शिक्षण

शिक्षणाची उलटी गंगा;उटपटांग निर्णय

   शिक्षक चांगलेच शिकवू शकतो पण बंधन आहेत. त्याला संस्थाचालकाच्या व त्यांनीच नियुक्त केलेल्या व त्यांचाच नातेवाईक असलेल्या मुख्याध्यापकाच्या रोषाला सामोरेे जावे लागते.
    शिक्षक.........अलिकडे शिक्षण क्षेत्राला सर्व नेत्यांनी बदनाम केलंं आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. त्याचं कारणंही तसंच आहे. नेतेमंडळी ही जेव्हा शिक्षणमंत्री बनतात. तेव्हा त्यांना शिक्षणाबाबतची काहीएक जाण नसते. केवळ आणि केवळ एखादं पद प्राप्त व्हावंं म्हणूून शिक्षणाचं खातं घेतलेले शिक्षणमंत्री. ते आपल्या मनानुसार शिक्षकमत विचारात न घेता तकलादूदृष्टीचे निर्णय घेत असतात. त्यातच त्या निर्णयाला कोणी विरोध केल्यास त्या निर्णयाला वेळीच बदलवतात.
   शिक्षणक्षेत्रातही अनेक आमदार आहेत. ते आमदार शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे असतात. परंतू त्यांना जर शिक्षण क्षेत्रातल्या प्रश्नांची जाण असेल तर........किंवा ते स्वतः शिक्षक असतील तर......ते आमदार शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा नक्कीच फोडू शकतात यात आतिशयोक्ती नाही. असे आमदार हे शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देवू शकतात. परंतू काही आमदार हे शिक्षक नसतात. ते इतर क्षेत्रातील असतात. त्यांना शिक्षकांच्या परीणामाची वा त्यांच्यावर होणा-या अत्याचाराची माहिती नसते. मात्र असे आमदार केवळ पैशाच्या भरवशावर निवडून आलेले असतात.
    एका सभेत बोलणारा एक नेता म्हणाला की आजपर्यंत महाराष्ट्रात असे शिक्षणमंत्री होवून गेले की जे शिक्षणमंत्री बनल्यानंतर पुन्हा निवडूनच आले नाहीत. मग वसंत पुरके असो की रामकृष्ण मोरे, राजेंद्र दर्डा असो की विनोद तावडे.......कोणीही निवडून आलेला नाही. म्हणून नाईलाजानं कोणालाही म्हणावेसे वाटेल की मंत्र्यांना वेड लागते की काय?
    मंत्री........जे विविध क्षेत्रात कामे करीत असतात. त्यांचं उत्कृष्ट काम पाहून कोणीही त्यांना सहज निवडून देतो. शिक्षणक्षेत्र असं आहे की जे पालकांनाही आवडतं. कारण त्यांना त्यांच्या मुलांचं भविष्य बनवायचं असतं. असं भविष्य की ज्या भविष्यातून त्यांच्या मुलांचा विकास होत असतो. ते आपल्या मुलांना शिकविणा-या शिक्षकांना चांगलेच म्हणतात. चांगलेच मानतात. परंतू जर त्यांचा विश्वास असलेल्या शिक्षकांना कोणी काही म्हटल्यास ते त्यांना धुळही चारण्याचे काम करतात. जसे यापुर्वीच्या शिक्षणमंत्र्याचे झाले.
     आताही शिक्षणमंत्री असलेल्या विद्यमान काळात शाळा ह्या विदर्भात एवढं तापमान असतांना एप्रील महिण्यातच सुट्ट्या लागायच्या. त्याचं कारण असायचं उष्माघाताचा आजार होवू नये. कारण विदर्भ असो की कोणताही भुभाग. लहान मुलांना उष्माघाताचा त्रास उदभवतोच. परंतू कोरोनाचे कारण पुढे करुन शिक्षणमंत्र्यानं भर उन्हाळ्यातही शाळा ठेवली. त्याचं कारण असं होतं की कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिकविता आलं नाही.,शिक्षकांनी शिकवलं नाही.
   तो कोरोना काळ. त्या काळात शिक्षकांची कसोटी लागलेली होती. त्या कसोटीत शिक्षकांना अहोरात्र झटावं लागलं. या कोरोना काळात याच शिक्षकांनी नाक्यावर तर दिवट्या केल्याच. व्यतिरीक्त त्यांनी मोबाईलची पुरेशी व्यवस्था नसतांना कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेवून अतिशय जोखीम पत्करुन विद्यार्थ्यांच्या घरीही जावून शिकवले. त्यामुळं या शिक्षकांवर कोरोना काळात ताशेरेच ओढता येत नाहीत. तरीही या शिक्षकांनी काहीच केले नाही. विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले