बुद्धांना संग्राहक वृत्ती नापसंत होती

बुद्धांना संग्राहक वृत्ती नापसंत होती
भगवान बुद्ध एकदा कुरुदेशात कम्मासदम्म नगरीत राहात होते.
स्थविर आनंद त्यांच्याकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसल्यावर तो म्हणाला, “तथागतांनी शिकवलेला प्रतीत्य-समुत्पादाचा (law of causation) नियम उत्कृष्ट व आश्चर्यकारक आहे. तो फार गहन आहे. तो मला अगदी स्पष्ट समजला आहे.”
“आनंद, असे म्हणू नकोस, असे म्हणू नकोस. हा प्रतीत्य-समुत्पादाचा नियम गहन आहे. हा नियम न समजल्यामुळे, त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी गोंधळात, गडबडगुंड्यात सापडली आहे. तिला दुःखाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झाले आहे.”
“मी सांगितले आहे की, तृष्णा (craving) हे लोभाचे (grasping) कारण आहे. जिथे कोणत्याही प्रकारची तृष्णा कोणालाही कशासाठीही नसते तिथे लोभाचा संभव कसा असेल?”
“भगवान, असणार नाही.”
“तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते.
“लोभाच्या मागे लागल्याने तृष्णा व लालसा (desire and passion) उत्पन्न होतात.”
“तृष्णा व लालसेमुळे दृढता (tenacity) निर्माण होते.”
“दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते.”
“स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते.”
“स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते.”
“मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात, जसे मारामारी, जखम, संघर्ष, भांडण, निंदा व असत्य.”
“आनंद, ही प्रतीत्य-समुत्पादाची साखळी आहे. जर तृष्णाच नसली तर लोभाची ओढ लागेल का? लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील काय? विकार नसतील तर दृढता निर्माण होईल काय? दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होईल काय? स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण होईल काय?”
“तथागत, नाही होणार.”
“जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार?”
“भगवान, टिकू शकेल.”
तथागत म्हणाले, “मी पृथ्वीला पृथ्वीच मानतो; पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही.”
“म्हणून मी सांगतो की, सर्व तृष्णा समूळ निपटून, त्यांची लालसा न धरून उलट त्यांचा त्याग, नाश व परित्याग करूनच मी ‘बुद्धत्व’ प्राप्त केले आहे.”
“भिक्खूहो, भौतिक मालमत्तेचे नव्हे तर आपल्या धम्माचे हिस्सेदार होण्यासाठी झटा. कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दास्यत्व येते.”
अशा रीतीने तथागत बुद्धांनी स्थविर आनंदाला आणि अन्य भिक्खूवर्गाला संग्राहक वृत्तीचे दुष्परिणाम समजावून सांगितले.
(संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-सहा)
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१८.३.२०२४
मो.९३२६४५०५०६