फुले आंबेडकरी गुरू-शिष्यत्व-भीमराव परघरमोल यांचा वैचारिक लेख
फुले आंबेडकरी गुरू-शिष्यत्व
-भिमराव परघरमोल यांचा लेख
आषाढ पौर्णिमेला विविधांगाने खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. संपूर्ण भारतामध्ये तिला गुरूपौर्णिमा, तर बुद्ध तत्वज्ञानामध्ये गुरूपौर्णिमेसह धम्मपौर्णिमा म्हणून संबोधले जाते. कारण अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी सम्यक संबोधी प्राप्ती नंतर पाहिले प्रवचन करून गुरू-शिष्य परंपरा तथा धम्माची रितसर स्थापना केली होती.
ब्राह्मण्यवादी गुरू-शिष्यत्व
जगातील गुरू शिष्य परंपरेचा इतिहास तपासला असता, भारतातील ब्राम्हण्यवादी गुरू-शिष्यत्व परंपरा ही सर्वात जुनी असल्याचे अनेक उल्लेख त्यांच्याच धर्मग्रंथांमध्ये आढळतात. परंतु त्याला प्रमाणित प्रमाण मिळत नाही. जे मिळते ते अतिशय एकाधिकारशाहीवादी! ते म्हणजे चातुर्वर्ण्यातील ब्राह्मण वर्णानेच गुरूची भूमिका पार पाडून शिष्यत्वासाठी इतर तीन वर्णातील पुरुषांना सैलता दिलेली होती. परंतु त्या सैलतेमध्ये ८५ टक्के बहुजन समाज आणि सबंध स्त्रियांना कोठेही स्थान नसल्याची कारणमीमांसा मनुस्मृती या धर्मग्रंथामधील १० व्या अध्यायातील १२९ व्या श्लोकामध्ये सापडते.
*शक्ती नापेन शुद्रोही नः कार्यो धनसंचयाl*
*शुद्रोही धनमासाध्य ब्राह्मनेनः बाध्यते।*
याचा अर्थ असा की, शुद्रांकडे (एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, डीएनटी, एसबीसी) धनाचा व ज्ञानाचा संचय होता कामा नये. तसे झाल्यास ते ब्राह्मणवादाला बाधक ठरते.
*गुरूपौर्णिमा*
प्रचलित विषमतावादी तत्वज्ञानाला सर्वात प्रथम तथागत गौतम बुद्धांनी छेद दिला. त्यांनी मानवी दुःखाचं विश्लेषण केलं. जगामध्ये दुःख का आहे? ते दूर कसे करता येईल? या प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी प्रचलित अनेक मार्ग त्यांनी चोखंदळुन पाहीले. परंतु प्रत्येक ठिकाणी पदरी निराशाच पडली. शेवटी जेव्हा त्यांनी बोधीवृक्षाखाली चार आठवडे सतत चिंतन, मनन केलं, तेंव्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर उठून चिंतनांती सर्वांची उत्तरं मिळाली. ती उत्तरं म्हणजे मानव जातीच्या दुःख निवारणावरील एकमेव व अंतीम उपाय होय. त्यालाच धम्म असे संबोधल्या जावु लागले. तथागत गौतम बुध्दांनी त्याच धम्माचा उपदेश सर्वप्रथम अश्वजित, कौंडिण्य, कश्यप (वप्प), महानाम व भद्रीक या पाच परिव्राजकांना करून त्यांना भिक्खु म्हणुन दिक्षीत केलं. तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता. तेव्हापासुन आषाढ पौर्णिमा ही गुरूपौर्णिमा असल्याचे पुरावे बौध्द साहित्यामध्ये मिळतात. परंतु कालांतराने प्रतिक्रांतीनंतर अस्तित्वात आलेल्या धर्मग्रंथांनी गुरूपौर्णिमेचे श्रेय इतरांकडे वळते केले.
*गुरूदक्षिणा*
शूद्रांना ज्ञानार्जनाची सर्व कवाडं बंद असताना, ज्ञानलालासेच्या उद्देशाने काही तरुणांनी एनकेन मार्गांचा म्हणजे खिडक्या, तावदानाचा उपयोग केला. परंतु त्यांना त्याची खुप मोठी किंमत अदा करावी लागली. रामायणातील शंबुक नामक शूद्र तपस्व्याला ज्ञानार्जन केले म्हणून प्रभूरामाचंद्राच्या हस्ते आपला जीव गमवावा लागला, एकलव्य या आदिवासी तरुणाला गुरूदक्षिणा म्हणून आपल्या शरिराचा महत्वपुर्ण अवयव (अंगठा) द्यावा लागला. तर कर्णासारख्या सुतपुत्र महायोध्याला महाशापाला सामोरे जावे लागले.
