ज्ञान संपन्नता म्हणजे धम्म जीवनमार्ग !…
ज्ञान संपन्नता म्हणजे धम्म जीवनमार्ग !…
तथागतांचा धम्म हा ज्ञानविचार आहे. धम्म ज्ञानावर भर आणि जोर देतो. धम्मज्ञान पवित्र धन आहे. धम्माचा ज्ञान प्रचूर आणि अत्युच्च प्रमाणात आहे. या ज्ञानावर कोणाची जहागिरदारी अथवा मक्तेदारी नाही. ते ज्ञान रावापासून रंकापर्यंत, स्त्रीपासून पुरुषापर्यंत, बालकापासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. धम्म तेथे ज्ञान, ज्ञान तेथे मानवी कल्याणाचा सर्वांगीण विचार आहे. धम्मज्ञान या विचाराला अनुलक्षून आहे. धम्मज्ञान मानवतेचे कोंदण आहे. धम्म मनावर आणि ज्ञानावर अधिष्ठित असल्यामुळे मन आणि बुद्धीचा, भावना आणि विचारांचा धम्म आहे. या अनुषंगाने मानवाच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टीने बौद्ध जीवन मार्गात डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या लेखणीतून साकारलेला धम्मं ग्रंथ “बुद्ध आणि त्यांचा धम्म”मध्ये तथागतांच्या धम्मोपदेशाचे मार्गदर्शन केले आहे. तथागतांचा धम्म महासागराप्रमाणे अनंत, विशाल आणि अथांग आहे. तसेच महासागरात ज्याप्रमाणे पाणी अनंत आणि खनिज संपत्ती अथांग असते, तद्वतच धम्म मनाने आणि ज्ञानाने भरलेला आहे. धम्म संस्कृती ही ज्ञानाची संस्कृती आहे. ज्ञान संस्कृती श्रेष्ठ श्रीमंती आहे. ज्ञानाचे मूल्य महान आहे.
‘ज्यांच्याकडे ज्ञान, जगी त्याला मान.’
धम्म ज्ञानाने ओतप्रोत भरलेला असल्यामुळे तत्कालीन परिस्थितीत त्या भूमीत बौद्धिक समृद्धी विपुल होती. त्याचा सबळ पुरावा भारताचा वैभवशाली इतिहास सांगतो. हे ऐतिहासिक सत्य कोणी नाकारू शकत नाही. तत्कालीन बौद्धिक विकास केंद्र म्हणजे तक्षशिला, नालंदा, तेल्हारा या जागतिक विश्वविद्यालयांचा नामोल्लेख करता येईल. ज्या ज्ञानाचे राष्ट्र निर्मितीसाठी उपयोजन झाले. म्हणून धम्म अनुरक्ताने ते राष्ट्रीयत्वाचे प्रतिक बनले. तसेच अनन्य विषयाचे सुगम ज्ञान विशद करणारे भदंत काश्यप, नागसेनसारखे विचारवंत निर्माण झाले.
ज्ञान हे अस्तित्वाचा आणि प्राबल्याचा केंद्रबिंदू असतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वचन उद्धृत करावेसे वाटते. बुद्धीचा विकास मानवाच्या अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.’ बुद्धीचा विकास ज्ञानाने होतो. बौद्धिक विकासासाठी मानवीय संस्कार धम्म रुजवितो. हे लाभदायक आणि हितकारक ज्ञान ‘धम्म जीवन मार्गात’ आहे. ज्ञानाने लाभ, अभावाने विनाश होतो हे कळण्याइतपत मानव अज्ञानी नाही.
धम्म जीवन मार्ग मानवी विकासाचा आराखडा आहे. मानवाला यथार्थपणे जीवन जगण्याचा तो सुलभ मार्ग आहे. मनाचा भाग मन शुद्धीकरणाचा आणि ज्ञानाचा भाग ज्ञान संपन्नता म्हणजे धम्म जीवन मार्ग होय. मनाची, ज्ञानाची सांगड घालून जीवन सुखी आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वत्वावर विजय, बुद्धिमान होणे, न्यायी बनणे, सुसंगत धरणे, विवेक जागृत ठेवणे, सावध व धैर्यशील राहणे, आळसाचा आणि निष्काळजीपणाचा त्याग करणे, उच्च संस्कृतीचा अवलंब करणे, असत्य भाषण टाळणे, सत्य व असत्याची पारख करणे, सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे धम्म जीवन मार्ग होय.
ज्ञानाचे अर्जन हा सर्वोन्नतीचा सुखदायक मार्ग आहे. अंत:करणातील ज्ञान जागवून त्याला चालना देण्याचे कार्य धम्म जीवन मार्ग करतो. सुंदर जीवन बनविण्याची, जगण्याची कला आणि विज्ञान या मार्गातून मिळते. मनुष्याला चांगल्यातील चांगला, उत्तमातील उत्तम सद्गुणी बनविण्याचे काम धम्म जीवन मार्ग करतो. माणसातील नेमस्त माणूस बनण्यासाठी, सर्वश्रेष्ठ माणूस बनण्यासाठी, मनुष्याचे वैयक्तिक चारित्र्य शुद्ध, स्वच्छ, निर्मळ आणि पवित्र असावे, असावे सुंदर मानवी जीवन, मनुष्य राष्ट्राचा सजग नागरीक, चारित्र्य संपन्न, ज्ञान संपन्न बनावा. यासाठी उत्कृष्ट जीवनाचे दिग्दर्शन तथागतांनी केले आहे. मानवी जीवन सार्थकी लावले आहे. या सारभूत तत्वांची रचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपरोक्त ग्रंथात केली आहे.
