साहित्य

कथा – भूमिहीन

कथा – भूमिहीन

“म्हातारी बाजतच किती दिस पडून ऱ्हाईल. तिला डाकटरला दाखवाय फायजे”
म्हणून मदनची बायको मदनला सांगत होती. बायकोचं सगळं बोलणं मदन नुसताच ऐकून घेत होता. त्याला आपल्या मायची काळजी वाटत होती. तिला दवाखाण्यात न्यावं असच त्यालाही वाटत होतं. पण हातात पैसा नसल्यानं तो खंगला होता. त्याच्या आईचा आजार दिवसेंदिवस वाढत चालला होता. राब राब राबनं अन् पोट भरणं यातच सगळे दिवस जात होते. घरात एक रुपयाही पाठिमागं उरत नव्हता. त्यामुळे मदनचा जीव आगदी नाकात आला होता. बाजवर कन्हत असलेल्या मायकडं त्यानं नजर टाकली पण तिच्याजवळ जाण्याचं धाडस त्याला होतनव्हतं.
मदनच्या बायकोनं सुडक्यात बांधलेली भाकर मदनच्या हाती टेकवत म्हणाली.
“आसा कोरडा पुळका बरा न्हवं. जा आता कामाला अन् पैसे आले की नेऊ म्हातारीला दवाखाण्यात. “
“करुणे हिच्यावर निट ध्यान ठेव, पोरायला धिंगाना करू देऊ नगस. म्हातारीच्या जीवाला बरं न्हाई, त्यांनला घरात मारा मारी भांडण करू देऊ नगस”
म्हणून मदन घराच्या बाहेर पडला. आज तो नंदासवकाराच्या शेताला जाण्यास निघाला. नंदासावकारणे त्याला लवनच्याकडची झाडं साळण्यास सांगितलं होते ;त्यामुळे तो कुन्हाड मागण्यासाठी सावकाराच्या घरी गेला. मदनाला पाहताच सावकारांनी त्याच्या हातात कुन्हाड देली अन् म्हणाला,
“मदया दोन दिसात लवणच्या कडची सगळी झाडं साळून झाली पाहिजे.”
” व्हय व्हय”
मालक म्हणून मदन तिथुन निघाला. मदनच्या मनात नेहमी एकच प्रश्न सलत होता. आपणास थोडा तरी जमिनीचा तुकडा आसायला हवा होता. पण करणार काय दरदर गरिबी अन् रोजच्च याच्या त्याच्या धुऱ्याला जाणं. कधी हाताला काम लागते तर कधी तेही लागत नाही. म्हणून त्याला गावातल्या भडीमार शेती आसणाऱ्या लोकांचा हेवा वाटत होता. गावातल्या काही काही लोकांना चाळीस चाळीस, पन्नास पत्रास एक्कर शेती. मात्र आपणास तर काहीच नाही. म्हणून त्याला जगण्याचं कोडं वाटत होते. मदन नंदासावकाराच्या शेतात आला होता. लवनच्या कडनं तो फिरत होता. मदनच्या पावलाचा चाळ चोळ लागताच पलिकडच्या हॅकोळणीच्या झुडपातून ससं भितीनं धुम ठोकत पळून गेलं. उंच हेळ्याच्या झाडाव बगळ्यांनी आपलं नगर वसावं तसं त्या हेळ्याच्या झाडालाच बगळे लागले असच वाटत होतं. मदन त्याच हेळ्याच्या बाजूच्या लिंबाच्या झाडावर चढला होता. त्याने चालवलेल्या कुराडीच्या घावाचा आवाज होताचं मगाशी बसलेली हेळ्यावरचे सगळेच बगळे उडून गेली होती. मदन कुन्हाड चालवत झाड साळत होता. मदनाची नजर पलिकडच्या माळाकडं गेली, माळाच्या कपारी आसलेल्यी गायरान जमिन बऱ्याच दिवसापासून त्याच्या मनात खेळू लागली. आपण भुमिहीन आहोत भुमिहीनास जमिन मिळणार म्हणून त्यानं बऱ्याचदा ऐकलं होतं, पण जसं ऐकल तसच ते न ऐकल्यासारखी गोष्ट मदनला झाली होती.त्यादिवशी दिवसभर काम केल्यावर मदन घरी संध्याकाळी आल्यावर त्यानं हळूच बायकोला माळराना बददल सांगितलं तसी करुणा म्हणाली,
” आवं येडं विडं लागलं व्हय तुमाला कोणी काई म्हणलं म्हंजे ?”
