संभाजी राजेवर जीवापाड प्रेम करणारे वीर गणपत महार उर्फ गोविंद गोपाळ गायकवाड- १
असंच ते गाव……… त्या गावात भेदभाव चरणसीमेला पोहोचला होता. अस्पृश्य सवर्ण असा वाद होता. नव्हे तर अस्पृश्यांना चांगली वागणूक मिळत नव्हती. त्यांना आवर्जून सुर्यास्ताच्या वेळा पाळाव्या लागत असत. एवढंच नाही तर मोगली साम्राज्य होतं परीसरात. त्यामुळं साहजिकच भीती मनात होती. ती एवढी भीती होती की मनाचा थरकाप होईल. शिवरायांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर राजा संभाजीला छत्रपती बनविण्यात आलं.,छत्रपती संभाजी हा शिवरायाचा आवडता पुत्र. वारसदार असल्यानं तोच हक्कदार होता. पण कटकारस्थानानं की काय, त्याला डावलून राजारामाला राजगादीवर बसविण्यात आलं. तसेच महाराज शिवरायांचा गुपचूप गडावरच अंत्यसंस्कार करण्यात आला व गडावर हजर असलेले अण्णाजी दत्तो सह बाकीची काही मंडळी संभाजीला मारायला निघाले. जसे की संभाजीनं फार मोठा गुन्हा केला. त्यावेळी संभाजीराजे गडावर नव्हते. संभाजीला ती माणसं मारायला निघाली अशी बातमी हंबीरराव मोहित्यांना मिळाली. त्यांनी या सर्व मंडळींना वाटेतच अडवलं व त्यांना अटक केली. हंबीररावांच्याच प्रयत्नातून पुढे संभाजी रायगडावर येताच त्यांना महाराज घोषीत करण्यात आलं. त्यातच आता नव्यानं संभाजीच्या नावानं राज्यकारभार सुरु झाला. त्याला राजारामानं विरोध केला नाही. कारण ज्यावेळी राजारामाला राजा बनवलं होतं. त्यावेळी त्याचं वय अवघं दहा वर्षाचं होतं. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी संभाजीला राजा बनवलं व त्यांच्या नेतृत्वात स्वराज्यरक्षणासाठी प्रखर लढा दिला. शिवरायांचा मृत्यू १६८० मध्ये झाला. त्यावेळेपर्यंत मुगल बादशाह औरंगजेब दक्षिणेत भटकलाच नाही. पण महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं की आता मराठे हतबल झाले. आता आपल्याला मराठ्यांना जिंकता येईल. त्यातच या मराठ्यांना जिंकण्यासाठी औरंगजेब बादशाहा इ स.१६८२ ला म्हणजे महाराज मरायच्या दोनच वर्षानं दक्षिणेत आला. कारण त्याला वाटत होतं की महाराज शिवराय मरण पावले. आता मराठ्यांजवळ ताकदच उरली नाही. परंतू मराठे काही हतबल नव्हते. त्यांनी औरंगजेब बादशाहाला चांगलीच शिकस्त दिली. संभाजी महाराज हे शिवरायांचे जेष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म १४ मे १६५७ ला पुरंदरच्या किल्ल्यावर झाला होता. ते शिवरायानंतर हतबल ठरलेल्या स्वराज्याचे छत्रपती बनले होते. त्यांच्यासमोर बरीच आव्हानं होती. औरंगजेब बादशाहा ज्यावेळी दक्षिणेत आला. त्यावेळी त्याच्याजवळ अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना होता. त्यानं जंजि-याच्या सिद्धीला तसेच पोर्तूगीजांनाही आपल्या बोलणीनं आपल्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळं संभाजीच्या शत्रूंमध्ये साहजिकच वाढ झाली. परंतू संभाजीही काही कमजोर नव्हते. संभाजीला प्रत्यक्ष महाराजांनी आपल्यासोबत त्यांच्या लहानपणापासूनच सोबत नेले होते. त्यावेळी त्यांचं वयही तेवढं नव्हतं. आग्र्याच्या मोहिमेवेळीही