संपादकीय

जगद्गुरु विद्रोही तुकोबाराय आम्हांला समजून दिलेच नाहीत..

जगद्गुरु विद्रोही तुकोबाराय आम्हांला समजून दिलेच नाहीत..

०२ फेब्रुवारी १६०८.. म्हणजे संत तुकाराम महाराज यांची जयंती.. तुम्ही गाथा वाचन, अभंग शतकाचे वाचन, तुकोबाराय जीवन चरित्रावर आधारित थोडक्यात व्याख्यान करावे,आपल्या घरात आपल्या कुटूंबासमवेत प्रतिमा पूजन करावी…. विश्ववंदनीय जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय यांची “गाथा” प्रत्येकांच्या घरोघरी असायला हवी..महाराष्ट्र हि संताची भुमी हे सर्वांच्या परिचयातले आहे. इतकी शतके गेली तरी आजही संताच्या कार्याचा प्रभाव गोर-गरीब जनमानसावर तसाच टिकुन आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही.शहर असो वा गाव, वाडी असो वा तांडा किंवा कोणताही भाषिक असो तो संतांना पुचतो भजतो मानतो समस्त चांगुलपणाचे आणि नैतिकतेचे जनकच संत असे मानणारा वारकरी वर्ग आहे. संत म्हणजे समाजसेवा, संत म्हणजे समानता, संत म्हणजे त्याग आणि समर्पण हे सर्वांना माहिती आहे. पण संत म्हणजे साहित्य हे माञ न चर्चिले गेलेले संताचे अंग.न चर्चिला विषय. भारतातील सर्वच संत उत्तम साहित्यिक होते…

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे निर्भिड सडेतोड रोखठोक व एका अर्थाने विद्रोही संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त जगद्गुरु तुकोबांचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे वारकरी साहित्यिक अभ्यासक सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच तसेच त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, आणि जगद्गुरु तुकोबाराय यांच्या विचारांची जनजागृती वाढतेच आहे…।

वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदांत वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. ते विटेवरचे सावळे परब्रह्म सगुण साकार होऊन, स्वत:ला तुकोबांच्या अभंग-भक्तिरसात बुडवून घेण्यात धन्यता मानते. तुम्हाला सांगतो की या विश्वामध्ये एकमेव संत ज्यांचा जन्म तर भुतलावर झाला परंतु त्यांना संपविल्यानंतरही त्यांच्या अस्थि किंवा राख मात्र या भुतलावर कुठे असल्याचा पुरावाच पुसून टाकल्या गेला एवढा धसका त्यांच्या घातपाती मृत्यूनंतर या शोषकांनी त्यांच्या अस्थिच्या राखेचा घेतला होता. कारण त्यांच्या अभंगरुपी घणाघाती वार शोषकांना सोसनं असह्य झाल्यामुळे या अभंगगाथा इंद्रायणी नदीत बुडवून नष्ट करुनही त्या जशाच्या तशा शोषित भारतीयांच्या मुखात राहू शकल्या एवढी ताकद या अभंगरुपी वारात होती,शोषकांवर वार करणारे तुकोबांचे लाखो साहित्य वारकरी आजही तयार होवून या शोषकांवर वार करत आहे. जर का तुकोबांच्या अस्थि या अमुक ठिकाणी आहे एवढे जरी आम्हा साहित्यिकना लेखकांना वारकऱ्यांना माहित असते तर त्या समाधीला नतमस्तक होवून आम्हां साहित्यिकामध्ये वारकऱ्यांमध्ये या शोषकांविरोधात विरश्री संचारली असती व या शोषकांची ही व्यवस्था उधळून लावली असती एवढी ताकद त्यांच्या या अस्थित होती याची जाणीव या शोषकांना नक्की होती त्यामुळे त्यांच्या समाधी पर्यंत कोणी पोहचूच नये याची व्यवस्था त्यांनी “पुष्पक विमान वैकुंठ” हे भ्रामक शस्त्र आम्हा मराठा बहूजन समाजावर वारकऱ्यांवर चालवून आम्हांला पराभूत केले. याची प्रचीती देहूला गेले असता प्रत्येक मराठा बहूजन समाजाला वारकऱ्याला झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक महाराष्ट्रातील भावीक महापुरुषांच्या समाधीस्थळाला नतमस्तक व्हायसाठी अधीर झालेला असतो. कितीतरी त्रास सहन करत तिथपर्यंत जावून त्या समाधीवर डोक टेकवून धन्य होत असतो परंतु आम्ही मराठा बहूजन समाज व वारकरी देहु ला गेलो असता तुकोबांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी मन व्याकुळ होवून भिरभिर फिरते पण माझ्या जगद्गुरु तुकोबाच्या अस्थि समाधीरुपानं कुठेच दिसत नाही या अतीव दुःखानं खिन्न मनाने तुकाबांचे वास्तव्य असलेल्या घराचं व त्यांचा घातपात ज्या इंद्रायणीने बधितला तिच्या घाटाचं दर्शन घेवून परतावे लागते.. देहुवरुन माघारी फिरतांना मनोमन एकच विचार येतो की माझ्या जगद्गुरु तुकोबाच्या अस्ती या मातीत आहे एवढं जरी आम्हा साहित्यिकना लेखकांना वारकऱ्यांना माहित असतं तर इथून परतणारा प्रत्येक भावीक स्फुरण घेवून हा शोषकांचा डोलारा उध्वस्त करणारा सच्च्या साहित्य व वारकऱ्याच्या रुपान तुकोबाचा सैनिक होवून शोषकांना परास्त करुन त्यांचा डोलारा उध्वस्त केला असता यात यत्किंचितही शंका नाही. परंतु आम्हा साहित्यिकना वारकऱ्यांना पुष्पक विमानाने तुकोबांचे वैकुंठ गमन झाल्याच्या भ्रामक कल्पनात गुंतवून साहित्याच्या वारकऱ्यांचा वार बोथड केल्या गेला. हे शातीर शोषक त्यांच्या कारस्थानात यशस्वी झाले याची आम्हा जाणीव होवू दिली नाही..।

मी वेदांचा अंकित नाही,भेदभाव सांगणारा वेदांचा भाग गाळून उरलेला भाग मी प्रमाण मानतो, सर्वांच्या ठिकाणी समत्व पाहणे हे ब्रम्हाचे स्वरूप न जाणणारा संत दुराचारी होय, अशी भूमिका त्यांनी घेतली.. सर्वांचे चर्म व मांस समान असताना भेदभाव कशाच्या आधारे करायचा, वाण्याच्या दुकानातून गूळ घ्यायचा असेल तर त्याची जात कूळ कशाला विचारायचे गावाचा मोकाशी हलक्या जातीतील असला तर त्या कारणाने त्याची आज्ञा मानायची नाही काय, असे प्रश्न त्यांनी विचारले. महार व्यक्तीला स्पर्श झाल्यामुळे ज्याला राग येतो तो काही खरा ब्रम्हज्ञानी ब्राम्हण नव्हे, त्याने देहान्त प्रायश्र्चित घेतले तरी त्याचे पाप फिटत नाही, असे त्यांनी म्हटले. त्यांनी सोवळ्या ओवळ्याच्या आणि परंपरागत कल्पना नाकारल्या आणि जो परद्रव्य व परनारी यांच्या बाबतीत सोवळा असतो तोच खरा सोवळा, अशी नैतिक कसोटी सांगितली.. जो जानवे व शेंडी यांच्याबरोबरचा संबंध तोडेल, त्याला कसलीही बाधा हाेणार नाही,असे म्हटले. विधिनि षेध यज्ञ श्राध्द पूजा भविष्यकथन शुभाशुभ नवस कौल योग समाधी उपवास तीर्थयात्रा वनवास गुहेतील ज्ञान, संन्यास, मोक्ष, यांचे परंपरागत स्वरूप नाकारून त्यांच्यापेक्षा शुद्ध भावना व शुद्ध आचरण यांना खरे महत्व असायचे सांगितले.. त्यांचा ईश्वरही पारलौकिक मूल्यांवर नव्हे, तर माणूसकीवर आधारलेला होता.रंजल्या गांजल्या लोकांना जो आपले म्हणतो, तो खरा साधू आणि देव अशा साधू जवळ च राहतो, असे त्यांनी म्हटले. देवपूजा करताना असे संत घरी आले असता देवांना सारून या संतांची पूजा करावी, असे त्यांनी लोकांना सांगितले…।

