बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे एक कार्य कर्तृत्व..
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे एक कार्य कर्तृत्व..
✍️ उमेश गजभिये. मो. 9326887326.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना बाबासाहेब आंबेडकरांचा उजवा हात म्हटले जात असे. ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे राजकीय, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक वारसदार होते. ते सामाजिक क्षेत्र असो, किंवा धार्मिक क्षेत्र असो, किंवा राजकीय क्षेत्र असो, रिपब्लिकन पक्षाशी लोकांना जोडण्याचे काम असो, किंवा दलित आणि बौद्ध लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार असो, राजाभाऊ खोब्रागडे खंबीरपणे बाबासाहेबांच्या विचारांच्य सोबत असायचे. बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर या सर्व क्षेत्रात बॅरिस्टर साहिबांचे योगदान लक्षणीय आहे! बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे तरुणपणा पासूनच आयुष्य हे दलित जनतेकरिता संघर्षाशील राहिलेले आहे. श्रीमंत घराण्यात जन्म घेऊनही बहिस्कृत अस्पृश्य वर्गाच्या हितासाठी व कल्याणासाठी त्यांनी स्वतःचे सर्व आयुष्य अर्पित केले. 1920 च्या कालावधीत बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचा प्रभाव भारतात होता. यासंदर्भात तत्कालीन प्रसिद्ध नेते भगवती प्रसाद मिश्र लिहितात, “डॉ. आंबेडकर यांच्या प्रेरणेने व प्रयत्नाने मे 1920 ला, नागपूर शहरी छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली, अखिल भारतीय बहिस्कृत (अस्पृश्य) परिषद झाली. या नागपूरच्या परिषदेला यशस्वी करण्यासाठी चंद्रपूरचे श्री पत्रुजी खोब्रागडे व देवाजी खोब्रागडे यांचा प्रमुख वरदहस्त होता. या परिषदेत दोन्ही खोब्रागडे बंधू उपस्थित होते. यानंतर देवाजी खोब्रागडे हे डॉ आंबेडकर यांचे अनुयायी बनले आणि मृत्यूपर्यंत त्यांचे अनुयायी राहिले. 2 जानेवारी 1899 ते 28 जून 1966 हा देवाजीबापू यांचा काळखड आहे. यांचे अनेक व्यवसाय होते. खोब्रागडे कुटुंबांना श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखले जात होते. 1930 साली खोब्रागडे यांच्याकडे फोर्ड कंपनीची मोटारगाडी होती. यावरून आपल्याला खोब्रागडे यांच्या श्रीमंतीची कल्पना येते. याच श्रीमंत देवाजी खोब्रागडे व पत्नी इंदिराबाई यांचे मुलं म्हणून राजाभाऊ यांचा जन्म 25 सप्टेंबर 1925 ला झाला. राजाभाऊंच्या नाव भाऊराव ठेवण्यात आले. भाऊराव हे अस्पृश्य जनतेच्या मनावर जेव्हा राज्य करू लागले तेंव्हा त्यांना लोक त्यांना राजाभाऊ म्हणू लागले व हे नाव रूढ झाले. देवाजी खोब्रागडे हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राजकिय पक्ष “स्वतंत्र मजूर पक्षा तर्फे” 1936 मध्ये असेंम्बली च्या निवडणुकीत चांदा – ब्रम्हपुरी येथें निवडणूक लढले. त्यांना पंजा हे चिन्ह मिळाले होते. देवाजी या निवडणुकीत निवडून आले होते. देवजीबापू हे 1949 मध्ये बल्लारपूर नगरपालिकाचे अध्यक्ष झाले. अश्या या आंबेडकरी बाण्याच्या पित्याच्या पोटी राजाभाऊ यांचा जन्म झाला.
बॅरिस्टर राजाभाऊ यांचे संपूर्ण आयुष्य बघितले तर ते दलितांच्या उत्थानासाठी होते. त्यांनी जे आयुष्य वेचिले ते दलितांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व बौद्ध धर्मविषयक क्षेत्राला चळवळीचे रूप देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले तत्व त्यात ओतलेले आहे.