संभाजी सोबतच होते. त्यातच शिवरायांच्याच देखरेखीखाली संभाजीला लहानपणापासूनच राज्याचा कारभार कसा करावा? शत्रूंचा बंदोबस्त कसा करावा? याचं शिक्षण सहजपणे मिळालं. त्यामुळं ज्यावेळी छत्रपती संभाजी राजे बनले. त्यावेळी त्यांचे बरेच शत्रू होते. अंतर्गत आणि बहिर्गतही. त्या शत्रूंना सहजपणे तोंड द्यायची ताकद साहजिकच छत्रपती संभाजीत निर्माण झाली होती. छत्रपती संभाजी राजगादीवर बसताच मराठ्यांना दुर्बल समजणा-या मुघलांशी संघर्ष तीव्र झाला. त्यातच औरंगजेबाला वाटत होतं की आता आपला काबूल ते कन्याकुमारीपर्यंत एकछत्री अंमल निर्माण होईल. त्यामुळं तो जोरकसपणे कंबर कसून दक्षिणेत आला होता. त्याला वाटत होतं की आपल्या प्रचंड शक्तीसमोर मराठ्यांचं काहीही चालणार नाही. त्यांना एका क्षणात नष्ट करता येईल. हे त्याचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाच्या स्वप्नपुर्तीसाठीच तो प्रयत्न करीत होता. परंतू संभाजीही काही कमजोर नव्हता. त्यानंही आपल्या आईचं दूध प्राशन केलं होतं. ज्या दूधात मराठ्यांचं रक्त होतं. नव्हे तर शुन्यातून साम्राज्य निर्माण करणा-या शिवरायाचं रक्तही संभाजीत होतं. ते रक्त……..ज्या रक्तानं शिवरायांना छत्रपती बनता आलं होतं. जे रक्त द-याखो-यात फिरलं होतं. ज्या रक्तानं शायीस्तेखानाची बोटं तोडली होती. तसेच ज्या रक्तानं धिप्पाड देहाचा अफजलखान मारला होता. औरंगजेब मराठ्यांवर स्वा-या करीत होता. एकेक किल्लाही घेत होता. पण मराठेही काही कमी नव्हते. औरंगजेबाचे सैन्य किल्ला ताब्यात घेवून पुढे गेले की तोच किल्ला परत ताब्यात घेत होते. त्यामुळं की काय, औरंगजेबाच्या मनाचा भयंकर तीळपापड व्हायचा. त्यातच एकदा त्यानं आपल्या डोक्यावरील पागोटं खाली फेकलं व प्रतिज्ञा केली की मी संभाजीचा पाडाव केल्याशिवाय पागोटं घालणार नाही. औरंगजेबाची प्रतिज्ञा केली. त्यानुसार तो संभाजीराजांना नमविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होता. त्यानं मुकर्रबखानाची नेमणूक कोल्हापूरला केली होती. त्यावेळी या मुकर्रबखानाला कोणीतरी बातमी सांगीतली की महाराज संभाजी कोकणातील संगमेश्वरात लपून बसले आहेत. त्यानंतर मुकर्रबखानाने संभाजीला पकडलं. त्यांना औरंगजेबासमोर प्रदर्शीत केलं. औरंगजेब बादशाहानं पहिला प्रश्न केला की त्यानं इस्लाम कबूल करावं. जर ते इस्लाम कबूल करीत असतील तर त्यांना सोडून देण्यात येईल. परंतू छत्रपती संभाजींनी इस्लाम कबूल केला नाही. त्यामुळं की काय, औरंगजेबांनं त्यांचा एकएक अवयव त्यांच्या जीवंतपणीच कापला. तसेच तो एकएक अवयव मराठी साम्राज्यात फेकला. त्यातच तो दिवस उजळला. त्याच्या दुस-या दिवशी गुढीपाडवा होता. ११ मार्च दुपारची वेळ उजळली. दरबार भरला होता. संभाजीचे पाय कापून टाकले होते. हातही कटले होते. वाणीही कापली होती आणि डोळेही फोडले होते. त्यातच संभाजीला औरंगजेबासमोर दाखल करण्यात आलं. अतिशय धिप्पाड देहाचा व पीळदार शरीराचा संभाजी राजा आज अगदी दुर्बल झाला होता. तरीही रग तेवढी शरीरात शिल्लक होती आणि त्याचबरोबर बाणेदारपणाही. औरंगजेबानं