संपत्तीची हानी झाली तर काही बिघडत नाही, शरीर संपत्तीची हानी झाली तर काही प्रमाणात बिघडते. परंतु चारित्र्य गेले तर सर्वस्वी संपते, माणूस कुठलाच राहत नाही. म्हणून चारित्र्याला जपावे हीच शिकवण धम्म देतो. जगण्याचे मनोबल वाढवितो. या धम्म संस्कारातून व्यक्तींचे कर्तृत्ववान आणि सामर्थ्यवान परिचय पत्र तयार होते.
खरे जीवन धम्म मार्गात आहे. उदात्त जीवनाचे दर्शन करून देणारे ते ज्ञान आहे. अज्ञानाला ज्ञान देणारा तो मार्ग आहे. ज्ञानावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे ते ज्ञान आहे. अज्ञानाची जाण ते धम्म ज्ञान आहे. जीवन सुंदर, सकस, सरस, पवित्र आणि सुखी बनविण्याचा तो निर्धोक मुख्य मार्ग आहे. म्हणून मानवाने आपले जीवन कुरुप बनवायचे की, सुंदर निकष बनवायचे की सकस, मानवाने चांगले असेल, चांगले करा, अधिक चांगले दिसेल. चांगले, शुभ कार्याचा शोध घेण्याचा पाठपुरावा बुद्धीने करावा. मनाचे विकार हे सकारात्मक आहेत ते स्विकारण्याचे आहेत. ते तर्कसुसंगतपणे कार्यकारणभावाने स्विकारण्याचे आहेत.
एक वेळ जग जिंकता येईल, पण स्वतःला जिंकणे काठिण्य पातळीवरचे व अलभ्य असते. जगाला बदलविण्याचा निर्धारकर्त्यांनी सर्वात अगोदर स्वतःला बदलविले पाहिजे. पण या बदलाबाबत त्या संदर्भात ते निरंक व अनभिज्ञ असतात. तो इतरांमध्ये ज्या बदलाची अपेक्षा करतो, तो बदल प्रथम स्वतःच्या अंतरंगात करून घेणे इष्ट असते. इतरांची मने जिंकण्याची असतील तर स्वतःचे मन जिंकावे लागेल. ते काम धम्म करतो. यांचे श्रेष्ठ उदाहरण म्हणजे सम्राट अशोक राजा होय. कलिंगवर विजय प्राप्त करून जगावर सत्ता गाजविण्याचा अद्वितीय अधिकार मिळवून सम्राट होण्याचा मान मिळविणाऱ्या अशोक राजाला मनाला जिंकण्यासाठी धम्माला शरण जावे लागले. धम्माच्या फलिताने स्वत्वावर विजय मिळून अध्वर्यू होता आले. जिथे धम्माची जाणीव नाही तिथे मनाची, ज्ञानाची उणीव भासते.
शुद्धी आणि अशुद्धी ही सर्वस्वी स्वतःवर अवलंबून असते. दुसरा कोणी येऊन आपल्या मनाची, विचारांची मलिनता दूर करेल ही अपेक्षा फोल ठरेल. अकुशल कर्माचा त्याग करा. धम्म जीवन मार्गाचा स्वीकार करा. आपोआप शुद्धता तुमच्याकडे चालत येईल.
शुद्ध विचार, शुद्ध आचार, प्रेरणा त्यातून मिळते म्हणून घेणाऱ्याने धम्म घ्यावा, देणाऱ्याला धम्म द्यावा. त्यात ज्ञानाची, आनंदाची अनुभूती आहे. ज्ञानाला योग्यतेने मोठेपण प्राप्त करून देण्याचा सातत्याने धम्म जीवन मार्ग प्राधान्य देतो. मोठेपण हे वयावर निर्धारण होत नाही. तर माणसातील सद्गुण, करुणा, संयम, ज्ञान, शहाणपण आणि आचरण थोडक्यात, धम्म जीवन मार्गावरून ठरते. जीवन किती लांब आणि दीर्घ आहे, यापेक्षा किती चांगले आहे. याला जास्त महत्त्व आहे. जी व्यक्ती मनाने, ज्ञानाने बलशाही असते, धम्मीक असते, ती कोठेही गेली, कोणत्याही क्षेत्रात असली तरी ती अग्रस्थानी राहते.
धम्म जीवन मार्ग व्यक्तीला विकासाकडे घेऊन जातो. विनाशाकडे नव्हे. म्हणून जीवनातला अनमोल क्षण सुखी, शांत, आनंदी, समाधानी जगण्याचे मर्म धम्म जीवन मार्गात अंतर्भूत आहे. म्हणून धम्म जीवन मार्गाचे, म्हणजेच सम्यक जीवन मार्गाचे अनुसरण करावे.
– प्रा. रंगनाथ धांडे
–91 86239 01586