राजाभाऊ खोब्रागडे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आले. देवाजीबापू खोब्रागडे हे शिक्षणाला प्रथम प्राधान्य देत. बाबासाहेबांनी सांगितलेला शिक्षणाचा दृष्टिकोन ते दलित समूहात रुजवण्याचा प्रयत्न करीत. राजाभाऊंचे प्रथम शिक्षण नगरपालिका शाळेत झाले. 1931 मध्ये चंद्रपूर मधील नगरपरिषद शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. 1912 पासून ही शाळा फक्त अस्पृश्यांकरिता सुरू करण्यात आलेली होती. 1942 मध्ये राजाभाऊ हायर मॅट्रिक (11 वी) पास झाले. 1945 ला मॉरिस कॉलेज नागपूर मधून वयाच्या 20 व्या वर्षी ते बीए झाले.
बाबासाहेब आंबेडकरांनी व्हाइसरॉय कौन्सिलमध्ये अस्पृश्य विध्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी एक योजना मांडली होती. या संदर्भात देवाजीबापू 1945 ला राजाभाऊ यांना घेऊन बाबासाहेबांना भेटले. त्यांना बाबासाहेब म्हणाले, “मी परदेशी शिष्यवृत्तीने 15 विध्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवीत आहे. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या मुलाला राजाभाऊला परदेशी पाठवले. तर मी त्याऐवजी एक गरीब मुलाला आणखी पाठवू शकतो.” बाबासाहेबांचे हे म्हणणे देवाजीबापू यांनी मान्य केले. त्यानंतर देवाजीबापूंनी स्वखर्चाने राजाभाऊ यांना बॅरिस्टर ही पदवी घेण्यासाठी लंडनला पाठवले.
राजाभाऊ यांची बाबासाहेब आंबेडकरांसोबत प्रथम भेट 15 सप्टेंबर 1943 ला चंद्रपूर रेल्वे स्थानकावर झाली. तेव्हां त्यांचे वय 18 वर्षाचे होते. नोव्हेंबर 1949 मध्ये राजाभाऊ बॅरिस्टर झाले. ते 1950 ला हिमालय जहाजाने भारतात परतले. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा विवाह हा खूप उशिरा 28 मे 1973 ला आयु. इंदू कांबळे यांच्याशी झाला. राजाभाऊंच्या घरचे वातावरण हे राजघराण्यासारखे होते. व राजाभाऊ हे नावाप्रमाणेच राजा होते. ते अत्यंत दयाळू, उदार दानी, कर्तव्यदक्ष व न्यायी होते. बॅरिस्टर राजाभाऊंनी चंद्रपुरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलीचा व्यवसाय सुरु केला. बाबासाहेब आंबेडकरांशी झालेल्या भेटीत देवाजीबापूंनी राजाभाऊ ला समाजाच्या सेवेसाठी अर्पण करावे अशी इच्छा बाबासाहेबांनी व्यक्त केली. त्यामुळे बाबासाहेबांचा हा आदेश स्वीकारून राजाभाऊंना समाजसेवेकरिता देवाजीबापूंनी समर्पित केले व राजाभाऊंनी दलितांच्या उत्थानासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वप्रणाली नुसार स्वतःला वाहून घेतले.
बॅरिस्टर राजाभाऊ हे 1943 ते 1945 या कालखंडात मध्यप्रांत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे महासचिव होते. बॅरिस्टर होऊन परत आल्यावर त्यांनी पुन्हा फेडरेशनचे कार्य सुरू केले. समता सैनिक दलाचे बॅरिस्टर राजाभाऊ हे शिस्तबद्ध सैनिक होते. 1952 ते 1955 च्या काळात बॅरिस्टर राजाभाऊ हे चंद्रपूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष होते. यावेळी त्यांनी पालिकेच्या शाळेत अस्पृश्य शिक्षकांना संधी दिली व नेमणूक केली. दलितांना दुकानांचे मालकी हक्क दिले. ते दुकाने चालवून आजही अनेक दलित कुटुंब चालू केलेल्या धंद्यावर ताठ मानेने जगत आहेत. 1953 मध्ये नागपूर प्रदेश शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या बैठकीत सर्वानुमते नागपूर प्रदेश चे फेडरेशनचे अध्यक्ष करण्यात आले. नागपुर प्रदेशाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी संघटना बांधणीस फार महत्व दिले. लहान मोठी शहरे, गावे पालथी घालून प्रत्यक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. संघटनेचे जाळे सर्वदूर पसरवले. 1954 साली बाबासाहेब आंबेडकर भंडारा लोकसभा निवडणुकीत उभे होते. याची प्रचाराची जबाबदारी ही बॅरिस्टर राजाभाऊंवर होती. या निवडणुकीत बॅरिस्टर राजाभाऊ यांच्या संघटन चातुर्य, दलीतनिष्ठा, कर्तृत्व व चळवळीप्रती इमानदारी याची ओळखले बाबासाहेबांना झाली. बाबासाहेबांनी बॅरिस्टर मधील नेतृत्व क्षमता ओळखली. आंबेडकरी समाजकार्यात व राजकारणात बॅरिस्टर पेक्षा वयाने मोठी व अनुभवी जेष्ठ मंडळी असतांना बाबासाहेबांनी 1955 मध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे महासचिव पदी नियुक्ती केली. नवीन उमेदीच्या तरुणांना नेतृत्व देणे व पुढे करणे ही काळाची गरज आहे हे त्यावेळी बाबासाहेबांनी हेरले होते. यासंदर्भात भाष्य करतांना डॉ गंगाधर पानतावणे म्हणतात की, ” डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तरार्धात ज्या काही तरुणांवर भिस्त ठेवली होती त्यात बॅरिस्टर राजाभाऊ यांचे स्थान फार वरचे आहे.