विचारलं. “बोल मराठ्यांच्या राजा, तुला इस्लाम कबूल आहे की नाही.” हातपाय कापलेले. वाणीही कापलेली. डोळेही फोडलेले. त्यातच ते शब्द कानी पडले. औरंगजेबाचे ते शब्द. तीक्ष्ण बाणासारखे वाटले. त्यातच त्यानं मान हालवली. तसा औरंगजेब पुन्हा म्हणाला, “हे राजा, मी तुला शेवटचं विचारतोय, बोल तुला इस्लाम कबूल आहे की नाही.” तशी संभाजीनं पुन्हा मान हलवली व अँ करीत स्पष्ट नकार दिला. तोच औरंगजेब जोरात म्हणाला, “उडवा याची मान याचक्षणी. उद्या गुढीपाडवा आहे. आपण याच्या रक्तानं गुढीपाडवा साजरा करु. गुढीपाडवा हिंदूचा सण आहे ना. आपण याचं मस्तकच गुढीला उभारु.” औरंगजेब हर्षोल्लासानं हसत होता. त्याला मनात भय वाटत नव्हतं. वा कोणतीच दयामायाही वाटत नव्हती. तसा एक शिपाही पुढे आला. त्यानं म्यानातून तलवार काढली आणि म्हणाला, “जहापनाह, काय आदेश आहे. उडवू का मस्तक?” “होय, याचक्षणी उडव.” ती तलवार. ती तलवार चमकत होती. तळपत होती. आपल्या आवडत्या राजानं शरसंधान करण्यासाठी नव्हे तर गळाभेट करण्याची वाट पाहात होती. ज्या छत्रपतीनं अतिशय जड तलवार आपल्या जीवनात वापरली. ती तलवार आज त्याची शत्रू बनणार होती. त्या तलवारीच्या डोळ्यात अश्रू होते. पण ती तरी काय करणार होती. ती मजबूर होती. शेवटी तो क्षण आला. तसा तो शिपाही पुढं सरसावला आणि एका क्षणात संपूर्ण ताकदीनिशी त्यानं संभाजीचं मस्तक उडवलं. संभाजीचं मस्तक एका वारात वेगळं होताच त्या शरीरातून रक्ताच्या चिरकांड्या उडू लागल्या. त्या चिरकांड्या आणि एवढं रक्त की मृत्यूनंतर पंधरा मिनिटं होवून गेले तरी रक्त थांबेना. एवढं रक्त. औरंगजेब बादशहा तर डोळे वटारुनच पाहात होता. त्याला तर अस्मीताच नव्हती. थोडा वेळ तर तो शुद्ध हरवूनच होता. तसा औरंगा म्हणाला, “घ्या ते मस्तक उचला. उद्या त्याला भाल्यावर सजवायचं आहे.” सैनिकांनी ते मस्तक उचललं. त्याला सुरक्षीत ठेवलं. अशातच दुसरा दिवस उजळला. बारा मार्च. या दिवशी सकाळीच त्या मस्तकाला भाल्यावर सजवलं गेलं. तसे त्याच्या शरीराचेही तुकडे तुकडे केले गेले. संपूर्ण त्या गावात मिळवणूक काढण्यात आली आणि आवाहन करण्यात आलं की जो कोणी हे तुकडे गोळा करेल आणि या तुकड्यांना अग्नी देण्याचा प्रयत्न करेल, त्यालाही यमसदनी पोहोचविण्यात येईल. दिवसभर मोगली सैनिक ते मस्तक एका भाल्यावर घेवून हर्षोल्लासात आनंद साजरा करीत नाचत बागडत गावभर फिरत होती. तर आपल्या लाडक्या महाराजांचं मस्तक गावातील माणसं घराघरातून पाहात होती. शोक व्यक्त करीत होती. त्यांच्या वेदना त्यांनाच कळत होत्या. पण कोणीच त्या मोगलांना अडवीत नव्हतं वा कोणीच त्यांचा प्रतिकार करीत नव्हता. कारण त्यांना माहित होतं की यात आपलाही जीव जावू शकेल. जीवाची पर्वा कोणाला नव्हती. तशी ती भीती त्या गावातील माणसांनाही होती. गणपत त्याचं नाव…….