महाराष्ट्राने भारतीय लोकशाहीला दिशा द्यावी !
महाराष्ट्राने भारतीय लोकशाहीला दिशा द्यावी !
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झालेत. भारतीय लोकशाही मात्र प्रौढ होतांना दिसत नाही. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद ह्या लोकशाहीच्या सदनात आम्हि सत्तर ऐंशीच्या दशकात जे अभ्यासपूर्ण लोकहीताची, देशहीताची चर्चा ऐकायचो, तशी चर्चा करणारे अभ्यासक आज बोटावर मोजण्या इतकेच दिसतात. अनेक पुढारी सत्तेत असतांना वेगळी भाषा बोलतात. विरोधात असतांना आपण ठरविलेल्या धोरणांनाच विरोध करतानां दिसतात. या लोकशाहीच्या मंदिरातील भक्तांचा हंगामा तर कोबडं बाजाराचाही अपमान करतांना दिसतात. घरातील लहान मुलं बापाला आणि आजोबांना विचारतात, हा झगडा कशासाठी असतो? का झगडतात हे ? आम्हीच मतदार लोकशाहीचे मालक याचे उत्तर देण्यास असमर्थ असतो. आता तर बातम्यांचे चॅनल पाहणे हीच आमच्यासाठी गुन्हेगारी ठरत आहे.
सत्तरच्या दशकातील विदर्भाच्या आंदोलनांचे आम्ही साक्षीदार आहोत. ‘व्वारे शेर’ नारा देत जांबुवंतराव महाराष्ट्राच्या विधान सभेत आणि नंतर नागपूर शहराचे खासदार म्हणून लोकसभेत पोहचले. भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशावर आणिबाणी लादली तेव्हा आम्ही दहावी पास होऊन अकरावीत प्रवेश घेतला होता. आणिबाणीत साठेबाज म्हणून आम्हा व्यापाऱ्यांवर शंका घेत शासकीय यंत्रणेकडून खुप त्रास दिल्या गेला. पण शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार कुठे दिसत नव्हता. प्रत्येक कर्मचारी वेळेवर आपल्या कार्यालयात हजर, साध्या तक्रारीची पण चौकशी. शिक्षक शाळेत वेळेवर, जनजीवनात शिस्तीचा पायंडा पडत होता. माझ्या आणिबाणी विषयी मताला अनेक सहमत होणार नाही. पण ही आणिबाणी अनेकांना शिस्त लावुन गेली. इंदिरा गांधीचा वीस कलमी कार्यक्रमाने अनेकांना घरे आणि हक्काची शेतजमीन मिळाली. मात्र संजय गांधीच्या पाच कलमी कार्यक्रमाने कहर केला. त्यातील महत्वाचे कलम लोकसंख्या नियंत्रणासाठी दोन किंवा तीन मुल सक्तीचे कुटुंब नियोजन असा त्याचा अपप्रचार लोकसंख्या फुगवुन गेला.
पण याच दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणूकीत रायबरेली पारंपारिक मतदार संघातून इंदिरा गांधी यांना राजनारायण या समाजवादीने बहुमताने हरविले. जयप्रकाश नारायण अवतरले जणू महात्मा गांधीचा अवतार घेऊनच, युवा जनशक्ती एकटवली. सारे तत्कालीन राजकीय पक्ष एकत्र येऊन जनता दल राजकीय पक्ष निर्माण झाला. सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस हरली. पण विदर्भात मात्र काँग्रेसचेच खासदार बहुसंख्येने निवडून आलेत. जनता दलाचे गांधीवादी मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले. दीड दोन वर्षात जनता दलाचे पूर्ववत तुकडे झाले. मध्यावधी लोकसभा निवडणूका लागल्या.
जांबुवंतराव धोटे त्यांचा पक्ष महाविदर्भ संघर्ष समिती, जी वेगळ्या विदर्भाचा नारा देणारी. काँग्रेसला शत्रू नंबर एक ठरविणारी, जनसंघाच्या मदतीने लोकसभा आणि विधान सभेत आपले प्रतिनिधी पाठविणारी. इंदिरा गांधीच्या राजकीय पडत्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरतेने उभी राहली. महाविदर्भ संघर्ष समिती आणि काँग्रेसच्या युतीतून अनेक आमदार, खासदार समितीचे निवडून आले. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. नागपूर महानगर पालिकेत भगवंतराव गायकवाड सारखे महापौर नंतर महाराष्ट्राचे मंत्री म्हणून गाजले. नानाभाऊ एम्बडवार, सुरेंद्र भुयार महाराष्ट्राचे मंत्री म्हणून लोकांच्या स्मरणात आहेत.