बाबासाहेब आंबेडकरांच्या 6 डिसेंबर 1956 परिनिर्वाणानंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे शे. का. फे. चे अध्यक्ष हे डिसेंबर 1956 ते ऑक्टोबर 1957 पर्यंत होते. दादासाहेब गायकवाड यांच्या सूचनेनुसार बॅरिस्टर राजाभाऊ सर्वानुमते अध्यक्ष झाले होते. 31 डिसेंबर 1956 व 1 जानेवारी 1957 ला अहमदनगर येथे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक झाली. यात सर्वानुमते बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व राजकीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यासाठी “प्रेसिडियम” स्थापन करण्यात आले. याचे अध्यक्ष म्हणून राजाभाऊ खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. त्याच दिवशी या प्रेसिडियम च्या सदस्यांनी अहमदनगर येथे 10 हजार लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था व राजकीय पक्ष यांच्या कार्याकरिता बॅरिस्टर यांनी प्राणपणास लावले. कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करू लागले. समता सैनिक दलाच्या कार्याला गती दिली. भारतात सर्व ठिकाणी बौद्धधर्म दीक्षेचे कार्यक्रम बॅरिस्टर आयोजित करू लागले. व दीक्षा देऊ लागले. 1957 च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समिती व शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन यांनी एकत्रित निवडणूक लढवली. राजाभाऊ खोब्रागडे व दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा झंझावात निर्माण झाला. 9 मार्च व 11 मार्च 1957 ला मतदान झाले. निकालानंतर शे. का. फे. ला भरघोस यश मिळाले. महाराष्ट्रातुन 6 खासदार व गुजरात, म्हैसूर व मद्रास मधून प्रत्येकी एक खासदार निवडून आले. चळवळीचे मुखपृष्ठ “प्रबुद्ध भारत” या साप्ताहिकच्या 23 मार्च 1957 च्या अंकात शे. का. फे. चा झेंडा दिल्लीत फडकला असा वृत्तांत प्रकाशित करण्यात आला. यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेडरेशनचे सतरा आमदार निवडून आले. पंजाब मधून 5 आमदार, कर्नाटक मधून दोन, आंध्रमधून एक, गुजरात मधून दोन व मद्रास मधून दोन असे एकूण 29 आमदार निवडून आले. हे सर्व यश बॅरिस्टर राजाभाऊ अध्यक्ष असतांना घडून येत होतं.
शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा इतिहास लिहितांना बंधू माधव लिहितात, “बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची संघटना, त्याकाळी भारतातील इतर कोणत्याही पक्षाच्या संघटनेपेक्षा अधिक सरस, अधिक सकस, अधिक सक्षम व समर्थ होती. या पक्षाचे अनुयायी, इतर कोणत्याही पक्षाच्या अनुयायांपेक्षा अधिक निष्ठावान व अधिक त्यागशील होते. बॅरिस्टर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते निर्णय घेऊन, 3 ऑक्टोबर 1957 ला नागपूर मध्ये 7 लक्ष लोकांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली. एन. शिवराज हे आर पी आई चे प्रथम अध्यक्ष करण्यात आले.
