
सध्या पावसाची रिपरिप सुरू झाली.मृग नक्षत्र लागले. त्यामुळे आता कोणत्याही क्षणात मान्सूनचे आगमन होऊ शकते.अशावेळी नांदेड शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाला एप्रिल-मे महिन्यात घेतलेल्या झोपेतून जाग आली आणि पाऊस तोंडावर येऊन ठेपला असताना शहरातील रस्ते दुरुस्तीची बुद्धी सुचली आहे.ही बुद्धी शहराच्या दृष्टीने महत्वाची असली तरी उशिरा सुचलेले हे शहाणपण कोणत्याच फायद्याचे नाही.कारण खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता तेच म्हणतात की,”सीसीचे रस्त्याचे काम करत असताना किमान १२ तास तर त्यावर पाणी पडता कामा नये .अन्यथा तो रस्ता म्हणजे पुढे पाठ मागे सपाट हा प्रकार होऊ शकतो.”
नेमक्या याच प्रकाराला निमंत्रण देत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जणू पाऊस त्यांच्या हातचाच आहे.अशा प्रकारे ऐन पावसाळ्यात ही कामे सुरू केली आहेत.त्यामुळे प्रशासनाचा हा बालिशपणा आणि कामाचे शून्य नियोजन ही बाब प्रकर्षाने जाणवते. खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब असताना त्यांच्याच नांदेड शहरात रस्ते कामाचे हे ढिसाळ नियोजन असेल तर राज्याच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा.एप्रिल-मे महिन्यात कुठल्याही हालचाली न करता आता रस्ते करणे, रस्त्याची डागडुगी करणे ही कामे चालू आहेत.त्यातच वाहतूक नियंत्रनाचे कुठलेली नियोजन न आखता आणि कुठल्याही प्रकारचे बॅरिकेट्स न लावता सुरू असलेली ही कामे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळणे होय.वाहतूक कोंडी वाढत आहे. वृद्ध,विद्यार्थी,महिला यांच्या बरोबरच इतर नांदेड शहरातील नागरिकांना या बालिश प्रशासनाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आज केलेले रस्त्याचे काम जर रात्री पाऊस पडला तर रस्ता परिस्थिती जशास तशी होऊ शकते.त्यामुळे ‘सौ के साठ आणि व्यापार थाट”असाच हा प्रकार म्हणावा लागेल. केवळ कंत्राटदाराचे हात पिवळे करून नांदेड शहराच्या विकासाच्या नावावर बिले लाटून रस्ता निर्मिती हे सूत्र म्हणजे पुढे पाठ माघे सपाट असे असून नागरिकांना अशी उलट्या सेवा देणारी यंत्रणा म्हणजे “Operation Successful but The Patient Died”
(“ऑपरेशन यशस्वी पण पेशंट दगावला”)
अशी परिस्थिती होय.त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे .
-इंजि.प्रशांत इंगोले
(वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्हा)