त्या ५० जणांच्या दलित्वाचा बाजार मांडून सन्मान म्हणजे शालीतून जोडे मारणेच होय
त्या ५० जणांच्या दलित्वाचा बाजार मांडून सन्मान म्हणजे शालीतून जोडे मारणेच होय
‘जात ‘ हा शब्द भेद जनक आहे. त्यामुळे जातीचा उदोउदो करणेही चुकीचे आणि जातीवरून कमी लेखणे ही तितकेच चुकीचे .जातीला अस्मिता नसते ;पण व्यक्तींनाअस्मिता असू असते. अशा अनेक व्यक्तींच्या समूहाला त्यांच्यातील कार्य कर्तृत्वाची प्रशंसा करायची किंवा त्यांच्यातली प्रतिभा सांगायची असेल तर त्या व्यक्तीच्या दास्यत्वाला धरून त्याची प्रतिभा सांगणे म्हणजेच त्याच्या जातीचा बाजार मांडून सन्मान करणे म्हणजे शालीतून जोडे मारणेच होय.हाच काहीसा प्रकार आज भारतीय प्रिंट मिडियातील आघाडीचे मासिक ‘आऊटलूक’ ने केलेला आहे .डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 130 व्या जयंतीनिमित्त जी कव्हरस्टोरी प्रसिद्ध करून 50 जनांना हिरो केलेला आहे. त्या हिरोंना त्यांच्या दास्यत्व, गुलामित्व व हिणत्व यातून वेगळं केललं नाही. तर ते त्यांच्या माथी मारलं. आपल्या कव्हर स्टोरी च्या माध्यमातून आऊटलूक म्हणतो की ” Our Dalit Every Inch A Hero”अर्थात “आमचा दलित प्रत्येक इंच एक हिरो”आहे .
तसेच ’50 Dalities Remaking India” म्हणून आपली कव्हर स्टोरी छापतो.हा काहीसा सन्मान देऊन दलितपणाचा सिक्का मारणे काही थांबवत नाही.मुळातच हा सन्मान म्हणावा की एखाद्या जाती समूहाची त्याच्या गुलामगिरीची आयडेंटिटी जाहीर करणे होय ?हे 50 जण जर हिरोच भासत असतील तर त्यांच्या सोबत
“आमचा दलित” म्हणून का हीन लेखले कळत नाही. दलितांची एवढी प्रतिभा दिसत असेल तर त्यांना दलित म्हणून संबोधन कधी सोडाल? त्यामुळे आउटलुकला ही उधारी उदारपणा दाखवायचा होता तर गेल्या अनेक वर्षांपासून दलित या अपमानास्पद शब्दावरून ज्यांना तुच्छ लेखले ,अपमानास्पद वागणूक दिली, तो शब्द न जोडता, त्यांच्या कालच्या गुलामीची ओळख करून देणाऱ्या शब्दाऐवजी आजच्या त्यांच्या प्रतिमेला शोभेल असा बुद्धिष्ट किंवा आंबेडकरी हिरो असा उल्लेख केला असता तर आम्ही हा सन्मान समजू शकलो असतो ;पण विष व औषधाचा डोस देऊन कुठला अर्थ साधत आहात हे कळेनासे झाले आहे. खरे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य संपूर्ण राष्ट्रासाठी कार्य केले. त्यांना केवळ दलितांचे नेते ,दलितांचे कैवारी असे म्हणणे साफ चुकीचे आहे. 1956 पूर्वी जे दलित म्हणून ओळखले गेले आहेत .डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धम्माच्या दीक्षेनंतर तर सर्वच बौद्ध झालेत.त्यामुळे ते दलित राहिले नाहीत. कारण बुद्धत्व स्वीकारणं आणि त्यांचा सोबत स्वीकारलं ते आंबेडकरत्व .म्हणून आज आमच्या समोरची ही खरी ओळख आहे. ती म्हणजे बुद्धिष्ट अथवा आंबेडकरी;पण दलित मुळीच नाही. कारण दलित पर हा परावलंबी शब्द आहे. त्या शब्दाच्या उच्चारावरून परकेपणा गुलाम असा भावार्थ निर्माण होतो. कुठल्याही समाजाला, व्यक्तीला कायम उपेक्षित राहावे असे वाटत नाही. ‘दलित’या शब्दाचा अन्वयार्थ लावला तर भारतासारख्या जातीवादी देशात व्यक्तीला प्रतिष्ठाही प्राप्त होत नाही. त्यातून सर्जनशीलतेचा व मानव मुक्तीचे पाठबळ मिळत नाही. म्हणून “आऊटलूकची”कव्हर स्टोरी ही स्वातंत्र्याची,सर्जनशीलतेची पूर्णतः ओळख देणारी नसून राजा उदार झाला आणि हाती भोपळा तिला या स्वरूपाची आहे.आऊटलुक चे संपादक रूबेन बॅनर्जी यांनी मांडलेल्या कव्हर स्टोरीतुन जातीय द्वेष दिसतो.त्यांना सरळ सरळ 50 प्रतिभावान आंबेडकरी, किंवा बुद्धिष्ट असा उल्लेख केला असता तर तो न्यायिक वाटला असता.