अखिल भारतीय दलित फेडरेशन’ चे अध्यक्ष बॅरिस्टर राजाभाऊ यांनी 15 ऑगष्ट 1957 हा ‘निषेध दिन’ म्हणून पाळावयाचा आहे या प्रकारचे तातडीचे पत्रक प्रकाशित केले होते. त्या पत्रकात असे म्हटले की, “भारत सरकारने जाहीर केले आहे की, ज्या अनुसूचित (दलित) जातीच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यांना सरकारी सवलती व मदत मिळणार नाही. सरकारचे हे धोरण अत्यंत अन्यायकारक आहे. हे राजकीय आकसाने अवलंबिले आहे असे दिसते. धर्मातरामुळे शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीत एकाएकी बदल होऊ शकत नाही. ही गोष्ट सर्वमान्य आहे. याबाबतीत ‘दलित फेडरेशन’च्या नेत्यांनी सरकारकडे वेळोवेळी मागणी केली असूनही सरकारने या प्रश्नांचा योग्य तो फेरविचार केलेला नाही. या परिस्थितीत अखिल भारतीय ‘दलित फेडरेशन’ने 15 ऑगष्ट 1957 ला, या सरकारच्या अन्यायकारक धोरणाच्या विरुद्ध ‘निषेध दिन’ म्हणून पाळण्याचे ठरविले आहे.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे 1958 ते 1964, 1966 ते 1972 व 1978 ते 1984 या कालावधीत राज्यसभा मधील सदस्य होते. यात डिसेंबर 1969 ते 1972 मध्ये बॅरिस्टर हे राज्यसभेचे उपसभापती होते. रिपाई ला राज्यसभेत उपसभापती चा बहुमान मिळाला. त्यानंतर असा सन्मान हा कोणत्याही आंबेडकरी म्हणवून घेणाऱ्या राजकीय पक्षाला आजपर्यंत मिळलेाला नाही. राजाभाऊंच्या अशी उतुंग उंची व कर्तृत्व होते.
बौद्धांच्या सवलती, मागासवर्गीयांना बढतीत राखीव जागा, लक्ष्मी बँक प्रकरण, काश्मिरचे विलीनीकरण, अन्नधान्य धोरण, निवडणूक योजना, भाषावार प्रांतरचना, जमौनधारणा कमाल मर्यादा, पंचवार्षिक योजना, शिक्षणासाठी आर्थिक तरतूद, अनुसूचित जातीजमाती अहवाल, राष्ट्रीय एकात्मता इत्यादी विषयावर बॅरिस्टर राजाभाऊ यांनी संशोधनात्मक अभ्यासपूर्ण आणि वकृत्वशैली युक्त अशी भाषणे राज्यसभेत देऊन आपल्या वैचारिकतेचा परिचय घडवलेला होता. अनेक विषयांवर युक्तीवाद करून आपल्या मुत्सद्देगिरी परिचय घडवला. याबाबत ताराचंद्र खांडेकर म्हणतात, “बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे राज्यसभेत बोलायला उभे राहिले की, सर्वच राजकीय पक्षाचे खासदार राजाभाऊंचे भाषण गांभीर्याने ऐकत असत. त्यांची भाषणे ही आंबेडकरी तत्यप्रणालीनुसार करण्यात आलेली तर्कनिष्ठ, कालसंगत आणि कल्याणकारी असे विश्लेषण आहे. केवळ भावनिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित न करता एकूणच भारतीय प्रश्नांचा त्यामधून विचार प्रस्तुत झालेला आढळतो.”.
आपल्या वक्तृत्वाने, अभ्यासाने, बहुश्रुततेने राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आनुषंगिक प्रश्नांवर बॅ. राजाभाऊंनी भाष्य केले. अनेक शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले. परदेशात गेले. अनेकदा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीसारखे मातब्बर पुढारी त्यांच्या नेतृत्वात सदस्य होते. बॅ. राजाभाऊ यांच्या कुशलतेबद्दल प्रा. अशोक गोडघाटे म्हणतात. “लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील उपसभापतीपद विरोधी पक्षाला द्यायची प्रथा आता रूढ झालेली आहे. राज्यसभेत ही प्रथा बॅरिस्टरांच्या निवडीपासून सुरू झाली. त्याकाळी सर्वश्री. भूपेश गुप्ता, राजनारायण, नानासाहेब गोरे, निरेन घोष, चॅटर्जी यासारखे रथी महारथी सदस्य होते. सभागृहाचे कामकाज चालवताना सभापतीला कशी तारेवरची कसरत करावी लागते, हे आज अख्खा देश अनुभवतो आहे. वर उल्लेखिलेले सदस्य सभागृहात असतानाही बॅरिस्टरांनी सभागृहाचे कामकाज कौशल्यानं हाताळलं. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि व्ही. व्ही. गिरी यांच्यानंतर बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांनीच राज्यसभा कुशलतेनी हाताळली असं जाणकाराचं मत आहे.”