असाच एक उल्लेख बौध्द साहित्यामध्ये सुध्दा आढळतो. एका गुरूआश्रमी अहिंसक नामक शिष्य ज्ञानार्जन करत होता. तो अतिशय प्रमाणिक, हुशार, देखणा, शिलवान, व्रतसंपन्न, मृदुभाषी, गुरूभक्त असून गुरूची आज्ञा म्हणजे त्याच्यासाठी काळ्या दगडावरची रेघ होती. अहिंसक खुप हुशार व प्रमाणिक असल्यामुळे साहजिकच त्यांचे गुरूबंधु त्याचा द्वेष करत होते. एनकेन प्रकारे त्याचा विरोध करून गुरूच्या लेखी त्याची प्रतिमा आणि प्रतिभा कशी मलीन करता येईल? याच्या शोधात ते असायचे. तो अतिशय गुणसंपन्न, सशक्त, तथा रेखीव बांध्याचा देखणा असल्यामुळे एकेदिवशी गुरूमाईचीही कुत्सीत व कामुक नजर त्याच्यावर पडते. परंतु अहिंसक कशालाही भीक घालत नाही. जेंव्हा गुरुमायीसोबत लगट करण्याचे प्रकरण गुरूजींकडे जाते तेंव्हा सर्व पुरावे त्याच्या विरोधात उभे ठाकतात. निर्दोष अहिंसक, स्वतःला सिध्द करू शकत नाही. दोषी अहिंसकाला दक्षिणारुपी शिक्षा म्हणून माणसांच्या शंभर करंगळ्यांची माळ सादर करण्यास सांगीतले जाते. पर्यायाने समाज त्यावेळी एका विद्वानाला पारखा ठरला, अहिंसक हिंसक बनला. लोकांचा संहार करू लागला. तो लोकांना मारून त्यांच्या करंगळ्याची माळ करून गळ्यात घालत असल्यामुळे लोक त्याला अंगुलीमाल म्हणू लागले. एकदा त्या क्रूरकर्मा दरोडेखोराकडे तथागत गौतम बुध्द जावुन त्याला ‘स्व’ ची जाणीव करून देतात, त्याला बुध्द धम्माची दिक्षा देवुन आपले शिष्यत्व बहाल करतात.
ऐतीहासिक पुराव्यांवरून स्पष्ट दिसून येते की,तथागत गौतम बुध्दांनी शिष्याकडून कधीही आणि कोणतीही गुरूदक्षिणा मागीतली नाही किंवा स्विकारलीही नाही. त्यांनी शिष्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. तथागत बुध्दाचे शिष्यत्व सहजच कोणालाही प्राप्त करता येत असे. त्यांची शिष्यांकडून मानवजातीच्या कल्याणासाठी धम्माचा (ज्ञानाचा) प्रचार, प्रसारापलीकडे कोणतीही अपेक्षा नसायची.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगातील अत्युच्य प्रतीचे व्यक्तिमत्व, महाविद्वान, विद्याव्यसंगी, अनेक विषयावर प्रभुत्व गाजविणारे. तरीही गुरूशिष्यत्वाच्या महान परंपरेमधुन सुटु शकले नाही. ते एका ठिकाणी (माझी आत्मकथा) म्हणतात की, “माझी तीन उपास्य दैवतं असून तीन लोकांना मी गुरूस्थानी मानले आहे. माझे पहिले गुरू तथागत गौतम बुध्द ज्यांच्या धर्मामध्ये उच्चनिचतेला स्थान नाही. केळुस्कर गुरूजींनी दिलेले बुध्द चरित्र वाचल्यानंतर मी बुध्द धर्माचा उपासक बनलो. जगामध्ये बुध्द धर्मासारखा धर्म नाही. भारताला जगायचे असेल तर त्या धर्माचा स्विकार करावा असे मला वाटते.” ते आणखी पुढे असे म्हणतात की, “माझे दुसरे गुरू म्हणजे कबीरजी त्यांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता.” आपल्या तीसऱ्या गुरूचा उल्लेख ते महात्मा ज्योतीराव फुलेंच्या रूपाने करतांना म्हणतात की, “त्यांचे मला मार्गदर्शन झाले.”
या गुरू-शिष्यत्व परंपरेमधून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पारंपारीकतेला तिलांजली दिलेली दिसते. त्यांनी आपल्या हयातीत जिवीत असणाऱ्या एकाही व्यक्तीला गुरूस्थान दिल्याचे आढळत नाही. उलट जे हयात नसुन ज्यांनी समता, स्वातंत्र्य, न्याय,बंधुत्व या मानवी मुल्यांसाठी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले, जे रात्रंदिवस दीनदुखितांसाठी खपल्यामुळे प्रस्तापित समाजव्यवस्थेने वेळोवेळी त्यांना मारेकरी पाठविले, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांच्यावर केले. वेळ प्रसंगी ज्यांना मानवतेसाठी आपला जीवही गमवावा लागला तरीही जे तसुभरही आपल्या मार्गावरून डगमगले नाही. अशाच महापुरूषांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले गुरूत्व बहाल केले. ज्यामध्ये कोणालाही गुरूदक्षिणा, कोणतेही अवडंबर किंवा कुणालाही ठकवण्याची गरज नाही. त्यामागे त्यांचा महान दूरदृष्टिकोन असल्याचे दिसून येते. कारण इतिहासामध्ये काही महापुरूषांनी खुप मोठा पराक्रम गाजवल्यामुळे त्यांची दखल संपुर्ण जगाने घेतली. म्हणुन प्रस्तापितांनी त्यांच्या पाठीमागे आपल्या जातीधर्माच्या गुरूंची नियुक्ती करून इतिहासामध्ये खोट्यानाट्या पुराव्यांची पेरणी केली. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,” जे लोक इतिहासापासून धडा घेत नाही, त्यांना इतिहास धडा शिकवल्याशिवाय राहत नाही.”
