डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि आजच्या शोषक अर्थव्यवस्थेचं वास्तव…!
![](https://writersmanch.com/wp-content/uploads/2021/10/PicsArt_10-05-05.13.15.jpg)
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि आजच्या शोषक अर्थव्यवस्थेचं वास्तव…!
जगाच्या पाठीवरील सर्वात अवघड आणि आव्हानात्मक असणारी लढाई म्हणजे सामाजिक न्यायाची लढाई होय.हीच सामाजिक न्यायाची लढाई लढून भारतीय समाज व्यवस्थेला एका समृद्ध परिपाकात आणण्याचं महनीय कार्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलं.त्यांच्या विचारांच्या परिसीमा ज्या पद्धतीने विस्तारित होत गेल्या त्यात त्यांचा ज्ञानपिपासूपणा हे होय. यातूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती घडवून आणली त्यापैकीच भारतीय समाजव्यवस्थेतील जातिव्यवस्थेचा संबंध हा अर्थव्यवस्थेची येतो ही बाब त्यांना प्रकर्षाने जाणवली.त्यातून आपल्या “अँनेहीलेशन ऑफ कास्ट”या ग्रंथात डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ,’जातीव्यवस्थेमध्ये अभिप्रेत होती ती विभागणी श्रमाची नव्हती तर श्रमिकांची श्रमिकांची होती .बुद्धिमत्ता,अंगभूत कौशल्य ,अशा कठोर निकषावर ही विभागणी नव्हती ,तर व्यक्तीचा जन्म कोणत्या जातीत झाला या दैवी गोष्टीवर अवलंबून होते.” मात्र समाजाची विभागणी ही गैर नाही पण श्रमिकांची विभागणी ही गैरच आहे .अशा प्रकारची विभागणी जगाच्या पाठीवर अन्य कुठेही नाही ती भारतात आहे.त्यामुळे ज्या पद्धतीने भारतात ही विभागणी आढळते त्यातून भारताचे मोठे नुकसान झाल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांगतात .अशा अवस्थेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ज्या प्रकारे सामाजिक ,राजकीय ,धार्मिक ,शैक्षणिक क्षेत्रांमध्ये समता प्रस्थापित करायची होती ,त्यात आर्थिक समतेचा हे समावेश होता. त्यासाठी “संस्थाने आणि अल्पसंख्यांक” States and minarities या ग्रंथात गरिबी निर्मूलन ,विषमता निर्मूलन आणि शोषणमुक्ततेचा आग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धरला .भूमीच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीने फ्रान्स व इटली अस्तित्वात आलेल्या सहकारी शेती पद्धतीनुसार भारतातही शेती, पाणी ,उद्योग यांचे राष्ट्रीयीकरण करण्याची भूमिका डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली मात्र आज घडीला या विपरीत पद्धतीने होणाऱ्या वाटचालीतून जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, यातून देशापुढे संकट निर्माण झाले.त्यात मुख्यतः गरीब ,पिडीत ,दलित ,भूमिहीन ,शेतमजूर ,शेतकरी ,भटक्या जाती -जमाती व इतर मागासवर्गीय घटकांची ससेहोलपट होत आहे. अशा पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जातीभेदाचे उच्चाटन करण्यासाठी एवढा भर दिला की, वर्गकलह आणि जातिभेदाच्या माध्यमातून होणारी भारतीयांची ही पिळवणूक कायम थांबली पाहिजे. पण आज घडीला देशात भांडवलदारांनी सर्व उद्योग ,व्यवसाय ,उत्पादनाच्या माध्यमातून देशात एक प्रकारची मक्तेदारीयुक्त हुकूमशाही लादली आहे.यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अमान्य असलेली अर्थसत्ताच सिद्ध होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गरीब,पीडती, दलित,शेतमजूर, सर्वसामान्य,यासारख्या मागासवर्गीय घटकांना सुधारण्यासाठी न्याय,हक्क,प्राप्तीबरोबरच त्यांच्या आर्थिक उत्पादनासाठी विचार आणि कृतीची पराकष्ठा केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थकारण हे केवळ माणसाच्या आर्थिक परिस्थितीचे किंवा उन्नतीचे सर्वमान्य विवेचन नाही तर माणसाच्या माणूसकीचे आणि माणूस ज्या ठिकाणी जगतो ,जसे जगतो , जे जगतो या साऱ्यांशी संलग्नित वास्तवतेच्या उत्थानाचे कारणही आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला राष्ट्रीय आर्थिक मूलस्रोत हा देशातील सर्व नागरिकांना आर्थिक स्वातंत्र्याचा उपयोग घेता येईल अशा प्रकारचा होता.आजच्या परिस्थितीत मात्र आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत एकाधिकारशाही व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यांची पाळेमुळे ही राजकीय सत्ताधाऱ्यांत रोवली आहेत .