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 1959 आणि 1963 ला भूमिथिनांचा सत्याग्रह झाला. या सत्याग्रहाचा इतिहासात तोड नाही. याचे नेतृत्व हे दादासाहेब गायकवाड व बॅरिस्टर खोब्रागडे यांनी केलेले आहे. 1964 च्या भूमिहीन सत्याग्रहाला केवळ रिपब्लिकन चळवळीत महत्वाचे स्थान आहे. तर या सत्याग्रहाचा जागतिक स्तरावर ऐतिहासिक महत्व आहे. 1 ऑगस्ट 1964 रोजी देशाच्या विविध प्रांतातून 1 लक्ष लोकांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर एकत्र येऊन संसदेवर हल्ला बोलला. या मोर्चाचे नेतृत्व हे दादासाहेब गायकवाड, बुद्धप्रिय मौर्य व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी केले होते. भूमिहीनांच्या या सत्याग्रहाचा बॅरिस्टर राजाभाऊ यांनी आढावा घेतला. तेंव्हा 6 डिसेंबर 1964 ते 31 डिसेंबर 1964 पर्यंत या काळात 1,44,000 एवढ्या सत्याग्रहींना अटक झाली. त्यातील 1,03,000 सत्याग्रही हे एकट्या महाराष्ट्रातील होते. या आरपीआई पुरस्कृत सत्याग्रहाने भारत सरकारची झोप उडाली होती.
या सत्यगृहामुळे सरकारने एकूण 37,500 लोकांना एकूण 2,50,000 एकर जमीन वाटल्या गेली. बॅरिस्टर राजाभाऊ हे 1957 ते 1970 पर्यंत रिपाइचे सरचिटणीस होते. 1970 ला राजाभाऊ रिपाई चे अध्यक्ष झाले. 1970 साली लोकसभा अध्यक्ष ढिल्लन यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ अमेरिकेत निवडणूक पद्धतीचा अभ्यास करणासाठी गेले. त्यात राजाभाऊ खोब्रागडे हे ही होते.
भारतात निवडणुकीत बदल होणे आवश्यक आहे ही मागणी सर्व विरोधी पक्षानी उचलून धरली. राजाभाऊ यांना निवडणूक पद्धतीत बदल अभिप्रेत होता. त्यांना मागील 35 वर्षाच्या अनुभवावरून संयुक्त मतदारसंघाचा प्रयोग अयशस्वी झालेला आहे हे लक्षात आलेले होते. देशातील पददलित व अस्पृश्य लोकांच्या विधिमंडळामधील प्रतिनिधित्वासाठी विभक्त मतदारसंघ हाच पर्याय आहे, असे बॅ. राजाभाऊ यांनी 1969 रोजी मुंबईत एका पत्रकान्वये जाहीर केले होते. या पत्रकात बॅ. राजाभाऊ यांनी म्हंटले की “सध्याची मतदान पद्धती अनुसूचित जाती व जमातीच्या विधिमंडळातील प्रभावी प्रतिनिधित्वाच्या संबंधात निकामी ठरलेली आहे. जरी आज विधिमंडळामध्ये
प्रतिनिधित्व असले तरी मागास जमातीच्या संबंधाने संरक्षण करणे त्यांना अशक्य आहे. कारण जे योग्य प्रतिनिधित्वासाठी राखीव जागा वाढविण्यात आल्यास त्याबरोबर मतदान पद्धतीमध्ये सुद्धा बदल करण्यात यावा. नाहीतर लोकसभा व विधिमंडळे यामधं प्रतिनिधित्व कुचकामाचे ठरेल.”
