स्प्रुट लेखन
धार्मीक स्थळी जा पण..
धार्मीक स्थळी जा पण..
कोरोना कोरोना कोरोना. सर्वत्र हाहाकार. मग सारंच बंद. उपासमारही सगळ्यांची झाली. होत आहे. कोरोना आला आणि अजूनही सुरुच आहे. त्यातच जे काही बंद होते. ते हळूहळू सुरु होत आहेत.
विद्यामंदीरं अजूनही सुरु झालेले नाहीत. फक्त आठवी ते बारावी प्रायोगीक तत्वावर सुरु झाल्या आहेत. परंतू दि.सात पासून महाराष्ट्रात मंदीरं सुरु झालेली आहेत. त्यातच काहींनी त्यात आपले स्वतःचे नियम बनवले आहेत. इंजेक्शनचे दोन डोज झाल्याशिवाय प्रवेश द्यायचा नाही. हा नियम फक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी.
कोरोना येण्यापुर्वी मंदीरात गर्दी राहायची. सर्व मंदीरं गजबजलेली असायची. त्यातच गरबा खेळतांना गर्दीच व्हायची. परंतू ज्यावेळेपासून कोरोना आला. त्यावेळेपासून लोकांना भीती आहे की आपण अशा गर्दीच्या ठिकाणी गेल्यास आपल्याला कोरोना होणार तर नाही? हाच यक्ष प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणूनच सर्वसामान्य लोकं अशा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळतात. काही जातात. ज्यांना भीती नसते. जे कोरोना आहे असं मानत नाही.
कोरोनाबाबतीत सांगायचं झाल्यास काही लोकं म्हणतात की कोरोना नाही. सरकार कोरोनाबद्दल चुकीची अफवा पसरवत आहे. परंतू याबाबतीत सांगायचं झाल्यास मी एवढंच सांगेन की कोरोना हा रोग अस्तित्वात आहे. मात्र त्याची झळ ज्याला पोहोचली, त्यालाच कोरोना काय ते चांगलं कळलं. इतरांना नाही.
कोरोना हा अति संसर्गजन्य रोग असून ह्या रोगाचे जंतू हे सर्वांच्याच शरीरात गेले. अजूनही ते सर्वांच्याच शरीरात आहेत असं म्हणायला काहीही हरकत नाही. परंतू त्या रोगाचा प्रादुर्भाव प्रत्येकाच्या शरीरावर झाला नाही. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळ्या डी एन ए नं बनलेलं असतं. त्यानुसार प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती ही वेगवेगळी असते. त्यामुळं आपल्या शरीरात जरी कोरोनाच्या जंतूनं प्रवेश केला तरी आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती ही चांगली असल्यानं आपल्याला कोरोना झाला नाही. कोरोनानं छळले नाही. त्यामुळं आपल्याला म्हणायला रान मोकळं झाला की कोरोना अजिबात नाही.
कोरोनाचा चढता आलेख पाहून व स्मशानघाटातील मृत्यूचं तांडव पाहून काही दिवस सर्व बाबतीत आपण दक्षता घेतली. त्यानुसार देशातील काही गोष्टीच्या बंदला आपणही स्विकारलं आपली होणारी उपासमार सहन करुन. आजही मंदीरं बंद आहेत. शाळा बंद आहेत. काँन्व्हेंटच्या शाळेतील शिक्षकांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर पुजा-यांचे हाल होत आहेत. पुजा-यांनाही वाटत आहे की त्यांचंही पोट भरावं. त्यातच या मंदीरावर उदरनिर्वाह करणारे हारवाले, ठेलेवाले यांनाही त्यांचं पोट भरावं असंच वाटतं. परंतू ते भरणार कसं? कारण कोरोनाचं संक्रमण आज सरकारला धारेवर धरत आहे.
दिनांक सातला मंदीर उघडलं. त्यातच मंदीर प्रशासनानं सावध भुमिका घेत कोरोना संक्रमणावर कडक निर्बंध लावले.
