शिक्षण

आजच्या शिक्षण व्यवस्थेचे वास्तव व पाळेमुळे..!

आजच्या शिक्षण व्यवस्थेचे वास्तव व पाळेमुळे..!

दहावी-बारावीच्या परीक्षेत आजकालच्या विद्यार्थ्यांना मिळणारे गुण हे आजच्या शिक्षण व्यवस्थेचे वास्तव आहे. त्याच्या खोलात बुडी मारून तिचा तळ ढवळून काढल्याशिवाय आपल्यापुढे दुसरा पर्याय नाही. परीक्षा आम्हाला काय प्रदान करते? ज्ञान नाही तर माहिती तपासते व वरच्या वर्गात जाण्याची संधी देत असते. सध्या निकाल ९० टक्क्यांच्या वर लागला आहेत. ही सूज आहे की बाळसं हे लवकरच कळेल.

मूल्यमापनाचा शिक्का वर्षानुवर्षे तोच आहे. मूल्यमापन करणारी यंत्रणा काळानुसार सक्षम नाही. अभ्यासक्रम सातत्याने बदलत असतो, पाठ्यपुस्तके बदलतात, बदलत नाही ते केवळ मूल्यमापन. परीक्षा ऑनलाइन घ्या किंवा ऑफलाइन घ्या, विद्यार्थ्यांनी त्यात अनेक पळवाटा शोधून काढल्या आहेत. कॉपी करण्याची भ्रष्ट परंपरा वृद्धिंगत होत आहे. कॉपीची वाळवी हळूहळू सर्व जीवन पोखरेल याचीच भीती वाटत आहे. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये परीक्षा योग्य पद्धतीने घेतल्या जातात म्हणून मूल्यमापन शब्द अजूनही अस्तित्वात आहे. सगळेच काही भ्रष्ट परीक्षेतून श्रेष्ठ झाले नाहीत. अभ्यासाने, परीक्षेने अनेक जण मोठे यश प्राप्त करू शकले व यशस्वी जीवन जगले. कॉपी न केलेले अनेक जण आपल्या ज्ञानाच्या आधारे जीवनातले अनेक प्रश्न सहजपणे सोडवतात. कॉपी, भ्रष्टाचार केलेल्यांचा शेवट आज तुरुंगामध्ये झालेला आपण पाहत आहे. परीक्षेला बायपास करून एक मोठा कळप कॉपी करून मूळ कळपात सामील होत आहे, याचे दुःख नक्कीच आहे.

अध्ययन-अध्यापन यापेक्षाही गंभीर प्रश्न परीक्षा व मूल्यमापन यासंदर्भात निर्माण होत आहेत. निरीक्षणाने व अनुवंशिकतेने विद्यार्थी जे शिकतात त्याची नोंद कोठे होते का? लहानपणापासून सायकल, बाईक दुरुस्त करणा-या मुलांची शिक्षणापासून वाताहत होते? पैशाशिवाय शिकताच येत नाही अशी आजची परिस्थिती आहे. शिक्षणाच्या हक्कापासून किती तरी जण तांत्रिक कारणामुळे वंचित आहेत, त्याचे उत्तरदायित्व कुणाचे? मूल्यमापनाची विश्वासार्हता कमी होत चालली आहे. मूल्यमापनाचाच नवीन आराखडा तयार करावा लागणार आहे.

फेरमूल्यांकनाची मागणी वाढतच आहे. शिकविणारे व शिकणारे यामध्ये समायोजन नाही, तर फक्त आयोजनच आहे. कागदावरच्या अध्यापनाची परीक्षा कागदावरच होत आहे. माणसाचे यश कागद ठरवत आहे, पण कौशल्ये कागदावर तग धरत नाहीत. लिहून दिलेल्या नोट्स नीट परीक्षेत लिहिल्या जात आहेत. फार थोडे शिकतात, बरेच पाहून लिहिण्याचे अनुकरण करतात. एखादी कृती केल्यानंतर त्या कृती आपण तपासतो. कोणत्याही शैक्षणिक किंवा इतर उपक्रमाचे मूल्यमापन केले जाते. मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचे संख्यात्मक प्रमाण ठरविणे होय. व्यक्तीच्या संदर्भात मूल्यनिर्धारण व प्रकल्प कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम याच्या संदर्भात मूल्यमापन या संज्ञा वापरल्या जातात. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्याचा समावेश होणे अत्यंत आवश्यक आहे.

शिक्षणात एखादा घटक शिकविला जातो या प्रश्नाचे उत्तर म्हणजे शिक्षणाचे ध्येय… त्यातून काय साध्य होईल? याचे उत्तर म्हणजे उद्दिष्ट… सर्वच साध्य होईल असे नाही. शिक्षण हे मानवाने संपादन केलेले एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणता येतात. हे बदल अपेक्षित दिशेने आणि किती झाले आहेत? ते मूल्य निर्धारणामुळे कळते. मूल्यमापन किंवा मूल्यनिर्धारण हे साधन आहे साध्य नव्हे… मूल्यनिर्धारण हे केवळ संपादनाशी संबंधित नाही, तर सुधारणेशीही निगडित आहे. मूल्यनिर्धारणात निर्णयाची गुणात्मक चिकित्साही असते. मापनात केवळ मोजमाप येते. मूल्यनिर्धारणात प्रक्रियेचे परिणाम तपासले जातात व पुरावा जमा करून त्याचा अर्थ लावणे म्हणजे मूल्यनिर्धारण.

