एकनाथराव, तुम्ही लय मोठं पाप केलंय..
एकनाथराव, तुम्ही लय मोठं पाप केलंय !*
✍🏻 प्रेमकुमार बोके
मा.एकनाथराव,
तुम्ही सध्या जरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आरुढ असले तरी तुम्हाला मुख्यमंत्री मानायला महाराष्ट्राची जनता अजिबात तयार नाही.कारण खरी शिवसेना आमचीच आहे हा स्वार्थी अट्टाहास धरुन तुम्ही जे आकांडतांडव केले होते,त्याच शिवसेनेचे नाव आणि चिन्ह तुमचा वापर करुन काही लबाड लांडग्यांनी गोठवण्याचा नीचपणा केला आहे.आता तुम्हालाही शिवसेना हे नाव वापरता येणार नाही व धनुष्यबाणही मिळणार नाही.त्यामुळे *याचसाठी केला होता का अट्टाहास !* अशी तुमची निर्भत्सना उभ्या महाराष्ट्रात सुरु आहे.फक्त एका पदासाठी आयुष्यभराची प्रतिष्ठा,सन्मान आणि इज्जत तुम्ही गमावून बसला आहात.ज्या शिवसेनेने तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला सर्वच काही दिले आणि मुख्यमंत्री पद सुध्दा तुम्हालाच देणार होते.पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना उध्दवजी पाहिजे होते म्हणून तुम्हाला ते पद मिळू शकले नाही.म्हणजे सर्वच काही मिळाल्यावरही जर तुमची महत्वाकांक्षा अघोरी आणि अमानवी रुप धारण करीत असेल तर तुम्ही फक्त पदांसाठी शिवसेनेत होते व तुम्हाला शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काहीच घेणेदेणे नव्हते असेच म्हणावे लागेल.
एकनाथराव, तुम्ही *अणाजीपंताच्या* कुटील कारस्थानाला बळी पडले आहात.अणाजीपंतांनी छत्रपती संभाजीराजांना सुध्दा कपटाने पकडून औरंगजेबाच्या स्वाधीन केले होते.परंतु संभाजीराजांनी शरणागती न पत्करता स्वराज्यासाठी हसत हसत आपल्या प्राणाचे बलिदान दिले.संभाजीराजांच्या अपमानामुळे या मराठी मुलुखातला प्रत्येक माणूस त्वेषाने असा काही पेटून उठला की औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात बांधावी लागली.आजही तुमच्या बेईमानीमुळे महाराष्ट्राच्या गावखेड्यातील प्रत्येक माणूस अतिशय संतप्त झाला आहे.बस,रेल्वे,आॕटोरिक्षा आणि चौकाचौकात तो तुमच्या गद्दारी बद्दल आणि अणाजीपंताच्या कपटाबद्दल अत्यंत संतापाने आणि रागाने बोलत आहे.आता सर्व मतभेद आणि पक्षभेद विसरुन या महाराष्ट्रात तुम्हा दोघांची राजकीय कबर बांधून महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या अस्सल व पवित्र भगव्याचे राज्य निर्माण करण्याचा विडा मराठी माणसाने उचलला आहे.आता छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या विचारांची जीवंत व ज्वलंत *मशाल* तुमचे विकृत व विद्रुप मनसुबे जाळल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा.
त्यामुळे उध्दवजींच्या पक्षाला आता नाव,चिन्ह कोणते मिळाले याला फारसे महत्व राहिलेले नसून फक्त आणि फक्त गद्दारांना आणि कपटी अणाजीपंताला त्यांची लायकी दाखवून त्यांचे थडगे बांधणे एवढा एकच विषय महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनात घोंघावत आहे.मराठी माणूस संतापाने एवढा पेटून उठला आहे की,तो फक्त आता निवडणूकीची आतुरतेने वाट पाहत आहे.तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांचा *धनुष्यबाण* चालला नाही.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेली *शिवसेना* तुम्हाला चालली नाही.त्यामुळे तुम्ही प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवरायांचे कट्टर शत्रू आहे व शिवरायांच्या शत्रूच्या गोटात सामील होवून मराठी मन,माणूस आणि मातीसोबत गद्दारी केली आहे.या अपमानाचा बदला मराठी माणूस घेतल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा.चाळीस पैकी चारही आमदार निवडून येणे कठीण होणार आहे आणि अणाजीपंत तुमच्या मुर्खपणावर मनातल्या मनात दुष्ट व कुत्सित भावनेने हसणार आहे.मराठी माणसांच्या मनातून तुम्ही पूर्णपणे उतरले असून तुम्ही सर्व काही गमावून बसले आहात व एक गद्दार म्हणून तुमाची इतिहासात कायमची नोंद झाली आहे.
एकनाथराव, आम्ही संभाजी ब्रिगेडचे लाखो मावळे उध्दव साहेबांसोबत खंबीरपणे सोबत उभे आहोत.संभाजी ब्रिगेडच्या शेकडो आक्रमक वक्त्यांच्या तोफा जेव्हा या महाराष्ट्रात गरजायला सुरुवात होईल,तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल.आम्ही प्रबोधकारांच्या विचारांचे वारसदार आहोत.उध्दव साहेब प्रबोधनकारांचे नातू आहेत.या संकटाच्या काळात आम्ही प्राणपणाने त्यांना साथ देवून तुमचा नीचपणा महाराष्ट्राच्या घराघरात सांगणार आहोत.सेना-ब्रिगेड युती महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिल्याशिवाय शांत राहणार नाही हे लिहून ठेवा.शिव-शंभू सैनिक आता तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही.औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंगाला शिवरायांवर स्वारी करण्यासाठी पाठवले होते.पुरंदरच्या तहात महाराजांना अनेक किल्ले गमवावे लागले,पण निष्ठावान मावळ्यांच्या ताकदीवर शिवरायांनी पुन्हा उसळी घेतली आणि दुपटीने किल्ले हिसकावून घेतले.शेवटी जयसिंगाला औरंगजेबाने विष देवून ठार मारले.आपल्या बहिणीचा नवरा असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांसोबत स्वार्थापोटी गद्दारी करुन मोहम्मद घुरीला मदत करणाऱ्या जयचंद राठोडलाही घुरीने नंतर मारुन टाकले.त्यामुळे गद्दारांना कुठेच स्थान नसते.शेवटी त्यांचा अंत हा फार भयानक होत असतो.त्यामुळे एकनाथराव तुम्ही अणाजीपंताच्या जाळ्यात फसले असून हा अणाजीपंत तुमचे राजकीय आयुष्य उध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही.ज्या माणसाने आपल्याच पक्षातील मोठमोठया नेत्यांचे राजकीय जीवन बरबाद केले,ती व्यक्ती तुम्हाला काय चांगली वागणूक देणार ? एकनाथराव, तुम्ही महाराष्ट्राच्या मराठी मनाला फार वेदना दिल्या असून तुम्हाला हा महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही.*तुमच्या हातून लय मोठं पाप घडलं एकनाथराव !*
प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी
९५२७९१२७०६
११ आॕक्टोबर २०२२ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतीदिन)