कापुसचोरांपासून सावधान..बळीराजा
कापुसचोरांपासून सावधान..बळीराजा
सुनील शिरपुरे/ झरीजामणी
मागिल दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे बऱ्याच लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आर्थिक विवंचनेत सापडला आहे. साहजिकच या आर्थिक कोंडीमुळे उदरभरणही मुश्किल झाले आहे. आताही हा प्रश्न काही सुटलेला नसून तो कायमच आहे. त्यामुळे जिकडे-तिकडे चोरीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत आहे. यात चोरीचं सहज माध्यम म्हणजे शेतातील वस्तू..कारण या दिवसात शेताकडे कुणी फिरकत नसल्याने रात्रीला निरव शांतता असते. त्यामुळे सहजरित्या चोरांना आपले हात साफ करता येते असा त्यांचा मानस झालेला आहे. सुरुवातीला यात मोटार, स्टाॅर्टर, केबल यासारख्या महागड्या वस्तूंचा समावेश होता. मध्यंतरी तर सोयाबीन या पिकाची चोरी मोठ्या प्रमाणात झालेली पहावयास मिळाली. आता मात्र चोरांनी आपले पाऊल पांढ-या सोन्याकडे वळविले. पांढ-या सोन्याचा भाव हा चढउतार असला तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत गगनालाच भिडलेला आहे. त्यामुळे चोरांना हे निदान किलोग्रॅम मध्ये जरी मिळाला तरी त्यांची दिवाळी झाल्यागत आहे. परंतु या प्रकारामुळे सामान्य मजूरवर्ग मात्र नाहक बदनाम होत चालल्याचं चित्र उघड होत आहे. वास्तविक पाहता हे मजूरवर्गाचं काम नाही. मजूरवर्गाची एवढी हिंमत होत नाही आणि मजूरवर्ग हा जास्तीत जास्त प्रामाणिक असतो. यात शेतकरी वर्गांचाच पुढाकार आहे. कारण त्यांच्यावर सहसा कुणी संशय घेत नाही. याच गोष्टीमुळे ते अशा संधीचा फायदा उचलताना आढळून येते. कारण हे लोकं जेवढे मोठे तेवढेच खोटे असल्याचं वेळोवेळी आपल्याला अनुभवास मिळतात. म्हणून शेतकरी बांधवांनी सजग राहणे खूप गरजेचं आहे. आपल्या शेतीविषयक माहिती कुणालाही देणे हे दुरापास्त झालं आहे. कारण तुम्ही ज्याला जवळचा, आपला समजता तोच तुमची मारत असतो. हा मूलमंत्र लक्षात घ्या आणि आपल्या नुकसानीपासून सावध व्हा.!