परीक्षांच्या बाबतीत विचार करता सतत होणा-या परीक्षा, त्यांची संख्या व त्यांचा निकाल लावणे ही व्यवस्थापनाच्या दृष्टीने समस्या बनत चालली आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात शिक्षण, अध्यापन, संवाद, कौशल्य प्रक्रिया याला एक प्रकारचा सेटबॅक मिळाला आहे. शारीरिक हालचालीही सीमित झाल्या, तर अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत. त्याला मूळ पदावर आणून पुन्हा विसरलेली कौशल्ये विद्यार्थ्यांना आत्मसात करून एका नवीन मूल्यमापनाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी परीक्षा घेऊन त्यांचे निर्णय लावणे गरजेचे आहे.

पूर्वीपेक्षा अधिक परीक्षा घेण्याची प्रथा वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे परीक्षा समस्या बनली आहे. सत्र परीक्षा काही विद्यापीठात यशस्वी झाली नाही किंवा वारंवार परीक्षेमुळे काही ठिकाणी ती योग्यप्रकारे हाताळता आली नाही. आपली पारंपारिक परीक्षा पद्धती ही विषयाच्या माहितीवरच अधिक भर देते. विद्यार्थ्यांमध्ये योग्य प्रकारची अधिक रुची आणि आपल्या कल्पना इतरांपर्यंत पोहोचवण्याचे संप्रेषण कौशल्य निर्माण होणे आवश्यक आहे. अध्यापन काही ठिकाणी झाले नसतानाही विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. नेट व नेटाने प्रयत्न नसल्यामुळे अनेकांना कौशल्यांचे अपंगत्व आलेले आहे. कोरोनामुळे अनेकांची जीवन प्रक्रिया खुंटली, जीवनशैली बदलली, अनेकांचे ज्ञान घेण्याची प्रक्रिया खुंटली. अलीकडे प्रश्नपत्रिका वा तिच्यातील प्रश्न सदोष असतात, पाठ्यपुस्तके ही सदोष असतात. प्रश्नासाठी निवडलेल्या पाठ्यक्रमातील आशय अपुरा असतो, मर्यादित असतो याचाच अभ्यास करून विद्यार्थी उत्तीर्ण होतो. मूल्यमापन लेखी परीक्षेपुरतेच मर्यादित असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यमापन आजच्या आपल्या परीक्षा पद्धतीत होत नाही. परिणामी, परीक्षा विश्वसनीय राहिलेल्या नाहीत. विद्यार्थ्याच्या उणिवांची चिकित्सा करून त्या दूर करण्याचे प्रयत्न वाढीला लावणे, ही गोष्ट परीक्षा पद्धतीतून होऊ शकत नाही.

शाळेत सुप्त गुण ओळखून त्यांना विकसित करणारी यंत्रणाच नाही. शाळेला फाटा देऊन अशा अनेकांनी आपले सुप्त गुण विकसित केले आहेत. शाळेत आम्हाला सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर किंवा पीएसआय पल्लवी जाधव ओळखताच येत नाहीत. हा शिक्षण प्रक्रियेचा पराभवच नाही का? अनेकांचे सुप्त गुण आयुष्याच्या उत्तरार्धात विकसित होत आहेत. अजून एटीकेटीची मलमपट्टी वापरली जात आहेच. परीक्षा डोळ्यापुढे ठेवून शिकविले जाते व परीक्षेचा पेपरही त्या दृष्टीने काढला जातो. परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी कसे उत्तीर्ण होतील व त्यांना ग्रेस मार्क देऊन उत्तीर्ण करणं हेच अंतिम उद्दिष्ट राहिल्यामुळे परीक्षेचा निकाल लागत आहे. कॉपी करून उत्तर लिहिलेले आहे हे तपासनिकाला माहीत असूनही कोणताच पुरावा नसल्यामुळे तपासनिक त्याला भरमसाट गुण देऊन मोकळे होतात. परीक्षेच्या काळात कॉपी पुरवणारी एक जमात सज्ज असते. शाळेच्या कंपाऊंड वॉल, खिडकीवर चढून ही टोळी युद्धपातळीवर काम करते. भरारी पथक येते व पोत्यांनी कॉपी गोळा करते, पण तरीही कॉपी विद्यार्थ्यांकडे असतेच. शैक्षणिक संस्थांच्या मुतारीमध्ये एक पर्यवेक्षक नेमण्या इतपत विद्यार्थ्यांची कॉपी करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अध्यापनच झाले नाही तर जिथे पेपरफुटीने अनेक जण स्वतः शर्यतीत पुढे जातात, तिथे सामान्य विद्यार्थी हिरमुसला होऊन तोही त्या कळपात सामील होतो.

