किनवट तालुक्यात ‘दंडार’ लोकनृत्याची धूम
किनवट तालुक्यात ‘दंडार’ लोकनृत्याची धूम
*सम्यक सर्पे*
किनवट : आदिवासीबहुल तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या दिवाळी
निमित्त होणाऱ्या पारंपरिक ‘दंडार’ या लोकनृत्याने गावागावात आनंदाचे उधाण आले आहे. आजच्या संगणक युगातही आदिवासी समाजाने आपली प्राचीन लोकसंस्कृती टिकवून ठेवली आहे. दसऱ्यापासून सुरुवात होऊन दिवाळीपर्यंत चालणारे हे ‘दंडार’ लोकनृत्य ते पिढ़ानपिढ्या जोपासत आलेले आहेत.
तेलगंणा राज्याच्या सीमेवर असलेल्या किनवट तालुक्यात आदिवासी समाज आहे. आदिवासी मुळातच नृत्य-गायनाचे विलक्षण दर्दी असतात. त्यांच्या या नृत्य-गीतांचा उगम निसर्गातल्या शक्तींना संतुष्ट करण्यासाठी झालेला आहे. निसर्गशक्तींना संतुष्ट केल्याने पीक-पाणी अमाप येते व शिकार
चांगली मिळते, अशी त्यांची पूर्वापार समजूत आहे.
‘दंडार’ मुळात हे डोंगर दरीत वास्तव्य करणाऱ्या गोंडी बोलीभागातील लोकप्रिय नृत्य होते. कालांतराने त्यात लोकनाट्याचा अंतर्भाव झाला. आठ दहा जणांचा समूह हातात ‘टाहारा’ नावाची दीड फूट लांबीची काठी घेऊन केलेला नाच हे या लोककलाप्रकाराचे एकमेवाद्वितीय वैशिट्य आहे. झाडीपट्टीत शेताला ‘दंड’, तर झाडाच्या फांदीला ‘डार’ म्हटले जाते. शेतातील पिकलेला शेतमाल घरी आल्यानंतर शेतकरी आनंद व्यक्त करण्यासाठी समूहनृत्य करीत असावेत. यातून ‘दंडार’ अवतरली, असे सांगितले जाते. ढढार, दंढार आणि गंडार या संज्ञादेखील दंडारसाठी रुढ आहेत. ‘दंडार’ नृत्य हा त्यांचा सर्वात मोठा उत्सव विविध
कलागुणांनी पारंपरिक नृत्यांनी ते साजरा करतात. त्यात दसऱ्याच्या दिवसापासून आदिवासी बांधव देवदेवतांना साक्षी ठेवून पारंपरिक पोषाख परिधान करतात. मोराच्या पिसांचा टोप डोक्यात घालून जवळपास १५ ते २० जण दंडार नृत्यासाठी सज्ज असतात. त्यातील एकास प्रमुख मानून त्याला ‘घुसाडी’ ही उपमा देण्यात येते.तो साडी परिधान करून नाचतो. या दंडारीत नाचासोबत विनोदी असे खडे सोंग दाखविले जाते. यांना ‘झडती’ असे नाव आहे. रात्री नाट्य प्रवेशासारखे प्रवेश दाखविण्याकडे कल असतो. या दंडारीला ‘परसंगी’ असे नाव आहे. अन्य प्रसंगी एखाद्या दिवाणखान्यात बसून दंडारीतील लावण्यांचे गायन होते, ती ‘बैठी दंडार’ होय.
• अनादी कालखंडापासून नृत्य-गायनादी विविध पारंपरिक कलागुनाची जपवणूक करून संस्कृतीचा दीप तेवत ठेवून
नवयुवक मंडळी संस्कृतीचा अमूल्य ठेवा जोपासून आत्मसात करीत आहे. त्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. भविष्यात आदिवासी सुप्त कला गुणांना वाव संस्कृती जपवणुकीसाठी आदिवासी कला, संस्कृती व परंपरा जगासमोर येण्यासाठी सांस्कृतिक ठेवा जतन करणाऱ्या आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी मी समाज ऋणातून
पुढाकार घेऊन सवर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.
– संतोष मरस्कोल्हे, सामाजिक कार्यकर्ता,किनवट
||फोटो ओळी||
किनवट : देवदेवतांना साक्षी ठेवून आदिवासी बांधव पारंपरिक पोशाख परिधान करतात.