एसएससीचा टप्पा पार…
एसएससीचा टप्पा पार
दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील शिक्षणासाठी सदिच्छा!
यंदाही टक्केवारीचा ‘आकडा’ हा खूप मोठ्या प्रमाणात फुगल्याचे दिसून आले. वास्तविक जीवनात खरच त्या विद्यार्थ्यांना तेवढ्या टक्क्यांचे ज्ञान (नॉलेज) आहे का? हा खरा कळीचा मुद्दा दरवर्षीप्रमाणे आ वासून समोर उभा राहतो! असो. पुढे चालून तुम्ही भारताचे सक्षम नागरिक व्हा म्हणजे मिळवलं!
ऑनलाइनमध्ये कोणाला शिकता आलं आणि कोणाला नाही, हे शाळेमधल्या शिक्षकांना आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच माहित. ऑनलाईन शिक्षणप्रणाली म्हणजे गरिबी आणि श्रीमंती अशी दरी निर्माण करणारीच ठरली. ज्यांच्याकडे मोबाईल आहे तो ऑनलाइन शिक्षण घेत होता आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही अशानी तटस्थ किंवा वेळकाढू धोरण स्वीकारले होते. अशा परिस्थितीत ही निकालाची टक्केवारी मात्र काही घसरली नाही, हे एक फार मोठं ….. आहे. सध्याची शिक्षणप्रणाली फक्त टक्केवारीवर आधारित आहे असं मला वाटते. एखाद्याला जास्त टक्के पडले म्हणजे त्याला जास्त माहिती आहे किंवा जास्त प्रमाणात तुम्ही अभ्यास केलाय असाच अर्थ होतो. पण प्रत्यक्षात तसे असते का याचा प्रत्येकांनी विचार करावा.
यंदाची दहावी आणि बारावीची परीक्षा ही त्या-त्या शाळेमध्ये वा कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आली. याचा काही प्रमाणात विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर सकारात्मक परिणाम झाला असावा, असा माझा अंदाज आहे आणि तो खराही असू शकतो…
मी मांडत असलेली मते ही खरंतर हुशार विद्यार्थ्यांना थोडसं बाजूला ठेवणारी आहेत आणि संशयरित्या त्यांच्याकडे पाहणाऱ्यांची संख्या वाढवणारी आहेत? तुम्हाला काय वाटते? खरच का हो, आपल्याकडे भरमसाठ टक्केवारी घेणारा विद्यार्थी म्हणजे हुशार अशीच धारणा आहे आणि कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा … आहे. पूर्वी कमी गुण मिळाले तरी म्हणायचे की, काही हरकत नाही कमी गुण मिळाले तरी म्हणत पुढील शिक्षणासाठी सदिच्छा द्यायचे. आजच्या विद्यार्थ्यांना एवढी टक्केवारी मिळून सुद्धा त्यांच्याकडे तेवढं नॉलेज किंवा माहिती कितपत आहे, त्यांचा अभ्यास कितपत आहे याचं मूल्यमापन होणे फार गरजेचे आहे… कदाचित मी म्हणत असलेला नवाभारत म्हणजे असा असावा की त्याच्याकडे पदवी आहे पण नॉलेज नाही, अशीच स्थिती भविष्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सर्वकाही अर्धशिक्षित लोकांचा एक गटसमूह भविष्यामध्ये वर येईल आणि त्यांच्याकडे नॉलेज नसेल पदवी/ डिग्री असतील. विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये राहणार नाही अशी स्थिती असेल…
ऑनलाइन शिक्षणप्रणालीमध्ये सर्वसामान्य कुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील पदव्या मिळाल्या, त्याला एकमेव कारण म्हणजे ऑनलाईन शिक्षणप्रणाली. या काळात सरळसरळ मोबाईलमध्येच उत्तरे शोधून/पाहून उत्तर दिल्या गेले. हे कटू सत्य आहे, ते नाकारता येणार नाही.
आजचा दहावीचा निकाल लागला तो ऑफलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेचा आहे. आज मी पाहतोय की, विद्यार्थ्यांना १०० टक्के, ९० टक्के, ८० टक्के गुण मिळाले…
शालेय शिक्षण विभागाचा किंवा विद्यार्थ्यांचा आणि शिक्षण प्रणालीचा विकास सरु नये यासाठीची ही धडपड असावी, असं मला वाटतं. कारण दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना थेट तिसऱ्या वर्षी ८० ९० टक्के १०० टक्के गुण पडतात ही कुठेतरी काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
विचार मांडतोय तो फक्त आणि फक्त सद्यस्थिती, वास्तववादी आणि आजची शिक्षणप्रणाली यांना धरूनच.
आज आनंदी आनंद आहे. आमच्याकडे पदव्या आहेत, आम्ही त्याच्यात खुश आहोत, आम्हाला शासकीय नोकरी, कामधंदा, व्यवसाय मिळावा यासाठी काही करायचे नाही, अशीच अवस्था सगळीकडे आहे. सावळा गोंधळ नुसता…
हेच ते विद्यार्थी आहेत की, ज्यांनी देशांमध्ये दहावी-बारावीची परीक्षा याहीवर्षी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी यासाठी आंदोलन केलं होतं. आज त्याच आंदोलनातील विद्यार्थ्यांना ९० टक्के, ८० टक्के गुण घेतल्याचे दिसून येत आहेत. ऑनलाइन प्रणालीची मागणी होती की राजकारण हा संशोधनाचा विषय आहे.
तूर्तास इतकेच!
एवढीच एक अपेक्षा आहे की, टक्केवारी मिळाली ते तर पाहिजेच पण याचसोबत माणुसकी अन् आजच्या जगाची मागणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे शिक्षण घ्या आणि मोठे व्हा. पुन्हा एकदा दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन!!!
-प्रा. प्रीतम तुकाराम लोणेकर,
(संशोधक विद्यार्थी)
माध्यमशास्त्र संकुल,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
मो. 9860720646