तो जातीनं महार होता. तो त्याच गावात राहणारा माणूस. तोही संभाजीच्या शरीरयष्टीचा होता. तसा तोही संभाजीसारखाच बाणेदार व शूर होता. सायंकाळ झाली होती. तसं सायंकाळी संभाजीचं मस्तक भाल्यातून काढून जमीनीवर फेकून देण्यात आलं. जे मस्तक फेकतांना गणपत महारानं पाहिलं. भाल्यावरचं ते मस्तक. ते फेकतांना पाहणारा गणपत महार. तो विचार करु लागला. त्याचा तो विचार आपले आवडते महाराज. त्यातच संभाजीचे केलेले चार तुकडे त्याच्यासमोर थयथय नाचत होते. वढू नावाचं ते गाव. त्याच गावात इस १६८९ ला फेकलेले संभाजी महाराजाच्या शरीराचे काही तुकडे. त्यातच विचार करणारा गोविंद गणपत गायकवाड. गोविंद गणपत गायकवाड हा वढू बुद्रूक गावात राहणारा. तो पहलवान होता. त्याने अनेक कुस्त्या मारलेल्या होत्या. तसेच तो शुरवीरही होता. तो हिंमतवान गडी असून धिप्पाड शरीरयष्टीचाही होता. सायंकाळ झाली होती. तशी मोगल मंडळी आजमीतीला सर्व गावात आणि आजुबाजूच्या भागात फिरली होती.जशी सायंकाळ झाली. तशी ती दमली व दमून थकून झोपी गेली. सायंकाळ झाली होती. तशी सायंकाळ जरी झाली असली तरी गणपत महार झोपला नव्हता. तो जागाच होता. त्या राजाचा विचार करीत. ज्या राजाचे मस्तक आज भाल्यावर सजले होते. गणपत हा जातीनं जरी महार असला तरी धर्मानं हिंदू होता. तो राजाबद्दल विचार करीत होता की राजा हा आपला. जरी आज भाल्यावर सजला असला जरी त्या औरंगजेबानं आपल्याला धमकी दिली असली तरी आज राजा आपला आहे. आपला हिंदू राजा. आपला अन्नदाता. त्या राजानं आपल्याला अन्न दिलं. प्रजेचं रक्षण केलं. प्रजेचं रक्षण म्हणजे आपलं रक्षण. तो विचार करु लागला आपल्या पुर्वजांच्या कर्तृत्वाचा. ज्यांचा ज्यांचा या भोसले घराण्याशी संबंध होता. शिवा काशीद असाच महार जातीचा माणूस. आज गणपतला शिवा काशिद व जीवा महाला आठवत होता. ज्यानं धन्यांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं. ज्या शिवा काशिदला शिवरायानं प्रति शिवाजी बनवून स्वराज्यासाठी आवश्यक असणारा आपला जीव वाचविण्यासाठी बलिदान द्यायला लावलं होतं. नव्हे तर ज्या शिवा काशिदला औरंगजेबानं शिवाजी समजून मारुन टाकलं. असा शिवा काशिद जेव्हा शिवरायांचा पोशाख वापरुन शिवरायांसमोर आला. तेव्हा शिवराय म्हणाले, “माहित आहे शिवा, हे सर्व तू माझ्यासाठी जे काही करीत आहेस. त्यातून तुला काय मिळणार. काहीच मिळणार नाही. तरीही तू हे करतोस. का करतोस ते कळत नाही.” त्यावर शिवा काशीद म्हणाला. “महाराज, मला आज शिवाजी राजा म्हणून मरता येणार आहे. आज मला औरंगा शिवा काशिद म्हणून नाही तर प्रत्यक्ष शिवाजी म्हणून मारणार आहेत. तीच संधी…….जी संधी इतरांना कधीच मिळणार नाही. ती संधी माझ्या भाग्यात चालूनन आलेली आहे.. ती संधी इतर कुणाच्याही भाग्यात चालून आलेली नाही.” शिवा काशिद स्वराज्यासाठी मरण पावलेला होता. त्यातच जीवा महालाही. अफजलखानाच्या तडाख्यातून शिवरायांना वाचविणारा जीवा महाला. ही दोन्ही माणसं गणपत गायकवाडाच्या डोळ्यासमोर तरळत होती. तशी सायंकाळ झाली. गणपतरावानं आता पूर्ण विचार केला की आपण संभाजीच्या देहाला अग्नी द्यावा. त्यांच्या तुकड्यांना असं बेवारस कुत्र्या लांडग्यांची शिकार बनू देवू नये. आपण ते तुकडे गोळा करावेेत. ते जोडावेत. कारण तो माणूस आपल्या वतनासाठी लढला. हिंदू धर्मासाठी लढला.