अग्नीपथ : उद्याच्या देशविनाशाचे बीज
अग्नीपथ : उद्याच्या देशविनाशाचे बीज ?
लोकांचे आश्चर्य मोठे आश्चर्य आहे,देशात बेसुमार महागाई,वाढती बेरोजगारी मुळे शंभर कोटी जनतेचे जगणे,तगण्यावर आले असताना,त्या विरुद्ध लोक रस्त्यावर उतरले नाहीत.कोणतीही तोडफोड करुन आपला संताप व्यक्त केला नाही.शेतकरी आंदोलन वर्षभर चालले.तेव्हा ही लोकांचा संयम तुटला नाही.लोक मुकाटपणे मोदी सरकारचा मार सहन करीत होते.आणि आताही तो सहन करीत आहेत.पण कुठेही बोंब शिवाय काही दिसले नाही. पण अशात अग्नीपथ योजनेची घोषणा होताच,लागलीच लोकांची तीव्र प्रतिक्रिया उमटते.त्यावरुन उत्तर भारत पेटून उठते.बिहार, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हिमाचल, मध्यप्रदेश, राजस्थान,हरियाणा, पंजाब,दिल्ली आदी राज्यांतील युवक संतप्त होतात. रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक करीत मोदी सरकार विरुद्ध आपला उग्र संताप व्यक्त करतात.युवकांना असे एकाएकी संतप्त होण्या सारखे असे काय या अग्नीवीर योजनेत दडले आहे ? आम्हाला वाटते, आमच्या आकलनानुसार हा प्रश्न केवळ नोकऱ्या पुरता मर्यादित नाही. त्यांच्या मागे त्या त्यापेक्षा भयावह कारस्थान दडले आहे.ते देशांशी संबंधीत आहे.देशाला दडपणारे आहे.ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
केंद्रात आल्या आल्या सरकारी नोकऱ्या गहाळ करणारे मोदी सरकार आठ वर्षांनंतर त्यांना युवकांना नोकऱ्या देण्याची आठवण नव्हे तर मोठा कळवळा येतो. पहिल्यांदा अगोदर दहा लाख नोकऱ्या देण्याची घोषणा करतो.त्या केंद्र सरकारच्या कोणकोणत्या खात्यातील आणि किती असतील,असा एकूण आलेख देशापुढे ठेवते. ( हा भाग अलहिदा ते दर वर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार होते.) त्या पाठोपाठ अग्नीपथ योजना घोषित करते.भारतीय लष्करात चार वर्षांसाठी साडे चार लाख युवकांना समावून घेतले जाईल.निवृत्ती वेळी त्याल साडे अकरा लाख रुपये मिळतील.त्यात तो आपला उदरनिर्वाह करु शकेल.अशी ती योजना असते.त्याविरुध्द उत्तर भारतातील युवकांनी का पेटून उठावे ? पेटून उठणारे युवक, भाजपाच्या भाषेत सांगायचे झाले;तर सर्व हिंदू होते.( भारतीय लष्करात धार्मिक अल्पसंख्याकांची हिस्सेदारी केवळ दोन टक्के असल्याचे बोलल्या जाते ) त्या हिंदूंना चार वर्ष भारत मातेच्या संरक्षण सेवेची संधी मिळणार होती.त्या विरुद्ध त्यांनी का जावे ? बरे झाले,या जनउद्रेकाला बघून कुण्या स्वयंसेवक भाजप नेत्यांनी आंदोलक युवकांना देशद्रोही म्हटले नाही.वा पाकिस्तानाची फूस असलेले फुटीरवादी आंदोलन आहे,असे सांगितले नाही.बरे असो,लागलीच मोदी सरकारने भरतीचे वय २१ वरुन २३ केले.या शिवाय त्यांना निवृत्ती नंतर केंद्र व राज्य सरकारच्या सशस्त्र पोलीस दलात प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. का अशी लगेच भूमिका बदलावी लागली ?
