कमळवेल्लीतील अश्विनी टेकाम उत्तुंग भरारी
कमळवेल्लीतील अश्विनी टेकाम तरुणीची उत्तुंग भरारी
टाटा इलेक्ट्राॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या निवड प्रक्रियेत बाजी
सुनील शिरपुरे/ झरीजामणी
आजच्या स्पर्धेच्या युगात कोणतीही गोष्ट वाटते तेवढी सोपी नसते. सुरुवातीला वाटत असते की, ही गोष्ट का? ही तर मी सहज करू शकते. परंतु ती गोष्ट प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यास सुरुवात केली जाते, तेव्हा त्यातील गहनता लक्षात येते आणि होते नव्हते सर्व देव आठवायला लागते. ही आमची तुमची रियल कंडिशन आहे. आज दिवसेंदिवस वाढती बेकारी बघता प्रत्येक क्षेत्रात चढाओढ सुरू असल्याचं निदर्शनास येते.
या चढाओढीत जो अथक परिश्रमाची जोड देतो, तोच यशस्वी होतांना दिसून येते. अथक परिश्रमाशिवाय यश मिळणे शक्यच नाही. तसेच आज प्रत्येक क्षेत्रात मुलीच बाजी मारतांना दिसून येत आहे. असं असलं तरी मुली म्हणजे फक्त चुल आणि मुल या संकुचित वृत्तीने ग्रासलेल्या आपल्या सामाजिक विचारसरणीमुळे खेड्यापाड्यातील मुलींना आपल्यात दडलेल्या सुप्त गुणांना मनातच दफन कराव्या लागत आहे. काही मोजकेच लोकं या विचारसरणीला झुगारून आपल्या मुलींना प्रोत्साहित करत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहे. आजचे युवक व युवती भरकटत चालले हा भाग वेगळा..परंतु त्यांच्याशी विचार विनिमय करून परिस्थिती आटोक्यात आणता येते याचा विसर पडत चालला आहे. याही स्थितीत जे आपल्या हलाकिच्या परिस्थितीची व आपल्या आई-वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून वाटचाल करत आहे, तेच यशस्वी होत असल्याचं चित्र जगासमोर प्रकट करत आहे. याच गोष्टीची जाण ठेवून वाटचाल करणा-या कमळवेल्ली या छोट्याशा गावातील कु.अश्विनी वसंता टेकाम ही युवती आपल्या शिक्षणासोबतच मोलमजूरी करून आपल्या कुटूंबाला हातभार लावत काल केळापूर तालुक्यातील उमरी येथे टाटा इलेक्ट्राॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारा पार पडलेल्या एक्झाॅम्स व इंटरव्ह्युव मध्ये यशस्वी बाजी मारली. या स्पर्धेच्या युगात नावाजलेल्या कंपनीत सिलेक्शन होणे ही छोटी गोष्ट नाही. तेही छोट्याशा खेड्यातील मुलींनी अशा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणे ही खूप मोठी कौतुकास्पद बाब आहे. इतर मुलींनी हिच्याकडून नक्कीच प्रेरणा घेऊन आपल्या आई-वडीलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. ती आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मार्गदर्शक व गुरुजनांना देत आहे. तिच्या या यशामुळे परिसरात सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.