शालेय पोषण आहाराची वास्तविकता
शालेय पोषण आहाराची वास्तविकता..
आपण आदिवासी भागात भटकंटी करीत असतांना नेमकं जाणवतं की त्या भागातील बरीच बालकं कुपोषित आहेत. त्यांच्या शरीराचा पुर्ण भाग हा हाडाला चिकटलेला असून फक्त चेहरा आणि पोट वाढलेलं आहे. यालाच कुपोषित अवस्था असे म्हणतात व त्या अवस्थेला कुपोषण.
आज देश विकासाच्या क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकावर असला तरी देशात असा कुपोषणाचा प्रकार ब-याच ठिकाणी आहे. आजही आसाम, बिहार, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, मध्यप्रदेश एवढेच नाही तर ज्या भागाला आपण सुधारलेला मानतो. त्या महाराष्ट्रातही आपल्याला कुपोषितपणा दिसतो. यासाठीच सरकारनं त्या त्या भागातच नाही तर संपूर्ण देशातच मध्यान्ह भोजन योजना सुरु केली.
आहार………आपल्या जीवनातील महत्वपूर्ण घटक. चांगला संतुलित आहार जर असेल तर बालकाची वाढ चांगली होते. नसेल तर होत नाही. संतूलित आहार म्हणजे सर्वगुणसंपन्न आहार असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आता सर्वगुणसंपन्न आहार म्हणजे काय?
सर्वगुणसंपन्न आहार म्हणजे ज्या आहारात सर्व जीवनसत्व, सर्व प्रकारचे क्षार, सर्व प्रकारचे प्रोटीन्स, तसेच स्निग्ध पदार्थ, तसेच सर्व प्रकारचे शरीराला लागणारे आवश्यक घटक असतात. ते अन्न. असे अन्न खाल्ल्याने शरीराला समप्रमाणात उर्जा मिळते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ती टिकूनही राहते. त्यातच थकवा जाणवत नाही. मग तो थकवा शारीरीक मानसिक वा कोणताही का असेना. संतुलित आहारानं शरीराची तसेच मनाचीही वाढ होत असते.
असा संतुलित आहार ज्याला मिळत नाही, असे व्यक्ती सतत चिडचिड करीत असून त्यांच्या स्वभावात सतत चिडचिडपणा येतो. तसेच त्याचा स्वभावही रागीट बनतो. म्हणून शासनानं बालकाच्या पुर्व प्राथमिक स्तरापासूनच शालेय पोषण आहार सुरु केला. परंतू या आहारातून खरंच विद्यार्थ्यांना सकस आहार मिळतो का? याचं उत्तर नाही असंच आहे. कारण शालेय स्तरावर जो तांदूळ येतो. तो तांदूळ लोकं खात नाही असाच येतो. तो ठोकळ स्वरुपाचा असतो. ज्याला राशनमध्ये मिळविल्यानंतर लोकं गरीब जनतेला विकून टाकतात.
शालेय पोषण आहार निमित्यानं शाळेत खारका बदामा येतात. डाळ येते. परंतू हा सकस आहार मधातीलच लोक फस्त करतात. तो विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचतच नाही. अशावेळी त्या पोषण आहाराचा फायदा काय?
शासनाचा संतुलित आहाराच्या नावानं येणारा असा शालेय पोषण आहाराचा ठोकळ तांदूळ……..त्यातच तो दर्जेदार नसला तरी दर्जेदार आहे म्हणणारं शासन. ख-या अर्थानं जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत नाही असं म्हणताच येत नाही. हा संतुलित आहार नाही, तर तो असंतुलित आहार आहे. कारण चांगल्या घरची मुलं त्याला आवडीनं खात नाहीत.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की शासनानं एकतर आहार संतुलित द्यावा. (बारीक तांदूळ) असा ठोकळ तांदूळ शालेय पोषण आहाराच्या नावानं देवून ठकबाजी करु नये किंवा असा तांदूळ द्यावा. चालेल. परंतू त्याला संतुलित आहार म्हणू नये वा संतुलित आहाराचा दर्जा देवू नये म्हणजे झालं.
आज लोकं सुशिक्षीत झालेले आहेत. ते आता अज्ञानी राहिलेले नाहीत. त्यांना चांगलं वाईट सारंच कळतं. तेव्हा सरकारचं अशा प्रकारचं वागणंही लोकांच्या लक्षात येतं. तरीही ते सरकारला दोष देत नाहीत. कारण हा आहार निःशुल्क असतो. त्याला पैसे मोजावे लागत नाही. परंतू एक मात्र निश्चीत की या आहारानं जी शरीरात समस्या निर्माण होते ना. ती समस्या पुढे चालून शरीरात विकृती निर्माण करते. ज्या विकृतीतून शारिरीक व मानसिक विकास खुंटतो हे तेवढंच खरं आहे. कारण त्या तांदळात असा कोणताच गुणधर्म नसतो की ज्याने विद्यार्थ्यांचा कुपोषितपणा दूर होईल.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०