सरतेशेवटी प्राण दिलं. पण धर्म बदलवला नाही. गणपतलाही माहित होतं की त्याच्या या कृत्याबद्दल त्याला मोगली बादशाहा प्राणदंड देईल. पण तो डगमगला नाही. त्यातच थोडा अंधार पडला. भीमा नदी……… ही नदी ८६१ किमी वाहात असून ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगाणामधून वाहते. या नदीचा उगम पश्चीम घाटात भीमाशंकरच्या पर्वतश्रेणीतून होतो. या नदीच्या सीना आणी नीरा या उपनद्या आहेत. तसेच या भीमा नदीला इतरही काही नद्या म्हणजे इंद्रायणी,मुळा व माण तसेच वेळ,घोड व शोण याही नद्या मिळतात. या नदीवर एकुण बावीस धरणे असून या धरणातून मिळणा-या पाण्यानं आजूबाजूचे क्षेत्र लाभान्वीत झाले आहे. या नदीला महाराष्ट्रात अनेकदा पूर येतो. ही नदी पंढरपूरातूनही वाहात असते. तिथे या नदीला चंद्रभागा असं म्हणतात. ही नदी पुणे जिल्ह्यातील कोरेगावजवळूनही वाहात जाते. तसेच वढू बुद्रूक गावातूनही. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. धार्मीकदृष्ट्याही भीमा नदीला महत्व असून तिला महानदीही म्हणतात.मत्स, बम्ह वामन या पुराणातूनही या नदीचे उल्लेख मिळतात. वढू बुद्रूक हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील गाव असून या गावाचाही स्वतंत्र्य असा इतिहास आहे. वढू गावात संभाजी महाराजांचे तुकडे जरी टाकले असले तरी ते तुकडे का केले, त्याला काही कारण आहे. छत्रपती संभाजी राजानं हरसुलच्या गंगाधर कुलकर्णी या ब्राम्हण दांम्पत्यास औरंगजेबाने जबरदस्तीनं मुसलमान बनवले होते. पण त्याच्या विनंतीवरुन कवी कलश व संभाजीनं त्याला आपल्या धर्मात घेतलं. हे धाडस कवी कलशासोबत संभाजीनं दाखवलं होतं. म्हणून औरंगजेब बादशहा संभाजी व कवी कलशावर चिडून होता. त्यामुळं की काय, याचा बदला काढण्याचा निर्धार औरंगजेबानं केला होता. त्यातच १६८४ ला संभाजींनी इंग्रजांबरोबर एक करार केला होता. तो म्हणजे इंग्रजांनी या माझ्या राज्यात अवश्य राहावे. पण धर्मप्रसार करु नये. असे जर झाले तर आमचं राज्य सोडावं लागेल. ही कराराची गोष्टदेखील औरंगजेबाला माहित होती. म्हणून तो संतापून होता. वढू गाव हे भीमा नदीच्या काठी वसलेलं होतं. या गावाला वढेश्वर असेही म्हणत. या गावात इंद्रायणी, भामा व भीमा अशा तीन नद्यांचा संगम आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूपुर्वी या वढू गावात औरंगजेबाचं राज्य होतं. या ठिकाणी औरंगजेबानं एक कारागृह बांधले होते. या कारागृहात पुढे संभाजी महाराज व कवी कलश यांना ठेवण्यात आले. औरंगजेबाचा एक शुर सरदार सिकंदरखान या कारागृहावर पाहारा देत होता. वढू हे गाव. या गावात चारही बाजूंनी वीस फुट उंच दगडी तटबंदी उभारली होती. जणू ते गाव म्हणजे भुईकोट किल्लाच शोभावा. गावाच्या पुर्वेला एक वेस होती. गावातील सांडपाणी हे उत्तरेकडील खिडकी दरवाज्यातून पाबळ रस्त्यावर निघत असे. आज त्याचं नाल्यात रुपांतर झालं आहे. भीमा नदीकाठी वसलेलं ते गाव. या गावात वडेश्वराचे प्राचीन मंदीर होते. हे यादवकालीन मंदीर होते.