महाविदर्भ संघर्ष समिती कॉंग्रसमध्ये विलीन होऊन विदर्भवीर जांबुवंतराव धोटे नागपूरचे दुसऱ्यांदा काँग्रेसचे खासदार झाले. नंतर हळू हळू ‘व्वारे शेर आगया शेरचा’ अस्त झाला. पश्चीम महाराष्ट्राचे शेतकरी संघटनेचे शरद जोशी पश्चिम विदर्भात कापसाचे आंदोलन करीत शेतकरी नेते झाले. विदर्भातील काँग्रेस हळू हळू क्षीण होत गेली. ‘राजकारणात येईल तर जोड्याने मारा’ म्हणनारे राजकीय परीस्थीने राजकीय पक्ष काढून, काही आमदार निवडून आणत, राज्यसभासभा सदस्य, कृषी आयोगाचे सदस्य झाले. शरद जोशींच्या निधनानंतर शेतकरी संघटन वेगळ्या विदर्भाचा नारा देत राम नेवले (आता हयात नाही), माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात कार्यरत आहे. आधी काही काळ विदर्भातील काही काँग्रेस नेत्यांनी वेगळ्या विदर्भाचा नारा देत आपली राजकीय पोळी शेकली. मध्ये भाजपच्या वेगळ्या विदर्भाच्या नाऱ्याने वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला जोर आला. पण ते खोट स्वप्नच ठरल.
जांबुवंतराव धोटे, माजी आमदार मधुकर किंमतकर, राम नेवले, प्रा. डाॅ. श्रीनीवास खांदेवाले जे जोरकसपने अभ्यासपूर्ण वेगळ्या सक्षम विदर्भाची मांडणी करायचे. आज हयात आहेत प्रा. डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले, ऍड. वामनराव चटप अभ्यासपूर्ण मांडणी करतात. पण विदर्भातील मतदार सुसतावला. वेगळ्या विदर्भाचा नारा लोकआंदोलन होतांना दिसत नाही. राजकीय पुढाऱ्यांनी स्वार्थासाठी वेळोवेळी विदर्भवासीयांना दीलेला धोका त्याचे मूळ कारण आहे.
मी राजकीय अभ्यासक नाही. मी विद्यार्थी दशेपासून जे पाहले ते माझ्या कुवती प्रमाणे मांडले. हा लेखन प्रपंच एवढ्यासाठीच, सध्या नागपूरात महाराष्ट्राच विधानसभा अधिवेशन होऊ घातले आहे. हे अधिवेशन ज्या नागपूर करारा प्रमाणे होत आहे. त्या कराराची प्रतच विधिमंडळाच्या ग्रंथालयाकडे नसल्याचे प्रसीध्दी माध्यमात चर्चेचा विषय आहे.
मित्रांनो महाराष्ट्राला मानवतावादी संतांची परंपरा आहे. रयतेचे राजे छत्रपती शीवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा वैचारीक वारसा आहे. अनेक महापुरूषांची कर्मभूमी महाराष्ट्र आहे.
आमच राजकारण असो की समाजकारण हे जनकल्यानाच असाव ही माफक भावना जनतेची असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लोकशाही विषयी लिहतात-
“छत्रपती शिवाजींनी नावारूपास आणलेला महाराष्ट्र हा आमच्या संतकविंनीच धर्म व भक्तिदृष्ट्या आधी जिवंत आणि जागृत करून ठेवला होता आणि म्हणूनच प्राणपणाने लढणारे स्वामिनिष्ठ पाईक त्यांना सामान्य लोकांतून शेकड्यांनी मिळू शकले व नवे राष्ट्र बनवता आले. ”
“समाजजीवनाची खरी पूर्णता त्याच दिवशी होईल की, जेव्हा आमची शोषणप्रवृत्ती नाहीशी होईल. वकिलांचे धंदे पडतील. पोलिसांचे ठाणे उठेल नि कोर्टकचेऱ्या ‘राम’ म्हणतील, अशा दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत. ”
महाराष्ट्रात कोण राज्य करतो यावीषयी सर्वसामान्य जनतेला काहीच देने घेने नाही. आरोग्याच्या सोयी , मुलांच शिक्षण शासकीय स्थरावरून मिळावे ही साधी अपेक्षा जनतेची असू नये का ? यासाठी अनेक योजना शासनाच्या कागदाच्या ढीगाऱ्यात आणि भ्रष्टाचारात अडकून पडतात. शासकीय कार्यालयात जायला सर्वसामान्य माणूस घाबरतो. खुर्चीवर विराजमान अधिकारी राजा सारखे कायदेच सांगत सुटतात. आर्थीक व्यवहाराने कायद्यात सर्वच बाबी बसतात याची सर्वत्र चर्चा असते. प्रसिध्दी माध्यम यावर लिहितात पण सिस्टीम थांबत नाही. कायदेशीर काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा तुकाराम मुंडे बनत बदल्यांमध्ये फिरावे लागते.
महाराष्ट्रातील सत्तेत असणाऱ्या राजा महाराजांनो साधूच्यासंत-महापुरूषांचा महाराष्ट्र भ्रष्टाचामुक्त करा एवढीच अपेक्षा. त्यासाठी राजकीय विरोधकांनी जनसमस्येवर बोलत लोकांच्यानं न्यायहक्कासाठी लढाव ही अपेक्षा मतदार म्हणून आमची असू नये का ?
: ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा
9823966282