सन १९७३ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी कृती योजना प्रसिद्ध केली होती. त्यात विद्यार्थ्याला अभ्यासाच्या योग्य सवयी घडविण्यास उत्तेजना मिळण्यासाठी अंतर्गत मूल्यनिर्धारण होते. या पद्धतीमुळे अन्य कौशल्ये व उद्दिष्टे यांची तपासणी करता येते. सांख्यिकी विश्लेषणातून असे आढळून आले की तपासनिक उत्तरपत्रिका तपासतो, तेव्हा गुणदान करताना पाच टक्क्यांपेक्षा अधिक गुण देण्याची शक्यता ५० टक्के एवढी असते. विद्यार्थ्याला त्याची परीक्षा कशी घेतली जाणार आहे? हे कळले पाहिजे. त्यासाठी प्रश्नपेढी आवश्यक आहे. प्रश्न रचनेची समस्या व्यवस्थित विकसित केलेल्या प्रश्न पेढीमुळे सुटू शकेल. चांगली शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या ज्ञानात्मक, भावनात्मक व क्रियात्मक बाजूवर सारखेच भर देत असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक मूल्यमापनाची संकल्पना स्वीकारणे गरजेचे आहे.

अभ्यासाबरोबरच जीवनाच्या अनेक क्षेत्रात सहभागी होण्यासाठीची काळजी सहशालेय कार्यक्रमातून घ्यायला हवी. विशिष्ट ज्ञान क्षेत्रे व त्यातील ज्ञानाचा काही अंश केवळ पाठ्यपुस्तक वा पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षणात विचारात घेतला जातो. जे जे परीक्षेला येणार त्याचाच अभ्यास करण्याची वृत्ती सध्या दिसत आहे. प्रश्नपत्रिका, प्रश्न चुकीचे असतील तर ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील कशा? ५० टक्के प्रश्न उपयोजनावर हवेत, तसे प्रयत्न काही विद्यापीठाने सुरूही केले आहेत. केवळ अभ्यासक्रम सर्वसमावेशक असून चालणार नाही. परीक्षेतील प्रश्न ही सर्वसमावेशक असावेत. मागच्या प्रश्नांची पुनरावृत्ती किती दिवस करणार? परीक्षेतील त्रुटी या शिक्षण पद्धतीच्या त्रुटी आहेत. परीक्षा म्हणजे केवळ घोका व ओका यापुढे जाऊन पाहा व लिहा या अवस्थेत आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा यंत्रणेला गुंडाळून ठेवले आहे. कॉपी नियंत्रणासाठी काही ठोस निर्णय दरवर्षी जाहीर होतात पण ते पुरेसे नाहीत. कॉपी करताच नाही आली किंवा कॉपी करता येत नाही, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हाच विद्यार्थी अभ्यासाकडे वळतील.

यासाठी उद्भोधनाची अत्यंत आवश्यरता आहे. विद्यार्थी व पालकांचे मेळावे, उद्भोधन अजून व्हायला हवे. विद्यार्थी निवड, शिक्षक निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम व अंमलबजावणी याचा संबंध कॉपी प्रकरणात कुठे तरी आहे याचा शोध घ्यायला हवा. कृतीपत्रिकेचा वापर, स्वमत, अभिव्यक्ती, उपयोजनावर भर देणारे प्रश्न असावेत. पेपर काढणारे व तपासणारे यांच्या क्षमतेचा व निकषाचा विचार व्हायला हवा. विश्वास नसलेली व्यवस्था चालू ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे. ही अवस्था बदलणार कशी? परीक्षेचे आयोजन, नियोजन याबद्दल शंका नाही, त्या सुरळीत पार पाडल्या जातात. शंका आहे ती फक्त उपयोजनाबद्दल. मिळालेल्या ज्ञानाच्या उपयोजनावर प्रश्न कमी असतात. प्राध्यापकांचे प्रश्न तयार करण्यासंबंधीचे प्रशिक्षण, प्रश्नात संदिग्धता नसणे, वैचारिकपणा नसणे, विचारप्रवृत्त करणारे प्रश्न नसणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. या सा-यांचाच विचार करणे आवश्यक ठरणार आहे.

परीक्षेत विचारल्या जाणा-या ज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी परीक्षा आव्हान न वाटण्याइतपत हास्यास्पद करीत आहेत. पेपर फुटीतून पास झालेले व बोगस नेमणूक झालेले शिक्षक कॉपी कशी रोखणार? हाही गंभीर प्रश्न आहेच. परीक्षकांना ‘मॅनेज’ करणे आता कमी झाले असले तरीही व्हिडीओ शूटिंग, शाळेची मान्यता रद्द करणे याही गोष्टी राबविल्या जात आहेत. तरीही कॉपीची समस्या राहणारच असली, तर कुठेतरी शिक्षणातली सगळीच मूल्ये हरवली आहेत याचा गांभीर्याने विचार करायला हवा. सगळंच आहे, पण मूल्यशिक्षण नाही ही आजच्या समाजाची शोकांतिका आहे. सर्वांनाच द्रोणाचार्य मिळतील असे नाही. म्हणून काही लढे आपापल्या परीनेच लढावे लागतात. त्यापैकीच शिक्षण हे एक आहे.

शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button