असा ठपका शिक्षकांवर ठेवून शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांची झोपच उडवली व विदर्भातील पारा बेचाळीस त्रेचाळीस असतांना शिक्षकांपाठोपाठ विद्यार्थ्यांचीही शाळा ठेवली. त्यातच मराठवाड्यातून आलेल्या एका जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी महोदयांनी म्हटलं की शाळा ही साडेदहापर्यंत नक्कीच घ्या. त्यात हयगय चालणार नाही. परंतू ज्या ज्या पालकांची इच्छा असेल की त्याही वर विद्यार्थी शिकला पाहिजे. अशा पालकांच्या मुलांना जास्त वेळ बसवा. या मराठवाड्यातून विदर्भात आलेल्या शिक्षणाधिकारी महोदयांना विदर्भातील तापमानाची अवस्था माहित नाही असेच वाटते. कारण तसाच विचार त्यांचा दिसला. त्यांना एसीच्या कम-यात बसल्यानंतर बाहेरचं तापमान काय असतं याची काय जाणीव! एखाद्या वेळी येतीलही ते सगळं सहन करायला. परंतू वेळोवेळी या इवल्या मुलांसोबत बसतांना त्रेधातिरपीट उडते. 
   ज्याचं त्याचं नशीब त्यांनाच माहित. पाण्यातील मासोळ्यांचं जीवन त्यांनाच माहित. आपण त्या पाण्यात जगूच शकत नाही. इथे जो शिक्षक स्वतः शिकवतो.स्वतः राबतो. त्याला स्वतःलाच स्वतःची अवस्था माहित आहे. आज संस्थाचालकाच्या अशा ब-याच शाळा आहेत की ज्या शाळेत पुरेसे पंखे नाहीत. पाणी पिण्याच्या योग्य व्यवस्था नाहीत. संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या भरवशावर बराचसा पैसा उभा केला. परंतू तो शाळेसाठी न वापरता स्वतःच्या घरासाठी वापरला. आज या गोष्टीचा तपास जर केला तर ब-याचशा संस्थाचालकांची कालची जी दयनीय परीस्थीती होती, ती आज राहिलेली दिसत नाही. याचं कारण काय? तर त्यांनी शाळेच्या माध्यमातून कमविलेला पैसा. काही काही मुख्याध्यापक हे शाळेतील कळसुत्री बाहूले असल्यागत वागत असल्याने त्या शाळेतील संस्थाचालकाचं फावते.
    विदर्भात विद्यार्थ्यांच्या शाळा ठेवल्या. त्यावेळी प्रत्यक्ष परीस्थीतीचा कोणी विचारच करीत नव्हते. विद्यार्थी ज्या बाकावर बसायचा. ती बाकं गरम यायची. जे पाणी प्यायचा. ती पाण्याची बाटल व ते पाणी गरम यायचं. ते पाणी प्यायल्यावर विद्यार्थी घरी उन्हाळी लागल्यानं तडपायचे. शाळेत पंखे नसल्यानं अंगातून घामाच्या धारा निघायच्या. तरीही पालक पाठवायचे. विद्यार्थ्यांना याबाबतीत विचारले असता ते म्हणायचे की सर माझ्या मायबापापैकी घरी कोणीही नसतात. मग मी इकडे तिकडे फिरु नये उन्हात म्हणून शाळेत येतो. याचाच अर्थ असा की शाळा ही त्या पालकांच्या दृष्टिकोणातून शिकविण्याचं साधन नाही तर मुलं सांभाळण्याचं साधन आहे.
    आजची अशी ही उपद्व्यापी शिक्षण व्यवस्था. या व्यवस्थेपुढे हारणारा शिक्षक. म्हणूनच की काय, आजपर्यंत झालेले शिक्षणमंत्री पुन्हा निवडून आलेले नाहीत. याचा विचार विद्यमान शिक्षणमंत्र्यांनी करायला हवा. त्यांनी उटपटांग असे निर्णय घेवू नयेत. जेणेकरुन शिक्षणाच्या या कालचक्रात त्यांचावरचा विश्वास उडेल व त्यांनाही लोकं टार्गेट बनवून पुढील निवडणूकीच्या काळात नाकारतील. निदान शिक्षण मंत्र्यांनी तरी राष्ट्रहित विद्यार्थी हित व शिक्षक हित जोपासावे. जेणेकरुन शिक्षणाचे ध्येय साध्य करता येईल. विद्यार्थ्यांचा जर सर्वांगीण विकास करायचाच असेल तर शिक्षकांना धारेवर धरुन चालत नाही. दडपशाहीचे तर धोरण अजिबात चालत नाही. त्यांच्यावर प्रेमाची फुंकर घाला. प्रेम द्या. प्रेमाने सांगा. प्रेमानं तर जगही जिंकता येते. हे तर शिक्षक आहेत. पाहा एकदा प्रयोग करुन. यश नाही मिळणार असे कदापीही होणार नाही हे तेवढंच खरं आहे.

   अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button