कंतारा : भारतीय संस्कृतीशी नाळ जोडणारा चित्रपट
*कंतारा : भारतीय संस्कृतीशी नाळ जोडणारा*
– प्रा. विशाल पवार
भारतीय संस्कृती, अप्रतीम अभिनय, त्याला साजेस असं संगीत-पार्श्वसंगीत आणि एका समाजाचा संघर्ष अशा अनेक गोष्टींनी परिपूर्ण असलेला कंतारा हा सिनेमा.
‘कंतारा’ या चित्रपटाच्या कथेच्या मुळाशी एक लोककथा आहे. लहानपणी आज्जी-आजोबा जशा लोककथा किंवा दंतकथा ऐकताना आपण जसे संमोहुन जायचो अगदी तसच काही या चित्रपटाच्या कथेत आहे. ऋषभ शेट्टी, एक लेखक-दिग्दर्शक म्हणून एक जग निर्माण करतो आणि त्या जगात आपल्याला घेऊन जातो, खेळवतो, अनेक गोष्टी पाहायला लावतो आणि आपणं सर्व ते मोठ्या कुतूहलाने पाहत राहतो. एकही क्षण किंवा दृश्य रिकाम वाटत नाही आणि ‘कंतारा’च्या जगाकडे पाहत राहण्याची इच्छा अधिक प्रबळ होऊन जाते. ज्यापद्धतीने सगळं जुळून आलय तेव्हा फक्त एकच शब्द सर्वात अचूक वाटतो – आश्चर्यकारक!
या चित्रपटाची कथा ही जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका छोट्याशा गावाची कथा आहे. ‘कंतारा’ या शब्दाचा अर्थ होतो की खडबडीत जंगल. याचं जंगलाला “द-लिजेंड” असं नाव दिग्दर्शकाने दिले आहे. या सिनेमाचा हिरोच हे एक जंगल आहे, अस म्हटल तरी हरकत नाही. या जंगलातील रहिवाशांना समृद्धी आणणाऱ्या देवतेवर विश्वास आहे. या देवतेचा वार्षिक विधी ‘भूत कोला’ हा कथेचा मुख्य घटक आहे.
सिनेमाच्या सुरवातीला कुणीतरी एकजण गोष्ट सांगायला सुरवात करतो आणि सिनेमा सुरु होतो. असे म्हणतात की शांततेच्या शोधात भटकणाऱ्या एका राजाला जंगलात दगडाच्या रूपात ही देवता सापडली आणि त्याने एक अट घातली. जमिनीचा हा भाग गावकऱ्यांकडे राहील आणि राजाला शांती मिळेल, अशी अट आहे. या स्थितीचा नियम मोडल्यास मोठा विनाश होईल.
चित्रपटातील प्रमुख पात्र शिव आहे, ज्याचे कुटुंब पिढ्यानपिढ्या जंगलातील देवतेची पूजा करत आहे. पण शिव हा पूर्णत: मनमिळावू आणि स्वतःच्या मस्तीत जगणारा मुलगा आहे. ‘कंतारा’च्या पहिल्या 30 मिनिटांत ‘कंबला’ (म्हशींची शर्यत) दाखविण्यात आली आहे, ज्यावरून असे दिसून येते की शिव जितका मजेदार आणि शूर आहे तितकाच खूप लवकर भडकणारा आहे. जशी जशी ‘कंतारा’ ची कथा पुढे सरकते तसे शिव, त्याचे साथीदार, गावकऱ्यांचे जंगलाशी असलेले नाते समोर येते व नकळत त्या कंतारा च्या जंगलात दिग्दर्शक आपल्याला घेऊन जातो.
कथेत एक वनाधिकारी मुरली (किशोर) आहे, जो सरकारच्या वतीने जंगलाचा रक्षक आहे आणि त्याच्या मते, जंगलात गावकऱ्यांचा हस्तक्षेप निसर्गाला हानी पोहोचवणारा आहे. अशा स्थितीत जंगलाला आपले खेळाचे मैदान मानणाऱ्या शिवाचाही त्याला राग येतो. कथेच्या मुळाशी असलेली जंगलाची एक वेगळी कथा, त्या कथेच्या राजाचा सध्याचा वंशज देवेंद्र सुतार (अच्युत कुमार) हे देखील संपूर्ण पटकथेमध्ये एक महत्त्वाचे पात्र आहे. सिनेमाच्या सुरवातीलाच हे सांगण्यात येत की ही जंगलाची जमीन गावक-यांना कशी मिळाली आहे आणि आता ती जमिनी सरकारच्या ताब्यात जाणार का, ग्रामस्थांचे पुढे काय होणार, असे अनेक प्रश्न एकामागून एक उपस्थित होत राहतात.
कथा ज्या काळात घडत आहे त्या काळात जमिनीच्या बाबतीत काही लोक एकमेकांचे गळे कापायला तयार आहेत, असा काळ असताना राजाचे वंशज आपल्या पूर्वजांनी मानलेल्या देवतेची अट पूर्ण करणार का ? या प्रश्नाला घेऊन सिनेमा पुढे सरकत राहतो. शिव आणि त्याच्या पूर्वजांचा जंगलातील देवाशी असलेला संबंध संपूर्ण कथेवर कसा परिणाम करतो? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ‘कंतारा’ स्क्रीनवर पूर्ण पाहिल्यानंतर मिळतील.
