बुद्धाने भिक्खूसंघाची निर्मिती का केली ? हा होता भिक्खूंच्या निर्मितीमागील उद्देश..
बुद्धाने भिक्खूसंघाची निर्मिती का केली ? हा होता भिक्खूंच्या निर्मितीमागील उद्देश..
आर्यांकडून पराभूत झालेल्या टोळ्यांमधील लोक घरदार सोडून रानोमाळ भटकत असत. यांना परिव्राजक असे म्हटले जात असे. परिव्राजक म्हणजे निराश्रित. या भटक्या लोकांना संघटित करण्यासाठी बुद्धाने संघटन निर्माण केले. हे संघटन म्हणजेच भिक्खूसंघ होय. भिक्खूसंघाच्या निर्मितीमागे समाजपरिवर्तन हाच हेतू आहे. चातुर्वर्ण्य नष्ट करणे, सर्वांना समान अधिकार प्राप्त करून देणे आणि समाजात समता, बंधुता आणि बुद्धिवाद निर्माण करणे हा उद्देश भिक्खूसंघ निर्माण करण्यामागे होता. त्यासाठी त्याने भिक्खूचे असे आंदोलन उभे केले. भिक्खु म्हणजे समाजपरिवर्तनाच्या चळवळीतील निष्ठावंत आणि पूर्णवेळ सैनिक होय बुद्धाला हे गृहीत होते.
सिद्धार्थाने प्रथम पाच परिव्राजकांना आपला धम्म सांगितला. बुद्ध होण्याआधी सिद्धार्थाने अत्यंत कठीण तपश्चर्या केली होती. यावेळी त्याच्यासोबत इतरही पाच तपस्वी होते. निरर्थक म्हणून सिद्धार्थाने तपस्या सोडली. त्यामुळे हे त्याचे पाचही सहकारी त्याच्यावर रागावले होते. पुढे सिद्धार्थ आपल्या सर्जनशील बुद्धिमत्तेच्या जोरावर बुद्ध झाला आणि त्याच्यावर रागावलेले त्याचे सहकारी तपश्चर्या करीत तिथेच थांबले होते. या तपश्चर्येने त्यांना काहीही दिले नव्हते. सर्जनशील बुद्धिमत्तेने, प्रश्नावरील उत्कट आस्थेने, उदंड माणुसकीने सिद्धार्थाला बुद्ध केले होते आणि बुद्धाची भेट झाली तेव्हा ते पाचही तपस्वी बुद्धाच्या तत्त्वज्ञानतेजाने भारावून गेले. त्यांनी धम्मदीक्षा घेतली. बुद्धाने त्यांचा आपल्या धम्मात समावेश करून घेतला, धम्माच्या इतिहासातले हे पहिले पाच भिक्खू होत. पुढे यशस, काश्यप बंधू, सारिपुत्त, मोगलान, बिंबिसार, अनाथपिंडक, | प्रसेनजित, जीवक अशा अनेकांनी धम्माचा स्वीकार केला.
भिक्खूंच्या निर्मितीमागील उद्देश : खुद बुद्धाने ४५ वर्षे धम्मप्रसार केला. त्याने आपले संपूर्ण आयुष्यच लोकांना धम्म वाटण्यात व्यतीत केले. पण मोठ्या प्रमाणावर आणि सर्वत्र धम्म पोहचवण्याची गरज होती. त्यासाठी बुद्धाला निष्ठावंत, अभ्यासू आणि चारित्र्यसंपन्न भिक्खूंची गरज होती. एखादी चळवळ कार्यकर्त्याच्या पावलांनीच लोकांच्या मनापर्यंत चालत जाते. लोकांना धम्म पटवून देणारे, त्यांना समताप्रस्थापनेच्या प्रक्रियेशी जोडणारे आणि नव्या प्रज्ञा-करुणा मानसशास्त्राला जन्म देणारे त्याकाळ ● पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणजे भिक्खु होत ! हे भिक्खू बुद्धाशी एकनिष्ठ होते. त्यामुळे प्राण पणाला लावून ते काम करीत होते. बुद्धाने असे असंख्य कार्यकर्ते तयार केले. त्यांना भिक्खू असे म्हटले जात असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, “बौद्ध भिक्खूची संघटना ही अशाच समाजसेवेसाठी भगवंतांनी निर्माण केली आहे. हे सतीचे वाण आहे.” (खंड १८, भाग ३, महाराष्ट्र शासन, पृ. ४४६) आणखी एका ठिकाणी बुद्धाने भिक्खूसंघ निर्माण करण्याचे कारण बाबासाहेबांनी सांगितले आहे. त्यांनी लिहिले आहे “बौद्ध धम्मात सांगितलेल्या आदर्श तत्त्वप्रणालीप्रमाणे समाजव्यवस्था निर्माण करणे, समाजातील प्रत्येक घटकाला नीतितत्त्वांनी वागण्यास कार्यप्रवृत्त करणे व प्रापंचिक लोकांपुढे स्वतःच्या आदर्श • वागणुकीचा एक उत्तम नमुना ठेवणे हे प्रमुख हेतू बौद्धभिक्खु निर्माण करण्यामागे होते. सर्वसामान्य माणसाला बौद्ध तत्त्वज्ञान सहजासहजी आकलन होणारे नाही ● याची कल्पना बुद्धाला होती. तथापि ते त्यांनी थोडे फार समजावून घ्यावे व त्यासाठी त्यांच्या नजरेसमोर बौद्ध विचारप्रणालीशी बद्ध असलेल्या सुसंघटित बौद्ध भिक्खूंचा आदर्श संच असावा हे भिक्खूसंघाच्या निर्मितीचे कारण होय. याच कारणास्तव विनय नावाच्या आदर्श नियमांनी भिक्खू संघाला बद्ध केले गेले. तथापि बौद्धभिक्खू संघ स्थापनेच्या वेळी बुद्धाच्या मनात दुसरे अनेक हेतू होते. सर्वसाधारण लोकांना सत्य आणि निरपेक्ष मार्गदर्शन देणाऱ्या बुद्धिवादी लोकांचे संघटन करणे आवश्यक आहे असे बुद्धाला वाटत होते.” (खंड २०, महाराष्ट्र शासन, पृ. ३८५) इथे काही गोष्टी स्वच्छपणे आपल्याला दिसतात त्या अशा धम्माला अभिप्रेत समाज निर्माण करण्यासाठी झटणे हे भिक्खूचे जीवनध्येय आहे. बुद्धाची ही समाजरचना विषमताविहीन समाजरचना आहे. ही समाजरचना इहवादी म्हणजे बुद्धिवादी समाजरचना आहे. अशी समाजसंस्था निर्माण करण्यासाठीच धम्माचा जन्म आहे. या समाजरचनेत माणसे इतर माणसांशी केवळ बंधुत्वाने वागतील आणि या समाजरचनेत देव, आत्मा, स्वर्ग, नरक अशी कोणतीही अंधश्रद्धा नसेल. ही समाजसंस्था प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारे धम्माचे तत्त्वज्ञान म्हणजे सत्य होय. भिक्खू या सत्याचे निरपेक्ष आणि सेवाभावाने प्रकाशन करतील. भिक्खू हे त्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादी लोकांचे संघटन असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथे भिक्खूच्या व्यक्तिमत्त्वाची घटनाच स्पष्ट करीत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे,
साभार- डॉ.यशवंत मनोहर ,आंबेडकरवादी बौद्धभिक्खू कसा असावा ?