द्विसदस्य मतदारसंघामुळे निवडणूक कमी खर्चात होते हे बॅ. राजाभाऊंना मान नव्हते. त्यांना एकसंघ मतदारसंघ अभिप्रेत होता. निर्वाचन क्षेत्र अलग झाल्यास राखीव उमेदवारास मतदारासमोर जावे लागेल. त्याला निवडून देण्याकरिता आपली ध्येय-धोरणे सर्व जातीधर्माच्या समुदायापुढे जाऊन समजावून सांगितले पाहिजे. याबाबत राज्यसभेत भाषण करताना बॅ. राजाभाऊ यांनी आपली भूमिका याप्रमाणे स्पष्ट मांडली, “या विधेयकाच्या उद्दिष्टात नमूद केल्याप्रमाणे द्विसदस्य मतदारसंघ रद्द करून दोन अलग निर्वाचन क्षेत्र केल्यास निवडणूक कमी खर्चाची व कमी त्रासाची होईल. या दृष्टीने विचार केला, तर अलग निर्वाचन क्षेत्र निर्माण केल्यास अनुसूचित जमातीच्या लोकांना अधिक खर्च करावा लागेल. श्री संथानम यांनी सुचविल्याप्रमाण द्विसदस्य मतदारसंघात अनुसूचित जमातीचा उमेदवार हा सर्वसाधारण उमेदवाराल चिकटलेल्या शेपटीसारखा असतो. आणि त्यामुळे त्याचा आपल्या निवडणुकीकरिता काही खर्च करावा लागत नाही. सर्वसाधारण उमेदवार खर्च करतो आणि त्याच खर्चात राखीव जागेवरील उमेदवार आपली निवडणूक लढवितो. माननीय सदस्यांच्या सुचविलेल्या खर्चाप्रमाणे निवडणूक कमी खर्चात होईल, हे मी मान्य करीत नाही.” याप्रकारे बॅरिस्टर राजाभाऊंनी सयूंक्त मतदार संघचा विरोध केला. व एक सदस्य उमेदवार याला पाठिंबा दिला. ही एक सदस्य पद्धत आज भारतात निवडणुकीत लागू आहे.
राजाभाऊ भारत सरकारला म्हणतात, “आम्हाला मिळणाऱ्या राजकीय सवलती काढून टाका; पण सामाजिक-आर्थिक सवलती मात्र कायम ठेवा.” लोकसभेत व विधानसभेत अनुसूचित जाती व जमाती यांचा राखीव जागांचा कालखंड पुढे वाढविण्यात येऊ नये, अशी त्यांनी भारत सरकारला केली.
बॅ. राजाभाऊ यांनी १९८१ मध्ये राज्यसभेत राष्ट्रीय एकात्मता कशी साधली जाईल? याविषयी असा प्रश्न निर्माण केला होता. आणि राखीव जागा का पाहिजेत याविषयी ते म्हणाले होते की, “घटनाकारांनी ही तरतूद का केली? सामाजिक न्याय हा यामागील हेतू आहे. शतकानुशतके दलित-आदिवासींना विकासाची संधी देण्यात आली नाही. धार्मिक इतिहासात मला शिरावयाचे नाही. मनुस्मृतीत म्हटले आहे की, अस्पृश्याने एखादा संस्कृत शब्द ऐकला, तर त्याच्या कानात गरम शिसे ओतावे, अशा सामाजिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आम्हास सवलती पाहिजेत. अमेरिका या लोकशाही राष्ट्राचाही ‘समान संधी’ या तत्त्वावर विश्वास आहे. तेथील निग्रोंना खास सवलती का प्रदान
करण्यात आल्या? कारण या मागे सामाजिक न्यायाचे आहे. त्या देशात गोरा माणूस गुणवत्तेने पुढे असला तरी निग्रोना नोक-यामध्ये प्रथम प्राधान्य देण्यात येते. पण या देशात गुणवत्तेला प्राधान्य असे म्हटल्या जात आहे काय? आम्हाला सवलती कायमच्या असे म्हणणे नाही. या सभागृहाला मला सांगायचे आहे की, दलित व आदिवासी जोवर इतरांच्या बरोबरीने येत नाही तोवर या सवलती राहणे आवश्यक आहे.”
याप्रकारे बॅरिस्टर राजाभाऊंनी संसदेत दलित व अदिवासी संबंधात सतत प्रश्न व समस्या यावर बोट ठेऊन सरकारला विचार करण्यास बाध्य केलेले आहे. आज जे दलित, आदिवासी व इतर मागासवर्गीय आहेत त्यांना जे हक्क आज प्राप्त आहेत. त्याचा सिंहाचा वाटा हा रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख व रिपब्लिकन शेर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना जातो.
1972 ला निवडणूक पध्दतीत बदल व्हावा याकरिता रिपब्लिकन पक्षाने देशव्यापी आंदोलन केले. ते बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली होते. भारताची राष्टाभाषा हिंदी असावी यावर बॅरिस्टर राजाभाऊंनी राज्यसभेत भाषण दिले आहे. याकरिता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला भाषाविषयक दृष्टिकोन स्वीकारला. भारतातील उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यांत दलितांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार संबंधित प्रश्न राजाभाऊंनी सतत राज्यसभेत विचारले आहेत. हुंडाबळी विधेयकाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा देतांना राजाभाऊंनी दिलेल्या राज्यसभेतील भाषणात समताधिष्ठित स्त्रीविषयक दृष्टिकोन याची प्रचिती येते. बॅरिस्टर राजाभाऊंनी कामगार चळवळी चालवल्या. कोतवाल संघटन, बिडी मजदूर युनियन, डेमॉक्रॅटिक इंडियन ट्रेड युनियन (डीटू) या संघटना राजाभाऊंनी उभ्या केल्या आणि त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले संघटनात्मक वैचारिक मूल्य व प्रतिष्ठा दिली.
