फक्त जयभीम बोलणे आंबेडकरवाद नव्हे..
फक्त जयभीम बोलणे आंबेडकरवाद नव्हे..
जस जशी भिम जयंती जवळ येते तस तशे काही लोकांच्या अंगात आंबेडकरवाद घुसायला सुरवात होते. आंबेडकरवाद म्हणजे जोरजोरात जयभीम बोलणे नव्हे, आंबेडकरवाद म्हणजे जयंती ला दारु ढोसुन नाचणे नव्हणे, आंबेडकरवाद म्हणजे जयंती कार्यक्रमावर निरर्थक खर्च करणे नव्हे, आंबेडकरवाद म्हणजे जयंतीच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी आणि विचाराचे हनन नव्हे, आंबेडकरवाद म्हणजे मोठ मोठे बँनर लाऊन दिखावा करणे नव्हे, आंबेडकरवाद म्हणजे जयंती कार्यक्रमाला हजार पाचशे रुपये देऊन तोऱ्यात मिरवणे नव्हे, आंबेडकरवाद म्हणजे जयंती कार्यक्रमात वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसुल करणे नव्हे, आंबेडकरवाद म्हणजे स्वतः ची दुकानदारी थाटून तडजोड करणे नव्हे, आंबेडकरवाद म्हणजे ज्याची कुवत नसताना ही त्याच्या कडून वर्गणीच्या नावाखाली सक्तीने पैसे गोळा करणे नव्हे, आंबेडकरवाद म्हणजे एखाद्याने नाचगाणे आणि निव्वळ मनोरंजनासाठी पैसे दिले नाही म्हणून त्याला चुकीचे बोलणे नव्हे, आंबेडकरवाद म्हणजे दारू पिऊन नशापान करणाऱ्या लोकांच्या हाती कार्यक्रमाचे सुत्र देणे नव्हे, आंबेडकरवाद म्हणजे लोकांना लुबाडून, नैतिकता कमी करून जयंती कार्यक्रमात मिरवणे नव्हे, आंबेडकरवाद म्हणजे जयंती ला नाचणे आणि महापरिनिर्वाण दिनी रडणे मुळीच नव्हे. आंबेडकरवाद म्हणजे स्वाभिमान, आंबेडकरवाद म्हणजे एकी, आंबेडकरवाद म्हणजे ज्ञान, आंबेडकरवाद म्हणजे संस्कार, आंबेडकरवाद म्हणजे शिस्त, आंबेडकरवाद म्हणजे सामाजिक न्याय, आंबेडकरवाद म्हणजे जागृती, आंबेडकरवाद म्हणजे एकमेकांना गरजेनुसार मदत, आंबेडकरवाद म्हणजे मानवता, आंबेडकरवाद म्हणजे आदर्श जिवन जगण्याची सर्वोच्च प्रेरणा, आंबेडकरवाद म्हणजे एकी, आंबेडकरवाद म्हणजे न्यायासाठी सामुहीक व प्रामाणिक संघर्ष, आंबेडकरवाद म्हणजे तडजोड न करता उभा केलेला सामाजिक लढा होय. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीने, विचार व कार्याने करोडो लोकांचे उत्थान करून देशाला मजबूत करण्याचे काम केले. देशाच्या व व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचार यांच्या शिवाय दुसरा पर्यायच नाही. जगाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्ञान, कार्य व विचार याची दखल घेऊन जागतिक पातळीवर वेगवेगळ्या माध्यमातून गौरव केला आजही गौरव होत आहे. परंतु भारतातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचे कार्य विचार व चळवळ यांच्या विषयी लोक गंभीर नाहीत हेच दिसून येते. प्रस्थापितांची व्यवस्था मोडीत काढून सर्वसामान्य लोकांना देशाचे मालक बनवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक क्रांती केली. प्रस्थापित लोक सर्वसामान्य लोकांना गुलाम, लाचार, तुच्छ समजून ते शिक्षण,नोकरी व हक्क अधिकार यांच्या लायकीचेच नसल्याने पुर्वी पासून यापासून दुर तर ठेवलेच परंतु माणसाने माणसाजवळ येऊच नये याची पुर्ण व्यवस्था केली करून स्वतः लाच श्रेष्ठ समजणारे निच लोकांनी सामाजिक व धार्मिक अराजकता निर्माण केली होती. या लोकांची व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. म्हणुन ह्या लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे कार्य मान्य कसे होईल म्हणून या लोकांनी सुरवाती पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याविरोधात काम करायला सुरवात केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा, कार्याचा व विचाराचा फायदा झालेल्या नव्वद टक्के लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही या वरून लोकांची बौद्धिक बेइमानी दिसून येते. परंतु जातीच्या नावाखाली व धम्माच्या नावाखाली ज्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेतले तेही लोक आंबेडकरवादी बनलेच असे मुळीच नाही. आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर, कार्यावर व विचारावर लाखो लेखक, वक्ते व गायक तयार झाले यापैकी खरचं विचार केला तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे कीती हा प्रश्न स्वतः च स्वतःच्या मनाला विचारला तर आपल्या समोर किती लोकांची यादी येईल हा चिंतेचा विषय आहे. गायक, लेखक व वक्ते फक्त पैसा मिळतो म्हणून विचार सांगत असतील तर खरंच ते विचाराचे असतील का? सुपारी मिळते म्हणून चळवळ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगणारे लोक कधीच विचाराचे होऊ शकत नाहीत. अनेक गायक, लेखक व वक्ते असुनही यामध्ये ही अनेक लोकांचे एमेकांसोबत पटत नाही. जर सर्व जन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन काम करत असतील, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व विचाराचा सर्वांना सारखाच फायदा व संधी निर्माण झाली असेल तर त्यांच्या च विचाराचे काम करताना वैयक्तिक मतभेद होण्याचे काय कारण? जर वैयक्तिक मतभेद होत असतील तर ते विचाराचे किंवा आंबेडकरवादी आहेत असे कसे म्हणता येईल? राजकीय परिस्थिती कशी आहे याबद्दल तर सर्वांना च माहिती आहे. स्वतः चे पोटभरण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव व चळवळ यांना भांडवल बनवून लोकांना मुर्ख समजून स्वतः चे दुकान थाटने यालाच आज नेता असे म्हणतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः ची मुले, स्वतः ची संपती, स्वतः चे सुख, स्वतः चे ज्ञान, स्वतः चे शिक्षण समाजासाठी खर्च करून गुलामांना राजा बनवले, बेघरांना बंगल्याचे मालक बनवले. शिक्षणाच्या माध्यमातून अधिकारी बनवले. डॉ बाबासाहेब आंबेडकर एकटे होते तरीही करोडो लोकांच्या जिवनात क्रांतीकारी परिवर्तन केले. आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन स्वतः ला नेते समजणारे लाखों आहेत परंतु ते स्वतः च्या ही समस्या सोडवू शकत नाहीत याचे एकमेव कारण म्हणजे आज लोकांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नाहीत, मनामध्ये प्रामाणिकपणा नाही, स्वाभिमान गहाण टाकून इतरांची हुजरेगिरी आणि लाचारी करणाऱ्यांना समाजाचे काही घेणे देणे नाही, वर्तनात विचार नसल्याने स्वतः ची झोळी भरण्यासाठी हे कोणाच्या ही पायावर लोटांगण घेऊन लाचारी इमानदारीने करू शकतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमुळे, कार्यामुळे आज अनेक विद्वान, अभ्यासु व परिवर्तनाची तळमळ असले अनेक लोक तयार झाले ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. परंतु जर विद्वान, अभ्यासु आणि परिवर्तनाची तळमळ असलेले लोकच कधीच एकत्र येत नसतील, नियोजन करत नसतील, वैयक्तिक मतभेद विसरून वैचारिक मुद्यावर एकत्र बसून चर्चा करत नसतील, सामाजिक समस्या व प्रबोधन करण्यासाठी विना नेतृत्व विना जाहिरात समोर येत नसतील तर त्यांचा अभ्यास, विद्वत्ता व तळमळ कोणाच्या कामाची? प्रत्येक जन आंबेडकरवादाच्या नावाखाली काहीना काही करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मनात कुठे तरी प्रसिध्दी, पैसा, पद याची लहर असते म्हणून सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या स्वतःला आंबेडकरवादी समजणाऱ्या लोकांमध्ये एकी नाही किंवा एकिकरण व्हायला पाहिजे यावर कोणीही बोलत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देऊन आपल्या कमाईतील विसावा भाग हा सामाजिक कार्यासाठी द्यावा म्हणून वर्गणी गोळा केली जाते. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विसावा भाग हा नाच गाण्यासाठी नव्हे तर सामाजिक उद्धारासाठी देण्याचे सांगितले यावर फार कोणी बोलतही नाही आणि विसावा भाग कोणी देतही नाही. म्हणून नाचगाण्याची वर्गणी दिली कि विसाव्या भागावर बरोबर पडदा टाकला जातो. समाजातील लोकांना शिक्षण, आरोग्य व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्वाभिमानी निधी हा स्वाभिमानी लोकांनी स्वतः च निर्माण करून शिक्षण, आरोग्य व रोजगार यावर खर्च करणे अपेक्षित असताना यावर बोलणे लिहणे सोईस्कर पणे टाकळे जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्याचा प्रचार करून प्रसिद्धी व पैसे मिळवणारे खुप आहेत. परंतु यापैकी किती लोक खरंच आपल्या कमाईमधुन काही भाग गोरगरीब मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर व रोजगारावर खर्च करतात हा खुप गंभीर प्रश्न आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे लोक तयार झाले असते तर मनामध्ये खरचं समाजा विषयी तळमळ असती तर कोणत्याही स्वार्थाशिवाय एकत्र येऊन आज शैक्षणिक, वैद्यकीय व औद्योगिक संस्था उभ्या राहून स्वाभिमानी व आर्थिक सक्षम समाज तयार झाला असता. परंतु आपल्या उत्पन्नातील मोठा वाटा जाहिरात, प्रसिद्धी, मोठेपणा, नाचगाणे व व्यसन करण्यावरती निरर्थक खर्च करतील परंतु गोरगरीब लोकांना शैक्षणिक व वैद्यकीय मदतीसाठी हात पुढे येणार नाहीत, कोणाला रोजगार उपलब्ध होईल अशी व्यवस्था निर्माण होईल असे काम विनास्वार्थ कोणी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. जर शिक्षण, आरोग्य व रोजगार यावर काम जरी करायचे ठरवले असते तर आज शैक्षणिक, वैयक्तिक व औद्योगिक संस्था उभ्या राहून त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा फायदा समाजालाच होऊन सर्व बाजूने समाज सक्षम व मजबूत झाला असता. राजकीय नेत्यांनी स्वतः ची दुकानदारी थांबवून स्वाभिमान जागृत ठेवून नेतृत्व केले असते, एकीकरणाची कास धरली असती तर सरकार स्थापन होण्यासाठी आंबेडकवादी लोकांचा अगोदर विचार केला असता. परंतु एकत्र येऊन स्वाभिमानी सत्तेचा भाग न बनता बेकी करून लाचार होऊन प्रस्थापितांची हुजरेगिरी करण्यात राजकीय नेते दंग आहेत. नेत्याचे भक्त तर नेत्यांना पेक्षा जास्त कलाकार आहेत. एकही आमदार खासदार सोडा पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याची क्षमता नसलेल्या नेत्यांचे भक्त म्हणतात आमचा नेता सरकार पेक्षा मोठा आहे. फक्त खोट्या स्तुती मध्ये हवेत उडणारे लोक खरचं विचाराचे कसे होऊ शकतील? बेकी करणारे, लाचार असणारे, तडजोड करून स्वतः चे घर भरणारे, जयंती च्या नावाखाली खंडणी वसुल करणारे यांच्या मध्ये एका गोष्टीत साम्य आहे ते म्हणजे सर्व जन जयभीम बोलतात. पण फक्त जयभीम बोलुन आंबेडकरवादी होता येत नाही. आंबेडकरवादी होण्यासाठी विचार अंगिकारून, पद प्रसिद्धी बाजूला सारून मानसाच्या उद्धाराचे काम निस्वार्थ पणे करावे लागते हेच आंबेडकरवादी होण्याचे लक्षण होय. जयंती दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायचे असेल तर अगोदर विचाराचे होऊन आपण तसे जगायला सुरवात करणे हेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन असेल.
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन व जयंती दिनाच्या मंगलमय सदिच्छा
©®
विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००