मी प्रथम भारतीय आहे
मी प्रथम भारतीय आहे
*अलिकडे एक वाद जोर पकडू लागला आहे. तो म्हणजे आमच्यावर हिंदूंनी अत्याचार केले. आमच्यावर मुसलमानांनी अत्याचार केले. सर्रास ही गोष्ट व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेअर केली जात आहे. यात स्रियांनाही सहभागी करुन घेतले जात असून त्या भावनाशिल असल्याने त्यांच्या मनात अशी कलुषीत मानसिकता तयार केली जात आहे. यावर वेळीच ब्रेक लावला गेला नाही. तर या देशाचं लवकरच वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वप्रथम लोकांनी हे लक्षात ठेवावं की मी प्रथम भारतीय आहे. नंतर हिंदू आणि मुसलमान. त्व्हाच देश वाचेल व स्थैर्य टिकेल. भारत अखंड आणि अबाधीत राहिल. हे कोणीही विसरु नये.*
पुर्वी मुलींचे विवाह करतांना स्वयंवरही होत असत. स्वयंवरात मुलींना इच्छीत वर शोधून त्याच्या गळ्यात वरमाला घालायची परवानगी होती. त्यातच कोणीतरी शुरवीर येई व आपल्या बलसामर्थ्यानं स्वयंवरात सर्व योद्ध्यांना आव्हान करीत असे आणि सर्व राजांना हारवल्यावर त्या कन्येचं अपहरण करुन नेत असे. तेव्हा मात्र कन्यांना विचार येई. कारण मनायोग्य पती त्यांना मिळत नसे.
स्रियांचं मुळातच असं कुजबुजलेलं जीवन. पुर्वीपासूनच त्यांना कोणीही प्राथमिक स्थानच दिलं नाही. फक्त तिच्या सौंदर्याचाच ते उपभोग घेत गेलेत. बदल्यात त्यांना काहीही दिलेलं नाही. म्हणतात की त्याही काळात स्रिया विद्वान होवून गेल्या. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या. शास्रार्थ केला. शेजारच्या राज्यांना हारवलं. नव्हे तर आपली अब्रू जावू नये म्हणून त्यांनी स्वतः इच्छा नसतांना सतीप्रथा अवलंबली. परंतू त्या दुस-या राजांच्या वासनेच्या बळी ठरल्या नाहीत. बदल्यात काय मिळालं त्यांना. काहीच नाही. उलट आमचे राजे ती जीवंत असतांनाच तिच्यासमोर तिची सवत उभी करत. एका एका राजांना कित्येक पत्नी असायच्या त्या काळात आणि त्या स्रिया ते सगळं नाईलाजानं सहन करायच्या. कारण मायबापाचे संस्कार.
मुलगी जन्माला विरोध करणारी परंपरा पुर्वीपासूनच चालत आलेली असून आजही मुलगी झाल्यास आनंदोत्सव साजरा केला जात नाही. मुलगा जन्माला आल्यास लोकांना एवढा आनंद होतो की त्यांना वाटते या मुलाला कुठे ठेवू आणि कुठे नाही. सर्वात जास्त तर मुलगा जन्माचा आनंद वयोवृद्ध महिलांनाच होतो पुरुषांपेक्षा. त्या महिला असूनही. तरीही महिलांनी आपआपल्या काळात रणांगणावरही पुरुषार्थ गाजवला आहे अर्थात पराक्रम केला आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजारामाची पत्नी ताराबाई, शिवरायांच्या मातोश्री जीजाबाई, अहिल्याबाई होळकर, रजिया सुलताना इत्यादी स्रिया रणांगणावरही लढल्या. तसेच सीता, उर्मीला, मंदोदरी, द्रोपदी, कुंती याही स्रियांनी त्यांचे पती असलेल्या पुरुषांना सोबतच केलेली आहे. आज अशी कितीतरी स्रियांची उदाहरणे आहेत की ज्या स्रियांनी आपल्या पुरुषांना मदत केली आणि अशा कितीतरी स्रिया इतिहासात होवून गेल्या की ज्या स्रियांची नावंही आपल्याला माहित नाहीत.
