संपादकीय

तुमचं एक मत देशाचे बहुमत ठरत असते..

तुमचं एक मत देशाचे बहुमत ठरत असते.

 

 

-प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल

भारतीय राज्यघटनेने या देशातील नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य मानले. समानतेचे हे एक फार महत्त्वाचे सूत्र घटनेद्वारे भारतातील प्रत्येकाला मिळाले आहे, त्याचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे याचे भान आल्याशिवाय जगातील सर्वात मोठी असलेली आपली लोकशाही सुदृढ होणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. मी एकट्याने मतदान केले नाही तर काय फरक पडणार, असा विचार करणारे व मतदानाला न जाणारे अनेक जण बघायला मिळतात..मात्र आपल्या एकेक मतातून बहुमत तयार होत असतेअगदी कमी फरकाने किंवा एकेक – दोन तीन मतांनी उमेदवार निवडून आल्याचे व निवडणूक हरल्याचे अनेकदा समोर आलेले आहेत..त्यामुळे
तुमचं एक मत देशाचे बहुमत ठरत असते.ही गोष्ट मतदारांनी समजून घेण्याची गरज आहे.

आपण प्रत्येक जण सरकारकडून जशा काही अपेक्षा करत असतो, त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी आपणही मतदान करणे हे कर्तव्य ठरते. लोकशाहीने दिलेला हा अधिकार बजावणे म्हणूनच अतिशय महत्त्वाचे आहे. आपण एकटय़ाने मत न दिल्याने असा काय मोठा फरक पडणार आहे, असा विचार करणारेही या देशात बरेच जण असतात. पण असा विचार आत्मघातकी असतो. आपल्या एका मतानेही फरक पडू शकतो, हे लक्षात घेतले, तर मतदानाचे खरे मूल्य लक्षात येऊ शकेल. आपल्याला जो पक्ष किंवा उमेदवार महत्त्वाचा वाटतो, त्या पक्षाला मत देणे म्हणजे आपण ज्या विचारांवर विश्वास ठेवतो, त्याला आधार देण्यासारखे असते. मत दिल्याशिवाय या देशात परिवर्तन अशक्य आहे, याची जाणीव ठेवली, तर हे सरकार नको होते, असे घडले त्याला हेच सरकार कारणीभूत आहे अशा चर्चाना पूर्णविराम मिळेल. सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्याची मतदान ही एक संधी असते. कोणत्या प्रकारचे सरकार आपल्याला हवे आहे, हे सांगण्याचे ते एक निमित्त असते. म्हणून मतदानाच्या दिवशी सहलीला जाणे किंवा मतदानालाच न जाणे अतिशय चुकीचे आहे. सशक्त लोकशाही हवी असेल, तर मतदानाशिवाय पर्याय नाही. नागरिक सजग असल्याचे ते एक द्योतक असते. मतदान हा एक मौल्यवान अधिकार आहे. त्याचे मूल्य करून कुणी आपल्याला विकत घेऊ पाहत असेल, तर त्याच्या प्रलोभनांना बळी पडणे म्हणजे या अधिकाराचा घोर अपमान आहे.आश्वासने आणि प्रलोभनांपासून दूर राहून लोकशाही निकोप करण्याच्या प्रयत्नात प्रत्येकाने सहभागी होणे त्यासाठी अतिशय आवश्यक आहे.

आपण लोकशाही देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत. सरकारची निर्मिती व अभिव्यक्ती मतातून होते. मतदान ही लोकशाहीच्या मंदिरातील सर्वोच्च पूजा आहे. मात्र, मतदानाचा निरुत्साह तरुणांमध्ये वाढत आहे.

मतदान कमी होण्याची अनेक कारणे आहेत. अशा अनेक कारणांमुळे मतदार मतदान करण्यापासून दूर राहतात किंवा स्वत:ला अलिप्त ठेवतात. लोकांचा अधिकाधिक सहभाग वाढणे लोकशाहीच्या यशाचे खरे गमक आहे. मी एकटय़ाने मतदान केले नाही तर काय फरक पडतो, असे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होय. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे एकेका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. तुमचे एक मत देशाचे बहुमत ठरत असते. या पार्श्वभूमी वर देशातील प्रत्येक पात्रता प्राप्त नागरिकांनी मतदान करून लोकशाहीवरील आपली श्रद्धा प्रकट केली पाहिजे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपला खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी. कारण ते आपले कर्तव्य आहे. हे कर्तव्य देशाप्रति, समाजाप्रति व आपल्याप्रति असते. ही जाणीव ठेवून आवर्जून प्रत्येकांनी मतदान केले पाहिजे.

खासगी सेवेत कार्य करणा-या मतदारांनी देखील मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविणे तितकेच महत्त्वाचे आहे. सरकारी नोकरदारांना मतदानासाठी सुट्टी असते, तर असंघटित क्षेत्रातील बहुसंख्य कर्मचा-यांना सुट्टी मिळत नाही. याचा परिणाम मतदानावर होतो. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने व सरकारने लक्ष द्यायला हवे. आपला देश लोकसंख्येने व विस्ताराने मोठा आहे. तितकीच या देशात विविधतादेखील आहे. तेव्हा समस्या, अडीअडचणी येणारच आहेत. या सर्व समस्यांचा सामना मतदारांनी करून लोकशाहीच्या प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.

प्रा. डॉ.सुधीर अग्रवाल

-प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल

(एस के पोरवाल
महाविद्यालय,कामठी,
नागपूर,९५६१५९४३०६)

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button