” आगं काय व्हणार न्हाय. अन् एवढ्या देशात ऐवढायले भरस्टाचार करायलेत अन् खरं फायजे आपल्या गावात एका एकाला किती किती जमिनी हाता अन् आपल्या बौद्धवाड्यात अणू मातंग गलीत सांग किती लोकं जमिनीवाले हातं. काय चार दोन बोटावर मिजण्याइतकीच अन् ते बी कोणाला दोन-तिन एकरापेकशा जास्ती हाय व्हय.” मदन आपल्या बायकोला म्हणाला.
“परीक काय कराव लागणार त्या रानासाठी”?
“आर्ग काई न्हाई”
“बगा बापा तुमच्या इचारानं” करुणा म्हणाली,
“दुसऱ्या दिवशी मदन सावकाराच्या घरी गेला.
“मालक म्हातारीला बरं न्हाई दवाखाण्यात न्यावं म्हन्तो “
“आरं मंग आज कामावर येत न्हाईस काय ?”
“नाही मी कसं जाऊ काम सोडून, करूणीला घेऊन धाडतो ,”
मदन म्हणाला.
सावकाराने मदनला दोनसे रुपये दिले अन पैसे घेताच मदन म्हणाला,
“मालक आज तुमी वावरात आल्यावर एक गोस्ट इच्यारायची हाय”
“काय रं वावरात काय हाय इतचं बोल की. “
“न्हाई वावरात बोलूत.’ “आरं सांग काय व्ह तै.”
तसा मदन म्हणाला,
“मालक माळाच्या पायथ्याशी असलेली जिमिन म्या काडाव म्हंतो.”
तसा सावकार हसत हसत म्हणाला,
“आरं येडा झालास की काय आरं ते सरकारी हाय केस व्हईल तुझ्यावर
“पर बऱ्याच गावातल्या लोकायनं तस्या जमिनी काढल्यात “
“आरं जाऊ दे तुला जेलमदी सडायचं आसल तर सड”
त्यावर हिरमुसल्या तोंडानं मदन “बरं बरं” म्हणत मदन सावकाराच्या घरून निघाला. सावकाराने तसं सांगितल्यावर मदनचा चेहरा एवढूसाच झाला होता. सावकार उगाचच काहीही सांगायल पण आपण मात्र ती जमिन सोडायचीच न्हाई म्हणून मदननं ठरवलं . दोन-तिन दिवसातच मदनला आपलं काळजच उकरल्यासारखं झालं होतं मदनच्या मनात खोलवर रुतलेल्या त्या माळरान जमिनीवर कुणीतरी टॅक्टरनं रात्रतुन नांगरलं होतं. त्यामुळं मदनचा जीव उडाला. आपणासच सुचलेली कल्पना त्यावर सावकार फायदा करून घेत आहे ,हे लक्षात आल्यावर मदनला सावकाराचा राग आला. आपणास भिती घालणारा सावकार स्वतःच माळरान काडतोय हे त्याच्या मनात खेळू लागलं. सावकाराला काय गरज हाय गायरान कोरायची.घरची पन्नास- साठ एक्कर मळा, विहिरी, बोर,बगा, एव्हढं जळ म्हणता जळत नाही तरी सावकार गरीबाच्या तोंडचा घसा काढत आहे या गोष्टीची त्याला चीड आली. तो दिवस मदनसाठी एखाद्या काळाप्रमाणं वाटत होता. तो संध्याकाळ होण्याची वाट पाहत होता. उरलेलं रान तरी आपण काबूत करुन घ्यावं असच त्याला वाटत होतं. आपल्या तोंडासमोरचा घास कोणी हिसकावून घेऊ नये याची मदनला भिती वाटत होती.संध्याकाळ होत असतानाच तो बायकोला म्हणाला,
“करूणे, आंधार पडू लागला की पोरांना बी तयार व्हायला सांग आज आपून माळाला जाऊ “
” आवं पर यदोका “
“व्हय व्हय यदोकाच पोरायला भाकर लवकर खाऊन तयार व्हायला सांग.”
