शिक्षण
शाळा आदर्श कशा होतील?
शाळा आदर्श कशा होतील?
आताच्या अभ्यासक्रमातून संस्कार!
आम्ही लहान होतो. तेव्हा आम्हीही शाळा शिकत होतो. त्यावेळी शाळा शिकतांना आम्हाला आनंद वाटायचा. कारण आम्हाला पाठ्यपुस्तकात असणा-या चांगल्या चांगल्या कथा वाचायला मिळायच्या. ज्या कथा संस्कारीत असायच्या. त्या कथा 88 आठवतात. आजही त्या कविता आठवतात. त्या की मन अगदी रमणीय झाल्यासारखं वाटतं आजही. आम्हाला त्यावेळी ज्या शिक्षीका व शिक्षक शिकवायचे. त्यांचा धाक असायचा. कधी कधी ते रागावत. छडीनेही मारत कधीकधी. पण त्यांच्या रागात खरं प्रेम असायचं. ते प्रेम आज दिसत नाही. कारण ते इमानदारीचं आणि निःस्वार्थीपणाचं प्रेम होतं.
आम्हाला आजही आठवतो तो सानेगुरुजींच्या कथेतील श्याम. ज्याचं अंग पुसल्यावरही त्यानं आईला कुरकूर केली. माझ्या तळव्याला माती लागू नये म्हणून तू तळवे पुसून दे. तसं आईनं श्यामचे तळवे पुसले आणि म्हटलं, 'बेटा, जसा तळव्यांना घाण लागू नये, म्हणून तळवे पुसून घेतले. तसा मनाला घाण लागू नये म्हणून मनही स्वच्छ करुन घेत चल.'
ती आई त्याला तसं का म्हणायची ते त्यावेळी कळत नव्हतं. आज कळतं.
एकदा तर श्याम लपून बसला होता. पोहायला जायला आई पाठवतेय म्हणून. पोहणे श्यामला आवडत नव्हते. त्याला वाटायचं की मी बुडून मरेल. तेव्हा आईनं वळ येतपर्यंत चांगलं झोडपलं श्यामला. मग नाईलाजानं श्याम पोहायला गेला व पोहणे शिकला. सायंकाळी घरी येताच आईनं त्याच्या वळाला तेल लावून दिलं. तेव्हा श्याम म्हणाला, 'आई, मारलं कशाला?' त्यावर आई म्हणाली, ' माझा श्याम भित्रा बनावा असं वाटते का तुला? तुझ्या आईला, तुझा श्याम भित्रा म्हटल्यावर चालेल का?' श्याम काय समजायचं ते समजला. तसाच श्यामचा दुसरा प्रसंग सांगतो. श्यामनं मुक्या कळ्या तोडल्या. त्यावर आई म्हणाली,
' श्याम मुक्या कळ्या तोडू नयेत. त्यांनाही जीव असतो.'
हे छोटे छोटे प्रसंग. त्यावेळच्या अभ्यासक्रमात होते. आजही आनंदी आनंद गडे ही कविता आठवतेय. अन् आजही चवथीतील आज ये अंगणा पाहूणा गोजीरा ही कविता आठवतेय. आजही शाळेच्या मैदानावर शिकवले जाणारे खेळ आठवतात. त्यातच शाळेच्या मैदानावर बसून सामुहिक शिकवले जाणारे हम होंगे कामयाब तसेच बलसागर भारत होवो हे गीत आठवतात. ते गीत आमचे पाठांतर होते त्या वयात. अगदी घरी दारीही आमचे मित्र ते गीत गुणगुणायचे. तसेच पेपर सोडवायचा असला की इकडे तिकडे न पाहता स्वतःचा पेपरही आम्ही सोडवत होतो. कोणतीच पेपरफुटी नाही वा कोणताच पेपरचा घोटाळा नाही. आजही दुसरीला असलेली आटपाट नगर होतं ही कथा आठवते. सगळ्या संस्काराच्या कथा. आज अशा संस्काराच्या कथा पाठ्यपुस्तकात दिसत नाहीत. कारण आज मात्र तसं नाही. हळूहळू काळ बदलला आहे.
आजचा अभ्यासक्रम मोबाइल, स्मार्टफोनच्या काळातील आहे. विद्यार्थ्यांना साधे बे चे पाढे पाठ नसतात. काल वाचलेले धडे आज आठवत नाही. पाठांतराला पुरेसा वेळच नाही विद्यार्थ्यांजवळ. शाळेतून घरी आले की सरळ मोबाईलवर खेळ खेळण्यात विद्यार्थी व्यस्त होतात. शिक्षकही शाळेत तसेच घरीही मोबाईलच बघत बसतात.
