राजकीय

आंबेडकरी राजकारण जीवंत राहील की नाही?

आंबेडकरी राजकारण जीवंत राहील की नाही?

मराठा समाज हा आंबेडकरी विचारधारा मानणारा घटक आहे, असं मानणं जरा धारिष्ट्याचेच होईल. तथापि ओबीसी समाजातील काही घटक फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेशी जवळीक साधणारा आहे, असं मानायला हरकत नाही. कारण बहुजन समाज पार्टीची बहुजनवादी चळवळ व कॅडर कॅंप्स, तसेच प्रा. मा.म.देशमुख, डॉ. आ.ह.साळुंखे इत्यादींच्या पुरोगामी साहित्यामुळे व प्रकाश आंबेडकर यांच्या ‘अकोला पॅटर्न’मुळे या समाजाचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन झाले आहे. पण जरांगे पाटील यांना मराठा आरक्षण आमरण उपोषणाच्या आंदोलनात प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिल्याने ओबी सी समाज बिछरल्यासारखा झाला होता. परिणामतः ओबीसी समाज २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे वळला. अशीच परिस्थिती मुस्लिम समाजाची झाली. त्यांनी भाजप विरोधात मतांचे विभाजन होऊ नये म्हणून झाडून महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केले. हे भाजपच्या नेत्यांनी पण त्यांच्या वक्तव्यात अधोरेखित केले आहे.
भाजपच्या ‘४०० पार’ नाऱ्यामुळे संविधानाला धोका निर्माण झाला होता; म्हणून आंबेडकरी-बौद्ध समाजातील विचारवंत, साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी यांनी मुंबईत बैठक घेऊन, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर आरोप करत, महाविकास आघाडीस मतदान करण्याचे आवाहन केले होते. कारण भाजपचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे व लल्लू सिंग यांनी भाजपचा ४०० पारचा नारा हा संविधान बदलण्यासाठी असल्याच्या वक्तव्याने संविधान समर्थकाकडून भाजप विरोधी प्रचार झाला. यामुळेच बौद्ध समाज पण वंचित आघाडीपासून दूरावला. त्यांनी पण मुस्लिम समाजाप्रमाणेच मग उद्धव ठाकरेची हिंदूत्ववादी शिवसेना का असेना, महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान करण्यात कुठलीच कसर सोडली नाही.
परिणामतः २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत २०२४ च्या निवडणूकीत वंचित आघाडीचे मतदान घटले आहे.
त्यामुळे झालं काय की, बहुजन समाज पार्टीचा जनाधार जसा खिसकत गेला, तसाच महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा जनाधार सुद्धा खिसकत चालला आहे, हे मान्य करावे लागेल. ह्या दोनच पक्षांमुळे आंबेडकरी राजकारणाचा प्रभाव आतापर्यंत तग धरून होता.
सगळ्यांना माहीतच आहे की, मा. कांशिरामजी यांच्या अथक परिश्रमातून कमावता आणि बुद्धीवादी नोकरीदार वर्गात सामाजिक परतफेडीचे स्फुल्लिंग चेतवून बहुजन समाज पार्टीची चळवळ पूर्ण देशात पसरवली होती. पण ते गेल्यानंतर मनुवादी व्यवस्थेने बसपाला संपविण्याचा कट रचला. आज हा पक्ष शेवटची घटिका मोजत आहे. जसं बसपाच्या बाबतीत घडलं तसंच महाराष्ट्रात वंचित आघाडीच्या राजकारणाच्या बाबतीत सुद्धा घडत आहे.
महाराष्ट्रात संविधान वाचवण्याचा प्रश्न मधात आल्याने वंचित आघाडीला बाजूला सारून काॅंग्रेस प्रणीत इंडिया गठबंधनकडे जायला आंबेडकरी समाजाला मजबूर व्हावे लागले.
त्यामुळे आंबेडकरी राजकारणात एक प्रकारची पोकळी निर्माण होते की काय अशी साधार भीती वाटत आहे. या भीतीमुळे आंबेडकरी राजकारण जीवंत राहील की नाही असा संभ्रम समाजात पसरायला वेळ लागणार नाही.
मनुवादी व्यवस्थेने परिवर्तनवादी विद्रोही आंबेडकरी समाजाला कैचीत पकडल्यासारखी अवस्था करून टाकली आहे.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या निवडणूका ऑक्टोबर २०२४ या महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तेव्हा या निवडणुकींना आंबेडकरी समाज कसा सामोरा जातो असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अजूनही धोका टळला नाही. हे भाजपचे आमदार टी.राजासिंह यांनी भिवंडी येथील धर्मसभेत केलेल्या वक्तव्यावरून दिसून येते. ते म्हणाले की,
“लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पार जागा जिंकल्या असत्या तर आपला भारत देश नक्कीच हिंदूंराष्ट्र घोषित झाला असता.” भाजपाचे नेतेमंडळी आजही असले विधाने करताना दिसत आहेत. त्यामुळे आंबेडकरी समाज आताही लोकसभेप्रमाणे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पण महाविकास आघाडीकडे वळला तर नवल वाटणार नाही.
लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सत्ता संपादन करण्याची मोठी संधी चालून आली आहे. वंचित आघाडीने महाविकास आघाडीसोबत जाऊन सत्तेजवळ समाजाला घेऊन जावे अशी आंबेडकरी समाजात भावना पसरली आहे. सत्तेत राहून किती फायदे मिळतात हे उत्तरप्रदेश आणि अकोल्याच्या जिल्हा परिषदेच्या उदाहरणाने समाजाच्या लक्षात आले आहे. म्हणून कित्येक वर्षांपासून सत्तेच्या बाहेर फेकल्या गेलेल्या या समाजाला सत्तेजवळ जायची ओढ लागली आहे. पण आता वंचित आघाडी जरी महाविकास आघाडीत सामिल होऊ इच्छीत असली तरी जवळ करेल की नाही, हा प्रश्नच आहे. कारण महाविकास आघाडीला माहीत झाले आहे की आंबेडकरी समाज हा लोकसभेप्रमाणे याही वेळेस महाविकास आघाडीसोबतच राहील अशी त्यांना खात्री वाटत आहे. त्यामुळे जागावाटपात आणखी एक भिडू नको म्हणून महाविकास आघाडी वंचित आघाडीला किंमत देईल की नाही अशी शंका वाटत आहे. अशा परिस्थितीत वंचित आघाडीची काय भूमिका राहील हे पाहणे फार महत्त्वाचे राहील.

आर.के.जुमळे
दि. २३.६.२०२४

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Back to top button