Uncategorized

सांस्कृतिक केंद्र व विद्येच्या माहेरघरातील लैंगिक अत्याचाराचा पाढा;हे मानवाचंच जग आहे का?

सांस्कृतिक केंद्र व विद्येच्या माहेरघरातील लैंगिक अत्याचाराचा पाढा ;हे मानवाचंच जग आहे का ?

पुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. उदयोग, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीमुळे पुणे हे राज्यात मुंबई नंतर दुस-या क्रमांकाचे शहर आहे. एके काळी मराठ्यांचे साम्राज्य असलेले पुणे हे समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा लाभल्यामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. देशातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्था पुण्यात असून जगभरातील अनेक विद्यार्थी त्यांत शिक्षण घेत आहेत. त्यामुळेच पूर्वेकडील ऑक्सफर्ड किंवा विद्येचे माहेरघर म्हणूनही पुण्याची ओळख आहे. आज, पुण्यामध्ये जगातील नामांकित आई.टी. कंपन्याही आहेत; त्यामुळे या शहराला आई.टी. हब म्हणूनही ओळखले जाते. पुणे हे बुद्धिजीवींचे शहर आहे. पुण्यात वर्षभर संगीत, कला, साहित्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. ‘पुणे तेथे काय उणे’ अशी उक्तीही प्रसिद्ध आहे. मनमोहक हिरवेगार डोंगर, द-या, जंगल, नद्या यांनी पुणे जिल्हा नटलेला आहे. येथे आधुनिकीकरणासोबतच निसर्गाचा समतोलही साधला आहे.

अशा विविधतेने नटलेली एज्युकेटेड नगरी पुणे नेहमीच चर्चेत असते. जसा विविधांगी छटांनी पुण्याचा इतिहास आपल्यासमोऱ उभा ठाकतो. अगदी तसाच दृष्कृत्यांच्याही बाबतीत तो नेहमी अग्रेसर हेऊन जगाला आपले दर्शन घडवितो. अशा या सांस्कृतिक केंद्र व विद्येच्या माहेरघरातील मागिल ५ महिन्यातील लैंगिक अत्याचाराचा हा पाढा आपल्यासमोर कथीत…

पुण्यात एका 11 वर्षीय मुलीवर बाप, भाऊ, आजोबा आणि चुलत मामाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. ताडीवाला रोड येथे ही मुलगी राहते. महत्वाची बाब म्हणजे मागील ५ वर्षापासून हा प्रकार सुरु असल्याचं समोर आलं. पीडित मुलीने तिच्या शाळेत आयोजित ‘गुड टच, बॅड टच‘ या सत्रात या धक्कादायक अत्याचाराबाबत सांगितले. पीडित मुलीने तिच्या समुपदेशकांजवळ सर्व प्रकार सांगितला. नंतर समुपदेशकांच्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय मूळचे बिहारचे रहिवासी असून ते सध्या पुण्यात वास्तव्याला आहेत. पीडितेवर मागील पाच वर्षेीपासून बलात्कार, विनयभंग. पीडित अल्पवयीन मुलीवर तिच्या किशोरवयीन भावाने आणि बापाने वेगवेगळ्या वेळी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर मुलीचे आजोबा आणि मामाने तिचा विनयभंग केला. संबंधित आरोपींविरुद्ध बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कोणालाही अटक करण्यात आले नव्हते. पीडित मुलीला बिहारमध्ये राहत असताना सन २०१७ पासून लैंगिक अत्याचार सहन करावा लागल्याचे एफआयआरमध्ये म्हटले होते. वेगवेगळ्या वेळी घटना घडल्याने सामूहिक बलात्काराचा गुन्हा नाही.

पीडित मुलीने तिच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘गुड टच आणि बॅड टच’ सत्रादरम्यान स्वतःवरील लैंगिक अत्याचाराबाबत तोंड उघडले. २०१७ मध्ये पीडित मुलीच्या बापाने तिचा लैंगिक छळ सुरू केला होता. त्यानंतर मुलीच्या मोठ्या भावाने नोव्हेंबर २०२० च्या सुमारास तिचा लैंगिक छळ सुरू केला. तसेच मुलीच्या आजोबा आणि मामाने तिला अयोग्यरित्या स्पर्श करून विनयभंग केला. सर्व घटना वेगवेगळ्या वेळी घडल्या. तसेच आरोपींना एकमेकांच्या गैरकृत्यांची माहिती नसल्याने हे सामूहिक बलात्काराचे प्रकरण नाही. या प्रकरणात पोक्सो कायद्याची कलमेदेखील जोडली जातील, असे पोलीसांनी स्पष्ट केले. पीडित मुलीचे आईवडील मूकबधिर आहेत. पीडित मुलगी पुण्यातील एका नामांकित कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेते. पुण्याव्यतिरिक्त बिहारमधील तिच्या मूळ गावीही मुलीचे लैंगिक शोषण झाले होते. त्यामुळे पोलिसांची एक टीम लवकरच बिहारमध्येही जाऊन अधिक तपास करणार होते.

