संपादकीय

काल, आज आणि उद्याचेही शिवाजी शिवाजीच

काल, आज आणि उद्याचेही शिवाजी शिवाजीच


मानवी समुदायात काही मूल्य असतात.त्या मूल्याची सततची रुजवणूक ही एका आदर्श समाज निर्मितीच्या दिशा ठरवतात.समाजात व्यक्ती तितक्या त्यांच्या प्रवृत्या असतात.त्यामुळे समाजात समतोलाचा अभाव आढळतो. स्वतःचाच स्वार्थ ठेऊन सगळेच जगत असतात.आपल्या गरजा, भौतिक सुखासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. मी,माझं कुटुंब,माझे सगेसोयरे,यांच्या पलीकडे जाऊन आपण फारसा विचार करत नाही.पण काही अशी माणसं असतात की, ते समाजासाठी स्वतःच्या कुटुंबांचा,विलास,वैभवाचा त्याग करून समाजातील अमानवी कृत्य,वाईट रूढी परंपरा याना बदलण्यासाठी आपली हयात घालवतात.मग ते शिक्षण,न्याय,समाजपरिवर्तन,रयतेचे राज्य,असो की कुठलीही सामाजिक दुष्कर्मे. त्यांना पिटाळून लावण्याचे काम ही माणसे करत असतात.ही माणसे नेहमी समाज समाजातील दुःख,समस्या, सामाजिक न्याय यासाठी लढतात.यांच्या विचार कार्यात इतकी सत्यता असते की,ते मानवी जीवनाला प्रत्येक वळणावर मार्गदर्शक,बहुउपयोगी,अनमोल ठरतात.समाजात स्थेर्य टिकून ठेवण्याचे काम हीच महामानवे करतात. कुठल्याही समाजात समाजसुधारकांचे योगदान महत्वाचे ठरते. पण याच महाविभूतींना बदनाम करण्याचे कामही काही नालायक लोकांकडून स्वतःच्या स्वार्थासाठी केले जाते.आदर्श समाज निर्मितीसाठी कार्य महामानवाकडून केल्या जाते .मात्र त्यामध्ये खोडा घालून स्वतःची स्वार्थे साधण्यासाठी समाजात अंधश्रद्धा,विकृतविचार पसरवून आपली घरे भरणाऱ्या समाजकंटकाकडून महापुरुषाच्या मूळ विचारला छिन्न विच्छिन्न करून त्यात विकृतीच विखं मिश्रण करून विचार आणि महापुरुषांचे महत्व कमी करण्याचे प्रकार घडत असतात.असाच प्रकार नुकतेच प्रकाशित
झालेल्या ‘आजके शिवाजी-नरेंद्र मोदी’ या भाजप नेते जयभगवान गोयल लिखित पुस्तकाच्या निमित्ताने झाला.खरे तर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या घराण्याची बदनामी ही काही आजची बाब नाही.या आधी ब. मो.पुरंदरे यांनी राजमाता जिजाऊ यांची बदनामी केली आणि आम्ही सर्वांनी मूग गिळले. एवढेच नाही तर ज्या मातेला पावित्र्याचे प्रतिक म्हणून पहावे अशा राजमाता जिजाऊ यांच्या बदनामीनंतर पुरंदरेला धडा शिकवण्या ऐवजी त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तोही प्रकार आम्ही याच नयनी पहिला.श्रीपाद छिंदम यानेही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलले होते .असा माणूस निवडणूक रिंगणातून विजयी होतो.म्हणजे लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही त्याच माणसाला निवडून आणतो.या साऱ्याचा विचार केला की,खरच आपण विचाराने षंढ आहोत याची जाणीव होते. कुणीही उठावे काहीही गरळ ओकावी आम्ही ती मान्य करावी इतके आम्ही दुधखुळे झालोत. मुळातच आम्हाला खरा इतिहास माहित नाही.तो जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्नही कधी करत नाही.आपल्यातली तर्कक्षमता इतकी लोप झाली की,त्यामुळे आपले डोके आपण न चालवता दुसरे चालवत असतील तर अशा समाजाकडून काय अपेक्षा कराव्या हा मोठा प्रश्न आहे. जिजाऊंच्या जयंती दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला चक्क शिवाजीच्या बरोबरीला ठेवणे खरच योग्य आहे का? मोदी यांचे कोणते कार्य शिवाजी महाराजांची बरोबरी करू शकते म्हणून गोयल यांनी हे पुस्तक लिहले.? या पूर्वी अभिनेता परेश रावल यांनीही नरेंद्र मोदीला बुद्धाच्या त्यागाशी जोडण्याची गरळ ओकली.