आता हे मंदीर शंभूसागर धरणामुळं पाण्यात बुडाले आहे. तसेच औरंगजेबानेही या मंदीराला नष्ट केले आहे. हे शहर इ स बाराव्या शतकापासून व्यापार करणा-या लोकांचे राहण्याचे ठिकाण होते. या ठिकाणी विविध जातीधर्माचे लोकं राहात असून कुंभार वेशीतून एक दरवाजा होता. उन्हाळ्यात या नदीला पाणी नसायचं. त्यामुळं व्यापार व्हायचा. पण पावसाळ्यात पाणी असल्यानं हा दरवाजा बंद व्हायचा. त्यानंतर पुर्व दरवाजाचा वापर व्हायचा. तटबंदीच्या आत दक्षिणमुखी हनुमान मंदिर विठ्ठल मंदिर, भैरवनाथ मंदिर, उधोबा महाराजांची समाधी मंदिर होतं. तटबंदीच्या आतच राबता असायचा. रात्री दरवाजे बंद होताच सारा गाव पेटीत बंद व्हायचा. त्यातच गावात दिवेलागण व्हायची व सारा वढू गाव झगमगायचा. तटबंदीच्या बाहेरुन ओढा वाहात असे. ओढ्याकाठी भरपूर प्रमाणात वडाची झाडे होती. ही झाडे वाटसरुंना सावली देण्याची कामे करीत असत.या वडाच्या झाडावरुनच गावाला वढू नाव प्राप्त झालं असावं असं काहीजण म्हणत. गावात एक सतीचं मंदिरही होतं. तसेच पिरांची थडगीही होती. गणपत गायकवाड एक साधारण माणूस. तो पुण्याला लाल महालात शिपायाची नोकरी करायचा. ज्या महालात शिवरायांचा ताबा होता. तो तरुणपणापासूनच लालमहालात नोकरी करीत असून त्यानं अगदी जवळून शिवरायाचं कार्य पाहिलं होतं. तसंच त्याच्या पीढीनंही भोसले घराण्याची चाकरी केली होती. ज्यावेळी संभाजीराजांना मारलं गेलं, त्यावेळी संभाजीराजे केवळ बत्तीस वर्षाचे होते. कोणी म्हणतात की संभाजीचे तुकडे फेकतांना गणपत गायकवाडनं पाहिलं. तर कोणी म्हणतात सर्वात प्रथम एका धोबीनीनं पाहिलं. जी धोबीण त्या गावची रहिवासी होती. तिचं नाव जनाबाई होतं. गुढीपाडवा हा हिंदूचा सण. अनादीकाळापासून हिंदू लोकं गुढीपाडवा साजरा करीत असायचे. ते या दिवशी तोरणे, पताका लावून व गुढी उभारुन हा सण साजरा करायचे. त्यातच गुढी उभारतांना मंदिरातील कलशाप्रमाणे तो कलश उपडा ठेवायचे. त्याचं वैज्ञानीक कारणही होतं. ते म्हणजे आकाशातून आलेली सकारात्मक उर्जा खिचून ती उर्जा जमीनीवर पोहोचविणे. याचाच अर्थ असा की या जमीनीवर राहणा-या जीवजंतूंना या उर्जेचा फायदा होईल. कलश यासाठी वापरला जाई. कारण तो तांब्याचा होता व तांबा हा धातू उर्जेचा जास्त प्रमाणात वाहक आहे. त्यातच ही प्रक्रिया लाभदायी असल्यानं गुढी उभारण्याची प्रथा मोठ्या हिरीरीनं सुरु होती. मुघल जेव्हा सातव्या शतकात मोहम्मद बिन कासीमच्या रुपानं भारतात आले. तेव्हापासूनच ते भारतीय लोकांचा राग करायचे. कारण श्रीलंकेतून सिंधच्या देबल बंदरामार्गे इराकला जाणारं जहाज भारताच्या देबल बंदराजवळ अज्ञात लुटारुंनी लुटलं. ज्यात अतिशय मौल्यवान खजिना होता आणि जो इराकच्या खलिफाला बक्षीस म्हणून जात होता. तो खजिना देबलच्या बंदरात लुटला गेला. तो कोणी लुटला हे खलिफालाही वा कोणालाही माहित नव्हतं. परंतू त्याचं पाप देबल बंदरात ज्या राजाची सत्ता होती. अर्थात देबल बंदर ज्यांच्या ताब्यात होतं. त्या राजा दाहिरवर लावण्यात आलं. राजा दाहिर जो एक हिंदू राजा होता. याचाच अर्थ असा की त्यात एकट्या राजा दाहिरला दोषी न ठरवता संपूर्ण हिंदू धर्मालाच दोषी ठरविण्यात आलं. कारण राजा दाहिर हा हिंदू धर्माचा पुरस्कर्ताही होता. महाराजा संभाजीला