करूणानं आपल्या चारही पोरांना जेवन वाढलं. पोराच्या मनात गायरानाची बाब पटवून दिली. मदन,करुणा पोरांनी सगळ्या तयारीनिशी टिकास ,फावडं, कुऱ्हाडी, बॅटरी घेऊन गावाच्या बाहेर निघाले. सगळीकडचं घनघोर अंधार पसरला होता. त्याचं अंधारात बॅटरीच्या उजेडानं मदनचं कुटूंब पावलं उचलत माळरानात पोहोचलं. आजुबाजूची झाडं झुडपं माळरानाची गर्द झाडी रात्रीचा किर्र अंधारमय वातावरण यामुळं मदनच्या पोरांच्या मनात भिती वाटू लागली.आईच्या पाठिमागे दडत दडत ती बापाच्या धाकाने आली होती. माळरानात आल्यावर मदन म्हणाला,
” ते बगा तेतुन ते त्या पलिकडच्या पळसाच्या झाडपसरोक आपलाला शेत काढायचं हाय.तवा म्या जाळ करतो. अन् तुमी हे दगड-धोंडे धुरा केल्यावानी एका लायनीने टाका. “
मदनची बायको पोरं त्या अंधाऱ्या रात्री दगड उचलून पलिकडे टाकत होती. दगडाचा होणारा आवाज त्या माळरानाला झोपेतून जागे करत होता. मदन लहान लहान झुडपं पालव्या तोडत होता. डोळ्यावर झोपेच थवंग न येऊ देता आपणास शेत मिळणार म्हणून पोरं मोठ्या आशेनं सांगितलेली कामे करत होती. तिन चार घंटे काम केल्यावर मदन बायको पोरासह घरी आला.त्याच्या मनात आजूनही भिती खळवळू लागली होती. गायरान काढल्याशिवाय त्याला चैन पडत न्हवता.त्याच्या डोळ्यावरची पार झोपच उडाली होती. कुस बदलू बदलू ती रात्र तो जागतच होता. झोपेत असलेल्या बायकोला त्यानं त्याच रात्रीच झोपेतून उठवलं.
“करुणे ये, करूणे एक काम कर की “
“काय”
” आगं हे मंगुळसुत्र इकून टाकू दे की “
” आवं पर कयापायी अन हे काय येळ हाय ईचारायची”
” आगे घ्या मन्तो मंगळसूत्र इकून ट्याकटरने वावर काडाव मंतो.” आवं म्हतारीचं दुखणं कमी व्हायना झालं. म्या तिच्यापायी इकाव म्हंतू तर तुमी दुसरंच घेऊन बसल्या.झोपा गप “
” आगं मतारीचा दमा व्हय व्हईल दमादमान कमी “
” अन् आपूण तिला डाकटरला दाखवलय की.एकदाची जिमीन आपल्या ताब्यात आली की वर्सांन नं जवारी, तुरी- फिरी, दाळी -दुळीला तरसाव लागणार नाय “
” ते सगळं खर हाथ परिक “
” आगं आपलाला ते रान इकता येणार न्हाय परिक एकदा बी पेरलं अन्
एक दोन वर्षे वयतीचं झालं की झालं मंग पुना पोराच्या काळात नावावर झालं तर झालं, न्हाईत न्हाई परिक जनमाची भाकर व्हायायली की “
तसी करुणा म्हणाली,
” बरं घेऊन जा उद्या मंगुळसूत्र”
तसा रात्री मदनचा चेहरा खुलला. झोप लागली . आपणास आता माळरान मिळणार म्हणून मदन खुश झाला होता. दुसऱ्या दिवशी मदनन बायकोच मंगळसूत्र विकून टॅक्टरवाल्याला पैसे दिले. मात्र तो तेवढ्या पैस्यावर तयार होत नव्हता. टॅक्टर जर वनखात्याने पकडलं तरची भीती मदनला सांगत होता. मदनने पुन्हा वर आणखी पैसे देऊ करतो म्हणल्यावर त्या रात्रीच मदनने माळरानात टॅक्टर नेल. अन् चांगले दीड एक्कर रान काढलं. मदनला त्या रातातुन निघुन जाऊच नये असच वाटत होतं. सकाळी मदन,करुणा भाकरी घेऊन रानात आले. नांगरलेलं सगळं रान आपलं आहे यावर तिचा विश्वास बसत नव्हता. मदन अन् करुणाच्या चेहऱ्यावर आनंदाचं चांदनं निर्माण झालं होत. आजुबाजूच्या परिसराला न्याहळत वावराच्या कडे काटने फिरने मदनला खुपच आवडू लागलं .