पुण्यातल्या हिंजवडीत अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गंभीर बाब म्हणजे आरोपी वडिलाने दोन वेळेस मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं स्पष्ट झालं. ३५ वर्षीय आरोपी वडील, पीडित ११ वर्षीय मुलगी आणि मुलगा असे तिघे जण एकत्र राहात होते. आरोपीचे पत्नीसोबत पटत नसल्याने पत्नी तीन वर्षांपासून वेगळी राहते. मुलं मात्र वडिलांसोबत हिंजवडी परिसरात राहत होते. दरम्यान, १३ मार्च ला पहिल्यांदा सकाळी अल्पवयीन मुलीवर वडिलांनी जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केले, तर दुस-या दिवशी देखील म्हणजे १४ मार्चला पुन्हा तिच्या एकटेपणाचा फायदा घेत अत्याचार केले. या घटनेमुळे पीडित मुलगी घाबरली होती. मात्र, मन मोकळं करण्यास तिच्या सोबतीला कुणीच नव्हतं. दरम्यान, धुळवड आणि होळी आल्याने पीडित मुलगी आणि मुलगा यांना आरोपीने आजीकडे गावी सोडले. होळी आणि धुळवड झाली तरी पीडित मुलगी घरी जायचं नाव घेत नव्हती. आजीने पीडित नातीला काही झालं आहे का? असे विचारले असता वडील घाणेरडे वागत असल्याचं तिने आजीला सांगितले. या प्रकरणी सख्ख्या मुलाच्या विरोधात आईने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, ३५ वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेत एका अनोळखी व्यक्तीने ११ वर्षांच्या मुलीवर शाळेच्या स्वच्छ्तागृहात बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना सकाळी अकरा ते साडेअकरा या दरम्यान घडली. येरवडा येथील शाळेत शिरून एकतर्फी प्रेमातून दहावीतील मुलीवर खुनी हल्ला करण्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली़. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार यांची ११ वर्षांची मुलगी जंगली महाराज रस्त्यावरील शाळेत शिकायला होती. २३ मार्च ला सकाळी ती शाळेत गेली. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती शाळेत आली. त्याने तक्रारदार यांच्या मुलीची ओळख असल्याचा बहाणा करून तिला ढकलत ढकलत शाळेच्या स्वच्छ्तागृहात नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. “कोणाला काही सांगितले तर बघ,” अशी धमकी देऊन तेथून निघून गेला. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने तिच्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी शाळेतील शिक्षिकांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने मुलीच्या आईला आणि पोलिसांना शाळेत बोलावून घेऊन घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी शाळेत धाव घेतली. ”शाळेत सीसीटीव्ही आहेत. त्याचा तपास केला जात आहे. शाळेत कार्यरत असलेल्या कोणा पुरुषाचे हे काम नाही ना, याची तपासणी आम्ही केली आहे. हा आरोपी बाहेरचा असल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले.”

पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत शिकणा-या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आणि एकच खळबळ उडाली. शाळेतील बाथरूममध्ये आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी संशयित आरोपीचं स्केचही प्रसिद्ध केलं होतं. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली. शिवाजीनगर नामांकित शाळेच्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेने पकडलं. धक्कादायक म्हणजे हा आरोपी पीडित मुलीच्या वडिलांना ओळखत होता. आरोपी हा वॉचमनचं काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. ३६ वर्षीय मंगेश पदमुळू नावाच्या या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मंगेश याने शाळेजवळ असलेल्या एका शोरूममध्ये वॉचमनचं काम केलं होतं. केवळ एकच दिवस त्याने तेथे काम केलं होतं. दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील एका शाळेमध्ये ११ वर्षीय मुलगी गेली होती. त्यावेळी ३६ वर्षीय अनोळखी व्यक्तीने मी तुला ओळखतो असे सांगून शाळेच्या बाथरूम मध्ये नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटने बाबत कोणाला काही सांगितल्यास तुला बघतो, अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर पीडित मुलीने सर्वप्रथम घडलेला प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. मग तिने हा प्रकार वर्गशिक्षिकेला सांगितला. त्यानंतर वर्गशिक्षिकेने घडलेला संपूर्ण प्रकार पीडित मुलीच्या आई-वडिलांना सांगितला. त्या मुलीने आणि तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. एका अज्ञात व्यक्तीने शाळेत शिरून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेचे पडसाद अधिवेशनातही उमटल्याचं पहायला मिळालं. विधानसभेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, ही घटना खूपच गंभीर आहे. या संदर्भात एक नवीन धोरण आणण्यात येईल आणि त्यामाध्यमातून मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले वातावरण देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल.

