भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या संख्येत वाढ; परदेशी नागरिकत्वाला अधिक पसंती का ?
भारतीय नागरिकत्व सोडणा-या लोकांच्या संख्येत वाढ
परदेशी नागरिकत्वासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग
गृह मंत्रालयाने २०२१ मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार १,६३,३७० लोकांनी आपल्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला. संसदेत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटलं की, या लोकांनी त्यांच्या ‘वैयक्तिक कारणांमुळे’ नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्यासाठी सर्वाधिक म्हणजे ७८,२८४ लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले. या खालोखाल २३,५३३ लोकांनी ऑस्ट्रेलियाच्या तर २१,५९७ लोकांनी कॅनडाच्या नागरिकत्वासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला. चीन आणि पाकिस्तानसाठीही भारतीय नागरिकांनी आपल्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला. ३०० लोकांनी चीनचं तर ४१ लोकांनी पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं.
गेल्या दोन वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडणा-या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०२० साली ८५,२५६ लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले होते, तर २०१९ साली १,४४,०१७ लोकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला होता. गेल्या पाच वर्षांत जवळपास ८ लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले.
परराष्ट्र धोरणांचे तज्ञ हर्ष पंत यांनी सांगितले की, २०२१ मध्ये भारतीय नागरिकत्व सोडणा-या लोकांची संख्या एकदम वाढली. याचं कारण हेही असू शकतं की कोरोना काळात लोकांच्या नागरिकत्व मिळवण्याच्या प्रक्रियेत अडथळा आलेला असू शकतो.” पण एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय आपले नागरिकत्व का सोडत आहेत? याबद्दल देशाबाहेर राहणा-या लोकांशी, देश सोडू पाहणा-या लोकांशी आणि तज्ञांशी चर्चा करण्यात आली.
परदेशात राहण्याचे अनेक फायदे दिसून आले. अमेरिकेत राहणारी एक महिला म्हणतात की, जर भारताला आपल्या लोकांना देश सोडण्यापासून थांबवायचं असेल किंवा ब्रेन ड्रेनवर नियंत्रण मिळवायचं असेल तर नवीन पावलं उचलावी लागतील. देशातल्या लोकांना उत्तम सुविधा देण्यासोबतच दुहेरी नागरिकत्व देण्यासंबंधी विचार करायला हवा, असं त्यांना वाटतं.
ती महिला २००३ साली नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेल्या होत्या. तिथलं वातावरण त्यांना आवडलं म्हणून त्यांनी तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मुलीचा जन्म तिथेच झाला. मग त्यांनी ग्रीन कार्डसाठी अर्ज केला आणि काही वर्षांनी त्यांना तिथलं नागरिकत्व मिळालं. त्या म्हणतात, “इथलं आयुष्य खूपच सोपं आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूपच चांगलं आहे. मुलांचं शिक्षण व्यवस्थित होतं. त्यांना इथे भारताच्या तुलनेत अधिक चांगल्या संधी मिळतील.” “त्याशिवाय काम करण्याचं वातावरणही खूपच चांगलं आहे. तुम्ही जितकं काम करता त्या तुलनेत तुम्हाला चांगले पैसे मिळतात.”
कामाच्या ठिकाणचं वातावरण उत्तम आहे. कॅनडात राहणा-या अभिनव आनंद यांचंही मत असंच काहीसं आहे. त्यांनी तिथूनच आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आता तिथेच नोकरी करत आहेत. ते सध्या भारतीय पासपोर्टच वापरतात, पण त्यांना भारतीय नागरिकत्व सोडण्याची इच्छा आहे. त्यांना वाटतं की कॅनडात काम करण्यासाठी चांगलं वातावरण मिळतं आणि त्यामुळे त्यांना भारतात परत जाण्याची इच्छा नाही. ते म्हणतात, “इथे काम करण्याचे तास निश्चित आहेत. कामाच्या ठिकाणी नियम आणि कायदे पाळले जातात. तुम्ही जितकं काम कराल त्या हिशोबाने तुम्हाला पैसे मिळतात. भारतात हे नियम चांगल्या प्रकारे पाळले जात नाहीत. त्यामुळे मला नोकरीसाठी भारतात परत जायचं नाही आणि जर मी दुस-या देशात नोकरी करत असेन तर तिथलं नागरिकत्व घ्यायला काय हरकत आहे?”
हर्ष पंत म्हणतात की, बहुतांश लोक चांगलं आयुष्य, जास्त पैसे आणि संधींच्या शोधात देश सोडून जातात. ते म्हणतात, “मोठ्या देशांमध्ये चांगल्या सोयीसुविधा मिळतात, पण अनेक लोक लहान लहान देशांतही जातात. लहान देश व्यापारासाठी अनेक सवलती देतात. अनेक लोकांची कुटुंब अशाच देशात राहत असतात मग, ते लोकही तिथेच स्थायिक होतात.”