मदन अन् करुणा दोघानही त्या वावरात बसून जेवण केलं. दिवसभर दगड-गोटी इकडे तिकडे टाकली. झाडं झुडप तोडली होती. पाहता पाहता मदनने माळरान वावर काढल्याची चर्चा गावभर पसरली होती. मदनच्या रानाच्या बाजुन नंदासावकाराने रामाला उभ केलं होतं. रामाने नंदासावकाराच्या सांगण्यावरून रान काढलं होतं. मिरग सुरू झाला होता. आगोदरच आवकाळी पावसानं एक-दोनदा झोडपलं होतं. मिरगातही पावसाने चांगलीच उपस्थिती दार्शिवली होती. त्यामुळे गावच्या पेरण्या होऊ लागल्या. मदनाचा जीव पेरणी करण्यासाठी तुळतूळ करत होता. वाथरात कधी एकदाचं बी टाकाव आसच त्याला वाटत होतं. पण माळरानाने आता चौकीदार फरू लागला होता. गायराव नांगरल्यामुळे शेती करणार हे त्याला माहित होते. म्हणून तो मदन अन् रामाच्या मागावर राहत होता. त्यानं एक-दोनदा मदनला वावर काढल म्हणून विचारलही होते. सावकाराचा पूर्ण पाठिंबा रामाला आसल्यानं चौकीदार रामाला काहीच म्हणत नव्हता. त्यामुळे मदनही आता खंबीर झाला होता. आडकलं तर रामा बरोबर तोही जेलमध्ये जायला तयार होता. गावची सगळी पेरणी झाली होती. मदननं नुसती हायब्रीड बियाणं ,खत मिसळून शिपडायचं ठरवल होतं. रामानंही तसच केलं होते पण चौकीदार मदनला माळाकडे तोंड काडू देत नव्हता. त्या दिवशी रामानं केलेली पेरणी पाहून मदनला धिर आला. अन् आपणही आता पेरणी कराव या विचारानं तो करुणाला म्हणाला,
‘करुणे, ये करुणे आज रातच्यालाय जाऊन,बी शिपडून देऊता पोरायला सांग”
“आवं रातच्याला कामुन ?”
“आगे त्यो चौकीदार पेरू देत न्हाई, पर आज पेरणी करूताच”. म्हणून मदननं बायकोला सांगितलं.मदनने महिनाभर राब राब राबून पैसे गोळा केले होते. त्यातुनच त्यानं खत बी आनलं होतं. आता तो घरात आळणी-सपळ कसही खाऊन दिवस काढत होता. त्या रात्री तो बायकोला म्हणाला, “चला चला आज जाऊताच तसी मदनची बायको म्हणाली,
” आवं म्हातारी किती खोकलाय लागली अन उसवासही निघत नाही “
” मंग काय कराव दे तिला औषध पाणी “
” करुणानं सासूला औषध-पाणी दिल्यावर सगळेच घराच्या बाहेर पडू लागले. तोच मदन म्हणाला,
” ये धम्मा तु घरिच ऱ्हाय, आजीला पुन्हा जर दम येऊ लागला तर ते तिथं झंडू बाम हाय छातीला घास”. दुध गरम केलं तेचं दे. आमी येतोच जाऊन, अन् दाराची कडी लावून घे भिऊ नगस.”
म्हणून मदन बायको पोराला घेऊन माळरानाकडे आला. त्या सुनसान अंधान्या रात्री मदननं वावरात भला मोठा जाळ केला होता. त्यामुळं त्या संपूर्ण माळरानात तो एकटाच जाळ दिव्याप्रमाणं जळत होता. मदन काशी अन् पोरांनं आपापल्या हातात टोपले घेतले अन् खत, बी शिपडू लागले. त्यांच्या प्रत्येकाच्या मनात उत्साहाच ,आनंदाचा फुलोरा बहरून येत होता. आपल्या वावरात आपण पेरणी करत आसल्यानं मदनची छाती फुगून येत होती. मदनचं कुटूंब घाई घाईनं बी शिपडत होता तोच मदनचा मुलगा सुजित ओरडला.
