हाही जमले नाही आणि आताही जमू शकणार नाही. कारण देशचं बुद्धाच्या पायावर उभा आहे. आपण या देशाचे मालक आहोत ते कविता नागवंश याच्यामध्ये लिहितात की,
यार हो..!
आपण तर
राजे, शूरयोध्दे
मातीच्या ही गर्भात प्रेमाचं घनदाट पीक घेणारे नागवंशी
या भूमीचे मालक आपणच मूलनिवासी …
………..
मी नागवंशी
सर्वांसाठी मंगलसुत्त गातोय …
पृ क्र १५९
कवीची द्रुष्टी परिवर्तनवादी विचारांची आहे. म्हणून त्यांची कविता गनिमाचा योग्य शोध घेतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारासोबत आपले नाते जोडतो .हे महामानवच कवीची ऊर्जा व आदर्श आहेत .ते बुद्ध या कवितेत लिहितात की,
बुद्धा..!
तू कुठं कुठं
रुतून गेला सांगू..?
जगाच्या काळजातून विहारताहेत तुझी शांतीची पाखरं
गगणभर
नेमकं
तुझ्याच जन्मभूमीत
मारतात हे निष्पाप राजहंस
चालूहे प्रवास इथला
डोळे,
कान,
हृदयाची झापडं बंद करून
पुन्हा रोहिणीच्या युद्धाकडं…
पृ क्र १२६
तर बोधीसत्वा या कवितेत लिहितात की,
बुद्धमुद्रेतलं महाकारूण्य
कोसळत्या धबधब्यानं
साठतं गात्रागात्रात
उत्कट रक्ताभिसरणांच्या
सशस्त्र रक्तथेंबात…
पृ क्र ५१
वर्तमान घडणाऱ्या घटनांमुळे पुन्हा जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. ही भीती कवीला वाटते आहे .तो कवितेतील बाबासाहेब यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलू उजाड करताना लिहितात की,
अंधार युगायुगांच्या छाताडावर
प्रकाशलेलं
उजेडाचा गाव
बाबासाहेब..!
स्त्रीशूद्रदास्यजातवर्गातकाचा
एकमेव
डायनामाट
बाबासाहेब …!
मरणांकित
गुदमरत्या
आयुष्याचा
व्हेंटिलेटर
बाबासाहेब….!
पृ क्र १३६
हा कवी व्याकुळ आहे .मानवी नात्याला जोपासणारा, दुःख, वेदना यांचे प्रतिबिंब रेखाटणार आहे, रोहित वेमुला या स्कॉलर मुलांना आत्महत्या करायला लावणारी शिक्षणव्यवस्था भटाळलेल्या विचारांची जोपासना करणारी आहे. भारतीय संविधान व्यवस्थेत बुद्धिमान विद्यार्थ्यांना जातीयतेचे चटके सहन करावे लागतात. आणि त्यात सरकारचे मंत्री सोबत असतात. यातूनच भारतीय जातीव्यवस्थेचे मुळे किती घट्ट रुजली आहेत याची प्रचिती येते .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मनात घेऊन आंदोलन करणारा हा तरुण सत्तेच्या मग्रूर व्यवस्थेचा खुनच ठरलेला आहे .मानवावरच्या उत्कट प्रेमाचा जाहीरनामा त्यांनी मांडला होता .उध्वस्त वर्तमान पाहून प्रज्ञासूर्य यांच्या दिशेने निघालेला हा उजेडपक्षी प्रस्थापित अविचारप्रवृतीचा बळी ठरला आहे .अशा घडणाऱ्या घटनांमुळे कवी अंतर्मुख अस्वस्थ पेटून उठला आहे .ते ‘रोहित वेमुला: एक अस्वस्थ संदर्भ ‘या कवितेमधून आपल्या विचारांना वाट मोकळी करून देताना ते लिहितात की,
तुझा ओठात आंबेडकर
तुझ्या पोटात आंबेडकर
तुझ्या श्वासात आंबेडकर
हेच पचलं नसावं
रूढीवादी काजव्यांना
…………..
एवढं मात्र खरं
‘जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर अधिक डेंजरस ‘
पृ क्र ९४
ही कविता मानवीय भावजीवणाचे विश्लेषण प्रस्तुत करते.
कविया नागवंशाच्या या कवितासंग्रहातील कविता नवमूल्यांची कास धरणारी आहे.स्वप्न पाहू नकोस, ऑडिट, स्वातंत्र्याची हत्या, अशोक चक्र, कविता लोकशाहीच्या, आम्ही भारताचे लोक ,बोधिसत्वा, पेरणी माझ्या भावांनो ,बा भिमा, संघर्ष या कविताचा आशयही व प्रयोजनही अत्यंत वास्तवगर्भी असेच आहे . भाषेच्या एकूणच बांधणीमध्ये हा कवितासंग्रह आपलं स्वत्व टिकवून आहे. काही मर्यादा या कवितासंग्रहात दिसून येतात .आंबेडकरवादी कवीची नक्कल करण्याची प्रक्रिया यातून दिसून येते. कवीने इतर कविता भूमिकेतून लिखाण न करतात स्वयंप्रज्ञने चिंतनगर्भी कविता लिहावी. ही आशा आहे .यातील रचनाबंध व मुक्तछंद अप्रतिम आहे. वाचकाला खिळवून ठेवण्यात हा कवितासंग्रह यशस्वी झालेला आहे .वर्तमानाचे भाव चित्र प्रस्थापित करणारा हा कवितासंग्रह आम्ही भारताचे लोक या मूल्यासापेक्ष भूमिकेचा पुरस्कार करणार आहे .कविता नागवंशाच्या या कवितासंग्रहातील कविता मनु व्यवस्थेला सुरुंग लावणारी आहे. बदलत्या समाजजाणिवांचा व राजकीयजाणिवांचा परामर्श या कवितासंग्रहात पाहायला मिळतो. एक उत्तम कवितासंग्रह वाचकाला दिल्याबद्दल कवीचे अभिनंदन. पुढील काव्य प्रवासाकरिता कवीला लाख लाख मंगलकामना..!
संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००
पुस्तकाचे नाव-कविता नागवंशाच्या
कवी -प्रफुल्ल धामणगावकर
गौरव प्रकाशन, औरंगाबाद
मूल्य:१८० रूपये
मो.न.९७६४३०१३३५