तरुणपणातील आकर्षण..
तरुणपणातील आकर्षण..
बालपण सरुन जातं आणि केव्हा तरुणपण येतं. ते कळत नाही. तरुणपण येताच सारे संदर्भ बदलतात. अवयवात आणि शरीरात बदल होतो. मग तरुणांना तरुणाईचं आकर्षण वाटायला लागतं. तरुणींनाही असंच वाटायला लागतं. यातच तरुण तरुणी एकमेकांवर प्रेम करायला लागतात. ते प्रेम त्यांनाही माहित नसतं की ते एकमेकांवर का बरं होत आहे.
सुरुवातीला तरुण तरुणी एकमेकांशी बोलायला लागतात. त्या बोलण्यातून मग ते एकमेकांवर प्रेम करायला लागतात. त्यातच ते एवढे प्रेमात गुरफटून जातात की ते एकमेकाच्या शिवाय राहू शकत नाहीत. ते आकर्षण इतकं महाभयंकर असतं की ते मागचा पुढचा विचार न करता असे निर्णय घेतात की ते निर्णय मायबाप व आबालवृद्धांना सांगतही नाहीत. कारण सांगीतल्यावर ते काही म्हणतील अशी त्यांना भीती वाटते. त्यातच काही मुलं मुली पळूनही जातात मायबापांना न सांगता. ते कुठे गेले कुठे नाही हा थांगपत्ताही नसतो. मग काय ते अवेळीच असे निर्णय घेवून फसतात. कारण यामध्ये मुलं या शारिरीक आकर्षणानं पळून तर जातात आणि मुलं पैदा करतात. परंतू जेव्हा जबाबदारी अंगावर येते, तेव्हा मात्र अशी मुलं हतबल ठरतात. मग कुटूंबात रोजची भांडणं होतात. काही मुलं तर सोडून जातात मुलींना. मुलं पैदा करुन. काहींना जबाबदारी पेलवत नाही. म्हणून ते आत्महत्या करतात. तर काही कामालाच जात नाहीत. शेवटी उपासमारीची वेळ येते. शेवटी काय तर नाईलाजानं मुलींना कामाला जावंच लागतं. आपल्या पैदा केलेल्या मुलांना पोसण्यासाठी.
पुर्वीचा काळ एकप्रकारे बरा होता की त्या काळात मुलामुलींचे बालविवाह होत. अगदी वयात येण्यापुर्वी मुला मुलींचे मायबाप विवाह करुन देत. याचाच अर्थ असा की मुलं वयात येण्यापुर्वीच लहानपणीच विवाह होत असल्यानं मुलांना तरुणपणातील आकर्षणाची गरज राहायची नाही. त्यातच ते पळूनही जायचे नाही. तसाच त्यांचा संसारही व्यवस्थीत चालायचा.
लहानपणीच विवाह होत असल्यानं मुलांवर संस्कारही चांगले पडत. मुलं मुली मायबापाच्या व वडीलधा-यांच्या छत्रछायेखाली वाढत. त्यामुळं त्यांचा त्यांच्यावर धाक राहायचा. ती मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्या वडीलधा-यांची आज्ञा मोडत नसत.
तो बालविवाह……. त्या बालविवाहात संदर्भ नसायचे. सगळे घरातले कामावर जात. त्यातच मायबाप कितीही मोठे झाले तरी म्हाता-या मायबापांची सेवा करीत. वेगळं राहण्याची वा निघण्याची प्रथा नव्हती. कुटूंबनियोजनाचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्याचं कारणही तसंच होतं. कारण त्यावेळी युद्ध होत व युद्धात प्रचंड मोठ्या प्रमाणात सैन्य मरत. कित्येक मुली लहानपणीच विधवा होत. त्यातच त्यांना बालपणापासूनच वैधव्याची समस्या सतावायची. मात्र लोकसंख्या या युद्धामुळं नियंत्रीत असायची.
एका एका माणसाला दोनच्या वर पत्नी असायच्या. त्या अनेक पत्नी करण्यामागे उद्देश होता. तो उद्देश म्हणजे मुलं पैदा करणे. कारण युद्धाला अनेक मुलं सैनिक म्हणून हवे असायचे. परंतू जसजसा काळ बदलला. तसतशी परिस्थीतीही बदलली. युद्ध बंद झालं.