” आई~आई~”
काय झालं म्हणून सगळेच त्याच्याजवळ गेले. सुजित पायाला काहीतरी टोचलय म्हणून सांगत होता. सुजितनं हाततलं टोपलं बाजुला फेकलं. त्या अंधाऱ्या तो रानात रडत रडत तडफडत होता. त्याचं ते तडफडनं पाहून मदनंन बॅटरी घेतली त्याच्या पायाला बघितलं अन् आजुबाजुला पाहतो तर काय एक मोठी इंगळी काटा वाकडा करुन तरतर धावत होती. मदननं तिला एका दगडात ठार केलं होतं. पण पोरगं तस तडफडत आसल्यानं त्याचं मन त्याला आनखी पुन्हा काम करू देत नव्हतं; त्यामुळ मदन म्हणाला,
” आरं पोरांनो तुमी जा घरला म्या एकटा टाकून येतो. “
तसी करूणा म्हणाली ,”आवं नका एकटं दुकटं टाकू चला तुमी बी घरलाच चला.”
तसं मदननं खत बी उद्याच्या रात्री शिपडाव म्हणून माळातच झुडपात लपवून ठेवलं. अन् घराला निघाला होता. सुजितच रडनं अजूनही चालू होतं. त्याच्या पायाची आग होत होती. त्याचं पूर्ण अंग ल्हाई ल्हाई होत होतं. मदन घरी आला होता. पण त्याला निट झोप लागत नव्हती. रात्रभर तो पोरासमोर बसुन होता. काशि तर वेड्यासारखी होऊन पोराच्या तोंडाकडं पाहत होती. सकाळी उठल्यावर मदनंन पोराला दवाखाण्यात नेलं. पोराच्या पायाची आग थोडी थंडावली होती. पण मदन आजरात्री मात्र कोणत्याही परिस्थितीत वावरात बी शिपडणार होता. संध्याकाळ होताच तो एकटाच माळरानाकडं निघाला होता. आज तो एकटाच काम करणार होता. माळरानात आल्यावर मदन टोपल्यात खत, बी घेऊनं शिपडू लागला. तोच पलिकडच्या वाटेनं बॅटरीच्या उजेडात कुणीतरी येत असल्याचं मदनला दिसलं. अन् मदनच्या मनात भिती पसरली गेली. आपल्या मागावर चौकीदार आहे. म्हणून मदननं टोपलं बाजूच्या झुडपात ठेवल अन् पलिकडच्या झुडपामागे जाऊन बसला. चौकोदाराला आपण पेरणी करत आसल्याची खबर लागली. तो आता आपणास पकडणार रामाला पाटलाचा,सावकाराचा पाठिंबा होता. अन् त्याने काहीतरी पैसे त्याला दिले ;म्हणून रामाच्या विरोधात तो गप होता. पण, आपणास पैसे मागल्यावर आपण त्याला देयना म्हणून म्हणालो होतो. त्याचाचं राग चौकीदार आपल्यावर काढणार. दिवसभर त्यानं शिपडलेलं ते बघितल असल ,आता तो पुन्हा बघणार. जीव मारून धाडस केलं खरं पण काय होणार? हा सगळा विचार करत मदन झुडपामागं दडला होता. बॅटरीचा उजेड जवळ जवळ येत होता. वावरात आल्यावर बॅटरीवाला वावराच्या सगळ्या कडनं बॅटरीचा उजेड मारत होता. त्याला त्या रानात कुणीच दिसत नव्हतं. त्यानं आजुबाजूच्या झाडा-झुडपावरही उजेड मारला. अन् मग तर ज्या झुडपात मदनन खत लपून ठेवलं त्या झुडपाकडं उजेड जाऊ लागला. मदननं डोळे मिटवले .आता चौकीदार खत घेऊन जाणार. बॅटरीवाला झुडपात शिरला अन् त्यानं हळूच खताच पोते बाहेर काढलं. मदनचा जीव कासाविस होत होता. आपण केलेल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरणार चौकीदार खत घेऊन गेल्यावर आपण दुसरं खत कोणत्या पैस्यातुन आणाव याचा विचार मदनला पडला होता. तोच मदनच्या कानावर शब्द शब्द पडले.
