देश
वाचाळ बोलणं; देशाला घातक
वाचाळ बोलणं; देशाला घातक
आज देशात बोलण्याच्या शितयुद्धाची लहर सुरु आहे. कंगणानं बोललेलं वक्तव्य. कोणी म्हणतात की कंगणाचं बोलणं देशविरोधी आहे. कोणी कंगणाच्या बाजूनेही व्हाट्सअपवर मेसेज पाठवीत आहेत. पण त्या मेसेजमध्ये आपले नाव टाकत नाही. कारण प्रत्येकाला भीती आहे की आपण जर कंगणाच्या बाजूनं बोललो किंवा राहिलो, तर जी कारवाई कंगणावर होवू शकते. तीच कारवाई माझ्यावरही होईल. त्यापेक्षा चूप बसलेलं बरं. त्यांचंही बरोबरच आहे. कारण उगाच कोण फुकटचा वाद स्वतःवर ओढवून घेणार.
विचारस्वातंत्र्य......घटना कलम बारा ते पसतीस अंतर्गत भाग तीन मध्ये मुलभूत स्वातंत्र्याअंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. त्यानुसार प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार मिळाला आहे. बोलणे म्हणजे वाचाळ बोलणे नाही. परंतू मत अवश्य मांडता येते. हा अधिकार आपल्याला कलम १९ अ अंतर्गत दिला गेला आहे.
कंगणानं म्हटलं की भारताला मिळालेलं स्वातंत्र हे भीकेतून मिळालं. परंतू ते वाचाळ बोलणं झालं. कारण स्वातंत्र काही देशाला भीकेतून मिळालेलं नाही. त्यासाठी मेहनत करावी लागली. हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहूती द्यावी लागली.
कलम १९ अ अंतर्गत मिळालेलं हे अभिव्यक्ती स्वातंत्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा घटनेत पुरस्कार केला. पण हे जरी खरं असलं तरी कोणत्याही प्रकारचं बेताल वक्तव्य कोणालाही करता येत नाही.
आज देशात जिकडे तिकडे बेताल वक्तव्य सुरु आहे. बोलण्याला काहीच तारतम्य उरलेलं नाही. उचलली जीभ लावली टाळूला अशा प्रकारचं वाचाळ वक्तव्य सुरु आहे. कोणी स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी अर्थात असं बोलून स्वतःची आणखी प्रसिद्धी करुन घेण्यासाठी असं वक्तव्य. जणू स्पर्धाच चालल्यासारखी. कंगणा असं का बोलली ते कळत नाही. परंतू देशाला स्वातंत्र भीकेतून मिळालं नाही हे तेवढं खरं.
देशाच्या स्वातंत्र्याबद्दल थोडं सांगतो. देश हा केवळ इंग्रजांचाच गुलाम नव्हता. (कारण देशाला सारे इंग्रजांचेच गुलाम समजतात) तर तो अनादीकालापासून गुलामच राहिलेला आहे. पुर्वी हा देश अनेक राज्यामध्ये विखुरलेला असून या देशात अनेक लहान लहान राजे होती. त्या राज्यात प्रजा ही राजेशाहीची गुलाम होती. ज्यात काही राजे जरी चांगल्या स्वभावाचे असले तरी काही राजे हे नक्कीच हुकूमशाही स्वभावाचे होते. ते प्रजेवर केव्हाही जुलूम करीत. त्यात प्रजेतील कोणत्याही नागरीकाचा केव्हा जीव जाईल याची शाश्वती नव्हती. ही राजेशाही आजपर्यंत चालली.
या राजेशाहीत इस च्या सातव्या शतकापर्यंत काही राजे हे हिंदू राजे झाले, काही बौद्ध धर्मीय तर काही जैन धर्मीयही झाले. यात या प्रत्येकांनीच शांततेनं राज्य केलं असं नाही. तर काही राजांनी अराजकतेनंही राज्य केलं.
हे सर्व राजे इसाच्या सातव्या शतकापर्यंत टिकले. पुढे या देशात मोहम्मद बिन कासीमच्या रुपानं अरबांचं आक्रमण झालं आणि मुस्लीम सत्ता या देशात उदयास यायला लागली. त्यातच या देशात मुस्लीम शासक अकराव्या शतकात स्थिरावली. नंतर तेही येथे हिंदू मुस्लीम भेदभाव करीत या देशातील हिंदू धर्मीयांवर अन्याय करु लागले. तसेच चौदाव्या शतकात गोव्यामध्ये आलेले पोर्तूगीज आपला धर्म या देशात वाढविण्यासाठी हिंदूंचे हात कापू लागली. आजही तिथे असलेला हातकातरी खांब याची साक्ष देतो. कालांतरानं या देशात मुस्लीम शासन जावून ब्रिटीश शासन आलं. तेही या भारतीयांवर अत्याचार करु लागले. तरी आम्ही ते सगळं सहन करीत गेलो. कारण आम्ही ब्रिटिश शासन भारतात येईपर्यंत शिकलो नव्हतो.
