डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले ते तीन धोक्याचे इशारे आज तीव्र जाणवतात..
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले ते तीन धोक्याचे इशारे आज तीव्र जाणवतात..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याने घटना समितीच्या सभेत भारतीय राज्यघटना आणि तिच्या अमलबजावणीसाठी ज्या गोष्टीचे पालन करण्याचे सांगितले त्या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने आज भारतीय जनतेसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यात भारतात लोकशाही टिकवायची असेल कोणत्या बाबी प्रत्यक्षात आणायच्या आणि कोणत्या बाबीपासून सावध रहायचे त्या संदर्भात धोक्याची सूचनाही केल्या आहेत.
त्यापैकीच
पहिली बाब:
अशी की,
लोकशाहीसाठी आवश्यक पद्धती आपल्या जीवनात अंगीकारली गेली पाहिजे तसेच सामाजिक व आर्थिक ध्येय प्राप्त करण्यासाठी लोकशाही पद्धतीनेच गेले पाहिजे म्हणजे रक्तरंजित क्रांतीच्या मार्गाचा अवलंब करता कामा नये. घटनात्मक मार्ग असताना अवैधानीक मार्ग न वापरण्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दुसरी गोष्ट स्पष्ट करून सांगताना,
जॉन स्टुअर्टच्या विधानाचा उल्लेख करून म्हणतात की
” कुणीही आपले स्वातंत्र्य कुण्या महान व्यक्तीच्या पायाशी ठेवू नये किंवा आपले अधिकार समर्पित करून आपल्या त्याला आपल्या संस्थांचा विध्वंस करायला संधी देऊ नये”
डॅनियल कुलीच्या शब्दात ते स्पष्ट करत की ,
“कोणीही मनुष्य स्वतःच्या स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञ होऊ शकत नाही.कोणतीही स्त्री आपल्या चारित्र्याचा, शीलाचा बळी देऊन कृतज्ञ राहू शकत नाही तसेच कोणीही मनुष्य आपल्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञ राहू शकत नाही.
हा इशारा भारताच्या बाबतीत आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण देताना ते असे म्हणतात की,
” भारतात सेवा प्राप्तीचा मार्ग आणि व्यक्ती पूजा या गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. जगात अन्य कुठल्याही देशात अशा गोष्टी आढळत नाहीत. राजकारणात असणारी विभूतिपूजाही नक्कीच आपल्याला अधोगतीला नेईल व त्यातून हुकूमशाही निर्माण होईल” असे म्हणतात.
तिसरी गोष्ट अशी की,
आपणास केवळ राजकीय लोकशाहीवर विसंबून न राहण्याचे सांगितले आहे.
ते म्हणतात की ,”आपल्याला राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत करावे लागेल. सामाजिक लोकशाही निर्माण केली नाही तर राजकीय लोकशाही फार काळ टिकणार नाही” असाही इशारा आपणास दिला आहे.
सामाजिक लोकशाही म्हणजे:
सामाजिक लोकशाही म्हणजे असा एक जीवन मार्ग आहे की, ज्यात समता, स्वातंत्र्य व बंधुभावाची जीवन मूल्य असतील. समता,स्वतंत्र, बंधुत्व या त्रिसूत्रातील तत्वे वेगळी करता येणार नाहीत. या तीन सूत्रातून कोणतेही एक तत्व वेगळे काढून बाजूला ठेवले की, लोकशाहीची हार होते.त्यामुळे समतेपासून स्वातंत्र्याला बाजूला काढता येत नाही.स्वातंत्र्यापासून समता बाजूला करता येत नाही. त्याचबरोबर स्वतंत्र्य समता व बंधुभाव हेही वेगळे करता येणार नाहीत. समता व स्वातंत्र्याशिवाय काहीव्यक्तीचे अनेकांवर अधिराज्य निर्माण होईल .समता जर स्वतंत्र्याशिवाय असेल तर माणसांची पुढाकार घेण्याची वृत्ती नष्ट करेल.म्हणून बंधुभाव व स्वातंत्र्याशिवाय समतेच्या मूलतत्त्ववादात नैसर्गिकता राहणार नाही.
म्हणून सामाजिक लोकशाही निर्माण करणे ही आज घडीला तीव्र गरज बनली आहे.