आईच्या प्रियकराने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तिच्या आई व बहिणीला मारून टाकण्याची धमकी देऊन वेळोवेळी जबरदस्ती केली. बलात्कार प्रकरणी पोलिसांनी त्या प्रियकराला अटक केली. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, इंदोरी तसेच भंडारा डोंगराच्या जंगलात २०१४ पासून ते ११ एप्रिल २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. जनार्दन सोमाजी शितोळे वय ४०, रा. बहुळ, ता. मावळ असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी शितोळे हा फिर्यादी तरुणीच्या आईचा प्रियकर होता. त्याचे फिर्यादीच्या घरी येणे-जाणे असायचे. फिर्यादी तरुणी अल्पवयीन असल्यापासून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी तरुणीच्या आई व बहीण यांना मारून टाकण्याची धमकी देऊन वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केले. आरोपीने रात्री दीडच्या सुमारास फिर्यादी तरुणीवर जबरदस्ती केली. या अत्याचाराबाबत तरुणीने आईला सांगितले. त्यामुळे आरोपीने शिवीगाळ करून तरुणीला हाताने मारहाण केली. फिर्यादी तरुणी अल्पवयीन असल्यापासून आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. तिला धमकी दिल्यामुळे ती अत्याचार सहन करीत होती. तिच्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. मात्र ते असह्य झाल्यानंतर तिने आईला सांगितले. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आईसोबत पोलीस ठाण्यात येऊन पीडित तरुणीने तक्रार केली. बलात्कार प्रकरणी तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करण्याच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पुण्यात बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली. जन्मदात्या नराधम बापाकडूनच आपल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली. शिक्रापूर पोलीस ठाण्यात नराधम पित्याविरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांकडून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील एका गावात पित्याकडून पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरातील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. पीडित अल्पवयीन मुलीचा नराधम बाप दारूच्या नशेत घरी आला होता. त्यामुळे त्यानं पत्नीशी वाद घातला. त्यानंतर चिडलेल्या नराधम बापानं दारूच्या नशेत घरात झोपलेल्या पोटच्या १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना घडली. या घटनेनं बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासला गेला आहे. या नराधमाच्या कृत्यानंतर पीडित मुलीच्या आईनं परिसरात आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावलं. त्यानंतर जमा झालेल्या लोकांनी नराधमावर तीव्र संताप व्यक्त केला. त्या नराधमावर स्थानिक नागरिकांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी झाली होती.

पुण्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. घर सोडून गेलेल्या महिलेच्या दीराने तिच्या मुलांसोबतच दुष्कृत्य केल्याची घटना घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ३० वर्षांच्या आरोपी काकाला अटक केली. या घटनेने पुणे हादरलं. पुण्यातील एका ३० वर्षीय महिलेचा पती घर सोडून निघून गेला. ती वडकी परिसरात राहते. ती मुलाच्या प्रसूतीसाठी ससून रुग्णालयात दाखल झाली होती. तर घरी तिचा ८ वर्षांचा मुलगा आणि ४ वर्षांची मुलगी एकटेच होते. मात्र, यावेळी अत्यंत संतापजनक घटना घडली. दीर त्यांना घेऊन स्वत:च्या घरी गेला होता. तर दुसरीकडे या महिेलेला मुलगा झाला. घरी आल्यावर तिने मुलीची व मुलाची अवस्था पाहिल्यावर चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. वडकी येथे राहणा-या या महिलेला पहिल्या पतीपासून ८ वर्षाचा एक मुलगा व ४ वर्षाची मुलगी आहे. आता ती मागील ५ महिन्यांपासून दुस-या पतीबरोबर राहत होती. मात्र, गेल्या ४ महिन्यांपासून तिचा दुसरा पती घर सोडून निघून गेला आहे. आपली उपजीविका भागवण्यासाठी ती भंगार गोळा करते. ती गर्भवती असल्याने आता तिचे दिवस भरत आले. यामुळे ती तिच्या मुलांना शेजा-यांकडे सोपवून ससून रुग्णालयात २० मे रोजी दाखल झाली. यानंतर तिला मुलगा झाला. रुग्णालयातून तिला २३ मे रोजी सोडण्यात येणार होते. त्यामुळे तिने मोठ्या दिराला फोन करून बोलावले. यानंतर त्यांनी तिला वडकी येथील घरी सोडले. यावेळी शेजारी चौकशी केल्यावर तिचा धाकटा दीर मुलांना घेऊन त्याच्या घरी गेल्याचे तिला समजले. दुस-या दिवशी या महिलेने पिंपळमळा येथून आपल्या मुलांना घरी आणले. मात्र, मुलांच्या अंगावर वळ दिसल्याने तिने दिराला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर दुस-या दिवशी मुलांना आंघोळ घालताना मुलीबाबत काहीतरी वाईट घडल्याचे तिच्या लक्षात आले. तिने चौकशी केल्यावर छोट्या काकाने अत्याचार केल्याचे चार वर्षांच्या मुलीने सांगितले. तसेच त्याचा खूप त्रास होत असल्याचेही तिने सांगितले. तर सोबतच मुलाबाबतही हाच प्रकार घडला होता. त्याच्यावर काकाने अनैसर्गिक अत्याचार केला होता. या दोघांनी सांगितलेल्या हकीकतीने तिच्यावर जणू आभाळच कोसळले. तिने लोणी काळभोर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या ३० वर्षांच्या आरोपी काकाला अटक केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस तपास करत आहेत.

