आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र निवडावे..
आता थोड्याच दिवसात दहावीचे निकाल जाहीर होतील. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता असते ती करिअर निवडीची…कोणते करिअर निवडावे? याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था असते. कारण योग्य करिअरची निवड ही विद्यार्थ्याला यशाच्या मार्गावर नेते, तर चुकीच्या करिअर निवडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते. शिवाय आयुष्यातील महत्त्वाची वर्ष वाया जातात.
करिअरची निवड हा विद्यार्थी आणि पालक या दोघांसाठीही अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच काळजीचा विषय आहे. योग्य वयात योग्य करिअरची निवड केली, तर ती लौकिकार्थाने यशस्वी आयुष्याची पहिली पायरी ठरते. करिअरमुळे उत्तमता आणि प्रतिभेची उंची गाठता येते. प्रत्येक व्यक्ती बुद्धिमान असते, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक सुरक्षितता आणि उज्जवल भविष्य या गोष्टीसुद्धा करिअर निवडीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंधित असतात.
जीवनाचा विकास साधायचा असेल, तर प्रत्येकाने आपल्या बुद्धीचे चलनक्षेत्र ओळखून तसे क्षेत्र निवडावे. त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा साध्य करावी. आत्मपरीक्षण आणि रुची असलेल्या क्षेत्राची निवड, निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा मिळविणे ही सर्वात महत्त्वाची त्रिसूत्री आहे. माहितीच्या विस्फोटात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली दबणा-या मुलांना आपण नक्की काय करू शकतो? काय करणे दीर्घकाळाच्या दृष्टीने योग्य असेल हे समजून घ्यायला मदत करणारे वस्तुनिष्ठ साधन म्हणजे कल चाचणी…करिअरला आवश्यक गुणसंपदा तुमच्या व्यक्तिमत्त्वात असेल, तर तुम्हाला त्या करिअरमध्ये स्कोप असते.
पुस्तकी अभ्यासातल्या बुद्धिमत्तेला अकँडमिक इंटेलिजन्स म्हणतात. ज्याच्याकडे अकँडमिक इंटेलिजन्स आहे, त्याने पुस्तकी अभ्यासाशी संबंधित क्षेत्रात करिअर करावे. दहावीत खूप टक्के मिळवून बोर्डात येणारे विद्यार्थी विज्ञान शाखेला जातात. बारावीला पीसीएम, पीसीबी किंवा पीसीएमबी हे विषय घेतात. मग, बारावी सायन्सला बोर्डात येणे, मेडिकल, इंजिनिअर प्रवेश परीक्षा देऊन यश मिळविणे आणि जो हे करू शकेल तो बुद्धिमान…मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश न मिळाल्यास विज्ञानाच्या विषयांमध्ये प्युअर सायन्स करायचे. विज्ञान शाखेला प्रवेश नाही मिळाला, तर वाणिज्य शाखेला प्रवेश घ्यायचा. पण दहावीत वाणिज्य शाखेलाही प्रवेश मिळविण्याएवढे मार्क नसले तर मान खाली घालून कला शाखेला प्रवेश घ्यायचा अशी करिअरची उतरंड असते. हे सर्व चुकीच्या सूत्रांवर आधारीत असते.
पुस्तकी अभ्यासातल्या बुद्धिमत्तेपलिकडे बुद्धिमत्तेचे एक फार मोठे क्षेत्र आहे. त्याचे नाव बिहेव्हियल इंटेलिजन्स म्हणजेच रोजच्या जगण्या वागण्यातली बुद्धिमत्ता…लेखन, चित्रकला, खेळ, गायन, अभिनय, संगीत, कला, समाजकार्य, नेतृत्त्व, उद्योग व्यवसाय अशी अनेक क्षेत्र आहेत. ही मेडिकल, इंजिनीअर सहित अकँडमिक इंटेलिजन्स इतकीच महत्त्वाची आहेत. आता दहावीनंतरही करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. या दहावी बारावीनंतरच्या असंख्य पर्यायांपैकी नक्की कोणता निवडावा? हा प्रश्न ‘आ’ वासून उभा असतो. कोणता अभ्यासक्रम निवडावा? कसा निवडावा? पाल्याचा कल कसा ओळखावा? असे अगणित प्रश्न उपस्थित होतात.
दहावीचा निकाल काही दिवसात जाहीर होणार आहे. यावर्षी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाल्यामुळे लवकरच अकरावी आणि डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रवेश कुठे आणि कोणत्या शाखेत घ्यायचा याबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेकदा विद्यार्थी पॉलिटेक्निक की बारावी यासंदर्भात संभ्रमात असतात. यापैकी पुढील शिक्षणाच्या दृष्टीने चांगला पर्याय कोणता? याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत. दहावीनंतर थेट इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश मिळतो. हा डिप्लोमा तीन वर्षांचा आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ज्युनिअर इंजिनीअरची नोकरी मिळते. विशेष म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअर व्हायचं असेल तर तुमच्या पुढील शिक्षणासाठी पॉलिटेक्निक हा उत्तम पर्याय असतो. यामध्ये इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, सिव्हिल, कॉम्युटर अशा अनेक ब्रांचमध्ये शिक्षण घेता येतं. इंजिनिअरिंगचे बरेचशे मुद्दे डिप्लोमा करताना समजतात आणि त्यामुळे पुढे अडचण येत नाही. प्रॅक्टिकल ज्ञानासाठीही डिप्लोमा हा उत्तम पर्याय आहे.
डिप्लोमाला प्रवेश घेतल्यानंतर जर इतर कोणत्या शाखेत म्हणजे कॉमर्स, कला क्षेत्रात जाण्याची तुमची इच्छा झाली तर ते शक्य होत नाही. यासाठी बारावी असणं महत्त्वाचं असतं. डिप्लोमानंतर पदवीसाठी इंजिनिअरिंगशिवाय दुसरा पर्याय नसतो. बरेच विद्यार्थी डिप्लोमानंतर जॉबही करतात. अशा विद्यार्थ्यांना सुपरवायजर किंवा ज्युनिअर इंजिनिअर म्हणून जॉब मिळतो.
दहावीनंतर बरेच विद्यार्थी अकरावी आणि बारावी करतात. यामध्ये विद्यार्थ्यांना अकरावीची परीक्षा कॉलेजकडूनच असते मात्र बारावीमध्ये बोर्डाची परीक्षा असते. ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्स, आर्ट्स या शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना बारावीशिवाय दुसरा पर्याय नसतो. तसेच अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी बारावीनंतर जेईई ची परीक्षा देतात. ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर नक्की कोणत्या क्षेत्रात पदवी घ्यायची आहे हे माहिती नसतं त्यांना बारावीला प्रवेश घेता येऊ शकतो. त्यानंतर उपलब्ध असणा-या पर्यांयामधून चांगल्या पर्यायाची निवड करून पदवी पूर्ण करता येते. पदवीनंतर सरकारी नोकरीसाठी अथवा स्पर्धा परिक्षांसाठी अर्ज करता येतात. हा देखील करिअरच्या दृष्टीने चांगला पर्याय आहे.
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९