*भक्तानुयायांची तुलना*
आज बहुजन समाजामध्ये महापुरूषांना मानणारा बराच वर्ग आहे. परंतु त्यांचे दोन वर्ग पडतात एक ‘भक्त’ आणि दुसरा ‘अनुयायी’. भक्ती करणारा वर्ग महापुरूषांना डोक्यावर घेतो, डोक्यात नाही. त्यांचा उदो उदो करतो. परंतु त्यांना विचारांशी व त्यांच्या अपुर्ण कार्याशी कोणतेही सोयरसुतक नसते. अनुयायांची मानसिकता मात्र याउलट असते. ते महापुरूषांचा उदो उदो कमी करतात परंतु त्याची महापुरूषांच्या विचारांसोबत नाळ जुळलेली असते. त्याचं अपुर्ण राहीलेल कार्य कोणतं आहे? ते कसं पुर्ण करता येईल? त्यांचा संघर्ष कोणता? कोणासोबत? कोणासाठी? त्यामध्ये त्यांना कोणी मदत केली? कोणी विरोध केला? का केला? त्यांना कोणी मारेकरी पाठविले? त्यांच्या विचारांमध्ये कोणी मिलावट केली? या संदर्भात अनुयायी सतत चिंतन करतात. ते चिंतन करून शांत बसत नाही तर त्या दिशेने पावले टाकण्याचा प्रयत्न करतात. महापुरूषांचं अपुर्ण राहीलेलं कार्य पुर्ण करण्यासाठी ते सतत प्रयत्न करतात. महापुरुषांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केल त्यांच्या प्रती ते कृतज्ञता व्यक्त करून विरोध करणारे, मारेकरी पाठवणारे, विचारधारेमध्ये घुसखोरी करणाऱ्यांविरोधात सावध पवित्रा घेतात.
कोणती मानसिकता
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले तिसरे गुरू राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संदर्भात अनेक ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केल्याचे दिसून येते. १९३६ मध्ये जेधे-जवळकर जेंव्हा महात्मा ज्योतीराव फुलेंची सत्यशोधक चळवळ काँग्रेसमध्ये विलीन करतात तेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अतीव दुःख होते. १९४८ मध्ये देशातील ओबीसीचे (इतर मागासवर्ग) एक शिष्टमंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटून विनंती करतात की, आपण अनुसुचित जाती-जमातीचे यशस्वी नेता असल्यामुळे आमचंही नेतृत्व केलं पाहिजे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना उत्तर देताना म्हणतात की, “मी महात्मा ज्योतीराव फुलेंचा अनुयायी आहे, एकटा आहे परंतु सच्चा आहे. मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही.” म्हणुन त्यांनी भारतीय संविधानामध्ये देशातील सर्वात मोठया ओबीसी गटासाठी ३४० व्या कलमाची विशेष तरतुद केलेली आहे. तसेच त्यांनी संविधानामध्ये ३९५ कलमाचा अंतर्भाव केला. कारण महात्मा ज्योतीराव फुलेंनी ज्या बुधवार पेठेतील भिडेच्या वाड्यामधुन शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती त्या घराचा नंबरही ३९५ होता. महात्मा ज्योतीराव फुलेंच्या दत्तकपुत्राचे नाव यशवंत होते म्हणुन त्यांनीही आपल्या पहिल्या पुत्राचे नाव यशवंत ठेवले होते. एवढेच नव्हे तर महात्मा ज्योतीराव फुलेंना इथल्या प्रस्तापित व्यवस्थेमध्ये जे जे बदल अपेक्षित होते, ते शेतीचे असो की शेतकऱ्यांचे, शिक्षणातील असो की शिक्षकांचे, नोकरीमधील असो की आरक्षणाचे. ही सर्व तरतुद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधनामद्ये केलेली दिसून येते. या संदर्भात महात्मा ज्योतीराव फुलेंनी १८८२ ला हंटर आयोगाला सोपविलेले निवेदन वाचल्यास आपल्या बऱ्याचश्या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एक ना अनेक कामांमधुन महात्मा ज्योतीराव फुलेंना गुरूदक्षिणारुपी आदरांजली अर्पण केलेली आहे. बहुजन समाजातील काही महाभाग याला योगायोग समजून आपल्या कोत्या मानसिकतेचं प्रदर्शन करतात. परंतु तो योगायोग नसुन ते गुरूशिष्यांचं महान नातं आहे.
म्हणून इतिहासातील अजरामर आणि महान परंपरेतील गुरू शिष्यांना कोटी कोटी अभिवादन
भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला
मो. ९६०४०५६१०४