महत्वपुर्ण गोष्ट ही की ज्यावेळी या स्रियांचे पती रणांगणांवर मरण पावले आणि त्यांच्या स्रियांना अपहरण करण्याचा प्रयत्न केल्या गेला, तेव्हा या स्रियांनी जोहार करीत स्वतःला संपवलं. तेही संबंध राज्यातील स्रियांसह. त्यात विरांगणा राणी पदमावती व राणी संयोगीताचा समावेश आहे. आज ब-याच जणांना इतिहासाची एवढी भूरळ पडली आहे की त्यांना महाराणी पदमावती आणि महाराणी संयोगीताच आठवत नाही. त्या कोण होत्या? कोणाच्या राण्या होत्या हेही आठवत नाही. एवढंच नाही तर येथील राजांना ठार केल्यानंतर विदेशी मंडळींनी (मोहम्मद बिन कासीम) या देशातील राजा दाहिरच्या मुलींना बगदादला नेलं. तेथील खलिफाला बक्षीस द्यायला. जेणेकरुन त्यांच्याशी खलिफाला विवाह करता यावा व एक दिवसाच्या अंथरुणाची सोय व्हावी यासाठी. तेव्हा ते अंथरुण स्विकार नसलेल्या राजा दाहिरच्या मुलींचं बलिदान आज व्यर्थ गेल्यासारखं वाटतं. आज सिंध प्रांत टिकविण्यासाठी राजा दाहिर लढला मोहम्मद बिन कासीमशी. पराभवात मारला गेला मोहम्मद बिन कासीमकडून. त्यानंतर मोहम्मद बिन कासीमनं त्याच्या मुली सुर्यादेवी उर्फ सुलेखा व प्रेमादेवी यांना खलिफासाठी पाठवलं होतं. परंतू त्या दोन्ही मुली खलिफाच्या हाती लागल्याच नाही. उलट त्यांनी युक्तीनं मोहम्मद बिन कासीमला तर ठार केलंच. व्यतिरीक्त खलिफालाही आणि स्वतःच आत्मबलिदान केलं. परंतू आजच्या पिढीला हे माहित नाही.
महत्वाचं म्हणजे ज्या लोकांना राजा दाहिरच माहित नाही. त्या लोकांना प्रेमादेवी व सुर्यादेवी क? हे कसं माहित असणार.
आज हा हिंदू , हा मुसलमान असा सतत वाद चालतो. कोणी हिंदूच्या बाजूनं बोलतात. कोणी मुसलमानांच्या. कोणी म्हणतात की या देशात हिंदू धर्मच नव्हता. विशेष सांगायचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे त्या हिंदू मुसलमान धर्माचं. ज्या भारतात आपण राहतो, त्या देशाचा विकास सोडून आपण फुकटच हा हिंदू हा मुसलमान. काही म्हणतात हिंदू चांगले. काही म्हणतात मुसलमान. काही म्हणतात मुसलमानांनी आपल्यावर अत्याचार केले. काही म्हणतात हिंदूंनी आणि मग अशाच गोष्टी व माहिती प्रसारीत करु करु समाजात कलुषता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. खरं तर अशा प्रकारावर बंदी आणायला हवी. ती आणलीही जाते. परंतू तेव्हा म्हटलं जातं की आमच्या विचारस्वातंत्र्यावर गदा येते. परंतू विचार करा की अशा प्रकारच्या गोष्टी करुन देशाचं स्थैर्य व विकास बाधीत होत नाही का? होतो. मग अशा गोष्टी का करायच्या? त्या करण्याची गरज आहे का? याचं उत्तर नाही असंच येईल. माहित आहे की जुनं ते सोनं आहे. परंतू ते सोनं आता मातीमोल झालंय. आता नव्यानं चालण्याची गरज आहे. स्रियांनाही प्राधान्य देण्याची गरज आहे. आता इथे कोणी स्पृश्य नाही, कोणी अस्पृश्य नाही. कोणी हिंदू नाही. कोणी मुसलमान नाही. फक्त आपण सगळे भारतीय आहोत. हीच विचारधारा अंगी बाळगायला हवी. कारण ही विचारधारा जर आपण अंगी बाळगली नाही व आमच्यावर हिंदूंनी अत्याचार केला, आमच्यावर मुसलमानांनी अत्याचार केला. असे वारंवार म्हणत राहिलो तर ते राष्ट्रीय ऐक्याला बाधक ठरेल व देश टिकणार नाही. या देशातही दंगे भडकतील व याही देशाचा अफगाणिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. महत्वपुर्ण गोष्ट ही लक्षात ठेवावी की आपण सगळे प्रथम भारतीय आहोत. मग हिंदू आणि मुसलमान. तसेच स्रिया मुळात भावनाशिल आहेत. निदान त्यांच्या तरी विचारात तसे विष जावू देवू नका म्हणजे झालं.
अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०