असा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दु:खमय जीवनप्रवास;सर्वच स्त्रियांनी घ्यावी प्रेरणा
असा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दु:खमय जीवनप्रवास;सर्वच स्त्रियांनी प्रेरणा घ्यावी
ओडिसा या एका आदिवासीबहुल राज्याच्या नागरिक असलेल्या द्रौपदी मुर्म आता देशाच्या १५ व्या नामनियुक्त राष्ट्रपती बनल्या आहेत. त्यांचा संपूर्ण राजकीय आणि वैयक्तिक जीवनप्रवास म्हणजे अविरत संघर्षाची कहाणी होय. आपली निवड या सर्वोच्च पदासाठी होईल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. त्यामुळेच जेव्हा एनडीएने त्यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून निवडले, तेव्हा क्षणभर त्यांचा यावर विश्वासच बसला नव्हता.
ही कहाणी आहे एका शिक्षिकेची, झुंजार आदिवासी महिलेची, निस्वार्थी समाजसेविकेची, अध्यात्मिक प्रवासाची, जिद्दी समर्पित जीवनाची. काल-परवा पर्यंत फारसे कोणाला माहीत नसलेले द्रौपदी मुर्मू यांचे नाव आज खूपच चर्चेत आहे. राष्ट्रपतीपदाची त्यांची उमेदवारी घोषित होईपर्यंत तसे त्यांचे नाव अज्ञात होते. एका आदिवासी, गरीब, सामान्य कुटुंबातील महिलेला राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च पदाची उमेदवारी मिळते, हीच मुळी आपल्या शक्तीशाली लोकशाहीची थक्क करणारी सुंदर साक्ष आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. विशेषतः सर्वच स्त्रियांना द्रौपदी मुर्म यांचा जीवनसंघर्ष भावूक करणारा व प्रेरणादायीही आहे. घराणेशाही, अमर्याद संपत्ती आणि खानदानाचा दर्प नसलेल्या सामान्य माणसाला अभिमान वाटावा अशीच कहाणी ही द्रौपदी मुर्मू यांची आहे.
ओरीसा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावातील एका अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म २० जून १९५८ रोजी झाला. त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही गावचे सरपंच होते. त्यामुळे त्यांना राजकिय बाळकडू घरातूनच मिळाले. भुवनेश्वर येथील रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. नंतर १९७९ ते १९८३ या काळात त्यांनी वीज आणि सिंचन खात्यात कारकून म्हणून नोकरी केली. त्यानंतर मुलीच्या आग्रहाखातर त्यांनी अध्यापक म्हणून सेवा बजावली. मग यथावकाश त्यांनी राजकारणात प्रवेश केला. घराणेशाही नाही, संपत्ती नाही, वारसा नाही, पण सारेच कसे थक्क कणारे आहे. आजही त्या मयुरभंज येथे एका साध्या दुमजली घरात राहतात.
नगरसेविका, आमदार, राज्य सरकारमधील मंत्री व राज्यपाल अशा राजकीय पदावर त्यांनी काम केले आहे. त्या १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पाठोपाठ २०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या. याखेरीज त्यांनी भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदही भूषवले आहे.
द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यानंतर सामाजिक प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी बालपणापासून सोसलेले गरिबीचे चटके. २०१६ मध्ये रांचीतील कश्यप मेडिकल कॉलेजद्वारा आयोजित केलेल्या ‘रन ऑफ व्हिजन’ कार्यक्रमात त्यांनी नेत्रदानाची घोषणा केली होती. वास्तविक त्यांना लहानपणापासून गरिबीचा सामना करावा लागला, तरी त्यांनी याचा कधीच उल्लेख केला नाही. दलित, आदीवासी, लहान मुले यांच्या उत्थापनासाठी झटणा-या द्रौपदी मुर्मू यांची वैयक्तिक जीवनात अनेक संकटामुळे अक्षरशः होरपळ झाली. कुणीही कोलमडले असते, तशा त्याही कोलमडल्या. पण पुन्हा ऊभ्या राहिल्या आणि ताठ ऊभ्या राहिल्या.
