१२ ऑगस्ट पासून बार्टी कार्यालयास ताळेबंद आंदोलन
१२ ऑगस्ट पासून बार्टी कार्यालयास ताळेबंद आंदोलन
पुणे:: येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला सहा दिवस उलटून गेली मात्र शासन व बार्टी प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची सकारात्मक कार्यवाही अद्यापही करण्यात न आल्याने १२ऑगस्ट पासून बार्टी संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या वतीने बार्टी कार्यालयास ताळेबंदचे आंदोलन करण्यात येणार आहे.
५ ऑगस्ट २०२४ पासून पार्टी कार्यालयासमोर २५ जुलै २०२४ च्या शासन निर्णयाविरोधात विद्यार्थी नेते हर्षवर्धन दवणे व पल्लवी गायकवाड हे बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीद्वारे बेमुदत आमरण उपोषणास बसले असून आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. उपोषणकर्त्यांनी २०२२ च्या बार्टी संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून १०० टक्के फेलोशिपचा लाभ देण्याचा निर्णय सरकार देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन उपोषण सुरूच राहणार आहे.
या आंदोलनास ०९ ऑगस्टला महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी भेट दिली असून शासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्याचे आश्वासन दिले, तर रात्री उशिरा दोन वाजता भाजप आमदार सुनील कांबळे यांनी भेट दिली असून उपमुख्यमंत्र्यांमार्फत आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.यावेळेस बार्टीचे महासंचालक सुनील वारे व इतर कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन उपस्थित होते. तरी सर्व विद्यार्थ्यांनी जोपर्यंत शासन स्तरावरून मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण मागे घेण्यात येणार नाही असे सांगितले
उपोषणाच्या सहाव्या दिवशी सुद्धा बार्टी प्रशासन व महासंचालकांनी विद्यार्थ्यांच्या मागणी संदर्भात कुठल्याही प्रकारची मोठी कारवाई केली नसून बार्टीच्या महासंचालकांच्या हलगर्जीपणाच्या विरोधात बार्टी संशोधन विद्यार्थी कृती समिती २०२२ यांनी या विरोधात १२ ऑगस्ट पासून बार्टी कार्यालयास मागण्या पूर्ण होईपर्यंत टाळे ठोकण्याचे आंदोलन सुरू करणार आहे.या आंदोलनात पुणे शहर व पुणे विद्यापीठातील अनेक विद्यार्थी संघटना सहभागी होणार आहेत. तरी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या भूमिका असणाऱ्या पुणे शहरातील सर्व संघटनांना आंदोलनास उपस्थित राहून बार्टी २०२२ च्या संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यास सहकार्य करावे असे आवाहन बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीद्वारे करण्यात आले आहे.