बॅरिस्टर राजाभाऊंनी 1971 च्या जनगणनेत अनुसूचित जाती व बौद्धांची टक्केवारी ही चुकीची व पक्षपाती दृष्टीने तयार केलेली आहे असा आरोप करणारे एक पत्रक काढले.
मुंबई येथे 1973 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत बोलताना बॅरिस्टर राजाभाऊ “दलित पँथर” संदर्भात म्हणाले, “अलीकडे देशात बऱ्याच फुटीरवादी संघटना जन्म घेत आहेत. क्रांतिदल, दलित पँथरसारख्या संघटना शोषित, दलित समाजाचे नुकसान करणार आहेत. ज्यांना अशा संघटना काढून केवळ पुढारीपण करावयाचे असेल, तर त्यांनी कृपाकरून पुढारीपण करावे, परंतु समाजाचे नुकसान करू नये. ”
औरंगाबादला 1973 साली बॅ. राजाभाऊ म्हणाले, “दलित पँथर ही संघटना दलितांचे ऐक्य साधू शकत नाही उलट दलितांची संघटना खिळखिळी करण्याचे दृष्कृत्य ते करीत आहे.”
“साप्ताहिक प्रजासत्ताक’ला दिलेल्या एका मुलाखतीत 1974 ला बॅ. राजाभाऊ म्हणाले, “दलित पँथरची चळवळ ही समाजवादी पक्षाची निर्मिती आहे. मध्य मुंबईच्या निवडणुकीपासून कम्युनिस्टांनी पँथरला उचलून धरण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष हे दोन्ही पक्ष, दलित पँथरचा वापर करून दलितांच्या चळवळीला फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षाने हे जर थांबवले नाही तर, त्याच्याशी भविष्यकाळात कसे संबंध ठेवायचे याचा रिपब्लिकन पक्षाला विचार करावा लागेल.”
1975 च्या दशकात दलित पँथर चा कार्यक्रम नागपुरात इंदोरा चौक भागात होता. पँथरचे नामदेव ढसाळ हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर राजभाऊ खोब्रागडे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत होते. त्यावेळी तेथे हजर असलेले रिपब्लिकन पक्ष व समता सैनिक दलाचे निष्ठावान सैनिक दिवंगत युवराज गायकवाड व श्यामभाऊ डोंगरे यांनी नामदेव ढसाळ यांची सभा उधळून लावला. त्याबद्दल त्या दोघाना पोलिसांनी अटक केली. त्यांना नागपूरचे रिपब्लिकन पक्षाचे नेते ऍड सखाराम मेश्राम यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सोडवले. ज्या पँथरचा दरारा महाराष्ट्रात होता असे पूर्वीचे लोक सांगतात. त्या पँथर व नामदेव ढसाळ यांची सभा उधळवून लावण्याची ताकद ही नागपुर इंदोरा भागातील रिपब्लिकन पक्षाचे व समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांत होती. कारण त्यांना बॅरिस्टर राजाभाऊंच्या त्याग, बलिदान व त्यांचे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल समर्पण माहीत होते.
14 ऑक्टोबर 1956 ला नागपुरात बौद्धधर्म दीक्षा कार्यक्रम झाला त्यावेळी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचेचे सरचिटणीस होते. त्यामुळे नागपूरच्या धम्मदीक्षा कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडण्यासाठी त्यांनी ऍड बाबू हरदास आवळे जे समता सैनिक दलाचे प्रमुख होते व शे का फे चे प्रमुख नेते होते यांच्या सहकार्याने, बौद्धधर्म कार्यक्रम दीक्षासमिती ‘भारतीय बौद्धजन समिती” यांना सहकार्य करून हा दीक्षेचा कार्यक्रम यशस्वी केला. बाबासाहेबांचा जीवाला धोका होऊ नये व सुरक्षितेच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे एक गुप्तचर समूह नागपुरात टेहळणीसाठी नियुक्त केला.