प्रश्न असा,भारतीय लष्कराच्या पायदळात १३ लाख २५ हजार नियमित सैनिक व ११ लाख ५५ हजार हे राखीव सैनिक आहेत.या शिवाय त्यांच्या सहयोगी म्हणून बरीच निमलष्करी दलांची फौज वेगळी आहे.ती ही लाखांच्या संख्येने आहे.त्या वरुन भारतीय लष्कर हे जगातील एक मोठे सैन्य गणले जाते आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान ,आधुनिक पद्धती ,आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून स्वतःला सक्षम बनवत असते. असे असताना त्यात आणखी साडे चार लाखांची केवळ चार वर्षाची नवीन फौज कशा साठी ? दुसरे असे महत्वाचे,अग्नीपथ योजनेला लष्करी तज्ज्ञांनी विरोध दर्शविला आहे.चार वर्षाच्या प्रशिक्षणाने सक्षम लष्करी सैनिक तयार होवू शकत नाही.असा त्यांचा दावा होत आहे.दुसरी महत्वाची प्रतिक्रिया,अशा फोगीर भरतीमुळे भारतीय लष्कराचे मनोबल तुटेल.तरी मोदी सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाही.असे जर असेल तर त्यात मोदी सरकारचे काही तरी खास वैशिष्ट्य दडले असले पाहिजे.त्याचा शोध व बोध घेणे आवश्यक होवून जाते.
आपण नेहमी मोदीला फॅसिस्ट म्हणतो.त्यांचे सरकार हे हुकूमशाही कडे वळते आहे.असा आरोप करताना,मोदींचे चाल-चलन हे जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरच्या चरित्राला लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो.हिटलरनी अगोदर लोकांत राष्ट्रवादाची भावना रुजविण्यासाठी,एक देश,एक ध्वज,एक भाषा,एक नेता आणि एक आवाज,असे जर्मनीत असावे,असे भावनिक आवाहन जनतेला केले. त्यासाठी जू विरोधी भूमिका घेतली. सक्तीचे सैनिकी शिक्षण सुरू केले.अल्पावधीसाठी सैन्यदल व नौदलात युवकांची मोठ्या संख्येने भरती केली.निवृत्तीनंतर त्यांच्यातील चांगल्या युवकांना आपल्या नाझी पक्षात समावून घेतले.त्यातून जर्मनीत आपल्या पक्षाची दहशत निर्माण केली.जू लोकांच्या कत्तली घडवून आणल्यात.जर्मनीवर द्वितीय महायुद्ध लादले.
मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत.असे म्हटल्या जाते,त्यांच्या सरकारचे रिमोट हे नागपुरातील संघ भवनामधून होते.संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर यांची, वेळोवेळी केलेली आपली भाषणे आणि लेखांचा ‘ बंच ऑफ थॉट्स ‘या शिर्षकाने एक पुस्तक प्रकाशित झाली आहे. त्यातील ‘ वी ओर आवर नेशनहुड डिफाइंड ‘ त्यात भारतात द्विराष्ट्राची संकल्पना मांडली आहे.वर्तमान सरसंघचालक मोहन भागवत हे हिंदू राष्ट्राचा जोरदार पुरस्कार करतात.या देशात राहणाऱ्यां सर्वांनी हिंदू म्हटले पाहिजे.असा त्यांचा हेका आहे.