भावनिक गुंतवणूक आहे, पण फायदे नाहीत. हरेंद्रल मिश्रा वरिष्ठ पत्रकार आहेत आणि गेल्या २२ वर्षांपासून इस्रायलमध्ये राहत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, भारताशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे ते भारतीय नागरिकत्वाचा त्याग करू शकत नाहीत. त्यांची पत्नी इस्रायलचीच आहे आणि त्यांच्या मुलांचा जन्मही तिथेच झाला. त्यांच्या बायका-मुलांकडे इस्रायलची नागरिकता आहे. पण मिश्रा म्हणतात की, भारतीय पासपोर्टमुळे त्यांना अनेक अडचणी येतात. अनेक देशांमध्ये जाण्यासाठी त्यांना व्हिसा घ्यावा लागतो.
ते उदाहरण देताना म्हणतात, “मला लंडनला जाण्यासाठी व्हिसा घ्यावा लागतो. पण जर तुमच्याकडे इस्रायलचा पासपोर्ट असेल तर तुम्हाला व्हिसाची गरज पडत नाहीत. पण व्हिसाचा अर्ज करायला इथे कोणतंही ऑफिस नाहीत. त्यासाठी मला टर्कीतील इस्तंबूलला जावं लागतं. तिथे येण्या-जाण्याचा खर्च फार आहे. या गोष्टींचा फार त्रास होतो.” ते म्हणतात, “भारताशी माझी नाळ जोडली गेली, माझी भावनिक गुंतवणूक आहे. त्यामुळे मी तिथलं नागरिकत्व सोडू इच्छित नाही. पण त्याशिवाय मला काही विशेष फायदा होत नाही.” तुमचा पासपोर्ट भारतीय असेल तर तुम्ही व्हिसा न घेता ६० देशांमध्ये प्रवास करू शकता. इतर देशांच्या तुलनेत ही संख्या फारच कमी आहे. पासपोर्ट रँकिंगमध्ये भारत १९९ देशांच्या यादीत ८७ व्या स्थानावर आहे.
दुहेरी नागरिकत्वाची अत्यंत गरज आहे. हरेंद्र मिश्रा म्हणतात की, भारतात जर दुहेरी नागरिकत्वाची सवलत मिळाली तर भारतीय नागरिकत्व सोडणा-या लोकांची संख्या कमी होईल. अभिनव आनंदही असंच म्हणतात. त्यांना दुस-या देशाचं नागरिकत्व हवं पण त्यांचं म्हणणं आहे की, त्यांचा नाईलाज असल्यामुळे त्यांना असं करावं लागतं. त्या महिला आता भारतीय नागरिक नाहीत. त्यांच्याकडे ओसीआय कार्ड आहे पण त्यांचं म्हणणं आहे की, त्यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व असतं तर आणखी चांगलं झालं असतं.
जगभरातल्या अनेक देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व मान्य आहे. म्हणजे तुम्ही एकाच वेळी दोन देशांचं नागरिकत्व घेऊ शकता. पण भारतात दुहेरी नागरिकत्वाचा नियम नाही. म्हणजे जर तुम्हाला इतर कोणत्याही देशाचं नागरिकत्व हवं असेल तर तुम्हाला भारतीय नागरिकत्व सोडावं लागेल. पण परदेशी स्थायिक झालेल्या आणि तिथलं नागरिकत्व घेतलेल्या लोकांसाठी एक खास सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचं नाव ओसीआय – ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया मध्ये समाविष्ट करण्यात आले.
भारताबाहेर बसलेल्या पण भारताशी घट्ट संबंध असलेल्या लोकांची संख्या लाखांच्या घरात आहेत. अशा लोकांना पूर्वी भारतात येण्यासाठी व्हिसा घ्यावा लागायचा. या लोकांसाठी २००३ साली भारत सरकारने आणखी एक योजना आणली. पीआयओ – पर्सन ऑफ इंडियन ओरिजीन. हे कार्ड पासपोर्टसारखंच दर दहा वर्षांसाठी जारी केलं जायचं. यानंतर २००६ साली भारत सरकारने ओसीआय कार्ड देण्याची घोषणा केली. काही काळ ही दोन्ही कार्ड वापरात होती, पण २०१५ साली सरकारने पीआयओ कार्ड रद्द केलं. आता फक्त ओसीआय कार्ड चालतात. हे कार्ड जवळ असणा-या परदेशस्थित भारतीयांना भारतात आयुष्यभर राहण्याची, काम करण्याची, आर्थिक व्यवहार करण्याची सवलत देतं. एकदा काढलेलं हे कार्ड आयुष्यभर चालतं.
भारताच्या गृह मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार ओसीआय कार्ड धारकांना भारतीय नागरिकांसारखेच सगळे अधिकार असतात. पण ते निवडणूक लढवू शकत नाहीत, मतदान करू शकत नाहीत, सरकारी नोकरी किंवा घटनात्मक पद धारण करू शकत नाहीत आणि शेतजमीन खरेदी करू शकत नाहीत.
परदेशी जाणा-या भारतीयांची संख्या वाढेल. पंत म्हणतात की, सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता येत्या काही वर्षांत परदेशात स्थायिक होऊ पाहणा-या लोकांची संख्या कमी होईल. ते म्हणतात, “भारताची आर्थिक परिस्थिती इतर देशांपेक्षा चांगली आहे. इथेही आणखी संधी मिळतील. त्यामुळे लोक भारतात राहतील. अर्थात ज्या लोकांनी आधीच ग्रीन कार्डसाठी अर्ज केले आहे, ते मात्र अमेरिकेचं नागरिकत्व घेण्याची संधी सोडणार नाहीत.”
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९