Tech

सावधान!सोशल मीडिया वापरताय तर मीडिया संशोधकांनी मांडलेली ही साक्षरता तुम्हाला स्वीकारावीच लागेल

सावधान !सोशल मीडिया वापरताय तर मीडिया संशोधकांनी मांडलेली ही ही साक्षरता तुम्हाला स्वीकारावेच लागेल

आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जग झपाट्याने वैश्विक खेड्यात रूपांतरित होत आहे. मानवी समाजाला अधिकाधिक प्रगत करण्यात या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा वाटा आहे. आज साक्षर-निरक्षर, अबाल-वृद्ध, स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता सर्वांच्या हातात माहिती तंत्रज्ञानाचे जाळे येऊन पोहोचलेले आहे. आपण माहिती तंत्रज्ञानाच्या जाळ्यात गुंतल्या गेलोत. वयस्क स्त्री-पुरुषासह तरुण, तरुणी, लहान मुलं आदी सर्वच वयोगटातील लोकं ऑनलाईन प्रक्रियेत गुंतून पडलेले आहेत.

आज आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी क्षणार्धात कधीही, कोठेही, कुणाशीही संवाद (संपर्क) साधत आहोत. अर्थातच बोलणं, पहाणं इथपर्यंत आपण आलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टी या सोशलमीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणत आहेत, सध्या असा माध्यमांचा उपयोग आपण करत आहोत. “समाजमाध्यम ही दुधारी तलवार आहे,” याचे भान देखील आपण बाळगले पाहिजे. ही माध्यमे आपल्यासाठी चांगल्या पद्धतीची कार्य करत असतानाच त्याचे काही दुष्परिणाम ही सध्या दिसून येत आहेत. एकमेकांना ब्लॅकमेल करणं, एखाद्या मोठ्या रकमेचं आमिष दाखवून बँकेमध्ये जमा असलेली रक्कम लंपास करणं अशा अनेक प्रकारच्या घटना आज प्रसारमाध्यमांमध्ये दिसून येतं आहेत आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. तरीही लोकं ही बाब गांभीर्याने घेत नाहीत, हे ही दिसत आहे. या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट लक्षात येते की, आपण फक्त शिक्षित झालो आहोत, आपल्याला फक्त तंत्रज्ञान हाताळता येतं आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर थोड्या प्रमाणात करताही येतो, परंतु त्याचा वापर कसा आणि कुठे, कशा पद्धतीने करावा याचं शिक्षण घेतलेलं नाही. त्यामुळेच मी म्हणतोय की चला, आपण ‘सोशल मीडिया साक्षर’ होऊया!

काही दिवसापासून प्रसारमाध्यमात ब्लॅकमेल केल्यामुळे अनेक मुलींनी आत्महत्या केल्याच्या बातम्या येत आहेत. आणि हा प्रकार थांबायचे नाव घेत नाही. चंदिगढ विद्यापीठातील विद्यार्थिनीचे सामूहिक अर्धनग्न फोटो, नांदेडच्या क्रीडा शिक्षकाने प्रशिक्षणार्थीचे कपडे बदलताना बनवलेले व्हिडिओ यातच भर म्हणजे प्रेयसीच्या बहिणीचे अर्धनग्न फोटो काढून प्रियकराने ब्लॅकमेल केल्यामुळे अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली आहे, हे दुष्ट चक्र थाबण्यास तयार नाही.

सेवानिवृत्त नागरिकांना देखील ऑनलाईन फ्रॉडचे चटके बसत आहेत. स्मार्टफोनमुळे त्यांना आर्थिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागत आहे. एखादी गोष्ट स्वतःहून आपण सोशल मीडियावर टाकून त्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करत असतो किंवा करतो त्यात काय चांगल आहे किंवा वाईट आहे, याचा आपण विचार करत नाही. पण त्या प्रसिद्धीमधून जर एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीची असेल तर त्याचा दुरुपयोग तिसऱ्या व्यक्तीने केला तर मात्र आपल्यासारख्यांची गोची होते, हेच सत्य आहे. समाजमाध्यमे वापरत असताना आपण ती कशी वापरावी त्याच्यावर आपल्याला परिपूर्ण माहिती असावी. आज आपण सोशल मीडिया म्हणजेच व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, रिल्स, विविध व्हिडिओ ॲप अशा विविध माध्यमातून आपण आपली प्रतिमा, विचार, मत मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे सगळं करत असताना आपल्या खासगी जीवनाबाबतची गोपीनियता भंग पावते, याकडे लक्ष देत नाही.
समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या काळानंतर लोकांना पैशाची जास्त गरज भासत असताना ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या लोकांनी विविध ॲप बाजारात आणले, अशा ॲपच्या माध्यमातून लोकांना लोन देण्यात आलं. ते लोन घेत असताना अनेकांनी त्या संबंधित ॲपच्या सर्व अटी न वाचताच मान्य केल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो की तुम्ही तुमच्या फाईल्स, फोटो, कॉन्टॅक्ट गॅलरी मधली सर्व माहिती आमच्या सोबत शेअर करणार आहात किंवा त्या ॲप ओपन करण्यासाठी वरील सर्व गोष्टी आवश्यक आहेत अशा पद्धतीचा मजकूर त्यामध्ये दिलेला असतो. असं असतानादेखील आपण त्याला हो म्हणतो आणि आपला जो काही उद्देश आहे तो पूर्ण करण्यासाठी त्या ॲपला आपण संमती देतो. आणि त्यातून मग एखाद्या ॲपमधून आपली ब्लॅकमेल, फसवणूक इत्यादी काही गोष्टी घडून येत असतात. याला कारणीभूत आहोत ते आपणच, कारण आपल्याला माध्यमांचा वापर कसा करायचा याबद्दल आपण साक्षर झालो नाही, असं म्हणायला काही हरकत नाही. ऑफलाइन पद्धतीमध्ये जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कितीतरी प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात, पार पाडाव्या लागतात, त्यानंतर तुम्हाला लोन दिले जातं. आपण विचार करायला पाहिजे की, ऑनलाईनमध्ये आपल्याला सहजासहजी का लोन उपलब्ध करून दिले जात आहे, यातून काही धोका तर निर्माण होणार नाही ना? याची काळजी आपल्याला घ्यावयाची आहे.

