सामाजिक

पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल व पालकांची जबाबदारी

पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल व पालकांची जबाबदारी

“अहो ऐकलं का…शेजारच्या वहिनी सांगत होत्या की काल आपला बंड्या बिल्डिंगच्या मागे त्यांच्या मुला सोबत काहीतरी विचित्र गप्पा मारत होता…”आठवीत शिकणाऱ्या बंड्याची आई आपल्या नवऱ्याला सांगत होती..

उदाहरण नंबर दोन

“काय ग तु त्या कॉलेजमधील घटना ऐकलीस का..अगं एका मुलीने तिच्या बॉयफ्रेंड ला गर्ल्स हॉस्टेल मधल्या मुलींचे अंघोळ करताना चे व्हिडिओ पाठवले आणि त्या बॉयफ्रेंड ने ते लीक केले..माझा बॉयफ्रेंड सुद्धा माझ्याकडे माझे न्यूड फोटो मागत असतो..” 11वी मधील मुलींचे संभाषण.

दोन्ही उदाहरणं खरं तर आपल्या बहुतांशी घरांमध्ये घडत असलेल्या घटनांचे वास्तव आहे. जशी मुले मोठे होतात, साधारणतः मुलांमध्ये वयाच्या 11 ते 14 व्या वर्षी शारीरिक बदल दिसण्यास सुरुवात होते व मुलींमध्ये आज काल हे बदल 9 ते 13 व्या वर्षी दिसण्यास सुरुवात होते.

आता हे कोणते बदल असतात ते आपण समजून घेऊयात

1. मुलांमध्ये – आवाज फुटणे, खांदे विस्तारणे, छाती वाढणे , उंची वाढणे, चेहऱ्यावरती केस येणे, काखेमध्ये केस येणे , चेहऱ्यावरती मुरूम येणे(acne), गुप्तांगा भोवती केस येणे(pubic hair), वीर्य तयार होऊन झोपेत असताना ते बाहेर येणे, सकाळच्या वेळेत झोपेतून उठल्यावर लिंगामध्ये ताठरपणा जाणवणे, घामाचा वास येणे अशा प्रकारे नैसर्गिक बदल होतात.

2. मुलीं मध्ये – पाळी येणे, स्तनांचे आकार वाढणे, काखेमध्ये व गुप्तांगा भोवती केस येणे, उंची वाढणे, घामाचा वास येणे, कंबरेखालील भाग (pelvic girdle) मोठा होणे, चेहऱ्यावरती मुरूम येणे अशा प्रकारचे नैसर्गिक बदल होतात.

आता आपण मानसिक बदल काय होतात ते जाणून घेऊया.

यामध्ये अपोजिट सेक्स बद्दलचे आकर्षण म्हणजेच मुलांना मुलींबद्दल, महिलांबद्दल तसेच मुलींना मुलांबद्दल किंवा पुरुषांबद्दल आकर्षण वाटणे
सुरु होते.

काहीवेळा पौगंड अवस्थेतील मुलांना मुलांबद्दल व मुलींना मुलींबद्दल आकर्षण वाटू शकते ज्याला आपण समलैंगिक आकर्षण म्हणतो. त्यासोबतच होणाऱ्या मानसिक बदलांमध्ये आपण कोणीतरी असण्याची भावना ज्याला इगो म्हणतात तोसुद्धा मुला-मुलींमध्ये जाणवतो त्यामुळे या वयातील मुलांना कोणाचेही न ऐकण्याची प्रवृत्ती बळावते. खोडसाळपणा, आपण केलेल्या कृतीचे कौतुक व्हावे, आपल्याला लोकांनी बघावं अशा प्रकारचे विचार या वयातील मुलांमध्ये दिसतात.