सध्या कोरोनाचा काळ. या काळात शासनानं विद्यार्थ्यांना शिकवायला मोबाईलला परवानगी दिली. परंतू किती शिक्षकांनी आणि किती वेळ मोबाईलचा वापर करुन शिकवले? हे स्पष्टपणे सांगता येणे कठीण आहे. किंबहूना शिक्षकही शाळेत मोबाईलवर आपल्या मित्रांचे मेसेज पाहण्यात वा मोबाईलवर खेळ खेळण्यात व्यस्त असतीलच हे नाकारता येत नाही. याचं कारण आजचं वातावरण. आज संस्थाचालकच असे असतात की ज्यांना नातेवाईक आवडतात. नातेवाईकांसाठीच शाळा उघडली म्हणतात. नात्यातील लोकांनाच बढत्या देतात. इतरांचे हक्क हिरावतात. स्वतः निवडणूक लढवून विधानसभेतील जागा बळकावतात आणि मग अभ्यासक्रमही आपल्या मतानुसार अभ्यासक्रम मंडळाकडून तयार करुन घेतात. आज त्यांचाच संसदेत वरदहस्त असल्यानं ते कोणत्याही शाळेला मान्यता देतात. मान्यता तिही पैशानं. मग त्या शाळेची स्वतंत्र्य इमारत आहे की नाही? त्या शाळेला स्वतंत्र्य मैदान आहे की नाही? त्या शाळेत शौचालयाची पुरेशी व्यवस्था आहे की नाही? त्या शाळेत पुरेशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे की नाही? या सर्व गोष्टींचा विचारच होत नाही. सरळसरळ मान्यता. तरी कधी एखादं पिल्लू पटपडताळणीच्या रुपानं येतं आणि शाळेची मान्यता दिसते. शिक्षकांचे वेतनही दिसते. पण शाळाच दिसत नाही. मग शिकविलेला अभ्यासक्रम दिसणार कुठून?
विशेष सांगायचं म्हणजे आज काही काही शाळेत खेळायला मैदानच नाही. शाळेत मैदानावर कधी हम होंगे कामयाब वा बलसागर भारत होवो ही गीतं शिकवली जात नाहीत. कधी वर्गात बे चे पाढे घेतले जात नाहीत. काही काही शिक्षकांनाच बे चे पाढे नीट म्हणता येत नाहीत. साधं राष्ट्रगीतं राष्ट्रीय गीतं पाठ नाहीत. मग ते गीतं विद्यार्थ्यांना कुठून येणार! परंतू तरीही ते शिक्षक चालतात. त्या शिक्षकांना पुरस्कार मिळतात. तोही आदर्श शिक्षकाचा. कारण ते शिक्षक संस्थाचालकांच्या अगदी जवळचे असतात.
आज खरा आदर्श शिक्षक चालत नाही. त्याची बदनामी केली जाते. त्याचेवर ताशेरे ओढले जातात. कारण आज संचालक मुजोर आहेत. या मुजोर सस्थांचालकापुढं शिक्षणाधिकारीही हार मानत असून मुख्याध्यापक लाचार सारखा वागतांना दिसतो. मग त्या शाळेतून विद्यार्थीच कुठून आणि कसे दर्जेदार तयार होणार? सर्व पिढी आज गारद होत आहे एकंदर अशा वातावरणातून. कारण आज प्रत्येक शाळेत स्पर्धाच होत नाहीत.
शाळेतून जर सक्षम पिढी घडवायची असेल तर खालील सुचना पाळणे अति आवश्यक आहे.
१) मुख्याध्यापकाच्या नियुक्तीवर विशेष भर द्यावा. मुख्याध्यापक हा गुणसंपन्न असावा. प्रतिभाशाली असावा तसेच तो अजीबात न्यायाधीश वा नातसंबंधातील नसावा.कारण ज्या जहाजाचा कप्तान चांगला गुणसंपन्न असेल, ते जहाज कधीच बुडत नाही.
२) मान्यता देतांना शाळेला मैदान आहे की? पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आहे का? शाळेला शौचालय आहे का? हे पाहावे.
३)शिक्षकांची नियुक्ती ही गुणतत्वावर व्हावी. त्यांच्यासाठी वेगळी अशी परीक्षा असावी. प्रत्येक शाळेत शिक्षक हे अशा परीक्षेतूनच निवडलेले पाठवावे.
