संस्कृती

होळीला कुणीही गालबोट लावू नका..

 

होळीला कुणीही गालबोट लावू नका..

 

 

होळीत शत्रुत्व विसरता येईल पण…….आम्ही तो विचार कधीच करीत नाही.आम्ही होळी खेळतो मनात शत्रुत्व ठेवून.जुन्या वैमनस्याचा बदला काढण्यासाठी आम्ही या होळीचा फायदा घेवून रक्तरंजीत होळी खेळत असतो आणि विसरत असतो होळी हा प्रेम वाढविण्याचा सण आहे.*

होळी हा आनंदाचा सण आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.आम्ही होळी हा सण साजरा करतो.त्याला हिंदूचा सण समजत त्यावर आपल्या धर्माचा हक्क जमवतो.तसंच पारंपारीक पद्धतीने विधीवत पूजा करुन आम्ही आमच्या धर्माचा प्रसारही एककल्ली स्वरुपात करीत असतो.
होळीला आपल्याला मजा वाटते ती रंग लावण्याची.मग तो ओळखीचा राहो अगर न राहो.काही मंडळी होळी खेळतांना अगदी वेगळ्या साधनांचा वापर करतात.रंग किंवा पाणी वापरण्याऐवजी अशी मंडळी चिखलाचा वापर करतात.नव्हे तर वेगवेगळे नकाबपोश करुन शत्रुत्वही काढत असतात.काही मंडळी अशा रंगात कमी प्रमाणात तेजाब टाकून चेहरा विद्रुपही करण्याचे काम करतात.जे आपल्याशी गोड गोड बोलतात,तेच अशा प्रकारचा घात करीत असतात.नाश्त्याच्या नावाने येणा-या डीशमध्ये उत्तेजक पेय टाकून काय काय करतात ते न सांगितलेले बरे.म्हणून होळी खेळतांना सावधान राहीलेले बरे.
मुळात हा सण हिंदूचा असला तरी या सणाची मजा सर्वच धर्मीयांना येत असते.ती मंडळी होळीची मजा घेत असतात.सर्व प्रकारची दुश्मनी विसरुन हा होलिकोत्सव साजरा केला जातो.हा सण जसा भारतात साजरा केला जातो,तसाच नेपाळमध्येही मोठ्या प्रमाणात साजरा होतो.या सणाचा महत्वाचा उद्देश शत्रुत्व मिटविणे हा आहे.पण आम्ही त्याचा उलट अर्थ घेवून आपले असलेले पुरातन शत्रुत्व……त्या शत्रुत्वाचा बदला काढत असतो.हा सण फाल्गून महिण्यात येतो.पंचमीला पंचमोत्सव साजरा केला जातो.
पुर्वी हा उत्सव आर्यामध्ये प्रचलित होता.अल्बेरुनी हा प्राचीन मुस्लीम पर्यटक.या मुस्लीम पर्यटकाने लिहिलेल्या आपल्या ग्रंथात होळीचे महत्व वर्णन केले आहे.तसेच मुस्लीमांच्याही काळात होळी हा सण साजरा करीत असल्याचे पुरावे मिळतात.बादशाह अकबर आपली राणी जोधाबाईसोबत नेहमी होळी खेळत होता.तसेच जहाँगीर बादशाह आपल्या नुरजहाँसोबत होळी खेळल्याचा उल्लेख अलवर संग्रहालयात आहे.अलवर येथील एका संग्रहालयातील चित्रात शहाजहान बादशाहाने या सणाला ईद ए गुलाबी आणि धुलीवंदनला आब ए पाशी(रंगाचा पाऊस)म्हटलेले दाखवले आहे.नव्हे तर बहाद्दूरशहा जफर जो मुस्लीमांचा शेवटचा शासक झाला,त्याला रंग लावायला संपुर्ण मंत्रीमंडळ जायचं.यावरुन हे दिसते की होळी हा केवळ हिंदूंपुरता मर्यादीत नव्हता.
काळ बदलला.इंग्रज आले.त्यांनी भारतीय सुत्रे हातात घेतली.नंतर त्यांनी हळूहळू या देशात फुट पाडण्याचा विचार करीत येथील हिंदू मुस्लीमांना भडकविले.मग भारतीय मुस्लीमांनी हेच सणं साजरे करावे तसेच हिंदूने हेच सण साजरे करावे आणि ते का करावे हे सांगून या सणातही फूट पाडण्याचा प्रयत्न केला.कारण त्यांना राज्य करायचे होते.त्यांना वाटत होते की ही मंडळी जर आपापसात भांडत असली तरच आपल्याला राज्य करता येईल. हा त्यांचा उद्देश आम्ही भारतीय समजू शकलो नाही.आज इंग्रज गेले तरी समजून घेत नाही.भेदभाव करीत असतो.आपापसातच भांडत असतो.कधी कधी सणावरुनही भांडतो.