१) प्रत्येकांनी सानिटायझर हाताला लावावं.
२) तोंडाला मास्क असल्याशिवाय प्रवेश नाही.
३) दोन डोज घेतल्याशिवाय प्रवेश नाही.
४) गर्दी करु नका.
असे साधे साधे नियम मंदीर प्रशासनाचे. सगळे नियम पाळत मंदीरात प्रवेश सुरु झाला. त्यातच लोकांची आस्था पूर्ण होत आहे. परंतू कितीही खबरदारी घेतली तरी कोरोना होणार नाही कशावरुन? ज्यांची ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यांना आजही कोरोना छळणार नाही. परंतू ज्यांची ज्यांची प्रतिकारशक्ती कमजोर आहे. त्यांना त्यांना नक्कीच कोरोना छळणार आहे हे मात्र निश्चीत. याचा अर्थ असा करावा का की मंदीर कोरोना आहे, तेव्हापर्यंत बंद ठेवावं. तर याचं उत्तर नाही असेच आहे. जोपर्यंत आपण सगळे कोरोनाच्या संक्रमणाच्या कक्षेत येणार नाही. तोपर्यंत कोरोनाची भीती ही दूर होणार नाही आणि कोरोनाही दूर पळणार नाही. कोरोनाच्या व्हायरसला पळवायलाही आपली संघटन शक्तीच कामात येणार आहे. विचार करा, किती मरणार आपण? मुठभर! पण वाचणार किती? असा प्रश्न केल्यास बरेच लोकं वाचणार आहोत.
कोरोनाबाबत सांगायचं झाल्यास एक उदाहरण देतो. आपण कोंबडे, बकरे प्रत्येकांनी पाहिले आहे. जेव्हा असाच या मुक्या प्राण्यांवर रोग येतो. तेव्हा बरेच कोंबडे बकरे मरतात. पण समाप्त होतात का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. तसेच पुर्वीपासून मानव जातीत अशाच साथी यायच्या. परंतू मानव प्राणी संपला का? तेव्हा तर औषधांचा जन्मही नव्हता. याचंही उत्तर नाही असंच आहे. मग कोरोनाला का घाबरावे. घाबरुन काही कोरोना पळणार नाही. त्याचा प्रतिकार करुनच कोरोना पळेल.
दिनांक सातला मंदीर उघडं झालं. सर्वांना आनंदीआनंद झाला. कारण आस्था. मंदीरात देव नाही. देव जर असता तर त्यानं वाचवलं नसतं का कोरोनापासून? असे काही मंडळी म्हणतात. बरोबर आहे त्यांचं. कारण मंदीरात देव नाही. केवळ मुर्ती आहे, तिही दगडाची. पण हे जरी बरोबर असलं तरी तोच मंदीरपरीसर माणसाला आत्मीक बळ देत असते. मग तो मंदीर परीसर असो की मज्जीद परीसर असो, तो चर्च परीसर असो की गुरुद्वारा परीसर. ते बुद्धविहार असो की आग्यारी परीसर. फरक एवढाच की या सर्व ठिकाणची वास्तविकता वेगवेगळी आहे. भावना मात्र एक आहेत.
धार्मीक स्थळं तुमची आस्था पाहून उघडलं गेलं आहे. त्या ठिकाणी अवश्य जा. मुक्तविहार करा. मनाई नाही. मात्र एक काळजी अवश्य घ्या. ती म्हणजे गर्दी करु नका. कुठेही स्पर्श करु नका. कुणालाही, कोणत्याही वस्तूला सध्यातरी हात लावू नका. हातात तसेच पायात हातमोजे घाला. जेणेकरुन कोरोनाचे जंतू तुमच्या शरीरावर शिरकाव करणार नाही अन् तसाही शिरकाव केलाच तर घरी येवून कपडे लवकरात लवकर बदलवून घ्या. ताबडतोब धुवून घ्या. तसेच विशेष सांगायचं म्हणजे मुक्कामाची धार्मीक स्थळं टाळा. त्यातच तुमचं भलं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०