४)मुख्याध्यापक वा शिक्षक हे नात्यातील नसावेत. त्यानंच शाळा लयास जात असते.
५)प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांच्या स्पर्धा व्हाव्यात नव्हे तर घेतल्या जाव्यात. यावर विशेष भर दिला जायला हवा.
६)पुढील काळात सांस्कृतीक कार्यक्रम, सहल प्रयोजन तसेच क्रिडामहोत्सव कधी शिबीर आयोजन प्रत्येक शाळेला अनिवार्य करावं. ते उपक्रम का राबवले नाही त्याचे सकारण स्पष्टीकरण मागवावे.
७)शिक्षणाधिका-यांनी संस्थाचालकाचे अजीबात ऐकू नये. त्यांनी मुख्याध्यापकाची नियुक्ती करतांना नातेसंबंधांचा विचार करु नये. फक्त गुणात्मक तक्ता पाहावा.
८)अभ्यासक्रम तयार करतांना विशेष समिती असावी. अशी समिती की ज्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्याचा कालसापेक्ष अनुभव असावा. अभ्यासक्रम हा संस्कारावर व मनोरंजनावर आधारीत असावा. जेणेकरुन तो वाचन झाल्यावर वा वाचताच विद्यार्थ्यांत शिक्षणाबद्दल रुची निर्माण होईल. तो शाळेतील शिक्षकांच्या वा मुख्याध्यापकाच्या वा संस्थाचालकाच्या मनमर्जीचा नसावा.
अलिकडे असंच घडत चाललेलं आहे. अभ्यासक्रम ही काही कुणाची धरोहर नाही. तरीही जी समिती असते. त्या समितीत असेही तज्ञ असतात की जी तज्ञ मंडळी ही अर्धी अधिक संस्थाचालकांची मांडलिक असतात. अशा शिक्षकांच्या हातून अभ्यासक्रम मुळातच गुलामगीरी शिकविणारा तयार होवू शकतो यात शंका नाही. तो राबविणारे हातही म्हणजेच संस्थाचालक वा शिक्षणाधिकारीही भ्रष्टाचार करणारे असू शकतात यात शंका नाही. मग जी पिढी घडणार. ती पिढीच कशी काय भ्रष्टाचार मुक्त वा भ्रष्टाचार विरहित तयार होईल? हा प्रश्न आहे. मुळात या सर्व बाबीत सुधारणा करावी लागेल. तेव्हाच वर्गखोल्यातून भ्रष्टाचार मुक्त पिढी घडेल. कारण शाळेच्या वर्गखोल्यातूनच देशाचं भवितव्य घडत असते. जसा राजा तशी प्रजा याप्रमाणे जशा शाळा तसे नागरीक. आदर्श नागरीक तयार करण्यासाठी आदर्श शाळाही असायला हव्या. त्या शाळा भ्रष्टाचाराने लिप्त नसाव्यात हे म्हणणे तेवढेच खरे आहे. प्रत्येक शाळा आदर्श बनावी. तसेच प्रत्येक शिक्षक आदर्श असावा. त्यातच प्रत्येक संचालक आणि अधिकारी वर्गानंही आदर्श बनावं. कारण शाळा हे निरागस मुलांचं भवितव्य घडविण्याचं केंद्र आहे. सानेगुरुजींनी म्हटलंच आहे की मुलं ही देवाघरची फुलं. जर आपण अशा देवाघरच्या फुलांवर योग्य फुंकर न घालता, त्यांच्यावर संस्कार करीत असतांना भ्रष्टाचार लिप्ततेनं वागलो, तर विधाताही आपल्याला कधी माफ करणार नाही. एक ना एक दिवस तो आपल्याकडून आपल्या वागणूकीवर अंकुश लावेलच ही शक्यता नाकारता येत नाही. आपण त्या मुलांवर योग्य संस्कार टाकावेत. त्यासाठी प्रयत्न करावा. त्यातच आपलं हित आहे. तसेच सरकारनं अभ्यासक्रमही तयार करतांना अशा आदर्श संस्काराचा तयार करावा. जेणेकरुन विद्यार्थी रुपी या कोवळ्या कळ्यांचं उद्या आदर्श नागरीकरुपी विकसीत फुलात रुपांतर होईल. तसेच ती शाळाच नाही तर तो देशही नावारुपाला येईल. ही शक्यता नाकारता येत नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०