भारतीय कापूस दर स्थिर राहणार की वाढणार?;निर्यातदारांचा अंदाज
भारतीय कापूस दर स्थिर राहणार की वाढणार?;पुढील काळात वाढण्याचा निर्यातदारांचा अंदाज
भारतात मागील दोन महिन्यांपासून कापसाचे भाव घसरलेले आहेत. त्यामुळे देशातून कापूस निर्यात वाढायला सुरुवात झाली आहे. यावर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा भारतीय कापूस महाग असल्याने निर्यात घटल्याचे सांगितले जात होते. ही परिस्थिती आता बदलली असून पुढील काळात भारतीय कापसाला मागणी वाढू शकते, असा निर्यातदारांचा अंदाज आहे.
अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये कापसाचे उत्पादन घटलेले आहे. त्यामुळे भारतीय कापसाला उठाव मिळू शकतो. त्या अनुषंगाने कापसाच्या दराला आधार मिळेल, असंही काही अभ्यासक सांगत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून कापसाचे भाव कमी झालेले आहेत. सध्या कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. खंडीचा भाव ६१ हजार रुपयांवर पोहचला. एका खंडीमध्ये ३५६ किलो रुई असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दराच्या तुलनेत पडतळ (पॅरिटी) मिळाली आहे. परिणामी, देशातून कापूस निर्यात वाढल्याचे निर्यातदारांनी स्पष्ट केले.
देशात कापसाचे भाव घसरल्यानंतर निर्यातीसाठी मागणी वाढली आहे. सध्या बांगलादेशातून भारतीय कापसाला मागणी आहे. कापसाचे सध्याचे दर टिकून राहील्यास इतर देशांकडूनही मागणी येण्याची शक्यता असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. भारतात यावर्षी कापसाच्या दरावरून मोठे घमासान सुरु आहे. गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यातच यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे कापसाची उत्पादकता घटल्याने शेतकरी कमी दरात कापूस विकायला तयार नाहीत. तर उद्योजकांना मात्र कमी दरात कापूस हवा आहे. बाजारात दर कमी झाल्यानंतर शेतकरी कापसाची विक्री कमी करतात. त्यामुळे आवक रोडावते आणि उद्योजकांना जास्त प्रमाणात कापूस मिळत नाही.
निर्यातदारांच्या मते भारतीय कापसाचे भाव जास्त असल्याने चीनसारख्या देशांकडून मागणी नाही. पण सध्याच्या भावपातळीपेक्षा कापसाचे भाव कमी होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. भारतीय कापसाचे दर आंतरराष्ट्रीय किंमतींच्या तुलनेत जास्त आहेत, असा दावा करताना इंटरकाॅन्टीनेन्टल एक्सचेंज अर्थात आयसीईवरील वायद्यांचा दाखला दिला जातो. मार्च महिन्यातील वायद्यांच्या तुलनेत भारतातील आजचे दर किती जास्त आहेत, याची चर्चा केली जाते. पण काही जाणकारांच्या मते ही तुलना चुकीची आहे.
भारतात सध्या कापसाचे वायदे बंद आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांशी तुलना नको. जगातील प्रत्यक्ष खरेदीचा दर अर्थात काॅटलूक ए इंडेक्सशी भारतीय दराची तुलना करायला हवी. काॅटलूक ए इंडेक्स आणि भारतीय कापसाचे भाव जवळपास एकाच पातळीवर आहेत. त्यामुळे भारतीय कापूस महाग असल्याची ओरड चुकीची आहे, असं या अभ्यासकांचं मत आहे. काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने यावर्षी देशातून ३० लाख गाठी कापूस निर्यातीचा अंदाज व्यक्त केला. तर अमेरिका कृषी विभागाचा (यूएसडीए) निर्यातीचा अंदाज ४० लाख गाठींचा आहे. मागील हंगामात भारताने ४३ लाख गाठी कापसाची निर्यात केली होती. सध्या भारतातून दोन लाख गाठी कापूस निर्यात झाल्याचे सांगितले जाते. पुढील काळात कापूस निर्यात वाढणार असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.
यावर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला कापसाच्या दरात मोठे चढ-उतार बघायला मिळाले. त्यामुळे उद्योजकांकडून कापूस दर स्थिर होण्याची वाट बघितली जात होती. आता देशातील कापूस दर एका पातळीवर स्थिर असल्याने सुतगिरण्यांनी कापूस खरेदी सुरु केली आहे. सध्याची दरपातळी कायम राहील, असा उद्योजकांचा अंदाज आहे. शेजारच्या पाकिस्तानमध्ये यावर्षी कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. तसेच पाकिस्तानला कापूस पुरवठा करणाऱ्या अमेरिकेतही उत्पादन कमी झाले. त्यामुळे पाकिस्तानने उद्योग सुरु ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस खरेदी केल्यास भाव वाढतील. या दरवाढीचा फायदा भारतीय कापसालाही मिळू शकतो. पण सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती हलाखिची आहे. त्यामुळे पाकिस्तानने आयात कमी केली तर त्यांचे कापड उत्पादन कमी होईल. त्यामुळे भारतीय कापडाला उठाव मिळू शकतो, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९