पुण्याच्या त्या उपमहापौर बाई यांनीतर सावित्रीबाई फुले हे इंग्रजांकडे धुनी भांडी करत असत असा जावई शोध लावला. इतके महापुरुष त्यांच्या म्हणण्यानुसार स्वस्त झालेत का?हे असे का घडते? सत्य तत्वाची मोडतोड करून आपल्या डोक्यातील भंगार खान्यातून कोणतेही विधान करणे हे आज घडीला वाढत चालले आहे.आपणास एखाद्या गोष्टीचे पुरेपूर ज्ञान नसताना वाटलं ते बारगळने हे सामाजिक मूल्यतत्वाच्या दृष्टिकोनातून घातक ठरू शकते. आज समाजात इतका द्वेष पसरला आहे की, लोक कुठल्याही प्रकारची चिक्कीसा न करता द्वेष पसरवत आहेत आणि स्वीकारत आहेत. मुळातच आमच्या मानसिकतेवर परंपरांचा, अंधश्रद्धेचा, खोट्या इतिहासाचा ,पगडा आहे.पुन्हा त्यात अशी खोटी माहिती ही समाजाची दिशाभूल करणारी असते. दिशाभूल समाज कधी क्रांती करू शकत नाही. आणि क्रांतीच्या दिशेने जाणाऱ्या समाजाला रोखण्याचे प्रकार आज विविध प्रकारच्या स्थरातून सुरु आहेत.त्यासाठी आपली वैचारिक मानसिकता चिक्कीसक बनवने गरजेचे आहे. कॉमरेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होते’? या पुस्तकाने शिवाजी महाराजांचा खरा इतिहास बाहेर आला. पण त्यामुळे त्यांची हत्या झाली हे आता सर्वानाच मान्य करावे लागणार आहे. सत्य मांडणाऱ्याना कोणती किंमत मोजावी लागते याचा प्रत्यय म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कुलबुर्गी,गौरी लंकेश, होय.समाज आज अशा स्थितीत अडकलेला आहे की, सत्याला असत्य आणि असत्याला सत्य समजून वावरत आहे.गेली मागच्या दशकापासून आज समाजात विचारवंत,बुद्धिजीवीवर्ग निर्माण होण्याचे प्रमाण मंदावले आहे. मा.म. देशमुख, पुरुषोत्तम खेडेकर ऍड.अनंत दारवटकर, श्रीमंत कोकाटे आदींनी शहाजी राजे, जिजाऊ ,छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे या संबंधीचा जो खरा इतिहास शोधून काढला.त्यात डॉ.अमोल कोल्हे यांच्या संभाजी महाराज विषयीच्या मालिकेतून बराचसा सकारात्मक प्रभाव समाजावर पडला. याचा परिणाम म्हणून या मालिकेवर देखील आक्षेप घेतले गेले. सत्य जेंव्हा झोंबते तेव्हा त्याला विरोध हा वैचारिक लढाईनेच केला गेला पाहिजे.खून करणे,विद्रुप,लेखन,बदनामी करणे,ही लक्षणे म्हणजे विकृतीवर पांघरण घालणे होय.शिवाजी महाराज यांच्या कार्यकृतत्वाची सर अशा हजार नरेंद्र मोदीना येणारी नाही.हे सत्य असतानाही असा डांबिसपणा या पुढे घडता काम नये.कारण शिवाजी ते शिवाजीचं त्यांची जागा कुणालाच घेता येणार नाही. आज गोयल लिखित पुस्तक मागे घेण्यात आले असलेतरी यापुढे जिजाऊंची ,शिवाजी महाराजांची,संभाजी राजेंची बदनामी करून विकृतीचा अजेंडा राबवण्याचे प्रकार रोखणे निकडीचे भासते.आजच्या परिस्थतीतही शिवाजी महाराजांची दूरदृष्टी ,व्यवस्थापन,निसर्गपेम, सर्वधर्मसमभाव,संघटन कौशल्य,स्त्री सन्मान ,न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधुत्व, तर्क,चिक्कीसक बुद्धी,तो विवेक,जलनीती, शेती-शेतकरी विषयक उपयोगी धोरणे या सर्वांचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातूनच आजच्या समस्यांचे निराकरण शक्य वाटते. म्हणून त्यांच्या विचार आणि कार्याला प्रत्यक्षात उतरवण्या ऐवजी त्यांना कमी लेखून आजके शिवाजी नरेंद्र मोदी अशाप्रकारे लेखन करणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी होय . शेवटी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजच कालचे आजचे आणि उद्याचेही!
–मनोहर सोनकांबळे, नांदेड ८८०६०२५१५०। manoharsonkamble255@gmail.com

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button