जातीय दंग्यांची आजची निमित्ते..
जातीय दंग्यांची आजची निमित्ते..
भारतीय समाजात विज्ञान ,तंत्रज्ञान कृषी,शिक्षण,राष्ट्रविकास या क्षेत्राची चर्चा कमी आणि त्यावर होणारे समाज उपयोगी मंथन हे अभावानेच जाणवते पण इथे राजकारन्याणा आपली राजकीय पोळी भाजवण्यात यशस्वी कसे करता येईल हाच इथली बुद्धी गहाण टाकलेल्या अनेकांचा खटाटोप असतो .
राखीव जागांचा प्रश्न नाही, रोजगाराच्या हक्काचा प्रश्न महत्त्वाचा आहे. समाजाच्या दृष्टीने काही प्रतीके महत्त्वाची असतात. गायीचे रक्षण हे अस्मितेचे प्रतीक म्हणून महत्त्वाचे पण गाय शेतकऱ्याला खात असली तर केवळ धर्मभावनेच्या आधाराने तिचे रक्षण होणे कठीण आहे. रामजन्मभूमीसारखा प्रश्न महत्त्वाचा असू शकतो; पण राष्ट्रीय विकासाच्या प्रवाहाला तुंबारा पडून डबके झाले असताना हाच प्रश्न प्राधान्याने उठवणे यात काही अर्थ नाही आणि सद्हेतूही असू शकत नाही.
गावातल्या गावात दोन खानदानांचे पिढ्यान् पिढ्या वैर असते. पोळ्याच्या पताकेखालून कोणाचे बैल पहिल्यांदा जायचे यावरून वर्षानुवर्षे डोकी फुटत राहतात. शेती तोट्यात, दुसरा काही व्यवसाय नाही, कर्ज तर प्राण घेऊ म्हणते असे सर्व बाजूंनी घेरल्या गेलल्या माणसाने जगावे कसे? माणूस म्हणून अभिमान तरी कशाचा बाळगायचा? मग आर्थिक-सामाजिक लढाईत पराभूत झालेले शेजाऱ्यावर कुरघोडी करून आपली मान त्यातल्या त्यात उंच ठेवण्याचा प्रयत्न करतात.
रामजन्मभूमीसारखे प्रश्न वेगळ्या परिस्थितीत सहज सुटू शकतात. वाढत्या संपन्नतेच्या अवस्थेत वेगवेगळे समाज माणुसकी आणि उदारता दाखविण्याच्या मानसिकतेत येऊ शकतात. आजच्या आर्थिक परिस्थितीत हे प्रश्न उभे केले तरी ते सुटणार नाहीत. एक बाजू जिंकली तरी त्याची जखम दुसऱ्या बाजूवर राहणार आहे. आणि कधी ना कधी या जखमा सगळ्या समाजाचे जीवन नासवून टाकणार आहेत.
या पलीकडे, हे प्रश्न आता उभे केल्याने वैभवाकडे जाण्याची वाटच बंद होणार आहे. वैभवाकडे जाणारा रस्ता शेतकऱ्यांच्या संपन्नतेच्या वेशीतूनच जातो. ही वेसच अडवली जाईल तर गरिबीही हटणार नाही; मग अस्मिता आणि प्रतीकांची फक्त राखच हाती येईल.
संदर्भ:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (शरद जोशी)