द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनात २०१० ते २०११ हा कालखंड म्हणजे साक्षात कालपर्व ठरला. या कालावधीत त्यांच्या लक्ष्मण नावाच्या थोरल्या मुलाचा गूढरीत्या मृत्यू झाला. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे त्या डिप्रेशन मध्ये गेल्या. जीवनातील सारेच स्वारस्य निघून गेल्यामुळे त्या पूर्णत: खचुन गेल्या. याचवेळी त्या प्रजापिता ब्रम्हकुमारी या अध्यात्मिक संस्थानात गेल्या. त्या अध्यात्माला शरण गेल्या. त्यानंतर कशाबशा पुन्हा उभ्या राहिल्यात. तोच धाकटा मुलगा बिरंची २०१३ साली रस्ता अपघातात ठार झाला. त्याच महिन्यात आई गेली, कर्तबगार भाऊही गेला. चार वर्षात जवळची सगळी माणसे हरवली.पाठोपाठ १ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांचे पती शामचरण यांनाही देवाज्ञा झाली. त्यापूर्वी म्हणजे १९८४ साली त्यांची तीन वर्षाची गोजिरवाणी कन्या अचानकपणे मरण पावली होती. एकापाठोपाठ बसलेल्या या धक्क्यांमुळे द्रौपदी मुर्मू निराशेच्या गर्तेत ढकलल्या गेल्या. नियतीने त्यांच्यावर घोर अन्याय केला. परंतु अध्यात्म त्यांच्या सोबत होते. त्यामुळे हळूहळू त्या यातून सावरल्या आणि दलित, आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. स्वतःचे दुःख जगाच्या दुखात मिसळून टाकले आणि पुन्हा ताठपणे ऊभ्या राहून नव्या जोमाने काम करू लागल्या.
२०१५ साली झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पाच वर्षे काम केले. लवकरच विनम्र स्वभावाच्या कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला. १९२१ पर्यंत त्या राज्यपाल होत्या. २० जून रोजी त्यांचा वाढदिवस होता आणि २१ जूनला भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यांना आणि देशालाही हा आनंदाचा धक्का होता. त्या नेहमी प्रमाणे शिवमंदीरात गेल्या. स्वतः झाडू घेऊन मंदीर स्वच्छ केले. मंदीरातील कर्मचा-यांबरोबर सुखसंवाद केला. मयुरभंजमध्ये जल्लोष झाला.
द्रौपदी मुर्मू भारताच्या पहिल्या आदिवासी आणि दुस-या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. यापूर्वी प्रतिभा देवीसिंह पाटील या एकमेव महिला राष्ट्रपती राहिलेल्या आहेत. यापूर्वी कधीही राष्ट्रपतीपदी अनुसूचित जमातीची स्त्री किंवा पुरुष कार्यरत झालेले नाही. अर्थात, अनुसूचित जातीचे दोन राष्ट्रपती झाले असून, ते के. आर. नारायणन आणि विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत.
द्रौपदी मुर्मू यांनी शामचरण मुर्मू यांच्याशी लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी झाली. दोन्ही मुलांचे व त्यांच्या पतीचे देखील निधन झाले आहे. आता त्यांच्या कुटुंबात मुलगी इतिश्री, नातू आणि जावई आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यावेळी द्रौपदी यांच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे बैदापोसी गावात शामचरण यांना तब्बल तीन दिवस डेरा टाकावा लागला होता. द्रौपदी या संथाल समाजाच्या आहेत. शामही त्याच समाजाचे होते. या समाजात मुलीच्या कुटुंबाला मुलाला हुंडा द्यावा लागतो. दोन्ही घरची मंडळी एकत्र बसून हुंडा किती व काय द्यावा हे ठरवतात. त्यावेळी चर्चेत असे ठरले की, हुंड्यात एक गाय, बैल आणि १६ जोडी कपडे वर पक्षाने वधू पक्षाला द्यायचे. त्याला शामचरण यांनी लगेच होकार दिला आणि नंतर म्हणजे १९८० मध्ये दोघांचा विवाह झाला.
द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी २५ जुलै रोजी होईल. ज्या दिवशी त्या शपथ घेतील, त्या दिवशी त्यांचे वय ६४ वर्षे ३५ दिवस असेल. त्यामुळे त्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती बनतील. आतापर्यंत सर्वात कमी वयाचे राष्ट्रपती होण्याचा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर आहे. ते राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांचे वय ६४ वर्षे २ महिने आणि ६ दिवस होते. द्रौपदी मुर्मू या एका लहानशा घरातून ३५० एकर परिसर, १९० एकर बगीचा व ७५० कर्मचारी असलेल्या प्रशस्त राष्ट्रपतीभवनात लवकरच जातील. एक सामान्य शिक्षिका भारताची राष्ट्रपती होईल. हे भारतीय लोकशाहीचे केवढे नितांत सुंदर व विलोभनीय रुप आहे बरे!
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९