नागपुरात 7 लक्ष लोकांच्या वर अस्पृश्यांनी बौद्ध धम्मदीक्षा घेतली. त्यानंतर देवाजीबापू खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बौद्ध जनसमिती ने चंद्रपूर मध्ये अल्प अवधीत 16 ऑक्टोबर 1956 ला बौद्धधर्म दीक्षा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते संपन्न केला. चंद्रपुरात 3 लक्ष अस्पृश्यांना बौद्धधर्म दीक्षा देण्यात आली. यातील खर्चाचा सिंहाचा वाटा हा खोब्रागडे परिवाराचा होता. 5 जून 1957 रोजी भंडारा जिल्हा चिखली येथे बॅरिस्टर राजाभाऊ यांनी 10 हजारांवर लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आयुष्ष्याच्या शेवटपर्यंत राजाभाऊ हे बौद्ध धर्मदीक्षेचे कार्यक्रम लावत राहिले व धम्मदीक्षा देत राहिले. ते ही रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष असतांना. दुसरा समाज रिपब्लिकन ला मतदान करणार नाही अशी भीती त्याकाळी रिपब्लिकन नेत्यांना कधीच निर्माण झालेली नाही. नंतरच्या बहुजनवादी राजकिय पक्षाने बौद्धधर्म दीक्षा कार्यक्रम हा आजपर्यंत एकही लावलेला नाही. यावरून आंबेडकरी खरा राजकीय पक्ष कोण याचे मूल्यमापन होते. व बाबासाहेब आंबेडकरांशी व विचारामध्ये निष्ठावंत व इमानदार याची तपासणी होते. यात श्रेय व विजय हा रिपब्लिकन नेत्यांना जाते व यात रिपब्लिकन पक्षाचे शेवटचे सेनानी बॅरिस्टर राजभाषा खोब्रागडे यांचा वाटा व श्रेय हे ऐतिहासिक आहे.
राजाभाऊ खोब्रागडे यांनी 1961 साली राज्यसभेत युनिव्हर्सिटी ग्रंट्स कमिशनच्या रिपोर्टवर भाष्य करतांना बौद्ध धर्माच्या अभ्यासाकरिता एक चेअर निर्माण करण्याची सूचना केली होती. आज भारतात अनेक युनिव्हर्सिटी मध्ये अश्या बुद्धिस्ट चेअर आहेत. 1981 मध्ये खासदार राजभाऊ यांनी राज्यसभेत बौद्धांचे धार्मिक स्थळ श्रावस्ती, कुशीनारा, बौद्धगया व नालंदा यांच्या विकासाचा आराखडा सरकारने तयार केला यासंदर्भात प्रश्न विचारला. सरकारने नंतर यावर कार्य केले.
बाबासाहेब आंबेडकरांच्या या इमानदार रिपब्लिकन सेनापतीचे मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी भारतात अस्पृश्य दलित, जमाती, अदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक या वर्गाच्या हितासाठी जे शैक्षणिक, आर्थिक, नौकरीविषयक, शेती व भूमिहीनांना जमीन यासंदर्भात होते. याकरिता सतत राज्यसभेत खासदार म्हणून पाठपुरावा केला. दलितांना व बौद्धांना सतत न्याय मिळावा याकरिता सतत कार्य केले. बौद्धांची लोकसंख्या वाढावी व भारत बौद्धमय व्हावा हे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्तीसाठी सतत बौद्धधर्म दीक्षेची कार्यक्रम भारतभर लावली. या बाबासाहेबांच्या निष्ठावान अनुयायांचे मृत्यू दिल्लीत हृदयविकारमुळे झाला. त्यातच राजाभाऊ यांचे परिनिर्वाण झाले. तो दिवस 9 एप्रिल 1984 हा होता. 12 एप्रिल ला लाखोंच्या उपस्थितीत चंद्रपुरात त्यांची प्रेतयात्रा निघाली.
अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या सन्मानार्थ, भारत सरकारने 11 नोव्हेंबर 2009 रोजी एक टपाल तिकीट जारी केले. रिपब्लिकनच्या अश्या थोर महापुरुषांना आज 25 सप्टेंबर जयंतीदिना निमित्त विनम्र अभिवादन !
दिनांक 25 सप्टेंबर 2021 (सुधारित : 8 एप्रिल 2022 व 25 सप्टेंबर 2022)
-उमेश गजभिये. रिपब्लिकन पक्ष प्रचारक. व समता सैनिक दल “प्रणित” (आंबेडकरी बौद्ध चळवळ – समन्वयक प्रचारक)
✍️ उमेश गजभिये. मो. 9326887326.