माध्यमांचा अभ्यास, पुरेशी माहिती आपल्याकडे नसल्यामुळे अशा गोष्टी आज वाढत आहेत. आपण एखादी गोष्ट, एखादी घटना, एखादी फोटो, एखादा व्हिडिओ समाज माध्यमावर शेअर करत असताना आपण काळजी घ्यायला हवी की, त्यातून आपली वैयक्तिक माहिती तिथे चालली आहे का, त्याचा कोणी दुरुपयोग करणार नाही ना, याचा आपण विचार केला पाहिजे. काहीजणांच्या माहिती या केवळ नकळत फॉरवर्ड केल्या जातात. एकानी पाठवले म्हणून दुसऱ्याकडे पाठवलं जातं आणि दुसऱ्याकडून आलं म्हणून तिसऱ्याकडे पाठवल जातं, अशा पद्धतीचं काम आपण करत असतो. व्हॉट्सॲपमध्ये एक ऑप्शन/पर्याय आहे, तुमच्यापर्यंत एखादा मेसेज आलेला असेल तो किती वेळा फॉरवर्ड झालेला आहे, म्हणजेच अनेकांनी तो एकमेकांना पाठवला आहे, याची माहिती मिळते. तरीदेखील आपण त्याची शहानिशा न करता ती माहिती इतरत्र पाठवत असतो आणि त्यातून बऱ्याच काही गोष्टी घडत असतात. मुलींच्या संदर्भात किंवा मुलांच्या संदर्भात एक गोष्ट अशी आहे की आपण कोणासोबत कशा पद्धतीचा फोटो किंवा व्हिडिओ करतोय याच्यातून काही दुष्परिणाम होतात की नाही या संदर्भातली माहिती आपण घेणे खूप गरजेची गोष्ट आहे. आपण कोणते फोटो घ्यावेत आणि ते का घ्यावेत तसेच ते कोणत्या माध्यमात पोस्ट करावेत आणि का? हे सर्वांनी स्वतः विचार करून निर्णय घेतला पाहिजे. याबद्दलची माहिती म्हणजे साक्षरता तुमच्यात आणि आमच्यात येणे खूप गरजेची गोष्ट आहे.

आपण दररोज वर्तमानपत्र वाचतो, वर्तमानपत्रांमधून विविध फसवणुकीच्या बातम्या आपण वाचतो आणि पाहतोसुद्धा तरीदेखील आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो, ही गंभीर बाब आहे. जर एखादी घटना आपल्या सोबत घडली तरच आपण त्यातून बोध घ्यावा का? तर नाही, काही गोष्टी आपण पाहून, वाचून, समजून, जाणून माध्यम साक्षर बनले पाहिजे.

