संपादकीय

तिचं बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरु शकेल..

तिचं बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरु शकेल..

आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगाचे प्रेरणास्त्रोत अन् चैत्यभूमी म्हणजे ऊर्जाभूमी. त्यामुळे ६ डिसेंबर दिनी चैत्यभूमीवर जाण्यासाठी प्रत्येकाच्या मनाला ओढ लागलेलीचं असते. महापरिनिर्वाण दिनाच्या ६५ वर्षानंतरही महाराष्ट्रासह सार्‍या देशभरातून तसेच परदेशातूनही लाखो आंबेडकरी, आंबेडकरवादी अनुयायी आपल्या लाडक्या थोर नेत्याचे भावपुर्ण दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या पवित्र स्मृती जागविण्यासाठी, आदरांजली, मानवंदना देण्यासाठी, विनम्रतापूर्वक नतमस्तक होण्यासाठी मोठ्या शिस्तीने, संयमाने चैत्यभूमीवर येत असतात अन् येतच राहणार.. प्रतीवर्षी त्यांच्यात विक्रमी वाढ होत आहे अन् होतचं राहणार.. चैत्यभूमीवरील अफाट भीमसागर पाहून अरबी समुद्रालाही लाज वाटेल अशी त्याची भव्यता अन् दिव्यता असते. चैत्यभूमीवर प्रतीवर्षी गर्दीचे नवे उच्चांक प्रस्थापित होत आहेत. महापरिवर्तनदिनी चैत्यभूमीवर प्रत्येक वर्षी महा प्रचंड भीमसागर लोटला जातो, परंतु ऊर्जाभूमी चैत्यभूमीवर प्रेरणास्त्रोतासमोर नतमस्तक होऊन तो पुन्हा गटा तटात का विखुरला जातो ? मग, चैत्यभूमीला नतमस्तक होऊन तो कोणती प्रेरणा घेत असणार ? त्यामुळे, बाबासाहेबांनी सांगितलेली अनमोल विचारधारा, त्यांचे मार्ग आपण का आचरणात आणण्याचा प्रयत्न करत नाही ? त्यावर मार्गक्रमण का करत नाही याचं प्रत्येकांने गांभिर्याने आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला विषमता, जातीयतेच्या बेड्यातून मुक्त करुन भीमशक्ती प्रेरणा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क मिळवून दिले. त्यांच्यामुळेचं आज आपल्या राहणीमानात, कपड्यात, विचारात नव्हे तर सर्व जीवमानातं परिवर्तन, आमूलाग्र बदल घडून आलेला आहे. खातो तो घास, घेतो तो श्वास अन् आपला अखंड जीवन प्रवास फक्त बाबासाहेबांमुळेचं असतांना, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक, राजकीय व इतर प्रश्नांबाबत आपण उपेक्षित का ? बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही दिले असतांना आपण दुसऱ्याच्या भाकर्‍या किती दिवस भाजून आपले पोट भरणार आहोत ? आपण बाबासाहेबांना मानत असलो तरी त्यांच्या अनमोल, क्रांतिकारी विचारांना, तत्वांना, मार्गाला दुर्लक्षित तर करत नाही ना ? मग, आपल्यात सर्व पातळ्यांवर गट तट, मतभेद, कुरघोडी दिसून का येतात ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या ध्येय धोरणांशी उभे ठाकले होते अन् त्यासाठी त्यांनी आपले जीवन अक्षरश: कुर्बान केले होते, आपल्या कुटुंबाचाही त्यांनी समाजासाठी विचार केला नाही. त्यांच्या महान कार्याशी, अनमोल विचारांशी, ध्येय धोरणांशी आपण किती प्रामाणिक आहोत हा प्रश्न अनुत्तरीतचं राहतो. बाबासाहेबांची चळवळ, त्यांचा लढा, त्यांची शिकवण आचरणात आणायची असेल तर, प्रथम आपण प्रामाणिकपणे एकसंघ व्हायला नकोत का ? दुरदर्शीपणे चळवळीबाबत आत्मपरिक्षण अन् कृतीशील चिंतन कधी करणार आहोत ? बाबासाहेबांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रासह देशात राजकीय आकांक्षेपोटी अनेक वारस निर्माण झाले. परंतु त्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा वारसा सांगून स्वार्थी अन् फक्त भावनिक राजकारणचं केले. कवडीमोल, फुटकळ, चतकोर सत्तेच्या पदासाठी अन् स्वतःचे अस्तित्व जीवंत ठेवण्यासाठी आम्हांला आंबेडकरी सामाजिक, राजकीय निष्ठा का गौण वाटू लागल्या ? आपले नेतृत्व अबाधित राखण्यापेक्षा अंतर्गत मतभेद का मिटवले जात नाहीत ? एवढं गटा तटाचे नेतृत्व बेफिकीर का झाले आहे ? गटा तटांमुळे आपल्याला राजकीय प्रादेशिक मान्यता व निवडणूक चिन्हही टिकवता येत नाही याचे कोणालाही शल्य का दिसून येत नाही ? बाबासाहेबांच्या पश्चात सत्ता हेचं अंतिम ध्येय असेल तर, प्रथम सत्तेच्या नादी न लागता, एका ध्येयाने, एका विचारांने, प्रामाणिकपणे, स्वाभिमानाने राजकीय भवितव्याचा गांभिर्याने दुरदर्शीपणे विचार करुन, पक्षाची सर्व पातळ्यांवर मजबूत पुनर्बांधणी का करता येत नाही ? सत्तेशिवाय कोणतीही संघटना वाढत नाही, परंतु सत्ता हे परिवर्तनाचे एकमेव माध्यम आहे असे मानण्याचं कोणतेही कारण नाही. सत्तेबाहेर राहूनही अनेक कामे करुन सत्ता हस्तगत करता येणार नाही का ? किती वर्षे दुसऱ्यांच्या सावलीत उभे राहून आपण आपली सावली निर्माण करणार आहोत ? आपल्या समाजासमोर अनेक प्रश्नचिन्ह प्रलंबित असतांना, दुसऱ्यांची उठाठेव करायची गरजचं काय आहे आपल्याला ? बाबासाहेबांनी आपल्याला संघटीत व्हायला सांगितले होते, नविन संघटना बनवायला नाही. आपण जितक्या संघटना निर्माण करणार, तितकेच कमजोर होत जाणार. आपला समाज सामाजीक, राजकीयदृष्टया एकसंघ, कार्यान्वित, दिशादिग्दर्शित नसेल तर बहुजन समाजासह इतर समाज आपल्याकडे आकर्षित कसा होणार अन् आपण शासनकर्ते बनून सर्वसमावेशक नेतृत्व कसे देणार आहोत ?