गुढीपाडव्याच्या दोन दिवसापुर्वी मारुन दुस-या दिवशी त्यांचं मस्तक भाल्यावर चढवून वाजत गाजत त्या मस्तकाची मिळवणूक मुघलांनी काढली आणि त्यातच त्यांच्या देहाचे तुकडे करुन ज्या वढू गावाच्या कारागृहात त्यांना बंदीस्त केलं होतं. त्याच गावच्या भीमा, भामा व इंद्रायणी संगमावर म्हणजेच वढेश्वराच्या बाजूलाच त्यांच्या देहाचे तुकडे नदीपात्रात टाकण्यात आले. जेणेकरुन त्या तुकड्यांना ओळखता येवू नये व त्यांचं मांस मासोळ्यांनी वा कोल्ह्याकुत्र्यांनी खावं. त्यांच्यासोबतच कवी कलशांचेही तुकडे करुन टाकण्यात आले होते. आणि फर्मान जाहिर करण्यात आले होते की उद्या कोणीही या तुकड्यांना अग्नी देवू नये. त्यातच कोणीही गुढीपाडवा साजरा करु नये. त्याचं पुर्वसंध्येला मारुन त्यांचं मस्तक भाल्यावर चढविण्याचा अर्थ असाच निघत होता. तरीही लोकांनी गुढीपाडवा साजरा केला व संभाजी आणि कवी कलशांच्या तुकड्यांना अग्नीही दिला. गुढीपाडवा हा हिंदूचा सण असून त्याला गालबोट मुघलांनी लावण्याचा प्रयत्न केला. एवढच नाही तर या तमाम महाराष्ट्रातूनच नाही तर देशातूनही समुळ हिंदू धर्माचं उच्चाटन कसं करता येईल याचा विचार स्वार्थी व धुर्त औरंगजेबानं केला. परंतू त्याला त्यात यश आले नाही. गुढीपाडवा हा हिंदूचा सण जरी असला तरी तो इतरही धर्मीयांनी मानायला हवा. कारण याच दिवशी ख-या अर्थानं नवीन वर्षाची सुरुवात होते. शिशिर ऋतू जावून वसंताला सुरुवात होते.,झाडांना नवी पालवी फुटलेली असते. त्यामुळं साहजिकच या पालवीतून मनमोहक असा सुगंध दरवळत असतो. ज्या सुगंधानं अगदी मन प्रसन्न होवून जाते. या दिवशी चैत्र मासाला आरंभ होत असून शेतकरी आपल्या शेतात साजवणी करीत असतात. साजवणी याचा अर्थ असा की या दिवशीपासून शेतकरी नवीन वर्षातील शेतीच्या कामाची सुरुवात करीत असतात. साजवणी करतांना गुळ आणि पोळीचा नैवेद्य वखरावर ठेवतात. बैलांना गुळपोळी चारतात. ज्यूची व वखराची हळद कुंकू लावून पुजा करतात. तसेच इतर माणसांनाही गुळपोळी देतात. काही लोकं पुर्वी भजन किर्तनही करायचे या दिवशी. आता मात्र ती प्रथा काही ठिकाणी दिसते तर काही ठिकाणी दिसत नाही. याच दिवशी कोणी मोठी माणसे, ज्यांच्याकडे भरमसाट शेती आहे. ती मंडळी सालदार ठेवतात. सालदार याचा अर्थ गडी माणूस. जो गडी माणूस शेतात वर्षभरासाठी नोकर असतो. बदल्यात तो धान्य आणि पैसा घेतो. पुर्वी मात्र धान्य घ्यायचा. आता मात्र तसं नाही. आता हा सालदार रोख पैसाच घेत असतो. काही लोकं या दिवसापासून हिशोबाच्या वह्या बदलवितात. तसेच हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. गुढीपाडव्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व असून अशा या हिंदू सणाला औरंगजेबानं गालबोट जरी लावण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचं महत्व हिंदूनी कमी होवू दिलं नाही. ज्यावेळी संभाजी राजांचा मृत्यू झाला, त्यावेळीही हिंदूंनी ह्या सणाच्या दिवशी शोक व्यक्त केला नाही. कारण या सणाच्या दिवशी शोक व्यक्त करणे म्हणजे मुघलांची कुठेतरी जीत होती. ती जीत हिंदूंना होवू द्यायची