बदलत्या काळानुसार युद्ध बंद झाल्यानं लोकसंख्या वाढली. या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी तरुणतरुणींच्या विवाहाचं वय वाढलं. त्याचबरोबर शारिरीक आकर्षण वाढलं. त्याची परियंती प्रेम करण्यात झाली. तेही लपूनचोरुन प्रेम करण्यात. त्यातच त्याची परियंती पळून जाण्यातही झाली.तेही मायबापांना माहित होवू न देता. याला जबाबदार कोण ठरला. युद्ध की युद्धविराम……
पुर्वीच्या काळात जेही युद्ध व्हायचे. त्या युद्धात जो नरसंहार व्हायचा. तो नरसंहार त्या काळातील तत्ववेत्यांनी पाहिला. त्यांनी त्यांना शांतीचा मार्ग सांगीतला. तोच अष्टांग मार्ग.
त्या काळातील असा शांतीचा संदेश देणारा तत्ववेत्ता म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्धाचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. कारण गौतमानं जो मार्ग सांगीतला. तो अहिंसेचा होता. हिंसेला त्यांनी वावच दिला नाही. अहिंसा धर्म जपला. हेच तत्व जेव्हा त्यानं आपल्या धम्माचा प्रसार करतांना जेव्हा बुद्धानं वापरले. तेव्हा मोठमोठे राजे त्यांना शरण गेले. काहींनी तर बुद्ध धर्माला राजाश्रयच दिला. काही राजे सुरुवातीला विरोधक होते. परंतू तद्नंतरच्या काळात त्यांनाही ते तत्व पटलं व त्यांनी युद्धाला विराम देवून सामोपचाराचा मार्ग पत्करला.
केवळ जगाच्या कल्याणासाठी बुद्धानं मांडलेले अहिंसेचे तत्व आज लोकसंख्या वाढविण्यास कारणीभूत ठरले असले तरी बुद्धाच्या जन्मानंतरही आजपर्यंत जगात युद्ध झालं.,अजुनही युद्ध होतच आहेत. परंतू आज पाहिजे त्या प्रमाणात युद्ध होत नाहीत. परंतू आज विवाहाचं वय वाढलं आहे. बालपणात झालेल्या वा होत असलेल्या विवाहांना आज अत्याचार समजले जाते.
बुद्धानं मांडलेलं अहिंसा तत्व. त्या तत्वांना आज सर्व जगानं स्विकारलं असलं तरी तसेच त्यांची आज गरज असली तरी असं विवाहाचं वय वाढविल्यानं तरुण तरुणीच्या शारिरीक आकर्षणाचं काय? त्यातच त्या तरुणपणाच्या आकर्षणातून मुलामुलांचं पळून जाण्याचं काय? तसेच त्या पळून जाण्यातून पुढे उद्भवणा-या समस्यांचं काय? हे तिनही प्रश्न विचार करायला लावणारेच आहेत. तेव्हा या गंभीर बाबींची दखल घेणंही तेवढंच गरजेचं आहे.
या तरुण पणाच्या आकर्षणाला बुद्ध तत्व जबाबदार नाही. त्यांनी फक्त अहिंसा परमोधर्म सांगीतला. पळून जाण्याचा मार्ग सांगीतला नाही.
महत्वपूर्ण वस्तुस्थिति अशी की शारिरीक आकर्षण प्रत्येकाला असतं. असावं. परंतू याचा अर्थ असा नाही की मायबापांना विश्वासात न घेता पळून जावं. हे असं पळून जाणंही एकप्रकारे हिंसाच आहे. हिंसा म्हणजे केवळ कत्तल करणे नाही तर आपल्या वागण्यातून जर कोणाच्या भावना दुखत असतील, आपल्या बोलण्यातून जर कोणाचं अहित होत असेल तर त्यालाही अहिंसाच म्हणावी लागेल हे तेवढंच खरं आहे. त्याचे परीणामही गंभीर होत असतात आणि ते गंभीर परीणाम प्रत्येकाला भोगावेच लागतात. तेव्हा प्रत्येकानं असं पळून जातांना विचार करावा. प्रेम करण्यापुर्वी सावधान असावं. तसेच पळून जातांनाही सावधानच असावं. पळून जातांना दहावेळा विचार करावा. जेणेकरुन कोणालाच गंभीर तसेच दुरगामी परीणाम भोगावे लागणार नाही व प्रत्येकाचा संसार व्यवस्थीत व सुरळीत होईल हे तेवढेच खरे आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०