आपण एखादा ग्रुप बनवतो त्या ग्रुपमध्ये सर्व सदस्यांना आपण एकत्रित आणतो आणि त्यानंतर त्यामध्ये आपला विचार विनिमयाचा प्रयत्न त्याच्यात आपण करत असतो. ग्रुप ॲडमिन असाल तर तुमचे कर्तव्य आहे की, ग्रुप मधील सदस्य कोण आहेत आणि आपल्या ग्रुपचा उद्देश काय आहे, याची जाणीव, माहिती वारंवार ग्रूपवर दिली पाहिजे. एखाद्याने दोन जाती, धर्म, विचारसरणीत तेढ निर्माण करणारी पोस्ट, फोटो, व्हिडिओ पोस्ट केली असेल तर ती पोस्ट समूह प्रमुख म्हणून तुम्ही काढून टाकली पाहिजे. ही ग्रुप ॲडमिनची नैतिक जबाबदारी असते. व्हॉट्सॲपने देखील सदस्यांची पोस्ट काढून टाकण्यासाठी ग्रुप प्रमुखाला ऑप्शन दिले आहे. त्यामुळे बऱ्याच काही प्रमाणात ग्रुप ॲडमिनला सुद्धा प्रोटेक्शन पद्धतीमध्ये काही नियमावली आलेले आहेत ते आपल्याला माहिती आवश्यक आहे. सोशल मीडिया माध्यमातून ज्यावेळेस आपण एखाद्याशी मैत्री करत असतो किंवा कोणाची ओळख आपल्यापर्यंत होते तर अशा वेळेस ती खरच व्यक्ती चांगली आहे किंवा वाईट आहे कमी वेळेमध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात येऊ नये. ती खरंच व्यक्ती आपल्या ओळखीची असेल तरच त्यांच्या सोबतचेमैत्रीपूर्ण संबंध समोर करावेत अन्यथा ते टाळावेत.

अननोन नंबर वरून आपल्याला कधी काही एसएमएस आले तर त्याला प्रतिसाद देऊ नये, एखादी वस्तू आपल्या घरात जर खराब झाली असेल तर आपण त्या कस्टमर केअरला फोन करतो आणि सांगतो की आमची वस्तू खराब झालेली आहे. पण आजकालच्या फ्रॉडमध्ये एक गोष्ट लक्षात आली की, कस्टमर केअरवाले बनून अनेकजण कस्टमरला फोन लावून विचारतायेत की, तुमची एखादी वस्तू खराब झाली आहे की चांगली आहे, काही मदत हवी आहे का? अशा प्रकारे देखील पैसे काढण्यासाठी किंवा फसवणूक करण्याचा मार्ग ते निवडत आहेत, ही गोष्ट गोष्ट लक्षात ठेवा. कधीही बँक अथवा कोणती कंपनी कस्टमरला वैयक्तिक फोन लावत नाही, तुमची माहिती विचारत नाही. याचा आपण विचार करणे गरजेची गोष्ट आहे आणि कधीही कोणताही एसएमएस आपल्याला ऑनलाईनमध्ये आलेला असेल तर त्याची सहानिशा करावी. खरंच असा मॅसेज येऊ शकतो का? मी कुठे तक्रारी अर्ज दिलेला आहे का? याबद्दलची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे.

आपण माध्यमं वापरत असताना आपल्याला एखादी फ्रेंड रिक्वेस्ट आली ती व्यक्ती आणि आपण कधी भेटलो आहोत का, आपण ओळखीचे आहोत का, याबद्दलची माहिती आपण घेणे खूप गरजेची गोष्ट आहे. एखादी पोस्ट टाकत असताना किंवा ती वाचत असताना त्यांच्या कोणत्याही लिंकवर जाऊन आपण ते क्लिक करू नये आणि आपली माहिती देऊ नये, अशा पद्धतीची काळजी घेणे गरजेची गोष्ट आहे.

माध्यम कशा पद्धतीने वापरावी त्याच्याबद्दलची माहिती सोशल मीडिया माध्यमातून घ्यावी. एखादं माध्यम किंवा एखादा ॲप तुम्हाला वापरायचा असेल तर त्या संदर्भात तुम्हाला YouTube सारख्या चॅनलवर सर्व काही माहिती दिलेली असते. एखादा फ्रॉड असेल तर त्याच्या संदर्भातली सुद्धा माहिती युट्युबवर दिली जाते. गुगलसारखी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण जाहिराती पाहतो त्या जाहिरातीत म्हटलेलं आहे, “बोलने से सब होगा” अशा पद्धतीचे टायटल आहेत. आपण ती माहिती घ्यावी आणि सोशल मीडियाचे साक्षर व्हावेत! यासाठी प्रयत्न करावेत, कोणतेही नवीन माध्यम वापरत असताना त्याची सविस्तर माहिती घ्या. त्याचे फायदे तोटे जाणून घ्या. जेणेकरून अनोळखी व्यक्तींसोबत जास्त प्रमाणात चॅट, व्हिडिओ अशा कोणत्याही गोष्टी शेअर करू नका. कारण एखादी गोष्ट आपण आर्थिक उलाढालीपोटी आमिषाचे बळी पडतो. कमी रकमेमध्ये जास्त परतावा असेल तर ती 100% फसवणुकीची गोष्ट असते, एवढी लक्षात ठेवा. आपण सोशल मीडियाचे साक्षर होऊया ही संकल्पना प्रत्यक्षात मांडत चला आणि सोशल मीडिया शिकत शिकतच साक्षर व्हा, पण त्याच त्या चुका पुनःपुन्हा करू नका. चला आता समाजमाध्यमावर वावरतांना काळजी घेऊया आणि साक्षर बनुया!

*© प्रा. प्रीतम लोणेकर*
पीएच.डी. संशोधक
माध्यमशास्त्र संकुल,
स्वारातीम विद्यापीठ, नांदेड
मो. 9860720646

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button