नव्हती. महत्वाचं म्हणजे या दिवसाच्या दोन दिवस पुर्वी धर्मासाठी बलिदान देणारा धर्मवीर संभाजी राजांचा मृत्यू झाला असला किंवा त्यांना मुघल बादशाहा औरंगजेबानं तडपवून मारलं असलं आणि तमाम हिंदूच्या भावना दुखावल्या असल्या तरी आजही आम्ही गुढीपाडवा साजरा करतो. कारण त्या गुढीपाडवा साजरा करण्यामागे आमचे तीन उद्देश आहेत. एक म्हणजे गुढीपाडवा सण साजरा करणे. दोन म्हणजे महाराज संभाजींना त्या निमित्यानं श्रद्धांजली अर्पण करणे व तिसरा हेतू म्हणजे औरंगजेबाच्या आत्म्याला व त्याच्या वंशजांना चपराक देणे. आम्ही आता डौलानं गुढीपाडवा साजरा करु. जो आमच्या लाडक्या राजांचा विरगती दिवस आहे. तसेच हा दिवस साजरा करणे याचा अर्थ महाराजांना श्रद्धांजली अर्पण करणे होय. जनाबाई पहाटेला उठायची. ती पहाटेसच अंघोळ करायची व कपडे धुण्यासाठी या नदीवर जायची. त्यानंतर ती परत यायची. तशी घरी येताच जेवनखावण करुन दुस-याची कपडे धुण्यासाठी निघून जायची. ही तिची दिनचर्याच नाही तर रोजचा क्रम होता. ज्यावेळी संभाजींना औरंगजेबानं मारलं, त्यावेळीही त्याची कल्पना तिला नव्हती. ती नित्यनेमानं कपडे धुण्यासाठी नदीवर गेली. त्यातच तिला माहित नसल्यानं ती कपडे धुत होती. तसा तिनं पाण्यात हात घातला. तोच तिला त्या पाण्यावर काहीतरी तरंगतांना दिसलं. तिनं ते दृश्य न्याहाळलं. परत तिनं काहीही असेल असा बनाव करुन ती आपल्या कामाला लागली. त्यातच दूर अंतरावर काही कुत्री एकमेकांवर भुंकत पुन्हा काहीतरी खातांना दिसली. तिनं त्यांच्याकडे जाणीवपुर्वक लक्ष दिलं असता ती कुत्री कोणाचं तरी शरीर खात होती. जनाबाई काम करीत होती. तोच जनाबाईनं त्या कुत्र्यांचं ओरडणं पाहून त्यांच्याकडं पुन्हा दुर्लक्ष केलं आणि धुण्याकडे लक्ष वळवलं. तोच तिला त्या मुंडक्याला केसं दिसले व तो माणसाचा मुंडका दिसला. ती लांब वाढलेली दाढी जणू तो संभाजीच वाटावा. तसं संभाजीला तिनं पाहिलं होतं. त्याला कवेतही खेळवलं होतं.! कारण तिनं शिवरायांच्या घरीही चाकरी केली होती. ते मुंडके……..फक्त ते मुंडके. ते मुंडकेच पाहून ती घाबरली. ती एवढी घाबरली की तिला शुद्धच राहिली नाही. ती आपलं धुणं तसंच टाकून क्षणाचाही विलंब न करता गावाकडे धावत धावत माघारी फिरली. जशी ती घाबरली आणि धुणं तसंच घाटावर ठेवून धावतच ती गावात आली. तो शंभूराजाचा देह. त्या देहाला कुंत्री खातांना दिसली होती. तो चेहरा. ज्या चेह-याची केसं जनाबाईच्या हाताला लागली होती. ज्याक्षणी ते मुंडके हाताला लागले. तोच जनाबाई गावात आली. ती थेट दामाजी पाटलाच्या वाड्यात गेली. तिच्या तोंडून शब्द फुटेनासे होते. दामाजी पाटील……..गावातील एक प्रतिष्ठीत माणूस. तो घरी होता. त्याची पत्नीही पाळण्यावर बसून झोके घेत होती. तसा दामाजी म्हणाला, “काय झालंया जनाबाई?” जनाबाईनं दामाजी पाटलांच्या तोंडचे वाक्य ऐकले. पण तिच्या तोंडून शब्द फुटेना. ती स्तब्धच होती. तशी दामाजी पाटलाची पत्नी म्हणाली, “जनाबाई, काय झालंया. तू एवळी घाबरली का?” “………” क्रमश:- पुढील भाग लवकरच..
शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०