वरील पहिल्या उदाहरणा मध्ये बंड्याच्या मनामध्ये स्त्रियांबद्दल चे आकर्षण बळावत होते ज्यामुळे तो त्याच्या मित्राशी बिल्डिंग च्या मागे बसून याबद्दल बोलत होता. अनेक घरांमध्ये मुले फोन मध्ये, किंवा टिव्ही मध्ये काहीतरी मादक फोटोज किंवा व्हिडिओ पाहताना आढळतात आणि त्या भावनांना कुठेतरी बाहेर येऊ देण्यासाठी समवयीन मित्राचा आधार घेतात. आता तो समवयीन मुलगा सुद्धा याच विचारांच्या गोंधळामध्ये असतो त्यामुळे दोघांनाही समजत नाही की हे नक्की कशामुळे होत आहे.

अशा वेळी पालकांची ही भूमिका असायला हवी की बंड्याशी शांतपणे बोलून त्याच्या मनातील प्रश्न जाणून घ्यावेत व त्याचे सखोल मार्गदर्शन करावे. यामध्ये लाजण्यासारखे काहीही नसावे. जर त्याला घरामध्ये योग्य प्रकारे समजावले गेले तर तो बाहेर वाईट मार्गाला लागणार नाही. आणि त्याच्या मनातील आकर्षण हे आदरा मध्ये बदलून जाईल. मुलांशी पालकांनी हे बोलले पाहिजे की हे होणारे बदल अगदी नैसर्गिक आहेत व प्रत्येक व्यक्तीला या वयामध्ये ह्यातून जावं लागतं.
अशाप्रकारे पालकच जर मित्र बनले तर बंड्या पुढे जाऊन एक आदर्श साथीदार व नंतर एक समजूतदार वडील बनेल.

आता दुसरे उदाहरण ज्यामध्ये अकरावीतील मुलींमध्ये संभाषण होत आहे ही तिचा बॉयफ्रेंड तिच्याकडे न्यूड फोटोज मागत असतो. आज काल लहान वयामध्ये रिलेशनशिपमध्ये असणे हे सुद्धा फार कॉमन झाले आहे यातून होणाऱ्या वाईट गोष्टीं बद्दल आपण पुढील लेखांमध्ये जाणून घेऊच, परंतु इथे या मुलीला हे समजत नाहीये की याचे पुढील दुष्परिणाम काय उद्भवू शकतात.

काहीवेळा असे दिसते की ब्रेकअप झाल्यानंतर बॉयफ्रेंड कडून हे फोटो लीक केले जातात किंवा सेक्सटॉर्शन केले जाते. अशावेळी होणारी हानी अपरिमित असते त्यामुळे जर पालकांनी मुलगी वयामध्ये येताना तिच्याशी योग्य संवाद साधला, तिला हे सर्व समजावून सांगितले की या वयात मुलांबद्दल चे आकर्षण वाटू शकते. परंतु त्यातून होणाऱ्या सायबर क्राईमचे धोके लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले पाहिजे.

आठवड्यातून किमान एक दिवस तरी पालकांनी मुलांशी पौगंड अवस्थेमधील बदल समजावून सांगण्यासाठी घालवला पाहिजे. मुलांसोबत शाळेमध्ये कॉलेजमध्ये काय घडत आहे याबद्दल गप्पा मारल्या पाहिजेत. या गप्पा मारताना कुठेही मुलांना असे नाही वाटले पाहिजे की त्यांची चौकशी होते आहे किंवा त्यांचे स्वातंत्र्य कमी होत आहे.

म्हणूनच मुला मुलींचे होणारे शारीरिक व मानसिक बदल आधी पालकांनी स्वतः समजून घेतले पाहिजेत व त्या अनुषंगाने मुलांशी मोकळ्या वातावरणामध्ये बोलले पाहिजे.

डॉ. ओंकार विश्वजीत बुलबुले.

लेखक हे लैंगिक आजारां मधील विशेषज्ञ
व रिलेशनशिप समुपदेशक आहेत.
8275836680

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

2 Comments

  1. Perfectly said! The topic is very important and need of day! Keep kon with the subject! Many social evils are the outcome Of lack Of knowlege Of sex education! It should be discussed and explored!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button