ज्याप्रमाणे मुस्लीम राजे हे होळी सण साजरा करीत.त्याप्रमाणे हिंदी राजेही होळी सण साजरा करीत.इसवी सणाच्या सोळाव्या शताब्दीत विजयनगरच्या हंपी राजधानीत तसेच मेवाडचा राजा महाराणा प्रताप हाही होळी खेळत असल्याचे चित्र मेवाडच्या एका चित्रप्रदर्शनीत लागले आहे.
या सणाला प्राचीन ऐतिहासीक पाश्वभुमीही लाभली आहे.जसे पुतना राक्षसीनीचा वध केल्यानंतर गोकुळात रंग खेळून आनंदोत्सव साजरा केला गेला.तो होळी सणच होय.तसेच शिवाच्या लग्नाची वरातही अशीच रंग खेळत निघाली होती.म्हणून आज त्याची आठवण म्हणून होळी खेळतांना शिवासारखे मोठे केस परीधान केले जातात.किंवा मुखवटे लावले जातात.तसेच मुख्य म्हणजे होळीचा संबंध भक्त प्रल्हाद आणि होलिकेशीही लावला जातो.अर्थात आपला भाऊ हिरण्याक्षला विष्णूने मारल्यामुळे हिरण्यकश्यपू श्रीहरीविष्णूचा भयंकर राग करायचा.पण त्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा प्रल्हाद सतत विष्णूचे नाव जपत राहायचा.त्या विष्णूचा राग मनात असल्यामुळे आपल्या पुत्राला मारण्यासाठी आपल्या बहिणीला होलिकेला शरणात बसायला लावले.त्यातच होलिका दहन झाली आणि प्रल्हाद सुखरुप वाचले.
होळीे पेटविणे म्हणजे याचा अर्थ दृष्ट प्रवृत्तीचे दहन करणे होय.आपल्या मनातील राग,लोभ, द्वेष ,मध,मत्सराचे दहन करुन चांगले सात्वीक बनणे.याच दृष्टिकोणातून होळीचे महत्व आहे.याच अर्थाने आम्ही दरवर्षी होळी हा सण साजरा करायला हवा.होळीला जास्त भडक रंगाचा वापर न करता फक्त गुलालाचा टिळा लावून गळाभेट घेवून हा सण साजरा करावा.पण आम्ही हा सण साजरा करतांना मनात एक व ओठात एक ठेवतो.गळाभेट घेतांना आमच्यातला अफजलखान जागा होतो आणि आमच्या शिवाजीला कल्पना येण्याआधीच आमचा शिवाजी कट्यारीने मारला जातो.सकाळी फागवा काढून पैसे गोळा केले जातात.आलेल्या पैशाने सायंकाळी एकतर जुवा खेळला जातो वा दारू ढोसली जाते.मग आमच्या डोक्यात शैतानी विचार शिरतात.कोणीचा गेम करायचा याचे मनसुबे आखले जातात.सकाळी देखील चेह-यावर चेहरा ओळखू न येणारा रंग लावून जुन्या शत्रूत्वाचा बदला काढण्यासाठी चाकूने वार केला जातो.नंतर पळ काढला जातो.कोणी हे कृत्य केले ते लक्षातही येत नाही.वा अँसीडही फेकले जाते प्रेयसीवर.एकतर्फी प्रेमातून होळीचा फायदा घेवून तु मेरी नही तो किसीकी भी नही।असे म्हणत चेहरा विद्रुप केला जातो.
कोणतेही सण साजरे करणे ही आपली परंपरा जरी असली तरी त्या सणाला कधीच गालबोट लावण्याचा प्रयत्न करु नये.बदला घेणे ही आपली राक्षसी वृत्ती आहे.ती या होळीच्या निमीत्यानं सोडावी.राग,लोभ,द्वेषाला होळीत जाळून टाकावे.जुनं वैमनस्य विसरुन होळी खेळावी.आनंद घ्यावा.शेअरही करावा.पण त्यात कोणी दुखावला जाईल अशा प्रकारची होळी खेळू नका.होळीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करु नका.
अंकुश शिंगाडे
९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button