शिक्षकांच्या वेतनासंबंधी चुकीचा संभ्रम बाळगणारी समाजवृत्ती;एका प्रेरणादायी कहाणीतून त्याचा सारांश
माणवाला प्रसिध्द व्हायचं असतील तर दोन गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे चांगले कर्म आणि दुसरे वाईट कृत्य. परंतु आज रोजी आपल्या समाजाची मानसिकता इतकी ढासळलेली आहे की, वाईट कृत्य करणा-याला लगेच डोक्यावर घेतलं जातात. एवढंच नाही तर त्याचे अनुकरण करून आपणही टॉप लेव्हलवर येऊ यासाठी धडपडतांना दिसतात. तेच चांगले कार्य करणा-याला वाटेल ते गालबोट लावून त्याच्यावर शिंतोडे उडविले जातात. अशाच आपल्या प्रगतशिल मानसिकतेच्या समाजाची प्रत्येकाला दिशा देणा-या शिक्षकांबद्दलचा दृष्टिकोन…
पिकासो हा स्पेन या देशात जन्मलेला एक अतिशय प्रसिद्ध चित्रकार होता. त्यांनी काढलेली पेंटिंग्ज अख्ख्या जगात कोट्यावधी आणि अब्जावधी रुपयांना विकल्या जात असत! एक दिवस रस्त्याने जात असता, एका महिलेची नजर पिकासोवर पडली आणि योगायोगाने त्या महिलेनं त्यांना ओळखलं. ती धावतच त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली, “सर, मी आपली खूप मोठी चाहाती आहे. आपली पेंटिंग्ज मला प्रचंड आवडतात. आपण माझ्यासाठीही एक पेंटिंग तयार करून देऊ शकाल काय ?”
पिकासो हसत म्हणाला, “मी इथे रिकाम्या हाताने आलोय. माझ्याजवळ काहीही साधने नाहीत. मी पुन्हा कधीतरी तुमच्यासाठी एक पेंटिंग नक्की बनवून देईन.” परंतु त्या महिलेने आता हट्टच धरला होता. ती म्हणाली, “मला आत्ताच एक पेंटिंग बनवून द्या. पुन्हा कधी आपली भेट होईल किंवा नाही हे सांगता येणार नाही.” पिकासोने मग आपल्या खिशातून एक छोटासा कागद काढला आणि आपल्या पेनने ते त्या कागदावर काहीतरी चित्र काढू लागले. जवळपास दहा मिनिटांमध्ये पिकासोने त्या कागदावर एक पेंटिंग काढलं आणि तो कागद त्या महिलेच्या हाती देत ते म्हणाले, “हे घ्या पेंटिंग. तुम्हाला याचे एक मिलियन डॉलर्स सहज मिळतील.”
महिलेला मोठं आश्चर्य वाटलं. ती मनात म्हणाली, ‘ह्या पिकासोने केवळ 10 मिनिटांत घाईघाईने हे एक काम चलाऊ पेंटिंग तयार केलंय आणि मला म्हणतोय की, हे मिलियन डॉलर्सचं पेंटिग आहे.’ मात्र उघडपणे काही न बोलता तीने ते पेंटिंग उचललं आणि ती मुकाटपणे आपल्या घरी आली. तिला वाटलं पिकासो आपल्याला मूर्ख बनवत आहे. ती बाजारात गेली आणि पिकासोने आपल्यासाठी बनवलेल्या पेंटिंगची किती किंमत मिळू शकेल? याची तीनं तिथं चौकशी केली. या चित्राची किंमत सुमारे दहा लाख डॉलर्सपर्यंत मिळू शकेल असं तिला जेव्हा कळलं, तेव्हा तिच्या आश्चर्याला पारावार उरला नाही.
ती धावत धावतच पुन्हा एकदा पिकासोकडे गेली आणि त्यांना म्हणाली, “सर आपण एकदम योग्य सांगितलं होतं. या चित्रांची किंमत खरोखरच सुमारे दहा लाख डॉलर्स आहे.” पिकासो हसून म्हणाला, ” मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं.” ती महिला म्हणाली, “सर, आपण मला आपली शिष्या बनवून घ्याल कां? मलाही पेंटिंग कसं बनवायचं ते शिकायचं आहे, तर आपण मला शिकवा. म्हणजे जसे तुम्ही दहा मिनिटांमध्ये दहा लाख डॉलर्सचं पेंटिंग बनवले, तसंच मी अगदी १० मिनिटांत जरी नाही तरी १० तासांत का होईना चांगलं पेंटिंग बनवू शकेन अशी आपण माझी तयारी करून द्या.”
पिकासो हसतच म्हणाला, “हे जे पेंटिंग मी १० मिनिटांत बनवलं आहे ते शिकण्यासाठी मला ३० वर्ष लागलेली आहेत. मी आपल्या जीवनाची तीस बहुमूल्य वर्षे यासाठी खर्ची घातली आहेत. तुम्हीही इतकीच वर्षे शिकण्यासाठी द्याल, तर तुम्हीही माझ्यासारखीच चित्रे काढू शकाल.” ती महिला अवाक् आणि निःशब्द झाली. ती पिकासोकडे नुसती पाहतच राहिली.
एक शिक्षकाला ४० मिनिटांच्या एका लेक्चरसाठी जो पगार दिल्या जातो, तोच उपरोक्त कथेबद्दल बरंच काही सांगून जातो. एका शिक्षकाच्या एक एका वाक्यामागे त्यांची कित्येक वर्षांची मेहनत असते. समाजाला वाटतं की , शिक्षकाला केवळ बोलायचंच तर असतं. त्याचाच पगार घेतात हे एवढाले. इथे हे विसरून चालणार नाही की, आज जगात महत्त्वाच्या पदांवर जितके लोक आरूढ आहेत, त्यांच्यापैकी अधिकांश लोक कुठल्या ना कुठल्या शिक्षकांमुळेच त्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत.
जर आपणही शिक्षकाच्या वेतनाला फुकटचं समजत असाल, तर मग एक वेळ ४० मिनिटांचं प्रभावी तसंच अर्थपूर्ण लेक्चर देऊन दाखवा. आपल्याला आपली क्षमता किती आहे? याची लगेच जाणीव होईल.
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९