आजचा वारकरी सांप्रदाय. किर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य हे जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारांचे नसून मनुवादी अंधश्रध्दा कर्मकांडी, सनातनी विचाराचे आहेत.. तुकोबारायांनी यज्ञादी कर्मकांड नाकारुन नाममार्ग सांगितला आज हेच प्रणप्रतिष्ठा ई नावाखाली नामसप्ताहामध्ये यज्ञादी कर्मकांडाचे आयोजन करतात. तुकोबारायांनी देवाच्या व कर्मकांडाच्या नावाखाली त्यामध्ये सर्व आले पिंडदानापासून ते सर्व या सर्वांचा पैसे घेऊन ढोंगी लुबाडनारांना विरोध केला. काही वर्षापूर्वी भारतात विज्ञानाचा लवलेश नसतानाही तुकोबाराय विज्ञानवादी मानवतावादी विश्वकल्यानाचे विचार मांडतात तर आता ढोंगी हे 90% किर्तनकार समाजाला चमत्काराच्या कर्मकांडाच्या अंधश्रध्देच्या दुनियेत घेऊन जाणारे विचार मांडतात..।

जगद्गुरु तुकोबाराय यांनी अंधश्रध्देवर कडाडून टिका केली लोकांना डोळस होण्यासाठी प्रयत्न केले. स्वतः गरीबीत राहुन लोकांची सेवा केली,अंधश्रध्दा हटवण्यासाठी पहिले स्वतःचे घर व धर्मापासुन सुरुवात करायला पाहिजे मगच दुसऱ्यांकडे वळावे ही शिकवण दिली. सर्वसामान्यांना सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक दहशतीतून मुक्त करण्यासाठी अभंगातून प्रबोधन केले. केलेले हे प्रबोधन तत्कालीन धर्मपंडितांना रुजलेले नाही. त्या मुळे त्यांनी तुकोबारायांचा मानसिक, शारीरिक छळ केला. त्यांच्यावर गावाबाहेर जाण्याची वेळ आली. त्यांचा इतका छळ केला की त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.. खरे स्ञीपुरुष समानता ही वारकरी संप्रदायाचीच देण आहे.. आणि धर्माच्या नावावर अनितीचा बाजार मांडणाऱ्या लोकांना कडवे आव्हान देले. ते एक महान लढवय्ये संत होते. एका विशिष्ट समाजव्यवस्थेच्या मुळाशी निर्भयपणे सुरुंग लावण्याचे काम आणि विशेष सनातनी व्यवस्थेविरुद्ध प्रचंड विद्रोह तुकोबांनी आयुष्यभर केला.. थोडक्यात म्हणजे समाजव्यवस्थेला न्यायाचे अधिष्ठान देऊन तिचे निर्मलीकरण करण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस युध्द केले आणि तत्वासाठी, काही मूल्यांसाठी स्वत:च्या हातांनी एका समाजाच्या वैराचा ज्वालामुखी स्वत:च्या परीवारावर ओढवून घेतला.. अशा महान विश्ववंदनीय जगद्गुरु विद्रोही संतश्रेष्ठ कवींना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..📖🙏🏻
✍️संतोष शकूंतला आत्माराम
बादाडे 💐🚩
जिल्हाध्यक्ष पुणे- 9689446003
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद,
महाराष्ट्र राज्य..📗📖

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button