पिंपरी-चिचवडमध्ये १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्या २८ वर्षीय साथीदाराला, ज्याने आरोपीला मुलीला हल्ल्यापूर्वी सार्वजनिक रस्त्यालगत मातीच्या ढिगा-यामागे ओढून नेण्यात मदत केली होती, त्यालाही अटक करण्यात आली. काही वाटसरूंनी त्यांना पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मजूर म्हणून काम करणारे दोघे आरोपी, मुलीच्याच झोपडपट्टीत राहत होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणाले, दुपारी दोन आरोपींनी मुलीला जबरदस्तीने त्यांच्यासोबत जाण्यास भाग पाडले. त्यांनी तिला मातीच्या ढिगा-या मागे ओढले. २८ वर्षीय तरुणीने तिला रोखले कारण ६५ वर्षीय व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि जबरदस्तीने ओरल सेक्स केला. मुलीच्या ओरडण्याने तेथून जाणारे काही लोक सावध झाले आणि त्यामुळे ही घटना उघडकीस आली. त्यानंतर दोघांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि भारतीय दंड संहिता कलम ३७७ नुसार अटक करण्यात आली. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

एका अल्पवयीन मुलीवर एका लॉजमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे हा प्रकर घडला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपीला अटक केली. शुभम लॉजमध्ये ही घटना घडली. पीडितेच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या सगळ्या प्रकरणाचा तपास तळेगाव दाभाडेचे पोलीस करत आहेत. पोलिसांनी २३ वर्षीय आरोपीला अटक केली असून तो तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहे. तक्रारदाराच्या घराशेजारी आरोपीचे नातेवाईक राहत होते. त्या परिसरात तो वारंवार येत असे. त्यामुळे आरोपीची तक्रारदाराच्या १२ वर्षीय मुलीशी ओळख झाली. आरोपी मुलीला लॉजवर घेऊन गेला. येथे आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच मुलीला व तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार. पहिला विवाह झाला असताना २८ वर्षीय तरुणीला विवाहाचं अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील पोलीस ठाण्यात या प्रकरणाबाबत २८ वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली. यावरुन आरोपीला अटक करण्यात आले. जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. तरुणी पुण्याची रहिवासी असून आरोपी हा मध्यप्रदेशचा रहिवासी आहे. आरोपी आणि तरुणीची ओळख इंस्टाग्रामवरुन झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीचा आधीच एक विवाह झाला असताना देखील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर अनेक दिवस दोघे सोबत राहिले. तरुणीच्या घरी देखील आरोपीचे कायम ये-जा असायचे. शिवाय घरी, गोवा, मुंबईत देखील दोघे फिरायला गेले असता तिच्यावर बलात्कार केल्याचं तरुणीने सांगितलं आहे. तरुणीवर जबरदस्ती करुन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. विवाह न करता तरुणीची फसवणुक केली, असं तक्रारीत लिहिले होते.

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला त्याच्या दोन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. हा सर्व प्रकार सुरू असताना महिलेचा पती कोप-यात उभं राहून हे पाहत होता. या प्रकारानंतर महिलेने पती आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती पत्नीला मानसिक त्रास देत होता. तिची इच्छा नसतानाही त्याने २०२० मध्ये हडपसर येथील एका लॉजवर मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. यानंतर जुलै २०२१ मध्ये कोरेगाव पार्क परिसरात एका फ्लॅटवर दुस-या एका मित्रासोबत पत्नीला अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. हे सर्व होत असताना पती मात्र कोप-यात उभं राहून पाहत होता. हे सर्व वारंवार घडत असल्याने शेवटी संतापलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. पतीच्या अशा कृत्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कोणता पती आपल्या पत्नीसोबत अशा प्रकारचं कृत्य करू शकतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button