ब्रिटिश शासन भारतात येताच त्यांनी या देशातील काही लोकांचे जीणे पाहिले. त्यांच्यावर याच देशातील याच लोकांकडून होणारा अत्याचार पाहिला व त्यांनी ठरवलं की या देशात यांना शिकविण्यासाठी शाळा उघडाव्या. त्यांनी या देशातील लोकांना शिकविण्यासाठी शाळा उघडल्या. त्यात त्यांना शिकवलं. याचा अर्थ त्यापुर्वी या देशात शाळा नव्हत्या काय? त्याचे उत्तर म्हणजे या देशात त्यापुर्वीही शाळा होत्या. पण त्या शाळेत केवळ युद्धाचं शिक्षण मिळत होतं. राज्यकारभाराचं शिक्षण मिळत होतं. परंतू आपले अधिकार व कर्तव्य कोणती? त्यांचा वापर कसा करावा? हे शिक्षण मिळत नव्हतं. तसेच ते शिक्षण त्यापुर्वी विशिष्ट वर्गाला होतं. परंतू ब्रिटीश आल्यानंतर त्यांनी ते शिक्षण सार्वत्रीक केलं. त्यानुसार लोकं शिकले. त्यांनी इंग्रजांसोबत उभे राहून सुधारणा घडवून आणल्या. काही मात्र स्वातंत्र्यासाठी उभे राहिले. त्यांना वाटलं की बस झालं आतापर्यंतचं पारतंत्र्य. आता आपलं राज्य यावं. राजेशाही नष्ट व्हावी.
इंग्रजांनी येथील जनतेला शिकवलं खरं. येथील सतीप्रथा, अस्पृश्यतानिवारण बंद केलं खरं. परंतू ते या देशाला स्वातंत्र देवू पाहात नव्हते. त्यातच शिकलेले भारतीय......त्यांना त्यांचे अधिकार व कर्तव्य समजताच ते स्वातंत्र्याच्या भावनेने प्रेरीत झाले. त्यांनी जनतेत स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले. त्यातच काही लोकांनी हौतात्म्यही पत्करले.
कंगणाजी हा देश काही भीकेतून मिळालेला नाही. तसं बोलू नका. कारण या देशानं लहान सहान क्रांतीकारक पाहिलेत. शाळकरी विद्यार्थ्यांचे हौतात्म्य पाहिले. त्यातच आबालवृद्धांचेही हौतात्म्य पाहिले. हा देश स्वतंत्र करण्यासाठी कित्येक महिलांनी आपले पती दिले. तर कित्येक महिलांनी आपले पुत्र. त्यातच पंधरा आगष्ट १९४७ ला देश स्वतंत्र्य झाला.
देश हा भीकेतून मिळालेलं फलीत नाही. त्यासाठी आपल्या पुर्वजांची अपार मेहनत आहे. हा देश टिकवायचा आहे नव्हे तर तो टिकविण्यासाठी आपल्याला प्रयत्नही करायचा आहे. व्यतिरीक्त विकासही करायचा आहे. परंतू तो विकास करण्याऐवजी या देशात चालतात फक्त राजकीय समीकरणं आणि त्या समीकरणातून बेताल वक्तव्य. कोणी त्याला आपली प्रसिद्धी समजतात. तर कोणी त्या बोलण्याला राजकीय स्टंट. परंतू ते काहीही असो. कलम १९ अ अंतर्गत आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र मिळालं हे खरं आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलं आहे घटनेत कलम लिहून हेही खरं आहे. तेव्हा आपणास नम्र विनंती आहे की बोला. बोलायची मनाई नाही. पण असं बोलू नका की जे बोलणं वाचाळ असेल व जे देशाला घातक असेल. तसेच जे देशाचा विकास रोखणारे असेल. ज्यात राजकीय स्टंट असेल वा प्रसिद्धी असेल. असं बोला की ज्यातून देशाचं हित साकार होईल व देशाचा विकास साध्य होईल. देश जगामध्ये विकासाच्या मर्यादा ओलांडून जागतीक क्रमवारीत क्रमांक एकवर येईल.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०