कमळवेल्ली येथे ‘बडेम्मा’ उत्सवाची सांगता
कमळवेल्ली येथे ‘बडेम्मा’ उत्सवाची सांगता
झारीजामनी:(सुनील शिरपुरे)
तेलंगणा व महाराष्ट्राच्या सिमेवरील काही भागात हा उत्सव साजरा केला जातो. जसा भोंडला उत्सव साजरा केला जातो , अगदी तसाच हा पण उत्सव साजरा केला जातो. हा एक महिलांचा उत्सव आहे. याचे नाव ‘बडेम्मा’ हे तेलगु भाषीक असल्यामुळे सहसा आपल्या लक्षात येणार नाही. याची सुरुवात नवरात्रापासून होत असते. कोजागिरीनंतर एक दिवस ठरवून या उत्सवाची सांगता केल्या जाते. नवरात्रापासून तर सांगता होईपर्यंत महिला हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. सुरुवातीला होमहवन प्रमाणे एक मोठा गल खणून त्याला मातीने लेपून सभोवताली मातीचे चौकट तयार केल्या जाते व दररोज त्याला फुलांनी सजविल्या जाते. मग याभोवती महिला फेर धरून नाचतात. याशिवाय विविधांगी खेळ खेळतात. एकुणच हा कालावधी महिलांसाठी खूप आनंदाचा असतो. दिवसभर काम करून कितीही थकवा असला तरी या उत्सवातील नर्तनामुळे व खेळामुळे त्या कामाचा त्राण नाहिसा होतो. ज्या दिवशी सांगता होते, त्या दिवशी फुलांच्या आरासाची अशाप्रकारे सजावट केल्या जाते. फुले न मिळाल्यास बांबूचा किंवा ताराचा घुमट बनवून त्यावर पेपर चिपकवला जातो व नंतर रंगीबेरंगी कागदी फुलांची कात्रणे त्यावर चिपकवल्या जाते. ही जी फुलांची आरास किंवा घुमट बनविल्या जाते, त्यालाच ‘बडेम्मा’ असं नाव दिल्या गेलं. सांगताच्या दिवशी त्या गलाजवळ दैनंदिनीप्रमाणे एकत्र गोळा होवून काही वेळ नाच व खेळ खेळल्या जाते आणि मग ते ओढ्यात किंवा नदीवर पूजाविधी करून विसर्जीत केल्या जाते. सोबतच मिष्टान्नाची शिदोरी नेऊन एकत्र भोजन केल्या जाते. सरतेशेवटी अशाप्रकारे या उत्सवाची सांगता केल्या जाते.