“बा वावरात आलाच न्हाय कायकीन “
“व्हय व्हय “
अन् मदनचा जीव शांत झाला. आपलेच पोर आमल्याची खात्री पटताच मदन उठला. पोराजवळ जात म्हणाला,
“आरं तुमी, मला वाटलं चौकीदारच आलाय तुमी का आल्या म्या एकटा शिपडलो आसतो की”मदन पोराला म्हणाला.
“बाबा तु बी शिपडू नगस,” सुजित म्हणाला
“कारं काय झालं ?” मदनन विचारलं,
“काय न्हाय.” दुसरा मुला म्हणाला.
“बा” सुजित एवढंच बोलला.
“काय ” ?
” बा आपली आजी गेली”
,म्हणून त्या शांत किर्र अंधाराला छेडत पोरांनी हंबरडा फोडला बापाला घट्ट बिलगून लक लक हलत रडू लागली.मदनच्या पायाखालची जमीन सरकली.काळजात दुःखाचं वादळ उठलं. त्याच अवस्थेत तो धावपळीनं घराकडं निघाला. त्याच्या पाठीमागं पोरही पळू लागली.मदन घरी गेल्यावर त्याला त्याची माय नाहीसी झाल्याची दिसली. मदनचं कुटूंब दुःखाच्या दरितून वाहत होते. मदनची पेरणी तसीच राहुन गेली होती. मदननं त्याच्या मायचे अंत्यसंस्कार केले. त्यानंतर दिवसही असेच गेले. आठ-पंदरा दिवस मदननं घर सोडलं न्हवतं. पंधरा-विस दिवसानंतर मदन सकाळी सकाळीच मोठ्या हिमतीनं दिवसाच बी पेरतो म्हणून मदन माळरानाकड निघाला होता, पंधरा -विस दिवस आसेच गेले होते. त्यातल्या त्यात आपली माय गेली. याचा विचार करत मदन वावरात आला. अन् वावरात पाऊल न टाकताच तो आलीकडच बसून ढसा रडू लागला. तिकडं ती माय अन इकड ही काळी माय, दोन्हीही नाहिस्या झाल्याचे त्याला दिसत होतं. मदननं काढलेल्या वावरात कुणीतरी पेरणी करून सगळ्या वावराभोवातो काटा लावून घेतला होता. मदन वावरावर नजर टाकत होता. तेव्हा छोटी छोटो बोटा एवढी ज्वारी त्या रानात वाऱ्याला लागलेली दिसत होती. मदनचं मन रडकुंडीस आलं होतं. आपण जिमीनवाला नाहीच आपले आता आसचं पहिल्या सारखच लोकांच्या शेतात राबत जगणं त्यांच्या नजरेस दिसू लागलं. मदनच जमिनवाला होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं होतं. मदन तिथून उठला आपण भुमिहोन ते भूमिहीनच आहोत हाच विचार करत तो घराच्या दिशेने निघाला होता. लोकांच्या वाटेला भरमसाठ जमिनी अन् त्याच्या वाटेला माळरानातला दगडीही आला नव्हता. आपणासही शेत असाव हो त्याच्या मनात सलणारी खंत पुन्हा एकदा सलू लागली.ही सगळी जमीन माणसानं काय जन्म घेताना सोबत घेऊन आला नाही.पण काहींच्याच वाटेला ही गर्भश्रीमंती तर काहीला मात्र ठेंगाच का? पाण्यानं डबडबलेले त्याचे डोळे भरून वाहू लागले. त्यामुुुळं डोळ्याला रस्ताही दिसत नव्हता आणि तो रस्ताही धूसर वाटत होता जो डॉ.बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जमिनीचे राष्ट्रीयकरण करून आर्थिक विषमता मिटवणाऱ्या मार्गाचाही.

– मनोहर सोनकांबळे 8806025150 (एमफिल संशोधक विद्यार्थी, माध्यमशास्त्र संकुल स्वा.रा.ती.म.विद्यापीठ,नांदेड) (टीप:कथा पूर्व परवानगीशिवाय इतरत्र घेऊ नये)

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button