त्यामुळे दलित या शब्दाला धरून केलेली प्रशंसा किंवा सन्मान हे सन्मान वाटत नसून प्रतिभेच्या गुणांना काळे फासने असच वाटते.गुणांचा सन्मान करायचा असेल तर जातीचा ठसा का मारला गेला?हे अनुत्तरित आहे. प्रख्यात विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांनी दलित शब्दाला नकार दिला.व ‘आंबेडकरवाद’या तत्व दर्शक शब्दाचा स्वीकार केला.तर बाबासाहेबांनी व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा मांडला. त्यासाठी शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त करून बौद्ध धम्माच्या दीक्षे नंतर रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली.दलित हा शब्द मुळातच समता,स्वातंत्र्य,बंधुत्व आणि न्याय ,प्रज्ञा, विवेक या आदर्श मानवी जीवन मूल्यांशी जुळणारा नाही. डॉ. यशवंत मनोहर असे म्हणतात की,” डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित हा शब्द दफन केला.त्यामुळे बौद्धांना बौध्दच म्हणा”. म्हणून औटलुक मासिकांची प्रसिद्ध करण्यात आलेली कव्हर स्टोरी सन्मान न देता, दलित हिरो अशी तुच्छत्वाची बाब जाहीर करते. महाराष्ट्रातील अमरावती येथील पंकज मेश्राम यांनी दलित शब्दाचा अभ्यास केला .त्यांनी दलित शब्दाचा अर्थ अनेक डिक्शनरी मध्ये बघितला असता याचा अर्थ हा तुच्छ ,अस्पृश्य ,हीन असा अर्थ निघाला. त्यामुळे मला आऊटलूकला विचारायचे आहे की, आपण तुच्छतेची प्रतिमा किती हे मोजण्यासाठी ही कव्हर स्टोरी निर्माण केली का ? हे 50 तुच्छ हिरो आमचा दलित( तुच्छ, हीन ,अस्पृश्य) प्रत्येक इंचावर एक हिरो आहे .हे जाहिरकरने हा कुठला न्याय? दलित शब्द अपमानकारक एक शिवी दर्शवित असल्याने त्यासंदर्भात पंकज मेश्राम यांनी 2016 मध्ये दलित शब्द वापरण्यास बंदी करावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल केली. त्यात प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ,माहिती आणि प्रसारण मंत्रालय, महाराष्ट्र सरकार यांना प्रतिवादी बनवले. जून 6 जून 2018 रोजी हे प्रकरण निकाली निघाले.दलित ही एक प्रकारची शिवी असून भारतीय संविधानात कुठलेही त्याचा उल्लेख नाही. 2018 च्या निकाली काढलेल्या परिपत्रकानुसार दलित शब्द वापरण्यास प्रतिबंध करण्यात आले. त्याऐवजीअनुसूचित जाती असा उल्लेख करावा असे सांगितले. खाजगी चॅनेल्स सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमातून दलित शब्दाचा वापर न करण्याचे सांगितले. तेवढेच काय महाराष्ट्र शासनाचा यापूर्वीचा दलित मित्र पुरस्कार हा आता ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार “असे त्याचे नवनामकरण झाले. दलित हा शब्द प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांनी वापरू नये म्हणूनच हा आदेश असतानाही आउटलूक माध्यमातून त्याचा शब्दप्रयोग करून 50 आंबेडकरी सर्जनशीलतेच्या व्यक्तींना आपल्या कव्हर स्टोरी मधून प्रसिद्ध केलं खरं ;पण त्याचं दास्यत्व दूर केलेलं नाही. त्यामुळे पन्नास जण हिरो आहेत की गुलाम ?हा नॅशनल. एसी. एसटी. ओबीसी स्टुडन्ट अँड युथ फ्रंट संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.डी.हर्षवर्धन यांनी तर 50 जणांची यादी म्हणजे गुलामची यादी असेच मत व्यक्त केले. अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया औटलुक ने दिलेल्या या कव्हरस्टोरीच्या निमित्ताने उठत आहे.दलित या जातीय अपमानकारक शब्दाचा बाजार मांडून दिला जाणारा हा सन्मान म्हणजे शालीतुन जोडे मारणेच होईल …रायटर्समंच (मनोहर सोनकांबळे,8806025150)