आपल्या समाजासाठी बाबासाहेबांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून राजकारण, समाजकारणावर सकारात्मक, प्रभावशाली, आश्वासक, सर्वसमावेशक, मार्गदर्शक अशी अनेक मते मांडली आहेत. पण आपण निष्प्रभ का ठरलो ? कारण, नेता + कार्यकर्ता + समाज = गट तट असेचं समिकरण सर्वत्र का निर्माण झाल्याने रिपब्लिकन पक्ष लोकसत्ताक बनण्या ऐवजी, नेतासत्ताक बनला. मात्र, राजकारण हे फक्त निवडणूका लढविणे एवढेच महत्वाचे नसून ते सत्ता अन् कायदे निर्माण करण्याची शक्ती निर्मितीचे केंद्र असल्याचा आम्हांला का विसर पडला आहे ? त्यामुळे, आंबेडकरी राजकीय चळवळीच्या अस्तित्वाला गटा तटाच्या माध्यमातून लागलेले प्रश्नचिन्ह कधी अन् कोण मिटवणार ? राजकीय प्रवाहात आपले वेगळे निर्णायक अढळ स्थान कधी निर्माण होणार ? मागील अनेक निवडणूकांच्या अपयशावरुन, भावी राजकीय वाटचालीबाबत का गांभिर्य दिसून येत नाही ? समाज घडविणारी अन् चळवळीला दिशा देणारी माणसे का जपली जात नाहीत ? बाबासाहेबांच्या पश्चात समाजात गट तट, मतभेद, टिका टिप्पणी, संवाद अन् समन्वय नसल्याने एकमेकांवर कुरघोडी करुन, बदनाम, हतबल करुन कोंडीत पकडून आपण काय साध्य केले आहे व भविष्यात काय साध्य करणार आहोत ? उलट आपल्या मंडळींचे खच्चीकरण, गळचेपी करुन विरोधकांना शिरजोर होण्याची आपण संधी दिली. त्यामुळे, सर्वांना सोबत घेऊन जातांना आपल्या सोबत असलेल्या मंडळींना कधी कमी समजू नका. माजी पदाधिकारी अन् नाराज मंडळी असतील त्यांनाही सोबत घेतले पाहिजे. कारण, त्यांचेही समर्थक असतात. ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, जे होतकरु आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे. दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेतृत्व निर्माण झाली पाहिजेत. आजचा तरुण चळवळीचा पाया झाला तर, उद्याचे तरुण त्याचे निश्चितच कळस बनतील अन् चळवळ सक्षम, व्यापक, सर्वसमावेशक होण्यास मदत होईल. तुमची झोपडी जीवंत राहिली तर, लोक तुमच्या आश्रयाला येतील असे बाबासाहेबांनी २७ ऑक्टो. १९५४ रोजी मुंबईत का म्हटले असेल याचा गांभिर्याने विचार झाला पाहिजे.