या दिशेने महत्वाचे म्हणजे मोदीचे सरकार केंद्रात आल्या आल्या,त्यांनी जाहीर केले होते, आम्हाला संविधानाच्या उद्देशिकेतील धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे सत्व मान्य नाहीत.पंथनिरपेक्ष मान्य आहे.त्या मागील त्यांचे मर्म म्हणजे,ते या देशातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शिख,बौध्द, जैन व अन्य धर्मांना धर्म या सज्ञेने नाकारता.त्यांना मानीत नाहीत.त्यांना आपल्या ब्राह्मणी धर्माच्या हिंदुत्वाचे पंथ मानतात.म्हणजे भारत हे हिंदू राष्ट्र आहे.समाजवाद नाकारण्या मागील कारण असेच,हिंदू राष्ट्रात सामाजिक, आर्थिक समानता राहूच शकत नाही.ते जन्माधिष्ठीत चातुर्वर्ण्य जातीनुसार आहे.त्यात ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ आहे.त्याचे अधिपत्य समाज,अर्थ,राजसत्तेवर अबाधित आहे.म्हणून समता व समाजवादाला नाकारत भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे समरसतेचा जोरदार पुरस्कार करतो.समरसता म्हणजे, जातीनुसार जे मनुस्मृतीचे वचन आहे,त्यात समरस व्हा ! बंडखोरी करु नका ! असा त्यांचा संकेत आहे. संविधान हे ब्राह्मणी संहिता मनुस्मृतीच्या अगदी विपरीत आहे.मनुस्मतीला स्पष्ट नाकारणारे आहे.म्हणून संघ परिवाराला भारतीय संविधान मान्य नाही.हे त्यांनी अनेकदा व्यक्त केले आहे.आमच्या वाचकांना स्मरण करुन देतोय; मोदी मंत्रीमंडळातील सदस्य अनंत हेगडे यांनी तर मोदींच्या सरकार पुढे संविधानाचे प्रतिकात्मक दहन करीत,आम्ही ते बदलविण्यासाठीच केंद्र सरकार मध्ये आलेले आहोत,असे जाहीरपणे निक्षून सांगितले आहे. त्या संघी अजेंड्यावर मोदींचे केंद्रातील व राज्या राज्यातील भाजप सरकार चालते.तो अजेंडा म्हणजे, द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर यांनी मांडलेली द्विराष्ट्राची संकल्पना आहे.त्यात आड येणाऱ्यांना निर्दयीपणे चिरडून टाकले.त्याच्या घरादारावर बुलडोझर फिरविणे.तेच तर ॲडॉल्फ हिटलर या हुकूमशहाने आपल्या जर्मनीत जू जमातीला निर्दयीपणे चिरडून त्यांचा वंशसंहार केला होता.तसेच काही भारतात हिंदूराष्ट्रासाठी घडवून आणण्यासाठी ‘ अग्नीवीर ‘ योजना तर नाही ?
आम्ही आणखी या निमित्ताने संघाच्या संस्थापकातील एक महत्वाचे व्यक्ती आणि डॉ केशव हेडगेवार यांचे गुरू डॉ बाळकृष्ण मुंजे यांचे लष्करी शिक्षणाचे प्रेम नमूद करावे लागेल.ते आपल्या सनातन ब्राह्मण धर्माच्या रक्षणासाठी हिंदू युवकांना लष्करी प्रशिक्षण देवून तयार केले पाहिजे.या प्रबळ विचारांचे होते.त्यातूनच स्वयंसेवक आधारित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आधारशिला ठेवल्या गेली.इंग्लंड मधील गोलमेज संमेलनात सहभाग घेतल्यानंतर डॉ मुंजे यांनी १९३१च्या फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान युरोप भ्रमण केले.१५ मार्च ते २४ मार्च पर्यंत इटलीत थांबले.तेथे त्यांनी हुकूमशहा मुसोलिनीची भेट घेतली.असे म्हणतात,ते यानंतर जर्मनीत हिटलरला सुध्दा भेटले.परतल्या नंतर त्यांनी १९३४ साली
सेंट्रल हिंदू मिलिट्री एजुकेशन सोसाइटीची स्थापना केली.ज्यातून साताऱ्यात भोसला मिलिटरी स्कूल साकारले.
हे सर्व काही मांडण्या मागे आम्हाला येवढेच इंगीत करायचे आहे,अग्नीवीर योजने द्वारे जे जर्मनीच्या हिटलरला आणि भारतातील डॉ बालकृष्ण मुंजेला अभिप्रेत होते,संघाची हिंदू राष्ट्राची जी गोळवलकरांची संकल्पना आहे,त्यासाठी त्याचा हट्टाहास तर नाही ? तसे असेल तर ते भारताच्या उद्यासाठी विनाशाचे बीज सिध्द होणार आहे.तेव्हा सुज्ञ भारतीयांनी मोदी व सरकारचे चाल,चलन व चरित्र लक्षात घेऊन त्यांच्या सत्ताकारणा पासून सजग राहिले पाहिजे.अग्नवीर योजनेला प्रखरपणे विरोध केला पाहिजे.कारण तो केवळ चार लाख नोकऱ्यांचा प्रश्न नाही.
मिलिंद फुलझेले
१७/६/२०२२