मुळातच या पद्धतीने देशातील अदानी ,अंबानी ,टाटा ,बिर्ला यासारख्या अर्थसत्तेच्या भांडवलदारांनी भारतीय समाजव्यवस्थेचे एक प्रकारे शोषण केलं आहे . ज्या पद्धतीने त्यांच्या उद्योग व्यवसायनीती ,कारखानदारीतुन निर्माण होणाऱ्या उत्पादनाची बाजारपेठ व्यापली आहे, त्यातून सर्वसामान्य ,छोटे-मोठे व्यावसायिक ,व्यापारी वर्ग ,शेतकरी,फेरीवाले,व तत्सम घटक यांच्यावर दिवसेंदिवस कुराड कोसळत आहे. मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, डी मार्ट ,मॉल यासारख्या बाजारपेठेतून स्थापल्या जाणाऱ्या बाजारपेठेत भारतीय लोकांचा कल वाढत चालला आहे. परिणामी रस्त्यावरील विक्री करणारे,छोटे मोठे व्यावसायिक यांची देशातील अर्थसत्तेच्या दृष्टिकोनातून अवहेलनाच आहे.डॉ.आंबेडकरांनी सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी आधारभूत उद्योग, शेती ,विमा ,बँका ,यासारख्या बाबी या शासनाच्या मालकीची असली पाहिजे अशी भूमिका घेतली होती. कारण यातून दलित ,पीडित ,शोषित ,सर्वसामान्य घटकांचे शोषण होणार नाही ,ही बाब सामाजिक न्यायाच्या परिक्षेत्रात सामावणारी असली तरी आज मात्र त्याच्या विरुद्धचा प्रकार दिसून येत आहे .देशातील बँका ,विमा ,उद्योग, रेल्वे ,वीज या सगळ्यात बाबी भांडवलदारांच्या हाती देण्यात आल्या आहेत.त्यामुळे यातील सेवेसंदर्भातील भांडवलदारांना कुठलाही जाब विचारता येत नाही .भांडवलदार ज्या स्वतःच्या नफ्याच्या दृष्टिकोनातून जी रणनीती आखतो त्या रणनितीनेच सेवा चालतात. अशा प्रकारची व्यवस्था देश विघातक असून आर्थिक विषमता निर्माण करणारी आहे . अशा या भयानव्यवस्थेतून दिवसेंदिवस जॉबलेस होत जाणारा समाज ,सुशिक्षित सुशिक्षित बेरोजगारांच्या पिढ्या ,आर्थिक शोषण भांडवलदारांची मक्तेदारी ही सगळी वाटचाल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पायमल्ली करणारी आहे . ज्या अर्थव्यवस्थेच्या निर्मितीमध्ये शोषित माणसाला केंद्रबिंदू न मानून जी अर्थव्यवस्था निर्मली जाते अशी अर्थव्यवस्था म्हणजे नफा खोरीचा आराखडा होय. गेली अनेक वर्षापासून सर्वसामान्य माणसाला सामाजिक न्याय देणारी भारतीय अर्थव्यवस्था निर्माण केली गेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या प्रकारे पीडित ,दुर्बल,वंचित,दलित,मागासवर्गीय घटकांचा सामाजिक ,राजकीय ,धार्मिक ,शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्यांच्या न्याय ,हक्क प्राप्तीकरता आर्थिक उत्पादनासाठी विचार आणि कृतीच्या प्रयत्नांची पराकाष्टा केली त्या पद्धतीचे अर्थसंकल्प आता निर्माण होत नाहीत.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थकरण हे केवळ माणसांच्या आर्थिक परिस्थितीचे किंवा उन्नतीचे सर्वमान्य विवेचन नाही,तर माणसाच्या माणुसकीचे आणि माणूस ज्या ठिकाणी जगतो, जसे जगतो, जो जगतो या साऱ्यांशी संलग्नित वास्तवतेच्या उत्थानाचा भाग आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक मूलस्रोत हा सर्व नागरिकांना आर्थिक स्वातंत्र्याचा उपयोग घेता येईल अशी असली पाहिजे ,असे प्रतिपादन केल्यानंतर आजच्या परिस्थितीत मात्र आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत एकाधिकारशाही व्यवस्था निर्माण झाली आहे .ज्यांची पायामुळे ही राजकीय सत्ताधाऱ्यांत रोवली आहेत . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या” दी प्रॉब्लेम ऑफ रुपी “या या ग्रंथात चलन व्यवस्थेची मीमांसा करताना भाववाढीने सर्वसामान्य माणूस हुरळून जाऊ नये अशा प्रकारच्या चलन व्यवस्थेचा पुरस्कार केला. पण आजचे विदारक चित्र मात्र याच्या उलट दिशेने फिरत चालले आहे .देशात डिझेल ,पेट्रोल जीवनावश्यक सेवा ,उत्पादने यांच्यातील भाववाढ ही गगनाला भिडणारी झाली असून त्यातून सर्वसामान्य लोकांचे शोषण होत आहे. लोकांच्या उपजीविकेची साधने बंद होत आहेत.पारंपारिक उत्पादनांना बाजारपेठेत व्हॅल्युएशन नाही. अशा अवस्थे लोकांच्या उत्पादनाचे मार्ग नामशेष होताना भाववाढीच्या चलन व्यवस्थेततील हा सगळ्यात मोठा सामाजिक एक शोषणकारी परिणाम आहे.अशा अवस्थेत मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या आर्थिक विचाराचे अनुसरण होऊनच सर्वाना सामाजिक न्याय मिळू शकेल. अन्यथा इथला अंधार दूर न होता ,शोषक अर्थव्यवस्थेचं हे सावट पसरत जाईल याची जाण आज सर्वांनी ठेऊन त्यादिशेने वाटचाल करणे गरजेचेच नाहीतर अपरिहार्य बनली आहे.अशा या सामाजिक न्यायाची लढाई लढणाऱ्या महामानव ,विश्ववंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन…!
-मनोहर सोनकांबळे
8806025150,8459233791
(एमफिल. संशोधक विद्यार्थी माध्यमशास्त्र संकुल
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड)
![](https://writersmanch.com/wp-content/uploads/2021/10/IMG-20211011-WA0040-1024x1024.jpg)