संपादकीय

आंबेडकरी चळवळीची दशा आणि दिशा”

“आंबेडकरी चळवळीची दशा आणि दिशा”

डॉक्टर बाबासाहेबांच्या अनंत प्रेरणा आणि प्रयत्नातून हा देश एका महान समाजवादी व समतावादी पायावर उभारला आहे .त्यांच्या हयातभर संघर्षातून अनेक बलिदानातून ही व्यवस्था निर्माण झाली आहे. परंतु तिचा मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी होणारा उपयोग येथील विषमतावादी वर्णव्यवस्था वादी पातकी लोकांना त्यांच्या वर्चस्ववादी, सरंजामशाही हुकूमशाही व्रतीला छेद देणारा, खिळ घालणारा वाटत असल्याने, ही मानवतावादी कल्याणकारी संविधानिक पद्धती त्यांना नको आहे.
आजवरच्या त्यांच्या हजारों वर्षाच्या वर्णवर्चस्ववाद व्यवस्थेला हितावह असणारी व्यवस्था त्यांना पुन्हा एकदा बहुजन पीडित शोषित सामान्य जनतेच्या माथी मारून आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करावयाचे मनसुबे त्यानी आखले आहेत .हे वास्तव आज कोणालाही नाकारता येणार नाही .
आज आंबेडकरी चळवळ ही एकमेव अशी चळवळ आहे जी ह्या कट-कारस्थानला उघडे पाडणारी आहे. परंतु “फोडा आणि राज्य करा” यां नीतिने आज आंबेडकरी चळवळीचे मूळ ध्येय बाजूला जाऊन वातावरण गढूळ धुसर करण्यात प्रतिगामी शक्तीना यश येत असल्याचे खेदाने म्हणावे लागते .
भय भ्रम झूटच्या नीतीने बोकाळलेल्या वातावरणात, स्वार्थी हव्यासापोटी शीलवान, इमानदार, सच्चे नैतिक आंबेडकरवादी तत्वांची जाण आणि अभिमान असणारे समाजसेवक पुढारी साहित्यिक जाणकार यांची आंबेडकर वादापासून फारकत करण्यात प्रस्थापित यशस्वी होत आहेत .याचाही विचार आम्हाला व सर्वांना करावा लागेल.

प्रथम डॉक्टर बाबासाहेबांचा सर्वच क्षेत्राविषयीचा मानवी कल्याणाचा, मानवी उत्थानाचा सिद्धांत शुद्ध स्वरूपात व साकल्याने समाज व धुरिणांनी समजून घेऊन, सांघिक शक्तीने नियोजनबद्ध पद्धतीने त्या पुढील रणनीतीचा योग्य पद्धतीने दीर्घकालीन आराखडा समाजापुढे ठेवून, कृती कार्यक्रम आखण्याची गरज आज सर्व समाजापुढे निर्माण झाली आहे.
खाउजा च्या नवीन जगामध्ये मानव चिंताग्रस्त अन्यायग्रस्त व असहाय झाल्याचे आपण पहात आहोत. स्व प्रतिष्ठा व स्वसंरक्षण यांची कुठलीही हमी आज कोणी देऊ शकत नाही. अशी विक्राळा अवस्था ,अस्वस्थता दिवसेंदिवस सर्वांना भेडसावत आहे, हे येथील शासन प्रशासनातील यंत्रणेला संवेदन शील वाटत नाही. संविधानिक मूल्यांची कुठलीही जाणीव जबाबदारी ही व्यवस्था स्वीकारायला तयार नाही .या व्यवस्थेचे अपयश त्यांना संविधानाच्या माथी मारून आपली प्रतिगामी व्यवस्था कशी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करावयाचे आहे. डॉक्टर बाबासाहेबांचा राज्य समाजवाद लागू करणे ऐवजी जनतेच्या शोषणाची पूर्वापार व्यवस्था लागू करण्याचे त्यांचे छुपे मनसुबे आंबेडकरवाद्यांना ओळखावे लागतील व त्यापासून सोडवणुकीसाठी सावधान नीती अवलंबविणे अगत्याचे झाले आहे .
आपण तात्कालिक लाभासाठी काम करावयाचे की व्यवस्था परिवर्तनासाठी झटायचे, यामध्ये मतभिन्नता होऊन तात्कालिक लाभासाठी आम्ही ध्येयवादा कडे कानाडोळा करणे खूप धोक्याचे होईल.कारण तात्कालीक स्वरूपाचा मोह आवरता आल्याशिवाय व्यवस्था परिवर्तनाचा लढा लढणे आम्हाला शक्य नाही .आपली लढाई ही सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक आघाड्यावर संविधानिक मूल्यांवर आधारित नव समाज निर्मिती करणे ही असली पाहिजे.

अन्यथा राजकीय यश अल्पजीवी व पूर्णतया फलदायी होणार नाही असा बाबासाहेबांचा सिद्धांत आपण कृती आणि वृत्तीतून पाळला पाहिजे. त्यांनी आपल्याला ‘शिका संघटित व्हा व संघर्ष” करा ही त्रिसूत्री दिली आहे. म्हणून त्यांचे सार सूत्र समजून आधुनिक समाज व युवकाने ते आचरणात आणणे अनिवार्य आहे. योग्य शिक्षण नसेल तर कुठलीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही आणि शिक्षणाला शीलाची जोड नसेल तर ते शिक्षण पूर्णतया यशस्वी अथवा फलदायी ठरेल असे नाही. असे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले आहेच.
म्हणून संघटना ध्येयवादी चळवळीत रूपांतरित करण्यासाठी शिक्षण ,संघटन यांची आंबेडकर वादासी घट्ट नाळ जोडून आपल्याला संघर्षाची पायाभरणी केल्याशिवाय योग्य दिशा सापडणार नाही हे निश्चित आहे .

चळवळ ही शिस्त व चारित्र्यावर उभी राहायला हवी. त्यासाठी हव्यास, क्रूर लालसा ,अहंकार प्रसिद्धीचा मोह यापासून धुरीणांना दूर राहावे लागेल .
मागील चळवळीचा इतिहास साक्षी ठेवून आम्हाला त्यातून धडे घेऊन त्यातील उणिवा दोष दूर सारावे लागतील.

जोपर्यंत आपल्या मनातील जातीय वृत्ती ,स्वार्थी व्यक्तिकेंद्रित वृत्ती ,व्यसने स्वयम् समर्थक हटवादी वृत्ती, बेजबाबदारपणा देव दैववादी वृत्ती,अविवेकी, अंधश्रद्धा वृत्ती ,शब्द प्रमाणे वादी वृत्ती ,आळसी आणि तृप्त वृत्ती, मूर्ख व उथळ गोष्टींमध्ये रस घेणारी वृत्ती ,टाळून प्रत्यक्ष समाजातील अंधश्रद्धा ,अज्ञान अडाणीपणा लाचारी जातीय पोटजाती वृत्ती, निरक्षरता घालवण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारावर आढळ निष्ठा ठेवून ,समाज जागृती चे निस्वार्थ कंगन जोपर्यंत शिकला सवरला मध्यमवर्ग आपल्या मनावर बांधणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत राष्ट्र निर्मिती अपुर्णच राहिल हे आम्ही समजून घेतले पाहिजे.

अशोक सदावर्ते
वसमत जिल्हा हिंगोली
99 21 39 85 35

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button