‘कंतारा’ ची कथा आपल्या देशातील अशा अनेक लोकांची आणि समाजांची आहे जे थेट जंगलाशी जोडलेली आहेत. शिव आणि त्याच्या गावकऱ्यांप्रमाणेच देशाच्या अनेक भागांतील लोक अशा संघर्षात अडकले आहेत. हा संघर्ष जंगलातील लोक विरुद्ध सरकार, पोलीस, राजकारणी आणि अन्य इतर यंत्रणा यांच्यात आहे. हा संघर्ष याआधी देखील होता, आजही आहे, भविष्यात मात्र नसावा अशी अपेक्षा आहे. जंगल आणि मानवाच्या नात्यावर चित्रपटसृष्टीत फार कमी चित्रपट येऊन गेले मात्र या यादीत ‘कंतारा’ला खूप वरचे स्थान मिळू शकते.
तांत्रिकदृष्ट्या विचार केला गेला तर ‘कंतारा’ हा अतिशय दमदार चित्रपट वाटतो. अरविंद शेट्टीची सिनेमॅटोग्राफी खूप मजबूत आहे. चित्रपटात ‘कंबला’च्या खेळापासून ते भूत कोलापर्यंत आणि जंगलातील संपूर्ण दृश्य कॅमेरा ज्या पद्धतीने टिपतो, त्यात एक नावीन्य आहे. तसंच थिएटरमध्ये उपस्थित प्रेक्षक देखील प्रत्येक प्रसंगात चिकटून राहतात. पडद्यावर कथेची केलेली गुंफण, विलोभनीय दृश्य, सुमधुर संगीत यात प्रत्येक क्षणाला प्रेक्षण गुंतुन जातो आणि जणू काही सगळं आपल्या डोळ्यासमोर घडत आहे, असा भास निर्माण होतो.
स्पेशल इफेक्ट्स देखील खूप चांगले आहेत आणि कलर टोन डोळ्यांना खूप सुखदायक आहे. ‘कांतारा’च्या आवाजात केवळ दक्षिण कन्नड लोकांची स्थानिक अनुभूती नाही, तर त्यात एक गूढ घटक देखील आहे जो जंगलाच्या पुराणकथेशी संबंधित कथेला भयानक प्रकाराची अनुभूती देण्याचे काम करतो. चित्रपटाची अॅक्शन कोरिओग्राफीही अप्रतिम आहे.
ऋषभ शेट्टीची पटकथा आणि दिग्दर्शन उर्जेने परिपूर्ण भरलेले असुन त्याच्या पटकथे मध्ये एक प्रवाह आहे की जो पडद्यावर एकाही क्षणी सैल सुटत नाही आणि कथेपासून अपल्याला तोडत देखील नाही. त्याच्या दिग्दर्शनाची ताकद तुम्ही पडद्यावर पाहू शकता, पण एक अभिनेता म्हणून त्याने जे काही केले आहे ते जादूईपेक्षा कमी नाही आणि शेवटी “अप्रतीम” हे शब्द त्याच्या अभिनयासाठी पुरक ठरतात.
शिवच्या पात्रातील त्याची ऊर्जा संपूर्ण चित्रपटात सारखीच पसरलेली आहे आणि पडद्यावरची त्याची संपूर्ण आभा अप्रतिम आहे. चित्रपटाच्या शेवटच्या काही मिनिटांत ऋषभला पाहून त्याच्या अभिनयात काय जादू आहे हे तुम्हाला समजेल. शिवाच्या प्रेमिकीची भूमिका साकारणा-या सप्तमी गौडा यांनी देखील उत्तम काम केले आहे. आपल्याच समाजात राहुन त्यांच्या मदतीने एक पोलीस अधिकारी होणे, त्यानंतर त्याच समाजाच्या विरोधात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून उभा राहणे आणि यासोबतच शिव वरती असणारे प्रेम असा अभिनय साकाराताना त्या कुठेच कमी पडत नाही.
‘कंतारा’ हे दक्षिण कन्नड आणि तुलुनाडू प्रदेशातील लोककथा आणि लोकसंस्कृतीशी खोलवर जोडलेले एक अविस्मरणीय अनुभव देणारे थरार नाट्य आहे. हा चित्रपट मुळात कन्नड भाषेत बनलेला आहे आणि हिंदी डबिंगमध्ये पाहिल्यास, कथेची संस्कृती आणि प्रतीके समजून घेण्यात काही गोंधळ होऊ शकतो. जे संवाद विशिष्ट भाषेशी आणि संस्कृतीशी निगडित आहेत, ते हिंदीत रूपांतरित करताना काही परिणाम गमावतात. पण यामुळे कथा कमकुवत होते असे अजिबात नाही. ‘कंतारा’ला फक्त तुमच्याकडून थोडा संयम आणि एकाग्रता हवी आहे. त्या बदल्यात तुम्हाला मिळणारा सिनेमाचा अनुभव प्रेक्षणीय आणि संस्मरणीय असेल.
*- प्रा. विशाल पवार*
चिंचवड पुणे
मो.नं.9730921981