बाबासाहेबांचे तत्वज्ञान अन् जातीवादी पक्षांचा मेळ कधीही बसू शकला नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या उभ्या आयुष्यात आंबेडकरी विचारांचा किंवा चळवळीचा कधीही आदर केला नाही. एखादा अनुचित प्रकार घडल्यास, त्यांच्या भूमिका अथवा प्रतिक्रियाही कधी स्पष्ट होत नाहीत. एवढा विरोधाभास अन् विषमता असतांना आपले काही मंडळी त्या पक्षांमध्ये का जातात ? पाटलाचं घोड अन् म्हाराक भूषाण काय कामाचा ? अनेक प्रकरणी इतिहासात सोनेरी अक्षरांनी नोंद करण्यासारख्या चळवळी आंबेडकरी जनतेने सर्व शक्तीनिशी रस्त्यावर येऊन यशस्वी केल्या आहेत. मात्र, जुन्या आठवणी कुरवाळत न बसता त्यापासून प्रेरणा घेऊन काही तरी नविन करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मागील अनेक निवडणूकांच्या अपयशावरुन भावी राजकीय वाटचालीबाबत राजकीय चळवळीच्या वाताहताची कारणे शोधून, त्यावर सविस्तर चर्चा घडवून, तिच्या जीवंतपणाची लक्षणे कोणती अन् दिशा स्पष्ट झाली पाहिजे. कारण, आपल्या छावण्या, बुरुज, व्होटबँका उध्वस्त होत आहेत हे दुर्लक्षित करुन किंवा फाजील आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. त्याला सर्वस्वी आपणचं जबाबदार आहोत. त्यामुळे सत्तेपर्यंत पोहचायचे असेल तर, आता ‘परिस्थिती बदलली गेली पाहिजे किंवा परिस्थिती प्रमाणे तरी बदललेचं पाहिजे’.

बेरोजगारी, महागाई, शिक्षण, अन्याय अत्याचार, जातीयता असे अनेक जीवनावश्यक मुलभूत प्रश्न सोडून सध्या जाती धर्माच्या नावाखाली जे राजकारण, विद्वेष, जी विचारधारा निर्माण होत आहे ती लोकशाहीला घातक ठरणारी आहे. वर्तमानात ज्या घटना घडत आहेत ती भविष्यकाळाची नांदी आहे. आताच दक्षता घेतली नाही तर, भविष्यात कदाचित काही पर्याय नसतील. त्यामुळे, ज्या घटना घडत आहेत त्या भविष्याच्या दृष्टीने दुर्लक्षित करता येणार नाहीत. तसेच संविधानाला धक्का लागला तर, बाबासाहेबांनी महत् प्रयासांने उभारलेला लोकशाहीचा डोलारा उध्वस्त होऊन अराजकता माजेल, राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर उतरुन न्याय मिळविण्याचे दिवस गेले आहेत. म्हणून आपल्याला रस्त्यावर नव्हे तर, संसेदत शक्ती निर्माण करण्याची अत्यावश्यकता आहे. त्यामुळे, गट तट अबाधित ठेवून तरी आपण आपल्या मतांशी होणारी विभागणी रोखली गेली पाहिजे.

ग्रामीण, तालुका, जिल्हा पातळीवरही आपल्या समाजात संवाद, समन्वय, एकमत ऐवजी मतभेद अन् गट तटचं जास्त दिसून येतात. सामाजिक अन् राजकीय पातळीवर कोणतीही बांधणी नाही, त्यामुळे राजकारणाबद्दल अनास्था व प्रस्थापित राजकीय पक्षांचे वर्चस्व दिसून येते. आपली बुद्ध विहारे परिवर्तनाची, प्रबोधनाची, चळवळीची केंद्र, प्रेरणास्थाने बनायला पाहिजे होती. पण, तसं दिसून येत नाही. आपल्या सामाजिक, धाम्मिक अन् राजकीय संघटनांमध्येही पुरेसा संवाद, समन्वय नसल्यांने तसेच ते कार्यान्वित, दिशादिग्दर्शित नसल्यांने समाजही काहीसा दिशाहीन आहे. ग्रामीण पातळीवर स्थानिक परिस्थितीमुळे निवडणूकांच्या वेळी तर काही मंडळी, काही गांवे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या गोठात सामिल होतात. सर्व पातळ्यांवर बांधणी मजबूत झाली असती तर, दुसऱ्यांच्या ओसरीत आसरा घ्यायची वेळच आली नसती. ग्रामीण पातळ्यांवर काही ठिकाणी आपण निवडून येऊ शकत नाही याचा अर्थ प्रस्थापित पक्षांसमोर नतमस्तक होणे नव्हे. आपल्या संघटना असतांना प्रस्थापित पक्षांनी तर राजकारणासाठी आपला वापर करुन घेतला आहे. पण, आता आपल्या संघटनांच्या माध्यमातून प्रस्थापित पक्षांशी युती/आघाड्या करुन तालुका पंचायत समिती व जिल्हा पंचायत समितीवर आपले प्रतिनिधी पाठवून, आपला राजकीय पाया विस्तारायला पाहिजे. पण, त्यासाठीही आपण प्रथम संघटीत असायला पाहिजे. पण, एक हत्ती अन् सात आंधळ्यांसारखी चळवळीची अवस्था बनली आहे.

चळवळीत आलेली शिथिलता, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले नैराश्य, समाजात नेते व कार्यकर्ते यांच्याबद्दल निर्माण झालेला अनादर अन् अविश्वास दूर होऊन आता आगामी २०२४ च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले पाहिजे. राज्यातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या महापालिका निवडणूकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांने आपापल्यापरीने महापालिकांची तयारी, बांधणी, रणनीती सुरु केली आहे. राज्यातील सध्याचे वातावरण पाहिले तर, लढाई अटीतटीचीचं असणार आहे हे निश्चित. महापालिकेच्या निर्णायक लढाईसाठी सर्व पक्ष सज्ज होतांना दिसत आहेत. प्रत्येक पक्षासाठी महानगरपालिका निवडणूक म्हणजे अस्तित्वाची अन् अस्मितेची लढाई असते. प्रत्येक राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. मात्र, महानगरपालिका निवडणूकांच्या महासंग्रामात आपली भूमिकाचं अजून स्पष्ट झाली नाही. (?) स्वबळावर निवडणूक लढवण्यापेक्षा आपले गट तट अबाधित ठेवून महानगरपालिका निवडणूकांना सामोरे गेल्यास, निर्णायक मते तरी मिळू शकतील. आपल्याला शासनकर्ते बनून, सर्वसमावेशक सक्षम नेतृत्व द्यायचे असेल तर आपल्या मतांची विभागणी होता कामा नये याची दक्षता घेतलीचं पाहिजे. आंबेडकरी चळवळीच्या मर्मस्थानाच्या ठिकर्‍याठिकर्‍या करणार शस्त्र म्हणजे युती, आघाड्या अन् प्रलोभने. एकट्या दुकट्या नेत्याला सोबत घेऊन, सत्तेची लालूच दाखवून आंबेडकरी चळवळीत फुटीची बिजे रोवायची अन् चळवळ संपवायची, आपसूकपणे ताकदचं क्षीण करुन टाकायची या कूट नितीपासून दक्ष राहिले पाहिजे. आपल्या गटा तटांचा फायदा इतर राजकीय पक्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे करुन घेत असतील तर, राजकारण का, कशासाठी अन् कोणासाठी करायचे ? ज्या क्रांतिकारी सामाजिक चळवळीला तत्त्वज्ञान आहे, क्रांतिकारी सामाजिक बांधिलकी आहे, परंतु त्याचं समाजासमोर, चळवळीसमोर पर्याय नसल्याने आज अनेक प्रश्नचिन्ह आहेत. आपण निर्णायक असूनही अदखलपात्र ठरत आहोत. त्यामुळे आपल्याला स्वयं प्रकाशित बनले पाहिजे. ज्या दिवशी बाबासाहेबांचा समाज एक होईल, त्या दिवशी त्यांचा इतिहास पुर्ण होईल. त्यामुळे, ऊर्जाभूमी चैत्यभूमीवर प्रेरणास्त्रोताला मानवंदना देतांना त्यांच्या ध्येय धोरणांशी प्रामाणिक राहून तशी संघटीतपणे दमदार वाटचाल करण्याचा निर्धार केल्याचं तिच बाबासाहेबांना खरी मानवंदना अन् विनम्रतापुर्वक अभिवादन ठरु शकेल.

*- मिलिंद कांबळे, चिंचवलकर*
*मुंबई*
*9892485349*

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button